@सागर अग्नी
गोवा भाजपातील ज्येष्ठ नेते दामू (दामोदर) नाईक यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी गेल्या जानेवारी महिन्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. बालवयापासून संघ स्वयंसेवक असलेले दामू नाईक 1994 पासून म्हणजे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ता आहेत. आणि 1999 पासून सत्तेच्या राजकारणात सक्रिय आहेत, असा दामू यांचा इथवरचा प्रवास आहे. गोवा विधानसभेत आमदार म्हणूनही दामू दोन टर्म कार्यरत होते. तसेच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याआधी ते गोवा भाजपाचे जनरल सेक्रेटरीही होते. पक्षाने सोपवलेल्या नव्या जबाबदारीसंदर्भात दामू नाईक यांनी सा. विवेकशी साधलेला संवाद.
गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार अधिकाधिक लोकप्रिय ठरू लागले आहे, अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीतील पक्षाची रणनीती कशी असेल?
भाजपाची ताकद गोव्यात वाढली असून जनतेच्या राज्य सरकारकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. ज्यावेळी सरकार जनतेला आवश्यक सेवा सुविधा पुरविते, त्यावेळीच अशा अपेक्षा निर्माण होतात. ते स्वाभाविकही आहे. सरकार जर जनतेच्या अपेक्षा पुर्या करू शकले नाही, तर निवडणुकीच्या माध्यमातून तीच जनता सरकारला पायउतारही करते. सध्याच्या स्थितीत गोव्यात भाजपा सरकार जनतेच्या अपेक्षानुरूप विकास कामे करत असल्यामुळे ते लोकप्रिय ठरत आहे. सध्या गोव्यातली पक्ष आणि सरकारची स्थिती भक्कम असून निवडणुकीसाठी आणखी वेगळी रणनीती आखण्याची गरज नाही. आम्ही सरकारच्या कामांचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊ.
गोव्यात सध्या पक्षाची संघटना किती मजबूत आहे आणि सदस्यसंख्या किती आहे?
भाजपाचे गोव्यात सव्वा चार लाखांहून अधिक प्राथमिक सदस्य आहेत. त्यात साधारणतः दोन सव्वादोन लाख महिला तर लाखभर युवा सदस्य आहेत. राज्य तसेच जिल्हा व मंडल आणि बुथ समित्यांची निवड काही महिन्यापूर्वीच झाली असून पक्ष संघटना मुळापासून मजबूत आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची विकासकामे आणि त्यांची देशाविषयीची दूरदृष्टी जनतेच्या अपेक्षा वाढवत आहेत. 2012 ते आत्तापर्यंतच्या 13 वर्षातील कामांचा आढावा घेतल्यास, त्याआधीच्या 60 वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशाला मागेच ठेवल्याचे स्पष्ट दिसते. नेतृत्वाच्या अभावामुळे या पक्षाची सध्या वाताहातच झाली आहे. भाजपाचे कार्यकर्तेच पक्षाची खरी ताकद असून कार्यकत्यांची आमच्या पक्षात उणीव नसल्यानेे संघटना बांधणीत अडचणी आल्या नाहीत.
स्वकीयांचे रूसवेफुगवे सांभाळून पक्षाची धुरा पुढे नेताना अडचणीचे वाटते का?
अजिबात नाही. हे पहा, भाजपा हा खूप मोठा पक्ष आहे. एकाच घरात चार-पाच माणसे असतानाही मतभेद असतात. त्यामुळे पक्षातही असे असणे स्वाभाविक आहे. तरीही रूसवे फुगवे दूर करून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी जुन्यानव्या सगळ्याच कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. पक्षाच्या यशाच्या वाटचालीत सर्वांना घेऊन पुढे पाऊल टाकायचे हाच माझा प्रयत्न आहे.
सामान्य कार्यकर्ता ते आमदार व आता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या आपल्या वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांविषयी काही सांगाल का?
समाजकारणाचे ध्येय उराशी बाळगून मी राजकारणात आलो. त्याआधी मी साधा पक्ष कार्यकर्ताच होतो. मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी मी जमेल तशी पार पाडत आलोय. प्रखर राष्ट्रवादाच्या भावनेमुळे पक्षाशी जोडला गेलो आणि समाजकारणाची आवड यामुळे राजकारणात आलो. पक्षाशी निष्ठा ठेवून लोक जोडत गेलो. आमदार झालो तोच सत्तेतल्या सरकारातून. मात्र अडीच वर्षानंतर विरोधात बसावे लागले. विरोधात असताना जनतेच्या अनेक समस्या होत्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधी आमदार दोन्ही भूमिकांमधून खूप काही शिकलो.
भाजपायुमोचा अध्यक्ष असताना वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम व्हायचे. आजही ते चालू आहेत. युवांशी माझे चांगले संबंध तयार झाले. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडला पाहिजे, यासाठी पक्षासाठी झोकून काम केले. नि:स्वार्थीपणे जबाबदारी पेलत गेलो. या प्रवासात बरेच काही शिकलो, ज्याचा मला माझ्या राजकीय वाटचालीत खूप फायदा झाला.
भाजपाचे गोवा प्रदेश अध्यक्ष म्हणून पक्ष वाढीसाठी काही नवीन उपक्रम आखलेत का?
केंद्रीय पातळीवरून पक्षाच्या प्रसार आणि प्रचाराचे जे कार्यक्रम आखले जातात, ते तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम पक्ष संघटनेमार्फत सुरू आहे. बरीच कामे आहेत. पक्ष हे एक साधन असून त्या माध्यमातून लोकापर्यंत आम्ही पोचतो. कधी वेगवेगळ्या योजनांची माहिती घेऊन, वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आमचा लोकसंपर्क कायम ठेवला आहे. केवळ निवडणुकीपुरता लोकसंपर्क न ठेवता तो नित्य असावा यासाठी पक्षाच्या केंद्रीय उपक्रमाद्वारे आणि राज्याच्या आखणीनुसार पुढे जाईन.
भाजपा आणि संघ यांचे अदृश्य असे, पण जवळचे नाते आहे. संघ शिस्तप्रिय म्हणून ओळखला जातो. नव्या कार्यकर्त्यांना संघाची ओळख घडविण्यासाठी काही करणार का?
निश्चितच तसे प्रयत्न असतील. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे काम, केंद्रात आणि राज्यात धावणारी विकास एक्सप्रेस सोबतच बलशाली भारताचे स्वप्न पाहताना संघाकडे दुर्लक्ष होऊच शकत नाही. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संघाची ओळख होणे गरजेचे आहे. त्यातही कुठे कमी पडू देणार नाही.
2027च्या निवडणुकीची तयारी कधीपासून सुरू होणार आणि जनतेसमोर यावेळी कुठले मुद्दे घेऊन जायचा विचार आहे?
जनतेसमोर जाताना विकासाचा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. पायाभूत सुविधांचा विकास, रस्त्यांचे विणलेले जाळे, पर्यटन, आरोग्य, कृषी, उद्योग, आयटी क्षेत्रातील सरकारची कामगिरी, गुंतवणुकीच्या माध्यमातून निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी हे विषयही आहेतच. केंद्रातील मोदी आणि राज्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारची कामगिरी जनतेने अनुभवली आहे. त्यामुळे या विषयांत केलेली कामगिरी घेऊन आम्ही लोकापर्यंत जाऊ.
सेवा, सुशासन आणि गरीबांच्या कल्याणाची अकरा वर्षे, या पार्श्वभूमीवर आयोजित संकल्प से सिद्धी तक अभियानाचा काय फायदा अपेक्षित आहे?
या अभियानातून केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीची माहिती पुस्तिकाच आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. आमच्यासाठी हे अभियान लोकसंपर्क कायम ठेवण्यासाठी खूप उपयोगी असून सामान्यापर्यंत त्याद्वारे आम्ही पोचू. शिवाय या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहितीही आम्ही घरोघर पोचविण्याचा प्रयत्न करू.
समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या योजना पोचल्या तर भविष्यातील विकसित भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. हे स्वप्न साकार करण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, जरूरीचे आहे. पक्ष कार्यकर्ते जेव्हा जनतेच्या संपर्कात असतील, तेव्हा लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे सोपे होईल.
एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने पक्षाचा राज्यातील पुढील प्रवास सुनिश्चित करू.
लेखक गोवा येथील वरिष्ठ पत्रकार आहेत.