सुनील किटकरु
9890489978
29 मे पासून मणिपूरमधील इंफाळ येथे सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामध्ये तीस हजारांहून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नव्वद ठिकाणी भूस्खलन झाले आहे. शेतीचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक विस्थापित झाले. यानंतर मणिपूरमधील तीनशे संघस्वयंसेवक आपल्या जीवाची व घरदाराची पर्वा न करता पूरग्रस्तांच्या मदतीस तत्परतेने धावून गेले. त्यांनी ही मदत कशी केली. याबद्दल माहिती देणारा लेख..
मानवनिर्मित मैतेई-कुकी संघर्ष दोन वर्षांपासून मणिपूरला सुरूच आहे. त्यातच निसर्गनिर्मित पुराचे तांडव तेथील जनता अनुभवत आहे. कधी कधी असे वाटते की, मणिपूर शापित नंदनवन आहे की काय?
29 मे पासून सुरू तेथे झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. संततधार पाच दिवस होती. त्याने इंफाळ खोर्यास जलमग्न केले. दीड लाख लोकांना प्रभावित केले. तीस हजारांहून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नव्वद ठिकाणी भूस्खलन झाले आहे. शेतीचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यांच्यासाठी सत्तरच्या वर शिबिरे उभी करण्यात आली आहे. येथील वृद्ध व्यक्ती सांगतात की, “असे जलतांडव त्यांनी आजवरच्या आयुष्यात कधी पाहिले नाही.“ अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणिपूर येथील पूरग्रस्त लोकांच्या मदतीस धावून आला. मणिपूरमधील तीनशे संघस्वयंसेवक आपल्या जीवाची व घरदाराची चिंता न करता पूरग्रस्तांच्या मदतीस तत्परतेने धावून गेले. काँगबा, एरिल, नांबुल नद्यांना पूर आला होता. पुरामुळे नदीकाठावर असणार्या भिंतीना भगदाडे पडल्याने वस्त्यांत पाणी शिरले होते.
स्वयंसेवकांनी अशा स्थितीत पंचवीस जणांचे प्राण वाचविले. स्वयंसेवक पुराने वेढलेल्या तीन हजाराहून अधिक घरांपर्यंत पोहोचले. पूरग्रस्त लोकांना योग्य वेळी मदत शिबिरात पोहचविले. अन्नसामग्री, पिण्याचे पाणी, कपडे, औषधे, आवश्यक सर्व मदत त्यांना केली.
हैनग़, खुरई, क्षेजिगों, वाँखई, यस्कूल, कैथल, हैकरों, मेंखांक, सालंतोंग, नग़मेबोंग ते कांगपो कपी वस्त्यांमध्ये जीव धोक्यात घालून आपल्या बांधवांची मदत केली. याची स्थानिक माध्यमांनी दख़ल घेतली. मैतेई-कुकी संघर्षात, संघाने असेच मदतकार्य केले, त्यामुळे संघ कोणताही भेदभाव न बाळगता निरपेक्ष, नि:स्वार्थ सेवा करतो हे स्थानिक लोकांच्या मनात रूजले आहे.
या संकटकाळात सैन्य तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी सर्वतोपरी मदत केली. पण आरंभी तंगोल या मैंतेई कट्टरपंथी संघटनेने खूप मदत केली. नरेन हैरम नामक स्थानिक पत्रकार म्हणतात, उत्तराखंड येथे तसेच हिमालयातील क्षेत्राने संघस्वयंसेवकांचे सेवाकार्य अनुभवले आहे. तसेच सेवाकार्य मणिपूरला आरंभी तंगोल या कट्टरपंथी संघटनेने केले ही आश्चर्याची गोष्ट आहे. आरंभी तंगोल ही कुकींशी सशस्त्र संघर्ष करणारी मैतेई संघटना आहे. नुकतेच त्यांचा नेता कनान व त्याच्या अन्य सहकार्यांना अटक झाली आहे.
त्याविरोधात मणिपूर बंदची हाक आरंभी तंगोल या संघटनेने दिली. शेत, पर्यावरण, क्रीड़ा यात आरंभी तंगोल संघटना सक्रिय आहे. संघटनेची प्रतिमा लोकांमध्ये चांगली करण्याचा आरंभी तंगोल संघटनेचा प्रयत्न आहे. पूरग्रस्त लोकांसाठी सेवाकार्य केल्याने आरंभी तंगोल या मैंतेई कट्टरपंथी संघटनेची प्रतिमा बदलत आहे असे हैरमचे मत आहे.
या पावसाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, जवाहरलाल नेहरू इस्पितळामधून बोटीचा वापर करून रुग्णांना दुसर्या दवाखान्यात न्यावे लागले. या पावसाने श्री गोविंदजी मंदिर, शाळा, आमदार निवास तसेच औद्योगिक क्षेत्र जलमय केले. अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित स्थानी हलविण्यात आले. एक 57 वर्षीय व्यक्ती यात मृत्यू पावला. तसेच तीन लोक बेपत्ता आहेत. एवढीच मनुष्यहानी झाली. सरकार व स्वयंसेवी संस्थांनी हेल्पलाईन सुरू केली. यामध्ये 116 हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाली. या पुराचा फटका 706 गावांना बसला. तसेच 75 मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला. पाच हजार लोकांची सरकार व स्वयंसेवी संस्थांनी पुरातून सुटका केली.
प्लॅस्टिक कचर्यामुळे नाल्यांतून पाणी वाहून गेले नाही. तसेच भ्रष्टाचार झालेला असल्याने रस्ते, नदीकिनार्याच्या भिंती कुचकामी होत्या. जंगलतोड़, अफूची शेती या जलप्रलयाला कारणीभूत ठरल्या. या पुरामुळे जनतेमध्ये निराशेचे वातावरण असून तसेच नुकसान झाल्याबाबत दुःख आहे. प्रशासनिक अकार्यक्षमता तसेच पावसापूर्वीच्या नियोजनाचा अभाव, अशा कारणांमुळे हा जलप्रलय आणखी तीव्र स्वरूपाचा झाला. संपूर्ण इंफाळ शहर पाण्याखाली गेले, याला कारण प्राथमिक पूरनियंत्रण व्यवस्था कोसळणे होय. पूर्णपणे निसर्गाला दोष देता येणार नाही. मणिपूरचा पूर हा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम आहे. जे या परिस्थितीस कारणीभूत आहेत त्यांना जबाबदार धरण्यात आले पाहिजे. संघाचे कार्यवाह बिल्कि शर्मा म्हणाले की,“मैतेई-कुकी संघर्ष सुरू झाल्यापासून संघाची मदतशिबिरे सुरूच आहेत. पहाडी क्षेत्रात भय्याजी काणेंच्या प्रेरणेने अनेक विद्यालये सुरू आहेत. या पुराने विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन संघ व सेवाभारती तडीस नेईल.“ संघाने मणिपूर सेवाभारतीच्या माध्यमाने ’लोकहितम मम करणीयं’ ध्येय वाक्याप्रमाणे निरंतर कार्य सुरू ठेवले आहे.