ज्ञानोपासक दाजी पणशीकर

विवेक मराठी    17-Jun-2025
Total Views |
daji
दाजी पणशीकर यांच्या उत्कट विचाराबरोबरच त्यांची चिकित्सक अभ्यास वृत्ती, तसेच ते लोकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती, त्यांना सर्वसामान्य विचार करणार्‍या लोकांपर्यंत घेऊन गेली. चांगली माणसे जोडून देणे आणि मग स्वतः त्यातून बाजूला होणे हे दाजींचे स्वभाववैशिष्ट्य.
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे ।
शहाणे करून सोडावे, सकळजन॥
 
या उक्तीला समरसून जगलेले विचारवंत म्हणजेच दाजी पणशीकर. वेदांमधले, प्राचीन संस्कृतीतले, संत साहित्यातले ज्ञान सामान्य व्यक्तीपर्यंत साध्या- सोप्या- रसाळ वाणीतून पोहोचवणारे व्याख्याते म्हणजेच दाजी पणशीकर! महाकाव्यांचे संदर्भ घासून पुसून तपासत, त्यांचे अन्वयार्थ शोधत, त्यावरची काल्पनिक पुटे काढून मानवाच्या गुंतागुंतीच्या स्वभावानुसार कथेचा गाभा शोधत, त्याकडे पाहायचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्या लेखमालांमधून मांडणारे लेखक म्हणजेच दाजी पणशीकर!
 
 
गोव्याच्या भूमीत 1934 साली जन्मलेले दाजी पणशीकर म्हणजेच नरहरी विष्णुशास्त्री पणशीकर. आजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर यांच्या निर्णयसागर प्रेसमध्ये महाकाव्य, संत साहित्य यांच्या प्रतींचे शुद्धीकरण करण्याची संधी दाजींना लाभली. दाजींच्या आजोबांच्या पुस्तकांच्या प्रती आजही अभ्यासक देशपरदेशात प्रमाण मानतात. वडील विष्णुशास्त्री पणशीकर यांचा व्याकरणाचा अभ्यास दाजींच्या अभ्यासाचा पाया बनला. म्हणजेच दाजींचा इतिहास त्यांच्या उन्नत विचारधारेसाठी कारणीभूत ठरला आणि अर्थात त्या विचाराबरोबरच त्यांची चिकित्सक अभ्यास वृत्ती, तसेच ते लोकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती, त्यांना सर्वसामान्य विचार करणार्‍या लोकांपर्यंत घेऊन गेली.
 
 
म्हणजे दाजींनी नेमके काय केले? तर दाजींनी ’महाभारत: एक सूडाचा प्रवास’, ’कर्ण खरा कोण होता?’, ’कथामृत’, ’अपरिचित रामायण’, ’कणिकानीती’ आदि साहित्य निर्माण केले. या पुस्तकांमधून महाभारत, त्यातील पात्र यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न केला. कर्णाला एरव्ही मिळणारी सहानुभूती, केवळ दुर्योधनाला लागलेला क्रूरतेचा बट्टा, दाजींच्या पुस्तकांमुळे आणि पुढे त्यावर लोकाग्रहास्तव झालेल्या व्याख्यानांमुळे लोकांच्या मनात हळूहळू बदलून गेला. त्यांची ओघवती वाणी, बोलण्यातला ठामपणा, परखडपणा आणि मुख्य म्हणजे अतिशय साधी सरळ जीवनशैली जी मुळात एक आदर्श होती, त्याचा प्रभाव पडत केला.
 
 
गोव्यातून गिरगावात आलेले, रात्रशाळेत शिकलेले, अकरावी मॅट्रिक झालेले, विल्सन कॉलेजात एक वर्ष शिकण्यासाठी गेलेले दाजी पुढे असे लौकिक शिक्षणाची कास सोडून पौरोहित्य करते झाले. त्या नंतर नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक झाले. तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवला. मुंबईनंतर पुण्यात काही वर्ष एकनाथी भागवतच्या प्रतिवर त्यांनी काम केले. पुढे न. र. फाटक यांच्यामुळे संपूर्ण महाभारत तपासले. त्यांचे ज्येेष्ठ बंधू प्रभाकर पणशीकर यांच्यामुळे परत मुंबईमध्ये त्यांनी नाटकाचे व्यवस्थापक म्हणून काम केले. ते करत असतानाच आत्माराम सावंत यांनी गळ घातली म्हणून ’मराठा’मध्ये कर्णावर लिहिले.
 
 
त्यावेळी संपादकपदी शिरीष पै होत्या. मराठामधले लेख वाचून ते छापण्यावर आलेली बंदी, त्यानंतर त्यांचे ते सगळे लेख पहिल्यापासून ग. वा. बेहेरे यांनी छापणे आणि त्यामुळे ’सोबत’च्या प्रति 30-40 हजारापर्यंत जाणे असे परिणाम दाजींच्या लेखांमुळे झाले. वाचक चळवळीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
 
 
लेखन करताना, त्यातले विषय व्याख्यानातून मांडताना, कोणत्याही पुस्तकाच्या मुळाशी जाणे हा नियम दाजींनी आपल्या कारकिर्दीत कायम पाळला. त्यामुळेच देशभरात आणि देशाबाहेरची 2500हून अधिक व्याख्याने देताना त्यांच्या मांडणीने प्रभावित झालेले भक्तच तयार झाले. दाजींनी पुढे उत्तम विषय आणि उत्तम व्याख्याते स्वत:ही जोडून दिले. चांगली माणसे जोडून देणे आणि मग स्वतः त्यातून बाजूला होणे हेही काम दाजींनी अनेकदा व सहजतेने केले.
 
 
ज्या प्रमाणे दाजी महाकाव्य, प्राचीन संस्कृती ग्रंथ यांचे अभ्यासक-चिंतक होते; त्याचप्रमाणे त्यांचा पाया अध्यात्माचा होता. ते गुरु शिष्य परंपरेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे ज्ञान त्यांना त्यांचे गुरू म्हणजे मामा श्रीपाद शास्त्री किंजवळेकर यांच्याकडून मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या मुलीला, नंदिनीला त्यांनी याच परंपरेत किशोरीताई आमोणकर यांच्या हातात दिले होते. या किशोरीताईंच्या दिव्य प्रतिभेची जाण असल्याने दाजींनी त्यांच्यावर गौरव ग्रंथ करण्यात देखील पुढाकार घेतला. ’गान सरस्वती किशोरीताई आमोणकर: आदिशक्तीचा धन्योद्गार’ या नावाने तो गौरव ग्रंथ आला. अलौकिक प्रतिभेची एक व्यक्ती दुसर्‍या अशा अलौकिक प्रतिभा असलेल्या व्यक्तीला दाद देते हे यातून दिसून आले. दाजींची प्रतिभा सातत्याने दिसत राहिली अगदी 92 वर्षापर्यंत. वयाच्या 92 व्या वर्षी सहा जून 2025 रोजी ठाण्याच्या राहत्या घरात अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. प्रतिमेच्या पलीकडे देवाचा आशीर्वाद असणारी अशी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल.
 
 
- पल्लवी गाडगीळ