रघुवीर सुखदाता

17 Jun 2025 16:47:20


माणसाला अनुभवाने कळून चुकते की, आप्तस्वकीय, सभोवतालची माणसे आणि पैसा हे आपल्या शाश्वत सुखाकरिता, समाधानाकरिता उपयोगी पडत नाहीत. याचा अर्थ आप्तस्वकीय, सभोवतालची सर्व माणसे चांगली नाहीत किंवा पैसा वाईट आहे असा होत नाही. तर आप्तस्वकीय, आजुबाजूची माणसे अथवा पैसा यांच्याकडे पाहण्याची आपली मानसिकता योग्य नाही, त्यामुळे त्यांच्याकडून सुखासमाधानाची अपेक्षा करता येत नाही, हे नीट समजून घ्यावे लागते. आपल्या अंतःकरणात अहंभाव व देहबुद्धी असल्याने अशाश्वताच्या संगतीत आपण आनंद शोधण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो आपल्याला मिळत नाही. उलट अशा संगतीत दुःख वाट्याला येते. आपली वृत्ती न बदलता, आपण नको त्या ठिकाणी सुखाचा शोध घेत गेल्याने, ’विषयजनित सूखें सौख्य होणार नाही’ असे स्वामींनी यापूर्वीच्या श्लोकात सांगितले आहे. तथापि विषयनिर्मित सुखात आनंद नाही, हे माहीत असूनही आपण त्यांची संगत सोडत नाही, त्याचीच मनात आवड धरतो. म्हणून स्वामींनी यापूर्वीच्या 11व्या श्लोकात विचार मांडले आहेत की, ”स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे!’ आणि ’रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे’ यावर सविस्तर विवरण मागील लेखात आपण पाहिले. या विचारांतील आशयाचा धागा पकडून स्वामींनी त्याचा विस्तार पुढील श्लोकातून केला आहे. तो, ‘अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातील पुढील श्लोक असा आहे.

सकल जन भवाचे अखिले वैभवाचे।
जिवलग मग कैचें चालतें हेंचि साचें।
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥12॥

या संसारातील (विश्वातील) सर्व लोक (भौतिक) वैभवाच्या आधीन झालेले आहेत. (मग अशांना) जिवलग कसे म्हणायचे? (हे) असेच चालते (हे) सत्य आहे, अत्यंत बिकट प्रतिकूल काळ आला (की) हे सर्वजण सोडून जातात, (त्यामुळे त्यांचा उपयोग नाही, अशा प्रसंगी) सर्वांना सुख देणारा राम अंतकाळी (यातून) सोडवतो.

या संसारातील आपल्या भोवतालचे बहुतेक सर्व लोक या दृश्य भौतिक सुखानंदाच्या आहारी गेलेले आहेत, असे स्वामी म्हणतात. अशाश्वत भौतिक सुखाच्या मागे धावणारे हे लोक सतत त्याचाच विचार करतात.

त्यांना वाटत असते की, आपल्याला विनासायास हे ऐहिक वैभव प्राप्त व्हावे, त्यासाठी पैसा त्यांना अत्यंत प्रिय असतो. या पैशाच्या जोरावर आपण जगातील सर्वकाही विकत घेऊ शकतो, असा त्यांचा समज असतो. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने पैसा जमा करावा ही वृत्ती बळावते, पैशाच्या हव्यासापोटी नीती-अनीती मार्गाचे काही वाटेनासे होते. दुसर्‍याच्या कष्टाचा हक्काचा पैसा ओरबडण्यात काही पाप आहे, हा विचारही मावळतो. वैभवाच्या हव्यासापोटी ही माणसे पापाचे धनी होतात. पुढे या गोष्टी दुःखाला कारणीभूत होणार आहेत, हा विवेक उरत नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकात मनाला उपदेश करताना स्पष्टपणे सांगितले आहे की -

नको रे मना द्रव्य में पुढिलांचे ।
अती स्वार्थबुद्धी न रे पाप साचे ॥ (श्लोक 9)

एकंदरीत काय प्रत्येकाला ऐहिक सुखोपभोग हवा आहे, भौतिक, वैभव हवे, शांती हवी आहे. त्यासाठी पैसा हवा आहे. गैरमार्गाने आलेला पैसा सुख देऊ शकत नाही. त्याने अहंकार व देहबुद्धी वाढणार आहे. देहबुद्धी अहंकारात जगणारा माणूस सुखी होऊ शकत नाही. खर्‍या शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी अहंभाव व देहबुद्धी यांचा त्याग करून रामाला शरण गेले पाहिजे. शरणागततेत खर्‍या भक्तीचे बीज सापडते. या मार्गाने गेल्यावर शाश्वत आत्मसुखाचा अनुभव घेणे शक्य आहे. असे असताना बहुसंख्य लोक भौतिक सुखलोलुपतेच्या आहारी का आतात याचा विचार केला पाहिजे. अहंकार, गर्व, ताठा, आसक्ती, देहबुद्धी, विषयवासना, हाव हे त्याचे उत्तर आहे.

काही प्रसंगी विवेक जागृत झाल्यावर आपण आपला अहंकार कमी करायचे ठरवले तरी ज्या आप्तस्वकीयात अथवा सभोवतालच्या माणसात आपण वावरतो, त्यांचा अहंकार, त्यांची देहबुद्धी कमी करणे हे आपल्या हातात नसते. प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने या वैचित्र्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होतात. त्यातून मार्ग काढणे आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे असते. त्यामुळे आपणही शाश्वत सुखाचा, रामभक्तीचा मार्ग गुंडाळून ठेवून क्षणैक भौतिक सुखाकडे वळतो. संत रामदासांसारखा एखादा विचारी पुरुष आपल्या मन:सामर्थ्याने लोकांना विवेक सांगून सन्मार्गाला लावतो व त्यांना शाश्वत सुखाकडे, रामभक्तीकडे वळवतो. तथापि एकंदरीने सर्वसामान्य माणूस आपल्या विचारांना ताण न देता, त्याला क्षणैक भौतिक सुखाचे आकर्षण निर्माण झाले आहे. स्वामी म्हणतात की, प्रत्येकजण भौतिक सुखवैभवाच्या आधीन झाला आहे, (सकलजन भवाचे अखिले वैभवाचे) ते खरे आहे. आज तर आपण त्याची परिसीमा गाठली आहे. अशांच्या संगतीचा फायदा नसून त्याने आपले नुकसानच होणार आहे.

आजची सभोवतालची सामाजिक, कौटुंबिक स्थिती अनुभवायची असेल तर फार दूर जायला नको किंवा पूर्वीप्रमाणे तीर्थयात्रा करायला नको, रोजचे वर्तमानपत्र उघडा अथवा टी.व्ही. वरील बातमीपण पाहा, ऐका. त्यातून समाजमनाच्या स्थितीचे विदारक स्वरूप पाहायला मिळले. आज लोकांना सर्व भौतिक सुखसोयी विना-सायास, अल्पशा मोबदल्यात, क्वचित प्रसंगी फुकटात मिळायला हव्या आहेत. त्यासाठी आपली जबाबदारी न ओळखता, आंदोलने, धरणे होतात. वस्तूंचे भाव वाढले की महागाई वाढल्याची ओरड, महागाई भत्यात वाढत मिळाली तर (नो कंमेट) भाज्या, फळे, दूध यांच्या दरवाढीसाठी त्या वस्तू रस्त्यावर फेकून द्यायचे वगैरे, शिस्त, राष्ट्रहिताची जपणूक, राष्ट्रीयत्व, बंधुभाव, त्याग यांचा विचारच नाही. अर्थात हा विषय मूल्यांचा अथवा समाजशास्त्राचा असला तरी ’सकळजन अखिले वैभवाचे’ या स्वामींच्या विचारार्थ हे सांगावे लागले, असो.

ही आपमतलबी, स्वार्थी, अहंकारी वृत्ती सर्वत्र दिसते, हे स्वामीचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. तेव्हा अशा देहबुद्धीधारी अहंकारी, स्वार्थी माणसांना जिवलग कसे म्हणता येईल? ही तर स्वार्थामुळे एकत्र आलेली माणसे आहेत. अत्यंत बिकट प्रतिकूल काळ आला तर कुणी कुणाला विचारत नाही. ते वाईट परिस्थितीत सापडलेल्या जिवलगालाही सोडून देतात, अगदी घट्ट नाती (माळी) असली तरी विषमकाळात सर्व सोडून देतात. तथापि रघुवीर तुम्हाला अंतकाळी एकटा सोडून देत नाही. तुम्ही शरणागत भावनेने रामाची माफी मागत असाल तर मृत्यूसमयी राम तुम्हाला सर्व यातनांतून सोडवतो. चांगली गती प्राप्त करून देतो, जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सोडवून मुक्तीचा मार्ग दाखवतो. रामचरित्र मुळात निःस्वार्थी, परोपकारी, त्यागी, सद्गुणांचा साठा असल्याने अंतकाळी रामाची संगत असावी. रामाचे स्मरण असावे, अंतकाळी सर्वांना सुख देणार्‍या रामाची कृपा हवी असेल तर त्याची आयुष्यभर असतानाही तयारी करावी लागते, म्हणजे हा सुखदाता राम, आमची लायकी नसतानाही अंतकाळी आम्हाला येथून सोडवतो. या रघुवीराला शरण जाऊन, त्याची भक्ती करून माणसाने आपल्या अंतकाळासाठी तयारी करीत असावे. राम सुखदाता असल्याने तो अंतकाळीही सुखच प्रदान करील व मुक्ती देईल, हे नि:संशय.
Powered By Sangraha 9.0