यमगरवाडीच्या माळरानावर आलेल्या भटके-विमुक्त समाजातील लेकरांना शिक्षणाच्या धड्याबरोबर जीवन जगण्याचे धडे देतात. गावकुसाबाहेर राहणार्या समाजाला मुख्यधारेतच नाही तर समाजाच्या सर्वोच्च स्थानी जाण्याची स्वप्ने रुजवून मार्गक्रमणासाठी दिशादर्शक म्हणून आपली जबाबदारीही चोख बजावतात. त्यांनी घेतलेल्या ध्यासामुळे ललितासारखी असंख्य लेकरे त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे गाठत आहेत.

’ललिता इंजिनिअर होणार’ हे यमगरवाडीतील शिक्षकांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले, ते 2017साली. ललिता शिवाजी जाधव ही यमगरवाडीत शिकणारी पहिली मुलगी इंजिनिअर झाली आणि यमगरवाडीतील वातावरण आनंदाने फुलून गेले. लहान भावंडांसोबत यमगरवाडीत दाखल झालेली दहा वर्षांची हुशार पण बुजरी अशी ललिता आज तिच्या समाजातीलही उच्चशिक्षित मुलगी असून भाजपा युवा मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी सदस्या म्हणून राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहे.
ललिताच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्यावर तिच्या आईने मामाच्या घरी धाराशिव जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी आपले बस्तान हलविले. तीन मामांचे एकत्रित कुटुंब आणि त्यात भरीस भर ललिताचे कुटुंब. टोपल्या, कणग्या, सूप विणून दारोदार विक्रीसाठी पायपीट करून कधी एक वेळची भाकर मिळत असे तर कधी कधी उपाशीच राहावं लागत असे. कैकाडी समाजातील ही परिस्थिती बहुतकरून सारखीच. सर्वांची पोटाची खळगी भरतानाच नाकीनऊ येत असताना शिक्षणाची हौस कशी परवडणार? हो, हौसच! भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण फिरणे, कधी मागून खाणे, नाहीच मिळालं तर उपाशी झोपणे हे जिणं ज्यांच्या वाट्याला येतं, त्यांना भारतीय राज्यघटनेने शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता देणे आणि शिक्षण घेणे हा आपला हक्क आहे, याची सुतराम जाणीव नसते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस असताना यमगरवाडी प्रकल्पाची माहिती सांगण्यासाठी यमगरवाडीचे मुख्याध्यापक मेहेत्रे मामा आणि घुगे सर ललिताच्या मामाकडे आले होते. ते सांगू लागले की, या प्रकल्पात दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. ‘मुलांना शिक्षणाबरोबर खेळायलाही दिले जाते’ हे वाक्य छोट्या ललिताच्या मनात रूंजी घालू लागले.
खरं तर अठरा विसे दारिद्य्र असताना या प्रकल्पामुळे आपल्या मुलांना शिक्षण घेता येईल म्हणून आलेल्या सद्गृहस्थांना ’आमची मुलं शाळेत येतील’ ही मामांनी तयारी दर्शविली. आमची मुलं यात केवळ घरातील मुलगे होते, ललिता नाही. समाजरितीप्रमाणे मुलगी मोठी झाली की, घरकामात मदत करणे, चालीरिती शिकणे, होईस्तोवर लवकरात लवकर तिचे उजवून टाकणे आणि कर्तव्य पार पाडून सुस्कारा सोडणे हा आतापर्यंतचा शिरस्ता. मळलेली वाट सोडून वेगळी वाट धरायची हे लहानग्या ललिताच्या रक्तातच होते. यमगरवाडीतील गृहस्थ जाताक्षणीच ललिताने आईच्या मागे मीही यमगरवाडीच्या शाळेत शिकायला जाणार हा धोशा लावला. नाहीचा पाढा म्हणता म्हणता घरचेही मुलांना सोबत होईल, त्यांना काय हवे नको ते बघेल, या विचारानेच त्यांनी ललिताला यमगरवाडीत जाण्याची परवानगी दिली.
यमगरवाडी आणि पारधी आतापर्यंत समीकरण होऊन बसलेलं. यमगरवाडीत शिकायला जाणारं म्हटल्यावर पारध्यांच्या पोरांशी संगत येणार, या अढीने ललिताच्या आईने काही गोष्टींची समज दिली होती. त्याचबरोबर समाजव्यवहारात जगण्यासाठीचे काही कानमंत्र दिले. हे कानमंत्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक ठरतात हे ललिता आवर्जून सांगते. यमगरवाडीत मुलं आणि मुली यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था होती, त्यामुळे हे गृहितच होतं की, भावंडाची साथ घरी मिळते तशी नसणार. सुरुवातीचे निदान सहा महिने तरी प्रत्येक गोष्टीत आईची आठवण येत असे. रात्र झाल्यावर तर घर खायला उठत असे. कारण रोज रात्री लहान भाऊ आणि तिच्यात चालणारी आईच्या कुशीत झोपण्यासाठी लुटुपूटुची भांडण आणि त्यावर आईने प्रेमाने काढलेला मार्ग या आठवणीने कित्येक रात्री डोळ्यांच्या कडा ओल्या होतं.
ऋतु कोणताही असो थंड पाण्याची आंघोळ करणे, आपली ताटवाटी आपणच धुणे, अशा बारीकसारीक जबाबदार्या लहान वयातच आल्यामुळे पुढील आयुष्यात संघर्षाच्या टप्यांवर दोन हात करण्यासाठी मन आणि मनगट तयार झाले, हे सांगताना ललिता एवढी प्रगल्भ कशी; याचे उत्तर मिळते. यमगरवाडीत येण्यापूर्वी इतर समाजगटांविषयी बरेच गैरसमज होते. पारधी समाजातील कुणी आलं तरी आम्ही दार बंद करीत असू. यमगरवाडीत मात्र आम्हा सगळ्या मुलांना समान वागणूक असे. एका ताटात आम्ही जेवत असू. पारधी समाजातील मुलंदेखील आपल्यासारखी माणसंच आहेत, त्यांनाही माणसासम वागणूक दिली पाहिजे ही जाणीव इथे झाली. यमगरवाडी प्रकल्प समाजातील बर्याच जणांच्या सहकार्याने उभा राहिलेला आहे. व्यक्ती समजून घेणे किंवा दुसर्या व्यक्तींसोबत कसं वागलं पाहिजे हे समजलं ते येथील संघ स्वयंसेवकांच्या आचरणातून. ही समरसता भावाची शिदोरी आजही गाठीशी आहे आणि प्रत्येक व्यवहारात त्याची शिंपण करण्यासाठी मी आग्रही असते, असे ललिता उत्कटतेने सांगत होती.
पारधी समाजातील मुलांसह सगळ्यांना प्रभुणेकाका, सुवर्णाताई रावळ, विजयराव पुराणिक, आप्पा कारखानीस, तुकाराम माने, उद्धवराव काळे, सुजातादीदी, अशासारख्या अगणित लोकांनी आमच्यावर मायेच्या पाखरणीसोबत जगण्याचं बळ दिलं. यमगरवाडीच्या शिक्षकांचा ममत्व भाव आणि पोटतिडकीने शिकविण्याच्या पद्धतीमुळे आम्ही योग्य प्रकारे घडत गेलो. विद्यार्थ्याच्या क्षमता ओळखून त्याच्या आवडत्या क्षेत्रात त्याला प्राविण्य मिळावे यासाठी त्यांची धडपड अतुलनीय आहे. यमगरवाडीतील मुले राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडाक्षेत्रात चमकली आहेत. बुद्धिबळ स्पर्धेत मीही जिल्हा स्तरापर्यंत खेळली आहे. एखादा किचकट विषय असेल तरी तो सोपा करून समजवण्याची हातोटी येथील शिक्षकांमध्ये आहे हे मी माझ्या अनुभवाने सांगते, असे ललिताचे उद्गार शिक्षकांविषयीचे प्रेम व्यक्त करीत होते.
शाळा झाल्यावर सायंकाळी संघशाखाही यमगरवाडीच्या माळरानावर लागते. या शाखेतून मुलांना शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरणाचे धडे दिले जातात. हे मात्र आता उमगते की आमच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीच्या विकासाची ती पायाभरणी होती. कोण कुठल्या समाजाचे आम्ही, पण कधी परकेपणाची जाणीवही आम्हाला होऊ दिली नाही. याउलट आमच्याच गावात सार्वजनिक पाणवठ्यावरही आम्ही खालच्या समाजातील म्हणून पाणी भरण्यासाठीही त्यांच्या नंतरचाच क्रमांक मिळत असे, कधी कधी तर रिकामा हंडा घेऊन घरी परतावे लागे.
शिक्षणाची जिद्द आणि शिकण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी होती, परंतु ’शिकून मोठी होईन’ हा आत्मविश्वास यमगरवाडीतील एकलव्य विद्या संकुलातील घुगे सर, भंडगे सर इ. शिक्षकांनी दिल्यामुळेच मी आज इंजिनिअर होऊ शकली, हे सांगताना ललिताचा ऊर भरून आला. यमगरवाडीतील दहावीपर्यंतचे शिक्षण संघछायेत झाल्यानंतर पुढील शिक्षण आपण आपल्या घरी करू असा घरच्यांचा निर्णय झाला.
शिक्षण घेण्याच्या ध्येयाने पछाडलेली ललिताने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला
उच्चशिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी घरी नव्हती. मार्गदर्शन तरी कोण करणार? घरी गेल्यामुळे यमगरवाडीचाही संपर्क पूर्णपणे तुटलेल्या संभ्रमावस्थेत असताना दाजींनी एका ठिकाणी चौकशी करून मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. कॉलेज सुरू होऊन दोन-तीन महिने उलटले तरी गणिताचा श्रीगणेशा काही होताना दिसत नव्हता. ललिताने न राहून शिक्षकांना विचारेलच की, गणित केव्हापासून सुरू करणार? तुझा प्रवेश चउतउ मध्ये झाला आहे. या क्षेत्रात गणित हा विषयच नसतो, हे ऐकून आता आपले इंजिनिअर होण्याचे स्वप्न मातीमोल होणार की काय या चिंतेत ती बुडाली. दोन वर्षांचा कोर्स करता करता इंजिनिअरिंगची वाटही ती धुंडाळत होतीच. अशाच शोधकामात तिला डिप्लोमाची माहिती मिळाली आणि हरवलेली इंजिनिअरिंगची वाट गवसली. या डिप्लोमाच्या प्रवासातही अनेक अडचणी आल्या. त्यात घरून लग्न करण्याचा दबावही होता, आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून पुढील शिक्षण घेऊ शकले. इंजिनिअरिंग करायचं असल्यामुळे अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेशप्रक्रिया केली नव्हती. अनेक अडथळ्यांतून वाट काढीत अखेर लातूरच्या वुमन्स पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमासाठी तिने प्रवेश घेतला.
डिप्लोमा करीत असताना शिक्षकांनी ललिताला गणिताचा एक फॉर्म्युला विचारला. शाळेत हुशार असलेली, शिक्षकांकडून कौतुकांचा वर्षाव करून घेणारी ललिता मात्र ढिम्म चेहरा करून बसली. गणिताची भिती आणि कॉलेजच्या फी चा प्रश्न बघून आता काय मला पुढचं शिक्षण होत नाही असं ललिताने आईला बोलूनही दाखवलं. ‘ठीक आहे, उद्यापासून माझ्यासोबत खुरपायला चल‘, आईचे हे शब्द तिच्या जिव्हारी लागले. खुरपण्यापेक्षा शिक्षण कैक पटीने चांगलं हा निश्चय तिने केला. चउतउच्या दोन वर्षात गणिताच्या गावीही ती गेली नव्हती. पण ही सल तिला अशी काही लागली की, गणिताची पाठ तिने शेवटपर्यंत सोडली नाही. एकाच सहामाहीत गणिताचे तीन विषय अभ्यासाला होते. कष्टसाध्य मेहनतीने गणिताच्या तिन्ही विषयांत एकाच खेपेत ती उत्तीर्ण झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे इंजिनिअरिंगसाठी प्रवेशासाठी ती गेली. परंतु कॉलेजची फी, मेसची फी, शैक्षणिक साहित्याचा खर्च न परवडणारा होता. मामाकडून आर्थिक मदत आणि ताईचे दागिनेे गहाण ठेवून दोन वर्षे कसबसा खर्च उचलला. दिवसेंदिवस त्यांची कुटुंबेही वाढत गेली आणि ललिताला मिळणारी मदत कमी होऊ लागली. शेवटच्या वर्षाला पडलेला आर्थिक पेच सोडवायला संघपरिवारातील रवी कर्वे यांची संस्था मदतीला आली आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाले. अभाविपच्या माध्यमातून बरेच सहकार्य लाभले. वरदराज बापट, प्रमोद कराड इ. हितचिंतक भेटत गेलेे. या मधल्या काळात यमगरवाडीतील लोकांशीही तिचा संपर्क झाला.
शिक्षण घेण्याच्या ध्येयाने पछाडलेली ललिता सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडे कशी वळली? या प्रश्नावर ती म्हणाली की, काही चुकीचे घडत असेल तर जाब विचारणे, कोणाची भिती अथवा दबावाची फिकीर न करणे, बेधडक प्रश्न विचारणे हे सुरुवातीपासूनच माझ्यात होते. कारण चुकीच्या गोष्टी मला सहनच होत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक गोष्टी वादानेच सोडवल्या पाहिजेत संवादानेही मार्ग निघतो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवला आहे, वेळप्रसंगी आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. माझ्यामध्ये असलेले नेतृत्त्वगुण ओळखून मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची जबाबदारी देण्यात आली. आपली दिशा योग्य असेल तर जनमताचा पाठिंबा स्वतःहून मिळतो.
खरं तर व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याची खूप इच्छा होती. आयुष्याच्या वळणावर कल आणि विचार बदलत गेले वाटा वेगळ्या होत गेल्या, निवड बदलत गेली. पण हे नक्की की, मला अशा क्षेत्रात यायचं होतं की, परिवर्तन करण्याची ताकद ज्यात असेल. लॉकडाउनमध्ये अन्नतुटवड्यासंदर्भात तक्रार करूनही काही झाले नाही, परंतु राजकारण्याच्या एका फोनवरून दखल घेतली गेली. या एका घटनेने राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा माझा निर्णय झाला.
अभाविपच्या संघटनात्मक कौशल्यामुळे मला भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी दिली गेली. त्या माध्यमातून कोरोना काळात आमच्या टीमने 773 लोकांना मदत केली. चिपळूणमध्ये महापूर आल्यानंतर पूरग्रस्तांसाठी सहायता प्रमुख म्हणून काम केले. 9 ते 10 ट्रक गृहोपयोगी वस्तूंचे वितरण केले. माझ्या हातून हे चांगले कार्य घडले ते केवळ राजकीय साथ आणि त्या माध्यमातून मिळालेले संघटन होय.
राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे. समाजाचे प्रतिबिंबच राजकारणात उमटतं असतं. आजची युवा पिढी ही उद्याच्या भारताचे भविष्य असणार आहे. त्यामुळे तरुण वर्गाने राजकीय क्षेत्राचा आपल्या करिअरची निवड म्हणून विचार करावा. बदल घडवून आणण्याचे उत्तम माध्यम हे राजकारण आहे. असे ललिताचे ठाम मत आहे. भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्या म्हणून ललिता उत्तम प्रकारे धुरा सांभाळत आहे. त्याचबरोबर इंजिनिअर म्हणूनदेखील तिची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे.
यमगरवाडीच्या माळरानावर आलेल्या भटके-विमुक्त समाजातील लेकरांना शिक्षणाच्या धड्याबरोबर जीवन जगण्याचे धडे देतात. गावकुसाबाहेर राहणार्या समाजाला मुख्यधारेतच नाही तर समाजाच्या सर्वोच्च स्थानी जाण्याची स्वप्ने रुजवून मार्गक्रमणासाठी दिशादर्शक म्हणून आपली जबाबदारीही चोख बजावतात. त्यांनी घेतलेल्या ध्यासामुळे ललितासारखी असंख्य लेकरे त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे गाठत आहेत.