देवराई - पर्यावरण दक्षता मंडळाला पडलेलं हिरवं स्वप्न

विवेक मराठी    02-Jun-2025
Total Views |
@सीमा जोशी  9819498798
पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेला टिटवाळा येथील रुंदे गावाजवळ काळू नदीच्या काठावर 19.19 हेक्टर जागा शासनाकडून जानेवारी 2017 साली मिळाली होती. येथे 50 हजार झाडे लावण्याचा संकल्प संस्थेने केला होता. आज या देवराई या वनीकरण प्रकल्पाला आठ वर्ष पूर्ण झाले. याला प्रतिसाद म्हणून विविध समाजिक स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून आजपर्यंत 45 हजार झाडे लावली गेली. हा प्रवास कसा सुरू झाला. याबद्दलच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती देणारा लेख..
पर्यावरण
 
रात्रीचे 10 वाजून गेले होते. आम्ही सगळे सह्याद्री बंगल्यावर होतो. निमित्त होतं, त्रिपक्षीय कराराने पर्यावरण दक्षता मंडळाला वन प्रकल्प मिळण्याचं. वन खात्यातून मेल आला होता. पर्यावरण दक्षता मंडळाने वनीकरणासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर होणार आहे, त्यावर वनमंत्र्यांची सही होणार होती. दोन वेळा परत मेल आला की, मिटींग पुढे ढकलण्यात आली आहे. ही तिसरी वेळ होती, आम्ही सर्व संस्थेचे कार्यकर्ते मंत्रालयात सकाळीच येऊन पोहचलो. तेव्हा कळलं की, मा. जयवंतीबेन मेहता यांचं निधन झाल्याने सर्व मंत्रीमंडळ अंत्यदर्शनासाठी गेलं होतं. आजही काम न होता परत जावं लागेल असं आम्हाला वाटलं. पण मंत्रिमहोदय परत येणार होते म्हणून आम्ही थांबायचं ठरवलं. रात्री 10 वाजता वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची कागदपत्रांवर सही झाली. नंतर काही दिवसांतच त्रिपक्षीय करार होऊन प्रकल्प मिळणार हे निश्चित झाले. कराराचा कालावधी होता जानेवारी 2017 ते जानेवारी 2024.
 
 
ही त्रिस्तरीय वन विकास योजना आहे. या अभिनव संकल्पनेनुसार तीन संस्थांनी एकत्रित येऊन सहकार्यातून वन विकास योजनेची रूपरेषा आखणी, अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. त्यासाठी वन विभाग वन विकासाकरिता 7 वर्षांसाठी वन क्षेत्र उपलब्ध करून देते. यात सहभागी असलेली अशासकीय संस्था वन विभागाने वन क्षेत्र हस्तांतरित केल्यावर वन विकास आराखडा तयार करते, 7 वर्षांकरता अपेक्षित वित्तीय भाराची सविस्तर अंदाजपत्रके तयार करतेे. त्यानंतर प्रत्यक्ष वृक्षलागवड, संवर्धन, संरक्षण व वन विकासाच्या अनुषंगाने इतर कामे करून 7 वर्षांनंतर विकसित करण्यात आलेले वनक्षेत्र वन विभागास हस्तांतरित करते. या दोघांबरोबरच जोडलेली असते ती वित्तीय संस्था. या वन विकास योजने करिता 7 वर्षांच्या अंदाजपत्रकानुसार या वित्तीय संस्थेकडून वित्तीय तरतूद व पुरवठा होणे अपेक्षित असते. ही त्रिस्तरीय वन विकास योजना कार्यान्वित करण्याआधी तीनही संस्थांनी करारनामा करणे बंधनकारक आहे. असा करारनामा होऊन पर्यावरण दक्षता मंडळाला वन विकसित करण्याची संधी मिळाली. या करारानुसार, 2 वर्षांत लागवड पूर्ण करणे अनिवार्य असते. तसेच केवळ स्थानिक प्रजातींची लागवड करण्याचे बंधन असते. लागवड केलेल्या रोपांना पाणी देणे तसेच लागवड केलेल्या रोपांचे व क्षेत्रातील नैसर्गिक वृक्षराजीचे संवर्धन व संरक्षण करणे अनिवार्य असते.
 

पर्यावरण  
 
2017 चा जानेवारी उजाडला होता व पुढच्या पावसाळ्यापासून वृक्षारोपण करायचे होते. त्याआधीची पूर्वतयारी भरपूर करावी लागणार होती. अनिल ठाकरे सर, सुहास पवार आणि मी अशा तिघांनी नारळ वाढवून कामाला सुरुवात केली. प्रकल्प हातात मिळणे ते वृक्षारोपण यात मिळालेल्या वेळेत जागेचा सर्व्हे करणे, जमीन लागवडी योग्य करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करणे, मजुरांची उपलब्धता कोठून होईल हे शोधणे, विविध प्रकारचे सामान जसे विळे, कोयते, कुदळ, फावडी हे सगळे सामान जमा करणे, खड्डे खणणे, लागवडीसाठी जंगली झाडांची रोपे आणणे अशी असंख्य कामांची यादी होती. सगळ्या रोपांची लागवड फक्त लोकसहभागातून करायची हे ठरवले होते. कारण एखादी व्यक्ती जेव्हा या जंगलासाठी काहीतरी करेल, अगदी छोट्यातला छोटा जरी सहभाग असेल, जसे की-घरी रोप तयार करून आणून देणं, घरात केलेलं कंपोस्ट आणून देणं, खड्डे खणणं यातून त्या प्रकल्पाशी जोडण्याचा अनुभव मिळेल, हा हेतू होता.
 
 
या लोकसहभागासाठी परिसरातल्या विविध शाळा, महाविद्यालयातून जायचं होतं. यासाठी त्यावेळचे मुख्य वनसंरक्षक किशोर ठाकरे यांची खूप मदत झाली. किशोर ठाकरे यांना संस्थेच्या कार्याबद्दल अतिशय आदर असल्यामुळे त्यांनी हा प्रकल्प मंडळाला मिळावा यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत संस्थेने वृक्षारोपण केले होते, झाडांसंबंधी वर्ग चालवले होते. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा ’वनश्री’ पुरस्कारही मिळालेला होता. महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड या उपक्रमातही संस्था दर वर्षी सहभागी झाली होती. पण वनीकरण प्रकल्प पहिल्यांदाच. त्यामुळे खूप आनंद, उत्साह होता. मनातल्या अनेक कल्पना प्रत्यक्षात आणायची संधी मिळणार होती. हा खरोखरच पर्यावरण दक्षता मंडळाचा ड्रीम प्रोजेक्ट होता व आहे.
 

Environment 
 
 
यासाठी टिटवाळा रेल्वे स्टेशनपासून 5 किमी अंतरावर रुंदे गावाजवळ काळू नदीच्या काठावर 19.19 हेक्टर जागा मिळाली. जागेचा पूर्ण सर्व्हे केला. भरपूर गवत वाढले होते. तण माजले होते. ते काढून आडे लावण्यासाठी जागा करणे आवश्यक होते. या सगळ्या प्रकल्पात माजी वनाधिकारी अनिल ठाकरे यांची मार्गदर्शक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्यामुळेच हा प्रकल्प इतका यशस्वी होऊ शकला. तसेच या प्रकल्पाचे खरे शिल्पकार आमचे कामगार आहेत. देवराईत आठ कामगार रोज कामाला होते. या कामगारांनी ठाकरे सरांबरोबर आधी काम केलेले असल्यामुळे ते प्रशिक्षित होते. याचा खूप उपयोग झाला. या प्रकल्पासाठी संस्थेने भरपूर पूर्वतयारी केली होती. मामणोली येथे संस्थेचा निसर्गायण प्रकल्प आहे. तिथे जंगली झाडांची नर्सरी तयार करायला घेतली.
 
 
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोपे दिली व प्रकल्पासाठी जागा मिळेपर्यंत वाढवायला सांगितले होते. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक गुंतवणूक या जंगलामध्ये निर्माण झाली.
 
 
जागा मिळाल्यावर त्याची पाहणी करण्यात आली. माती कशा प्रकारची आहे? आधीचा झाडोरा, वृक्ष किती आहेत, पक्षी किती प्रकारचे आहेत अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. तीन वेगवेगळ्या प्रकारची माती आढळून आली. जास्त भागात चिक्कण माती तर काही भागात मुरमाड माती आढळून आली. काही भागात अगदीच भरड जमीन आहे.
 
 
पर्यावरण
 
या प्रकल्पासाठी बाबू जोसेफ यांचे खूप सहकार्य झाले. त्रिपक्षीय करारासाठी जेव्हा संस्थेने प्रयत्न सुरू केले तेव्हा बाबू जोसेफ अ‍ॅक्सिस बँकेचे सी.एस.आर. प्रमुख होते. त्यांना हा प्रकल्प खूप आवडला व ’मी तुम्हाला बँकेकडून आर्थिक सहकार्य मिळवून देईन’ असे सांगितले. परंतु हा प्रकल्प प्रत्यक्षात मिळाला तेव्हा ते सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे त्या बँकेकडून सहकार्य मिळाले नाही तरी जोसेफ यांनी दिलेला शब्द पाळला व प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळवून दिले. प्रकल्पाचा खर्च एक कोटीच्या वर होता. त्यामुळे विविध मार्गांनी आर्थिक उभारणी कशी करायची याबद्दल विचार करण्यात आला. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सी.एस.आर.मधून पैसे मिळवणे, एका झाडासाठी नागरिकांकडून देणगी देण्यासाठी आवाहन करणे. रोटरी, लायन्स यासारख्या संस्थांकडून सहकार्य मिळविणे, कल्याण जनता सहकारी बँक, डोंबिवली नागरिक सहकारी बँक, जळगाव जनता सहकारी बँक अशा बँकांमधून देणगीसाठी पत्र देणे, घरातील मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाड लावणे अशा विविध मार्गांनी अर्थ उभारणी करण्यात आली. आता गरज होती औपचारिक उद्घाटनाची.
 
 
पहिल्या टेकडीवरील झाडांच्या सावलीमध्ये उद्घाटनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला रुंदे गावातून काही गावकरी आले होते. त्यांनी प्रकल्पाला पूर्णपणे सहकार्य करू असे आश्वासन दिले. पहिल्या वर्षी अर्ध्या जागेमध्ये (पहिल्या 10 हेक्टरमध्ये) वृक्षारोपण करावे तसेच पुढच्या वर्षी उरलेल्या 9 हेक्टर जागेवर रोपे लावावीत असे ठरले. गवत काढून झाल्यावर संपूर्ण प्लॉटचे अर्ध्या-अर्ध्या हेक्टरचे छोटे प्लॉट पाडले. खुणेसाठी छोटे-छोटे सिमेंटचे खांब रोवले. या नंतर ठाकरे यांनी एक ट्रीटमेंट मॅप तयार केला. या प्रकल्पासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या बैठकांमधून पुढील कामाची दिशा ठरत असे. या प्रकल्पात भारतीय व स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी हे निश्चित करण्यात आले. यासाठी टिटवाळा, मुरबाड, कल्याण, शहापूर या परिसरात कोणती झाडे आढळून येतात याचा अभ्यास करून 200 झाडांची यादी करण्यात आली. पुण्यापासून शहापूरपर्यंत अनेक नर्सरींना भेट देऊन रोपे मिळविण्यात आली. संस्थेच्या निसर्गायण प्रकल्पातून तयार केलेली बरीचशी रोपे मिळाली. अनेक लोकांनी आपापल्या घरी रोपे तयार करून आणून दिली.
 
 
या प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाने कल्याण-मुरबाड रस्त्यावरील मामणोली या गावामध्ये हिंदू सेवा संघाकडून 4 एकर जागा भाड्याने घेतली व या जागेला ’निसर्गायण’ हे नाव दिले. या जागेच्या मागे जंगल आहे. त्या जंगलातून बी गोळा करून निसर्गायणमध्ये जंगली रोपांची नर्सरी करण्यात आली. वनीकरण प्रकल्पात लावण्यासाठी 2 ते 3 फुटांची रोपे अत्यंत योग्य असतात. यापेक्षा लहान रोपे लावण्यात आली तर त्या रोपांना कडक उन्हात आणि पावसाळ्यातील पाण्याच्या मा़र्‍यात तग धरणे अत्यंत कठीण जाते. 4 ते 5 फुटांपेक्षा मोठी रोपे लावली तर ही झाडे वार्‍यापावसात उन्मळून पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नर्सरीतून घेतानासुद्धा 2 ते 3 फुटांची रोपे घेतली. लावलेल्या प्रत्येक रोपाची योग्य ती काळजी घेतली गेली. सीता-अशोकाची झाडे कडक उन्हात तग धरत नाहीत त्यामुळे त्या झाडांना बांबूच्या काठ्या रोवून गवताचा छोटासा मांडव केला होता. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की, ही 50 एकरवरची लागवड ही संपूर्ण लोकसहभागातून झाली. या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिक संस्थेशी जोडले गेले. जंगल म्हटलं की वणव्याचा धोका उद्भवतोच. सुरुवातीच्या दोन वर्षात दोन वेळा वणवे लागले. परंतु आपल्या कामगारांनी तात्काळ ते विझवले व रोपांचे नुकसान होऊ दिले नाही.
 
 
समितीच्या बैठकीमध्ये अशीही एक सूचना आली होती की 50 एकर जमिनीवर एक छोटासा भाग - साधारण 1 एकर जागा नैसर्गिक अवस्थेमध्ये ठेवण्यात यावी. त्यात कुठल्याही प्रकारचं वृक्षारोपण करू नये. तिथली झाडे जशीच्या तशी ठेवण्यात यावी. जागा रिकामी असेल तर झाडे लावण्यात येऊ नयेत. तिथे जंगल जसे वाढेल तसे वाढू द्यावे व 7 वर्षांनी त्या जागेत काय बदल झाला आहे याचे निरीक्षण करण्यात यावे म्हणजे निसर्गामध्ये कसे कसे बदल होतात याचा अभ्यास होईल. त्याप्रमाणे एक प्लॉट ठेवण्यात आला.
 
 
ज्या ज्या वेळेला वृक्षारोपणासाठी विद्यार्थी किंवा इतर नागरिक आले त्याच्या आदल्या दिवशी तयारी करण्यात यायची. खड्डे करणं, प्रत्येक खड्डयाजवळ रोपाची पिशवी नेऊन ठेवणं, पाण्याची पिंपं भरून ठेवणं. प्रत्यक्ष वृक्षारोपणाच्या आधी झाड कसं लावायचं, रोपाची पिशवी कशी कापायची, मुळं तुटू न देता, मुळाभोवती असलेली माती न सांडू देता रोप कसं बाहेर काढायचं व खड्ड्यामध्ये कसं लावायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं जायचं व नंतर प्रत्यक्ष वृक्षारोपण होत असे. वृक्षारोपणासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती तिथलं वातावरण बघून हरखून जात असे. वाढलेलं हिरवं गवत, छोटी-छोटी रोपं, एका बाजूला वाहणारी काळू नदी, तिथेच बसून वनभोजनाचा आनंद त्यामुळे येणा़र्‍याचा पाय तिथून निघत नसे.
 
 
 
ही निसर्गनिर्मित देवराई नाही. देवराई हे या प्रकल्पाला दिलं गेलेलं नाव आहे. देवराई रुंदे हे मानवनिर्मित जंगल आहे. या ठिकाणी आधी नैसर्गिक जंगल होतं. परंतु विविध कारणांनी त्याचा ़र्‍हास होत गेला व ते जंगल उजाड होत गेलं. या प्रकल्पाकडे फक्त वनीकरण प्रकल्प म्हणून न बघता त्या ठिकाणच्या संपूर्ण परिसंस्थेचे पुनरुज्जीवन असा दृष्टिकोन ठेऊन काम केले गेले.
 
 
मिळालेला प्लॉट आयताकृती आहे, छोट्याछोट्या टेकड्यांनी मिळून तयार झालेला आहे. उतारावरून पावसाळ्यामध्ये माती वाहून जाऊ नये म्हणून उतारावर चर खणण्यात आले. या चरामध्ये माती जमिनीत मुरत जाऊन अडवली जाते. दर वर्षी पावसाच्या आधी या चरातून माती काढली जाते आणि चर मोकळे केले जातात. उतारावर वाळा, बांबू यासारखी ज्यांची मुळं आपोआप वाढत जातात आणि माती धरून ठेवतात अशी झाडं लावण्यात आली. दोन टेकड्यांच्या मध्ये खोलगट भागात दगडी बंधारे घालण्यात आले. ज्या भागात उतार जास्त आहे त्या ठिकाणी सलग 2 ते 3 बंधारे घालण्यात आले, ज्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरेल. या सगळ्यामुळे माती आणि पाण्याचे संवर्धन झाले आहे. तसेच या प्लॉटमध्ये जमिनीखालचे वॉटर टेबल वाढायला मदत झाली. संपूर्ण प्लॉटला चिलार, सागरगोटा आणि बांबू अशा काटेरी झाडांचे कुंपण घालण्यात आले आहे. तसेच वन विभागाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या बाजूने खंदकही खणण्यात आला आहे. यामुळे लावलेल्या रोपांचे जनावरांपासून संरक्षण होते व पावसाळ्यात पाणी साचून ते जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते.
 
 
झाडं जगवण्यासाठी त्यांना पाणी घालणं आवश्यक होतं. जंगलाचा आकार लक्षात घेता 3 प्रकारे पाणी घालण्याची व्यवस्था केली. प्लॉटच्या एका बाजूला नदी आहे त्या भागाला डिझेल इंजिनने पाणी घालण्यात येतं. परंतु हे पाणी प्लॉटच्या दुस़र्‍या बाजूला पोहोचत नाही. त्यासाठी बोअरवेलची आवश्यकता निर्माण झाली. बोअरवेलमधून पाणी घेण्यासाठी वीजजोडणी आवश्यक होती. ती मिळायला बरेच महिने लागले. आजही त्या संपूर्ण 50 एकरमध्ये एकच विजेचा खांब आहे. बोअरवेल खणण्यासाठी आणि विजेची जोडणी घेण्यासाठी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. वन विभागाचे सहकार्य उत्तम होते. ताबडतोब परवानगी मिळाली. बोअरवेलपासून पाईपलाईन टाकण्यात आली. त्यातून जास्तीत जास्त भागाला पाणी दिले जाते. ही बोअरवेल खणण्याचीसुद्धा सुरस व रम्य कथा आहे. बोअर वेल खणायची ठरवली तेव्हा गावच्या पद्धतीप्रमाणे नारळ हातात घेऊन पाण्याचा स्रोत शोधला गेला. एक व्यक्ती हातात आडवा नारळ घेऊन चालत असते व ज्या ठिकाणी पाणी असते तिथे नारळ आपोआप उभा राहतो. अशा पद्धतीने ठिकाण नक्की केलं गेलं. बोअरवेल खणणा़र्‍या माणसाला बोलावलं गेलं. पण तो माणूस आलाच नाही. असं अनेक वेळा झालं. दिवसामागून दिवस गेले पण बोअरवेल खणली जात नव्हती. असं का होत होतं याचा शोध घेतल्यावर समजलं की मार्च, एप्रिलच्या काळामध्ये तलाव किंवा नदी आटतात व पाण्याची विलक्षण टंचाई निर्माण होते. या काळात बोअरवेल खणण्यासाठी प्रचंड मागणी असते. त्यामुळे बोअरवेल खणणा़र्‍या माणसाला लोकं रस्त्यातून उचलून नेत असत. त्यामुळे तो माणूस आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. शेवटी ज्या वेळेला तो आमच्या इथे आला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते आणि ती बोअरवेल रात्री 12 वाजता खणली गेली. या बोअरवेलचे पाणी अत्यंत मधुर आहे. बोअरवेल खणल्यापासून आजपर्यंत आम्ही सगळे तेच पाणी पीत आहोत. या बोअरवेलने खूप साथ दिली. सकाळी व दुपारी दोन तास ही बोअरवेल चालते व उन्हाळ्याच्या कालावधीत सगळ्या रोपांची तहान भागविते.
 
 
प्लॉटचा शेवटचा भाग जो आहे त्याला ’नारायणाचा प्लॉट’ असे नाव दिले गेले आहे. त्या भागात बोअरवेलचे पाणी पोहोचत नाही आणि त्या भागातील नदी पूर्णपणे आटून खडक दिसायला लागल्यामुळे या दोन्ही प्रकारांनी तिथे पाणी देता येत नाही. त्या ठिकाणी टँकर मागवावा लागतो. आठवड्यातून एक दिवस टँकर बोलावला जातो. यासाठी सगळे मजूर डोक्यावर पिंप घेऊन टँकरपर्यंत जातात. पिंपामध्ये टँकर रिकामा केला जातो. कारण त्या काळात या भागात टँकरला प्रचंड मागणी असल्यामुळे झाडांना पाणी घालून होईपर्यंत टँकर थांबत नाही. पिंपांमध्ये टँकरमधलं पाणी घेऊन टँकर रिकामा करावा लागतो. नंतर पिंपांमधून बादली बादली पाणी काढून झाडांना घालणे आणि नंतर रिकामी झालेली पिंपं परत डोक्यावर घेऊन आणून ठेवणे हे अतिशय कष्टाचं काम आपले मजूर करत आहेत हे कौतुकास्पद आहे.
 
 
दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीपासून झाडांना पाणी घालायला सुरुवात होते. तोपर्यंत पावसाळ्यात जमिनीत मुरलेलं पाणी झाडांना पुरतं. फेब्रुवारी ते पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी द्यायची गरज असते. मार्च 2020मध्ये लॉकडाऊन झाले आणि ते पुढे वाढत गेले त्यामुळे मार्चमध्ये झाडांना पाणी कसे घालायचे असा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीत वनखात्याने उत्तम सहकार्य केले. त्या वेळेला वनविभाग ठाणे येथे उप वनसंचालक डॉ. रामगावकर हे कार्यरत होते. त्यांनी आम्हा सर्वांना फोटो ओळखपत्र उपलब्ध करून दिली तसेच जंगलाच्या सर्व कामांना लॉकडाऊनपासून वगळण्यात आले आहे अशा जी.आर.ची प्रत दिली. त्यामुळे हा प्रकल्प लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस बंद राहिला नाही.
 
 
देवराईमधील वृक्षमोजणी - देवराई प्रकल्पाची जानेवारी 2025 मध्ये 7 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधी त्या प्लॉटमध्ये किती नैसर्गिक झाडे आहेत आणि आपण किती लावलेली आहेत याची नोंद व्हावी म्हणून वृक्षमोजणी. यामध्ये त्या प्लॉटमधील प्रत्येक झाड मोजलं गेलं. नोव्हेंबर-डिसेंबर 2022मध्ये ही मोजणी केली गेली. ही मोजणी लोकसहभागातूनही केली गेली.
 
 
50 एकरचा प्लॉट आणि त्यावरील हजारो झाडं यांची मोजणी कशी करणार याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी क्वाड्रंट पद्धत वापरली गेली. सुरुवातीला ट्रीटमेंट मॅप करण्यासाठी जसे छोटे छोटे भाग करण्यात आले होते तसेच भाग करण्यात आले. त्याला चारही बाजूंनी दो़र्‍या लावण्यात आल्या. त्या दोरीच्या आतील झाडे मोजण्यात आली म्हणजे एकच झाड परत परत मोजले जाणार नाही. झाड नैसर्गिक असेल तर त्याच्या खोडाला पांढ़र्‍या रंगाचा पट्टा रंगवायचा नि झाड आपण लावलेले असेल तर पिवळ्या रंगाचा पट्टा रंगवण्यात आला. परिसरातल्या महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. महाविद्यालयातील मुलांची टीम यायची ठरली की क्वाड्रंट तयार करून ठेवणं, पांढ़र्‍या व पिवळ्या रंगाचे डबे व ब्रश तयार ठेवणं, झाडांची नोंद करण्यासाठीचे तक्ते अशी सगळी तयारी आदल्या दिवशी करून ठेवत असू. दुस़र्‍या दिवशी विद्यार्थी आले की त्यांचे प्रशिक्षण घेतले जात असे व प्रत्येकी 5 जणांचे गट तयार करण्यात येत असे. एका क्वाड्रंटमध्ये एक ग्रुप जायचा आणि त्या क्वाड्रंटमधील सगळ्या झाडांची नोंद आणि मोजणी त्यांनी करायची. डॉ. मानसी जोशी, ठाकरे सर आणि मी प्रत्येक वेळी तिथे हजर असायचो. एकूण 40,555 इतकी ही वृक्षसंपदा आहे.
 
 
हिरवी सावर, विलायती चिंच, आंबा, ताम्हण, खाया, तुती, वड, पिंपळ, चिंच, शिसु, शिसम, शेंद्री, सप्तपर्णी, आवळा, फणस, बकुळ, काशिद, करंज, कुसुम, आपटा, कांचन, जांभूळ, शिवण, कळंब, कदंब, बहावा, महोगनी, पुत्रंजिवा, करमळ, लक्ष्मीतरू, हदगा ही लागवड केलेल्या रोपांपैकी उत्तम वाढलेली झाडं आहेत. रक्तचंदन, कृष्णवड, दालचिनी, लालवड, सीताअशोक, बारतोंडी, शमी, सुरू, शेंद्री या देवराई प्रकल्पातल्या दुर्मीळ प्रजाती आहेत.
 
 
या वृक्षमोजणीमध्ये 12 महाविद्यालये व 569 स्वयंसेवकांचा समावेश होता. तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या आत्ताच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, पौर्णिमा शिरगावकर, रुपाली शाईवाले, अनिल ठाकरे, सुभाष इसामी, भारत गोडांबे व संस्थेचे इतर कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जे झाड मोजून झाले असेल त्यावरती चुन्याचा पांढरा पट्टा द्यायचा. एकूण 50 प्रकारची झाडे आम्हाला आढळून आले. त्यामध्ये साग आणि ऐन यांचे प्रमाण खूप जास्त होते. वृक्षमोजणी करताना वनभोजनाचा आनंद आम्ही अनेक वेळा घेतला. तीन दगडांची चूल मांडून खिचडी शिजवणे, पळसाच्या पत्रावळीवर जेवणे, यावरून किती कमी गरजांमध्ये राहता येते याचा साक्षात्कार आम्हाला तेथे झाला.
 
 
ज्यावेळेला इथे एक साधी झोपडीही नव्हती तेव्हापासून नारायण व लक्ष्मी हे केअरटेकर म्हणून देवराईमध्ये राहत होते व त्यांच्याबरोबर त्यांची तीन मुलंही होती. मुलं टिटवाळ्याच्या शाळेमध्ये शिकायला जात असत. पावसाळ्याच्या दिवसात धोधो पाऊस, मिट्ट काळोख आणि 50 एकरमध्ये फक्त एक झोपडी अशा परिस्थितीमध्ये नारायण व लक्ष्मी तिथे राहिले आहेत. नारायणला एकदा रात्री विंचू चावला. देवेश जाधव हा आमचा तिथला समन्वयक, त्याने रातोरात त्याला गोवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार झाले व तो पूर्णपणे बरा होऊन घरी आला.
 
 
देवराईतले कामगार पांडुरंग बर्डे उर्प पांडू भाऊ, रघुनाथ भोईर उर्फ आबा, गोविंद बर्डे उर्फ गोविंद भाऊ, कृष्णा वाघे, बाळाराम वाघे, अनंत भोईर उर्फ अनंत आबा, किसनमामा भोईर आणि काशिनाथ भोईर हे सगळे गेली 7 वर्षे आपल्याकडे मजूर म्हणून काम करतात. दुर्दैवाने यापैकी किसनमामा आज आपल्यात नाहीत. पण आजही प्रत्येक वेळेला देवराईत गेल्यानंतर त्यांची आठवण येते. घरी अनंत अडचणी असल्या तरी नेहमी हसतमुख असत. कधीही गेल्यानंतर मला आणि ठाकरे सरांना त्यांच्या डब्यातील एक भाकर खायला लावणारच. सगळेच मजूर अत्यंत मेहनती. सगळे राहायला म्हस्कळ गावात. म्हस्कळ गावातून प्रकल्पापर्यंत यायला पाऊण तास चालावं लागतं. विलक्षण कष्टाळू. कधीही खाडे नाहीत. वर्षभरात फक्त 2 वेळा सुट्टी घेणार. प्रत्येकाची थोडी थोडी शेतजमीन असल्याने लावणीला आणि कापणीला. बाकी सणावाराला सुद्धा सुट्ट्या घेत नसत. हे देवराईचे खरे शिल्पकार. पहिली 2 वर्ष सुहास पवार प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करत होता. त्यानंतर देवेश जाधव व त्याला सहाय्यक म्हणून आदित्य गायकवाड काम बघत आहेत. अनिल ठाकरे सातत्याने अजूनही प्रकल्प पाहायला जातात, संपूर्ण प्रकल्प फिरतात व मार्गदर्शन करतात. त्यांच्याबरोबर जंगल फिरण्यात एक वेगळीच मजा आहे.
 
 
जी 200 झाडं लावायची ठरवली होती त्याची यादी तयार करण्याचं काम डॉ. मानसी जोशी, अनिल ठाकरे, विकास देसाई, भरत गोडांबे, सुभाष इसामे आणि पौर्णिमा शिरगावकर यांनी केलं. मला स्वत:ला या प्रकल्पाने खूप भरभरून दिले. अनुभवविश्व समृद्ध केले. वनस्पती विश्वाबद्दलचा आदर व प्रेम वाढले. देवराईमध्ये झाडं वाढल्यानंतर पक्षी, फुलपाखरं, कीटक आपोआप आले. मोर तिथे होतेच. ससे, रानडुक्कर देखील दिसू लागले. बिबट्याचीही चाहूल लागली आहे असं गावक़र्‍यांच्या बोलण्यात आलं. जेव्हा जेव्हा देवराईत जाते आणि रुंद्याच्या पुलावरून देवराईचा हरित पट्टा दिसू लागतो तेव्हा मन आनंदाने आणि समाधानाने भरून येतं.