सावरकरांचा निष्ठावंत अनुयायी हरपला

विवेक मराठी    20-Jun-2025
Total Views |
@दुर्गेश जयवंत परुळकर

vivek 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे पण दुर्दैवाने आपल्या देशातल्या गाजरपारखी काँग्रेसवासी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना त्याची जाणीव नाही. हिरे आणि गारा एकाच ठिकाणी असतील तर हिरा टाकून गारा गोळा करणार्‍या विद्वानांना समजावणे अशक्य आहे. अशा परिस्थितीतही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी हिंदुत्वाची गीता सातत्याने हिंदू समाजाला सांगण्याचा आपला वसा टाकला नाही. म्हणूनच, वीर सावरकरांच्या विरक्त, विरागी आणि उत्कट देशभक्तीने नटलेल्या जीवनाविषयी नितांत आदरभाव बाळगणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विचारवंत अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्या निधनाने निर्माण झालेली उणीव विशेषत्वाने जाणवणार आहे.
रामगीता, गुरूगीता, भगवद्गीता अशा अनेक गीता आहेत. याप्रमाणेच गत शतकात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उच्चरवाने हिंदुत्व गीता गायली. मात्र आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्व गीतेची दखल घेतल्याचे दिसत नव्हते आणि जाणवतही नव्हते. अशा परिस्थितीत, अशा वातावरणात सावरकरांची हिंदुत्व गीता अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी ओघवत्या भाषेत उपलब्ध करून दिली. त्यांचे हे ऋण आपण विसरू शकत नाही. त्यांची निष्ठा, त्यांचा प्रामाणिकपणा याला मुरड न घालता सावरकरांच्या हिंदुत्वाचे धगधगते विचार तेवढ्याच उत्कटतेने आयुष्यभर त्यांनी मांडले. वीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू समाजाला राजकीय दृष्टी देण्याचा अखंड प्रयत्न अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी करून सावरकरांचा वारसा जिवंत ठेवला.
 
पाकिस्तानची आक्रमक वृत्ती आणि अतिरेक्यांना दिला जाणारा पाठिंबा त्याचे मूळ मिर कासिमने सिंध प्रांतावर वर्ष 711 मध्ये केलेल्या पहिल्या आक्रमणात सापडते. मिर कासिमने हिंदुस्थानवर आक्रमण करण्यामागे हिंदुस्तान संस्कृती आणि धर्म नष्ट करून संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. तेच उद्दिष्ट पाकिस्तानचे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वर्ष 711 पासून सुरू असलेली ही लढाई अजून थांबलेली नाही पण आपण वर्ष 1885 मध्ये एकतर्फी युद्धबंदी घोषित केली. म्हणूनच आपण दररोज ही लढाई हरत आहोत पण ते आपल्या लक्षात येत नाही. याची जाणीव आपल्या लेखातून हिंदू समाजाला करून देत होते.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी चार पादशाही आपल्या टाचेखाली दाबून ठेवल्या होत्या. याउलट हिंदुस्तान स्वतंत्र झाला तेव्हा त्याने एका शत्रू राष्ट्राला जन्म दिला. हे वर्तन शिवरायांच्या वर्तनाशी विसंगत आहे. असे सांगणारा पत्रकार आणि राजकीय विचारवंत अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्या रूपात महाराष्ट्रात हिंदुत्वाची गर्जना करत होता आणि भविष्यातील धोके हिंदू समाजाला दाखवून देत होता. तोच आता हरपला.
 
आपला देश गांधी आणि सावरकर या दोन कुळांमध्ये विभागला गेल्याची खंत ते अनेक वेळा त्यांच्या व्याख्यानातून अथवा लेखनातून व्यक्त करत होते. जोपर्यंत सावरकर कुळातील लोकांची संख्या वाढणार नाही तोपर्यंत या देशाला ताठ मानेने जगता येणार नाही. सावरकरवादी बाजू मांडताना ते परखडपणे सांगायचे काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश या त्रिकूटाने संगनमत करून पाकिस्तानची निर्मिती केली. म्हणूनच विभाजन म्हणजे मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे. असे प्रतिपादन करणारे पहिले पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी होते.
 
आपण सावरकरवादी आहोत ही गोष्ट अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी कधीही लपवून ठेवली नाही. प्रामाणिकपणा, सत्य, नैतिकता या सद्गुणांची संगत त्यांनी कधीही सोडली नाही. कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडले नाहीत. शुद्ध संस्कारित वाणी आणि तेवढीच पवित्र, सात्विक लेखणी या जोडीला पवित्र ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांची पत्रकारिता गंगेसारखी निर्मळ आणि पवित्र ठरली. त्यामुळेच ते कधीही विकले जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी राजकीय वर्तुळात आणि पत्रकारिता क्षेत्रात निर्माण केला होता. त्यासाठी लागणारे नैतिक धैर्य त्यांना सावरकरांच्या विचारातून मिळाले. याचा त्यांना यथार्थ अभिमान वाटत असे. तो अभिमान आपल्या लिखाणातून आणि व्याख्यानातून ते व्यक्तही करत होते.
 
 
 
टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे या इंग्रजी दैनिकांनी सावरकरांच्या चारित्र्यहननाची मोहीम जेव्हा उघडली तेव्हा ते स्वतः त्याच दैनिकांत संपादकीय राजकीय विभागात काम करत होते. वास्तविक अशा वेळी व्यवस्थापनाबरोबर लढा देण्याची हिंमत कोणत्याही पत्रकारात नसते; कारण त्यांची नोकरी आड येते. पण त्यांनी एकहाती लढा दिला, त्यामुळे त्यांना आर्थिक हानी सहन करावी लागली. या गोष्टीबद्दल त्यांना कधीही पश्चाताप झाला नाही. सावरकर हे दैवत मानले की त्यासाठी कोणताही त्याग करायला, कोणत्याही संकटाशी सामना करायला तत्पर असणे हे आपले कर्तव्य ठरते. असे विचार ते व्यक्त करत होते आणि कृतीत आणत होते.
 
 सावरकरांचा हा सल्ला त्यांनी तंतोतंत अमलात आणला.
हिंदुत्वाचे कार्य करायचे असेल तर अनेक संकटांना सामोरे जावे लागणार. ठिकठिकाणी अपमान, मानहानी यासारखे प्रसंग उद्भवणार. आर्थिक हानीसुद्धा सहन करावी लागेल. या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी त्यांना मिळालेली ऊर्जा म्हणजे सावरकरांशी त्यांची प्रत्यक्ष झालेली भेट. त्यावेळी सावरकर त्यांना म्हणाले, ‘माझी जन्मठेप या पुस्तकाचे पारायण करा म्हणजे तुम्हाला जीवनात कधीही निराशेला सामोरे जावे लागणार नाही.’ सावरकरांचा हा सल्ला त्यांनी तंतोतंत अमलात आणला.
 
 
विलेपार्ल्यात 26 फेब्रुवारी या दिवशी सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला मराठी साहित्यातील नामवंत कवी उपस्थित राहणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून अरविंद विठ्ठल कुळकर्णी त्यांना म्हणाले,‘सावरकर हे महाकवी होते. आज त्यांचा आत्मर्पण दिन आहे. आपण त्यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोपसुद्धा त्यांच्याच कवितेने करावा.’ त्यांची ही सूचना संबंधित कवींना मान्य झाली नाही. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. पण कुळकर्णी स्वस्थ बसले नाहीत. ते कार्यक्रमाच्या वेळी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी कविवर्य ना.धो. महानोर यांना सावरकरांच्या कविता या कार्यक्रमात वाचल्या जाव्यात अशी विनंती केली. ना.धो. महानोर म्हणाले,‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाकवी आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. तुम्ही त्यांच्या कविता माझ्याकडे द्या. मी माझ्या कविता न वाचता सावरकरांच्या कवितांचे वाचन करीन.’ अशा प्रकारे छोट्या छोट्या वाटणार्‍या गोष्टीत सुद्धा त्यांनी व्यक्तिगत पातळीवर लक्ष घालून आपली सावरकरनिष्ठा आणि कर्तव्यभावना जोपासली.
 
 
संघाच्या संस्कारातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तेजस्वी ठरण्यामागे सावरकर तत्त्वज्ञान करणीभूत आहे. ‘संघातील अनेक कार्यकर्ते पत्रकार आहेत पण हे सारे प्रथम पत्रकार आणि नंतर स्वयंसेवक आहेत. अरविंद विठ्ठल कुळकर्णी हे स्वयंसेवक पत्रकार आहेत’, असे उद्गार दत्तोपंत ठेंगडी यांनी काढले होते.
 
इंग्रजी दैनिक आफ्टरनूनचे संस्थापक संपादक बेहराम कॉन्ट्रॅक्टर हे अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांच्याविषयी म्हणाले होते,”अरविंद कुळकर्णी हे एकमेव असे पत्रकार आहेत की त्यांचे राजकीय संबंध हे शुद्ध सात्विक आणि अत्यंत विश्वासाचे आहेत.”
 
 
वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले आणि बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आवश्यक तेव्हा अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा सल्ला घेत होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटण्याची वेळ ठरलेली नसताना सुद्धा ते मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी कधीही भेटू शकत होते. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीची दारे त्यांच्यासाठी नेहमी उघडी होती. शिवसेनेच्या राजकीय शिबिरात हिंदुत्वावर त्यांनी व्याख्याने दिली होती.
 
 हिंदुत्वाबाबत जो खटला भरला गेला तेव्हा हिंदुत्व याबद्दल अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वीस तास साक्ष दिली.
 
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर हिंदुत्वाबाबत जो खटला भरला गेला तेव्हा हिंदुत्व याबद्दल अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वीस तास साक्ष दिली. आपल्या साक्षीत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व कसे आहे ते त्यांनी प्रतिपादन केले. न्यायमूर्तींना त्यांच्या विद्वत्तेची आणि उत्कट देशभक्तीची ओळख पटवली, म्हणून त्यांनी साक्षीदाराच्या पिंजर्‍यात बसण्यासाठी कुळकर्णी यांना आसन दिले. वास्तविक साक्षीदार बसून कधीही साक्ष देत नाही. त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव जसा न्यायमूर्तींवरती पडला तसाच तो श्रोत्यांवर पडला याचा दाखला म्हणजे सांगलीला भिडे गुरूजी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी लोकांच्या आग्रहास्तव सुमारे साडेचार तास भाषण केले. त्यांचे भाषण लोकांना आवडले त्याचीही पावती म्हणजे धर्मभास्कर या मासिकात ते सातत्याने लिखाण करायचे. ज्यांना या मासिकाचे सदस्य व्हायचे असेल त्यांनी 125 रुपये भरून वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या भाषणाने प्रभावित झालेल्या लोकांनी धर्मभास्कर या मासिकाचे वर्गणीदार होण्याचे ठरवले. तिथल्या तिथे दोन लक्ष रुपये एवढी वर्गणी जमा झाली आणि हा एक विक्रमच प्रस्थापित झाला.
 
 ‘मी तारीख शब्द लिहू शकत नाही. माझी अडचण आहे.
सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी आयुष्यभर जतन केली. दैनिक सकाळमध्ये ते काम करत असतानाची ही घटना...बातमी करताना दैनिक सकाळच्या प्रथेप्रमाणे तारीख लिहावी लागते. तारीख हा शब्द मराठी नाही. तो परभाषेतला शब्द आहे. परभाषेतला शब्द आपल्या हातून लिहिला जाणार नाही याची खात्री असल्यामुळे तो सहजतेने दिनांक असा लिहिला गेला. त्यासाठी त्यांनी एकदा संपादक महाशयांकडे तक्रार केली. कुळकर्णी बातमी लिहिताना तारीख ऐवजी दिनांक शब्द वापरतात. संपादक महाशयांनी या तक्रारीची दखल घेऊन कुळकर्णींना जाब विचारला. त्यावेळी ते म्हणाले,‘मी तारीख शब्द लिहू शकत नाही. माझी अडचण आहे. प्रूफ रीडिंग करताना प्रूफ रीडर म्हणून तारीख लिहिल्यास माझा विरोध नाही.’ यावर संपादक महाशय निरुत्तर झाले.
 
 
एकदा रात्रपाळी करताना उत्तररात्री एक बातमी आली. त्या बातमीचे वृत्त तयार करून छपाई विभागाकडे पाठवले. त्याचे प्रूफ रिडींग स्वतः कुळकर्णी यांनी केले. त्यामुळे त्या बातमीत तारीख ऐवजी दिनांक शब्दच होता. आता अशी परिस्थिती झाली की त्या दिवशीच्या दैनिक सकाळच्या अंकात सर्व ठिकाणी तारीख शब्द होता. कुळकर्णी यांनी तयार केलेल्या वार्तेत दिनांक शब्द होता. संपादकाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी याबाबत कुळकर्ण्यांना खुलासा करण्यास सांगितला.
 
 
कुळकर्णी संपादकांना म्हणाले,‘रात्री 1॥ वाजल्यानंतर प्रूफ रीडर झोपतात. त्यांची झोप मोडू नये म्हणून मीच प्रूफ रिडींग करून ती बातमी छापली. आपण म्हणत असाल तर पुढच्या वेळेपासून प्रूफरीडरची झोपमोड करून प्रूफ रीडिंग करण्यास सांगेन. पण मी स्वतः तारीख हा शब्द चुकूनही वापरणार नाही. आपल्याला हे पटत नसल्यास मी नोकरी सोडण्यास तयार आहे.’ अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा हा खुलासा ऐकून संपादक महाशय चक्रावून गेले. एका सामान्य गोष्टीसाठी हा माणूस नोकरी सोडतो. याचा त्यांना बोध होईना. सावरकर विचाराशी नाते जोडल्यावर ते नाते टिकवण्यासाठी अन्य नाती तुटली तरी त्याची तमा बाळगायची नाही. ते ओघानेच आले. अशा प्रकारे स्वत्व, स्वाभिमान, अस्मिता, भाषाभिमान जोपासयला शिकवणारे संस्कार म्हणजे शुद्ध, निर्मळ, पवित्र जीवन होय. सावरकरांची विचारधारा अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी बळ देऊन मार्गदर्शन करते त्याचा हा दाखला आहे.
 
 
वीर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी, राजनीतिविषयी भाष्य करणारे शेकडो लेख अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी लिहिले. वीर सावरकरांचे स्वीय सचिव बाळाराव सावरकर एकदा त्यांना म्हणाले, ‘कुळकर्णी तुम्ही सावरकरांचे तत्त्वज्ञान उत्कृष्टरित्या लिहिता. सावरकरांचे विचार मांडणारा कोणीतरी आहे याचा मला आनंद आहे. आता मी मरायला मोकळा आहे.’
 
 
बाळाराव सावरकरांनी आपले हे मनोगत कुळकर्णींकडे व्यक्त केल्यानंतर केवळ दोन दिवसातच त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. या घटनेने कुळकर्णींना मोठा मानसिक धक्का बसला. त्याचवेळी स्वतःच्या वाढलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव त्यांना झाली.
 
 
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात त्यांनी युट्युबच्याद्वारे ‘अधोरेखित’ या सदराखाली राजकीय विश्लेषण सातत्याने करून आपला पत्रकारितेचा वसा पाळला.
 
 
कुळकर्णी यांच्या लिखाणातील आक्रमकता, सुस्पष्टपणा, तर्कसंगत बुद्धिनिष्ठ मांडणी या लेखनवैशिष्ट्यामुळे पु. भा. भावे यांच्या पत्नी (संपूर्ण डोंबिवलीच्या त्या भावे काकू होत्या.) कुळकर्णी यांच्या लेखाविषयी बोलताना म्हणाल्या होत्या,‘कुळकर्ण्यांचे लेख वाचताना मला भाव्यांची आठवण होते.’
 
 
हिंदी चित्रपटातील कॉमेडी किंग मेहमूद याच्या अचकट विनोद शैलीवर कुळकर्णी यांनी घणाघाती हल्ला केला होता. वर्ष 1971मध्ये हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धकाळातच मेहमूद चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी युरोपला गेला होता. तिथे एका पार्टीत आपल्या डाव्या हाताची करंगळी वर करून तो मोठ्याने सर्वांना म्हणाला,‘मी हिंदुस्थानला जाऊन येतो.’ त्यानंतर त्याने गंमत म्हणून अशी आवई उठवली की पाकिस्तानने मुंबईतील भाभा अणुभट्टी बॉम्ब टाकून उडवली. मेहमूदच्या तोंडून हे ऐकताच राज कपूर यांनी मुंबईला दूरध्वनी करून खरी माहिती मिळवली. तेव्हा मेहमूदने आपण गंमत म्हणून ही बातमी पसरवली असल्याचे सांगितले. या घटनेवर आधारित अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी सणसणीत लेख लिहिल्याचे अनेकांना स्मरत असेल. या लेखाचे शीर्षक होते ‘मेहमूदची करंगळी आणि हिंदुस्थान’... अशा प्रकारे जिथे जिथे देशविघातक गोष्टी घडल्याचे आढळलेे तिथे तिथे अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी आपल्या लेखणीतून प्रतिहल्ला चढवलेला आढळून येतो.
 
 
सावरकरांच्या तैलचित्राला संसदेत विरोध होताच त्यांनी धर्मभास्करच्या मार्च 2003च्या अग्रलेखात स्पष्टपणे लिहिले. ‘ज्यांच्यामुळे फाळणी झाली त्यांची चित्रे आपण नोटांवर छापतो आणि ज्यांनी फाळणी होण्याचे रोखण्याचा प्रयत्न केला त्यांचे चित्र लोकसभेतही लावायला विरोध होतो. हा दैवदुर्विलास आहे. सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी नव्हते असे न्यायालयात सिद्ध झाले म्हणून त्यांना न्यायालयाने कोणत्याही अटींवाचून सन्मानाने मुक्त केले. असे असतानाही काँग्रेस त्यांना गांधींचा मारेकरी ठरवण्याचा अट्टाहास करते. काँग्रेसची दादागिरी देशभक्त नागरिकांनी आणि सावरकरवाद्यांनी वैचारिक आंदोलन छेडून बंद करावी.’ असे कुळकर्णी यांनी लेखातून आवाहन केले होते.
 
 
मुसलमानांची नांगी मोडायची असेल तर ‘नको दंगे, नको धोपे आर्थिक बहिष्कार तंत्र सोपे’ अशी घोषणा करून मुसलमान समाजावर संपूर्ण आर्थिक बहिष्काराचे ब्रह्मास्त्र सोडा असे आवाहनही त्यांनी केले.
 
आपला देश आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असला पाहिजे हे सावरकरांचे विचार नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कृतीत आणत असल्याचे अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच,‘ऑपरेशन सिंदूर हे जोपर्यंत एक जरी अतिरेकी शिल्लक असेल तोपर्यंत ते अखंड चालूच राहणार’अशी घोषणा पंतप्रधानांनी करताच ते सुखावले होते. सावरकरांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत आणणारा हिंदुस्थानचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा वसा घेतलेल्या अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांना उतारवयात प्रत्यक्ष पहायला मिळाला. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
 
 
आमच्या पिढीसाठी अरविंद कुळकर्णी म्हणजे सावरकरांच्या साहित्याचा आणि सावरकरांच्या राजनीतीचा चालता बोलता संदर्भकोश! पार्थिव रूपात आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या लेखणीच्या आणि वाणीच्या स्वरूपात त्यांचे मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत राहील. सावरकरांच्या विचारांचा वारसा प्राणापलीकडे जपणारा त्यांचा कृतिशील अनुयायी काळाच्या पडद्याआड गेला त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!