राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

विवेक मराठी    20-Jun-2025
Total Views |


rss 
 
ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ठाण्यातील पहिली शाखा म्हणून हे कार्यालय ओळखले जाते. कै. विष्णू लक्ष्मण घाणेकर (आबा घाणेकर) यांनी ही जागा विकत घेतली होती. सुरूवातीला श्रीराम व्यायाम शाळा क्रीडा मंडळ हे मोफत सुरू केले. डॉ. हेडगेवारांसोबत जे 17 जण होते, त्यापैकी एकजणांनी आबांचे हे कार्य पाहून संघशाखा सुरू करावी ही इच्छा व्यक्त केली. ठाण्यातील पहिले प्रतिज्ञ स्वयंसेवक या नात्याने त्यांनी 2 फेब्रुवारी 1934 पासून या ठिकाणी संघशाखा सुरू झाली.

अनेक स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमाने ठाण्यातील ही संघशाखा कालानुरूप बदलत गेली. त्याचाच पुढील टप्पा म्हणजे 14 जून 2025 रोजी या नव्या कार्यालयाचे झालेले उद्घाटन. या कार्यक्रमास प्रांत संघचालक अर्जुन यशवंत तथा बाबा चांदेकर, प्रांत कार्यवाह विठ्ठल दुधप्पा कांबळे, ठाणे जिल्हा संघचालक राजेंद्र गोडबोले, प्रकल्प समन्वयक महेश भास्कर जोशी असे मान्यवर आणि ठाण्यातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाण्यातील श्रीराम व्यायाम शाळा या संस्थेला एक सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित संस्था म्हणून ओळखले जाते. संस्थेच्यावतीने नियमित व्यायाम, भारतीय खेळ, योग साधना, महिला व युवक सशक्तीकरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

ठाण्यातील हे संघ कार्यालय आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून 25 हजार चौरस फूट क्षेत्रफळात चार मजल्यांची प्रशस्त वास्तू उभारली आहे. या नवीन इमारतीमध्ये मुख्य सभागृह, सात छोटी सभागृहे, 4 मोठ्या खोल्या, प्रचारक निवास, मोठं स्वयंपाकघर, तसेच तळमजल्यावर 100 जणांची सोय होईल एवढी व्यवस्था, भोजनकक्ष, स्वागतिका कक्ष, भांडारविक्री सोय, संस्थेचे कार्यालय, महिला आणि पुरूषांसाठी चारही मजल्यांवर स्वच्छतागृहे अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.
 
संघ शताब्दी वर्षात ठाण्याच्या या वास्तूचे उद्घाटन होणे हा दुग्धशर्करा योग आहे. राष्ट्रउभारणीच्या या कार्यात संघ स्वयंसेवकांना आणि अन्य क्षेत्रातील राष्ट्रहितैषी कार्यकर्त्यांना ठाण्यातील हे संघ कार्यालय मायेचा आसरा आणि कामाचा उत्साह वाढविणारे उर्जाकेंद्र ठरेल, ही खात्री आहे.
 

rss