@माणिकराव खुळे 9423217495
महाराष्ट्रात खरीप हंगामात जी पीके घेतली जातात, त्या प्रत्येक पिकावर मान्सूनचे जे वर्तन असेल त्यानुसार सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतो. या संदर्भात कानोसा घेणारा हा लेख.
साधारण मे महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील शेतकर्यांना खरीप हंगामाचे वेध लागतात आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत त्या हंगामाची सांगता होते. एकूण अशा 160 ते 165 दिवसांचा हा खरीप हंगाम हा पूर्णपणे जागतिक पातळीवरील वातावरणीय घडामोडीतून देशात येणार्या व 120 दिवस पडणार्या मोसमी पावसावर अवलंबून असतो. महाराष्ट्रात पाऊस येणार आणि मृग नक्षत्राच्या पावसावर खरीप हंगाम पिकांची पेरणी होणार हे शेतकर्यांचे ठरलेल्या पारंपारिक सूत्रासाठी आदल्या वर्षी सरलेल्या हंगामापासून संपूर्ण उन्हाळाभर पुढील अडीच महिने शेतकरी शेत मशागत, बी-भरण, आर्थिक भांडवल, मजुरांची व्यवस्था इ. नियोजन करत असतो. परंतु अलीकडच्या 30-40 वर्षात या सूत्राला धक्का पोहोचल्याने शेतकरी उदासीन व चिंताग्रस्त होत आहे.
अलीकडच्या काळात मात्र मान्सून वेळेवर येत नाही. कधी तर येतच नाही. कधी उशिरा आल्यानंतर धो-धो कोसळून महापूर देऊन पिकांचा नायनाट करून उशिरापर्यंत ठाण मांडून बसतो व खरीप व रब्बी हंगाम पिकांची साखळी तोडून नुकसान करूनच जातो. अलीकडच्या दशकात तर दुष्काळी पट्ट्यात अधिक तर कोकणात कमी पाऊस होऊ लागलाय. त्यामुळे कोकणवासियांच्या व देशावरील जनजीवनावर दुष्काळी परिणाम जाणवू लागलाय. यंदा मात्र मे महिन्यात झालेल्या पावसामुळे कोकणात वाफसा मिळणे कठीण झाले आहे. भात लागवडीवर परिणाम होईल, अशी साशंकता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती मराठवाड्याच्या काही भागात आहे.
खरीप हंगाम कसा असेल?
खरीप हंगाम चांगला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होणे अपेक्षित असते. महाराष्ट्रात पावसाळी हंगामातील जून ते सप्टेंबर 4 महिन्यात सरासरी पाऊस हा साधारण अंदाजे 100 सेमी.च्या आसपास असतो. महाराष्ट्राचा विचार केला तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी इतका पाऊस झाला तर तो 96 ते 104 टक्के इतका पाऊस झाला, असे समजतात. भारतीय हवामान खात्याच्या दीर्घ पल्ल्याच्या अंदाजानुसार या वर्षी जून ते सप्टेंबर 2025 वर्षांत महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे सरासरीच्या 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजे दरवर्षी जो पाऊस जून ते सप्टेंबर चार महिन्यात एकत्रित पाऊस पडणार आहे. म्हणजेच खरीप हंगाम हा चांगलाच जाणार आहे. त्यामुळे ऊस, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग तूर, कपाशी व भाजीपाला इत्यादी पीके सुस्थितीत राहून पिकांची खळ्यावरील भर किंवा झड किंवा रास चांगली होण्याची शक्यता जाणवते.
हवामानाचा कानोसा घेऊन पेरणी करावी
यंदा फक्त पावसाचे वितरण मात्र समसमान होणे, अपेक्षित आहे. शिवाय जून महिन्यात सरासरी इतकाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे चांगल्या मान्सून पावसाच्या ओलीवर पेर होणे आवश्यक आहे.
आता मान्सून चांगला आहे, असं म्हणतात तर पहिला पाऊस झाला तर खरीप पेर वा लागवड करायला काय हरकत आहे? परंतु पहिला पाऊस भले तो पूर्वमोसमी असू दे, पण कमीत कमी 3 ते 4 दिवस वाफसा न होणारा दमदारच पाऊस व्हायला हवा. त्यावर पेर-पूर्व मशागत व्हावी, की ज्यामुळे जमीन रंध्रातून (मातीतील लहान छिद्र) संचित उष्णता बाहेर पडणे व जमीनगर्भी अंकुरलेल्या तणाच्या सोयीची मोडतोड होणे आवश्यक असते. कमीतकमी एक दोन रात्रीचा कालावधी या प्रक्रियेस मिळणे गरजेचे आहे. जमिनीतील ओल 4 ते 5 से.मी.दरम्यानची असावी, हवामान खात्याचा अंदाजाचा कानोसा घेऊन शेतकर्यांनी स्वतःच्या धाडसावर पेरणीचा स्वयंनिर्णय घ्यावा.
खरीप हंगामाचा गेम सावधच खेळायला हवा
महाराष्ट्रात खरीप हंगामात जी पिके घेतली जातात, त्या प्रत्येक पीकावर मान्सूनचे जे वर्तन असेल त्यानुसार त्या पिकांवर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतो. उदाहरणार्थ टोमॅटो, मिरची, कपाशीच्या लागवडीवर कसा परिणाम होतो बघा.
दीर्घ पल्ल्याच्या अंदाजात जरी भरपूर पाऊस सांगितला असला तरी, मान्सूनचे आगमन व त्याचे 4 महिन्यातील वितरण हे तीनही विषय वेगवेगळे आहेत. येथेच गफलत होऊन कपाशी, टोमॅटो व मिरची इत्यादीच्या आगापच्या (पीकाची लागवड त्याच्या योग्य वेळेपेक्षा आधी करणे.) नादात लागवडी होऊन कधी कधी फसव्या ठरतात.
मागील वर्षांची पाण्याची उपलब्धता, पाणी पातळी, धरण, कॅनॉल, नदी तलाव इ.चे जलस्रोतांद्वारे उन्हाळ्यात जमिनीत पाणी दिले तरी, पहिल्या 2-3 पावसाच्या फेर्या झाल्यानंतरच जमिनीला काहीसा थंडावा तर हवेत गारवा येतो.
सूर्य मावळतीनंतर प्रत्येक निरभ्र रात्रीतून ’लंबलहरी उष्णता ऊर्जा ’ बाहेर पडल्यानंतरच वरील पिकांच्या लागवडी होणे व नंतर मध्यम पाऊस होणेही आवश्यक असते. लागवड करणे आपल्या हातात असते पण नंतरचा पाऊस होणे आपल्या हातात नसते. शेतकरी जेव्हा लागवड करून बसतात अन पेर व लागवड करतांना म्हणत असतात,
’होईल पाऊस ’!
आगाप (धूळपेरणी) लागवड
’पाऊस का झाल्याशिवाय राहतो?!’ अन् येथेच गफलत होते. मान्सून पुढे येईलही पण अंगी जोर असेल की नाही हे माहीत नसते. तेव्हा महाराष्ट्रातील शेतकर्यांनी खरीप पेरणीचा गेम सावधच खेळायला हवा.
काही प्रश्न, काही उत्तरे
महाराष्ट्रात कपाशी, तूर, सोयाबीन, मका, भाजीपाला, लाल कांदा, भुईमूग व इतरही कडधान्य पीके खरीपात घेतली जातात. सध्याच्या अवस्थेत मान्सूनचे आगमन व एकंदरीत परिस्थिती पाहता, खरीप पेरण्या वेळेत होऊ शकतात. या वर्षी टोमॅटो, कोथिंबीर, गाजर व वाल ही पीके हाती येतील पण नंतर अति लागवडीमुळे अतिपुरवठा बाजारात होऊ शकतो. तो होणार नाही, हेही बघावे लागणार आहे.
बरेच शेतकरी, नेहमीप्रमाणे दरवर्षी करतात तशी कपाशीची धूळ-पेर लागवड कदाचित करतील. खरे तर बागायती क्षेत्रात यावर्षी असे धाडस शेतकर्यांनी केले तर हरकत नाही. कपाशी पिकासाठी मात्र या वर्षी पेर चांगल्या ओलीवर करावी. कारण ती वेळ येण्यास फार उशीर नाही.
मका पीकाचा विचार करतांना असे वाटते की, प्रकाश संश्लेषणास कितीही सूर्यप्रकाश मिळाला किंवा सांद्रीभवनात रूपांतरित न होणारी अशी कमी दवांक (हवेत अधिक पाणी राहू शकत नाही.) तापमानाची कितीही आर्द्रता वातावरणात उपलब्ध असली तरी अशा जाणवणार्या दमटपणातून मका पिकावर होणारे लष्कर अळीचे अधिक आक्रमण मका पीकाच्या कोंबात पावसाचे पाणी गेल्याशिवाय आटोक्यात येतच नाही. म्हणजेच पिकाचे 100 टक्के चांगले भरणपोषण चांगल्या व सततच्या पावसाशिवाय होतच नाही. म्हणून कितीही मूळ पाणीसाठा उपलब्ध असला तरी चांगल्या पावसाशिवाय खरीप मका पिकाचा हंगाम जिंकताच येत नाही. यावर्षीचा मका हंगाम जिंकण्यासाठी चांगली संधी आहे.
आगाप धूळ लागवड करण्याची धडपड का करतात?
खरे तर, कपाशीची आगाप लागवडच पीकाच्या सर्वांगाने फायद्याची ठरते म्हणून तर मराठवाडा विदर्भात फार मोठे क्षेत्र हे या पीकाला पूरक असल्यामुळे तेथील शेतकरी कपाशीची धूळ लागवड करतात. पाऊस येईपर्यंत उपलब्ध पाण्यावर रोपटे जगवतात. आणि जीवदान मिळाले तर सुरुवातीच्या पूर्वमोसमी व मोसमी पावसाच्या सरींवर, बदलणार्या हवेच्या थंडाव्यावर कपाशी पीक लागवड मार्गी लागते. सुरुवातीच्या काळातील कोवळ्या तणाचाही बंदोबस्त करता येतो. बोंडअळीचाही प्रादुर्भाव कमी होतो. दमट वातावरण साजेसा काळ येतो की, ज्यामुळे कपास- फळ वाढते. कपाशी आल्यामुळे भविष्यातील पावसाचे नक्षत्र वजा जाता कापूस वेचण्याच्या आवर्तनांना फायदा होतो. म्हणूनच शेतकर्यांची कपाशीच्या आगाप लागवडीसाठी धडपड असते.
कपाशीची अगाप लागवडीसाठी नेमकी काय अडचण?
जून महिन्यात मान्सूनचे आगमन नेमके कोणत्या तारखेला होईल? त्या अगोदर मान्सूनपूर्व वळवाच्या सरी कधी आणि किती कोसळतील? जून महिन्यातील या दोन गंभीर बाबी शेतकर्यांना कपाशी पिकाबाबत हवामान अंदाजातून आगाऊ तंतोतंत मिळाव्यात, अशी अपेक्षा असते. आगमनाबाबत अंदाज खरा ठरतो, परंतु मान्सून आला आहे अशी घोषणा होते, परंतु त्या प्रमाणात पाऊस न दिसल्यामुळे अंदाजाची विश्वासार्हता त्यांना निराश करते. हवामान विभाग त्यांच्या निकषानुसार आगमन तारीख व मान्सून कोठपर्यंत पोहोचला हे त्यांच्या दृष्टिकोनातूनच बरोबर असते. परंतु शेतकरी म्हणतात मान्सून आला पण मग पाऊस कोठे गेला?
कारण मान्सून प्रवाहात कमकुवतपणा निर्माण झाल्यास मान्सून पुढे झेपावतो, पण मागे पाऊस नसतो. जेव्हा पुन्हा तो प्रवाह उर्जितावस्थेत येतो, तेव्हाच पुन्हा पाऊस सुरू होतो. मान्सून प्रवाह कधी कमकुवत व कधी बळकट होईल ते अगोदरच वर्तवता येत नाही, आणि येथेच कपाशी पिकाचे गणित बिघडते.
लाल कांदा लागवडीचा काय निर्णय घेणे योग्य ठरेल?
या वर्षीच्या लाल कांद्याचा नवीन हंगाम हा जोरात लाल कांदा हुळं टाकणी (कांद्याचे बियाणे), उत्कृष्ट कांदा रोपांच्या नर्सरीत आणि अति लाल कांदा लागवडी होतील. मात्र लाल कांदा लागवड व काढणी दरम्यान यंदाचा मान्सून कदाचित शेतकर्यांच्या आशा व नियोजनावर पाणी फिरवील की काय? अशी शंका वाटते.
ऊस लागवडीसाठी पाऊसमान कसे असेल?
2025 च्या वातावरणीय घडामोडी या उसाच्या हंगाम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठीच आहे, असे वाटते. सातव्यातील (सातारा जिल्हा)आडसाली लागवडी यावर्षी शेतकर्यांना फायदेशीर ठरतील, असे वाटते. नोव्हेंबर-डिसेंबरमधील ऊस लागवडी कदाचित शेतकर्यांना चांगल्याच थकवतील असे वाटते.
सोयाबीनकडे कसे बघावे?
सोयाबीनची या वर्षीची आगाप पेरणी शेतकर्यांना लाभदायक ठरू शकते. ज्या ठिकाणी सध्या सिंचनासाठी अल्प पाण्याची उपलब्धता असेल अशा शेतकर्यांनी सुरुवातीच्या दमट ओलीवर व त्यांच्याकडील उपलब्ध तुषार सिंचनावर येणारा मान्सून कदाचित त्यांना मदत करू शकतो, असे वाटते. किडीचा प्रादुर्भावही अशा आगाप पेरणीत कमी जाणवेल असे वाटते. सोयाबीन पीकाबाबतीत मात्र यंदा निचरा होणार्या मुरमाट व माथा आणि उंचावट जमिनीत पिक घेणे योग्य ठरेल.
कांदा नर्सरीबाबत हंगाम कसा असेल?
लाल कांदा रोपांच्या नर्सरीजला या वर्षी अति पावसालाही कदाचित सामोरे जावे लागेल, असे वाटते. उन्हाळ गावठी कांदा रोपाच्या बाबतीत मात्र चित्र उलट असू शकते. उन्हाळ कांदा रोपे टाकेपर्यंतचा मान्सून पाहता शेतकरी उन्हाळ गावठी कांदा रोपे टाकण्याच्या जय्यत तयारीत असतील पण पाऊस उघडीप मिळणे, जमीन वाफसा होणे, रोपे उतार, बुरशी किडीचा प्रादुर्भाव या समस्यांना कदाचित अधिक तोंड द्यावे लागेल.
उशिरा पेरा करताना शेतकर्यांनी त्या त्या पीकांच्या लवकर येणार्या जाती लावाव्यात. शिवाय पर्यावरणीय बदलातही टिकून राहण्यासाठी संधीही शोधायला हव्यात.
लेखक पुणे येथील भारतीय हवामान विभागातील
सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत.