पितृऋण

विवेक मराठी    21-Jun-2025   
Total Views |
पितृऋण फेडण्यासाठी माता पित्याची तसेच कुटुंबातील वडीलधार्‍यांची सेवा करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आणि त्यांच्याप्रती आदर बाळगणे आवश्यक आहे. तसेच आपण स्वत: चांगले पालक होणं, आपल्या संततीला त्यांच्या कलेनुसार योग्य शिक्षण देणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपली संतती आपल्याहून अधिक चांगली होते, तेव्हा पितृऋण फेडले असे समजू शकतो.
पाच प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पाच प्रकारचे यज्ञ - अर्थात पंचमहायज्ञ सांगितले आहेत. 48 प्रमुख संस्कारांपैकी पंचमहायज्ञ हे गृहस्थाश्रमातील अत्यंत महत्त्वाचे संस्कार मानले गेले आहेत. विवाहानंतर गृहस्थ जीवनात प्रवेश केलेल्या प्रत्येक जोडप्याने हे यज्ञ दररोज श्रद्धेने आणि निष्ठेने करावेत, असा वेदांचा आणि स्मृतींचा आग्रह आहे. हे यज्ञ अग्नी प्रज्वलित करून, त्या मध्ये आहुती अर्पण करण्याचे नसून, आपल्या कुटुंबाची, समाजाची, पारंपरिक ज्ञानाची आणि निसर्गाची सेवा म्हणून केले जातात. प्रत्येक जोडप्याने - पाठशाळेला दान द्यावे, विद्यार्थ्याला मदत करावी, गरीबाला मदत करावी, प्राण्याला खाऊ घालावे, वृक्षारोपण करावे, आई-वडीलांची काळजी वाहावी आणि आपल्या मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन करावे ... याची आठवण करून देणारे हे संस्कार म्हणजे पंचमहायज्ञ! ह्या संस्कारांनी केवळ आपल्याच मुलांचे नाही तर समाजाचे आणि भावी पिढीचे हित पण आपोआप साधले जाते. पंचमहायज्ञ हे गृहस्थाश्रमी जीवनाचे केवळ कर्तव्य नाही तर साफल्य आहे, सार्थक आहे.
 
रजनीकांत आणि रोहिणी आज एका सत्संगाला गेले होते. काहीच दिवसांपूर्वी ते डॉ. मीरा यांना भेटले होते. सुदृढ बाळ होण्यासाठी आरोग्याची काय काळजी घ्यायला हवी हे त्यांच्याकडून जाणून घेतल्यापासून, दोघांनी स्वत:मध्ये काही बदल घडवून आणले होते - रजनीकांतने सिगरेटबंद केली होती. रोहिणीने आपल्या आहार-विहाराकडे गांभीर्याने लक्ष दिलं. ताजी फळं, सकस अन्न, व्यायाम यांचा समावेश त्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात केला होता. आजच्या सत्संगाला येणे, हा देखील त्याच बदलातील एक भाग होता. भजन झाल्यावर गुरुजींनी महाभारतातील कथा सांगण्यास सुरवात केली.
 
फार जुनी गोष्ट आहे. राजा पांडूला मूल होणार नाही असा शाप मिळाला होता. त्या दु:खात त्याने राज्य सोडले. त्यावर तो आपल्या पत्नी कुंती आणि माद्री यांना सोबत घेऊन हिमालयातील शतशृंग नावाच्या पर्वतावर गेला. तेथील वनामध्ये वल्कले परिधान करून पांडू राजा अल्प आहार घेऊन राहू लागला. तो नित्य यज्ञ करत असे आणि उरलेल्या वेळात तेथील ऋषींच्या बरोबर धर्म आणि अध्यात्मावर संवाद करत असे. एके दिवशी त्यांच्यात पाच प्रकारच्या ऋणांची चर्चा झाली. राजाने त्यांना ते ऋण कोणते असतात असे विचारले.
ऋषी म्हणाले, राजन्! ऋषीऋण, पितृऋण, देवऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण हे पाच ऋण आहेत. प्राचीन ऋषी परंपरेकडून आपल्याला मिळालेले ज्ञान हे ऋषीऋण आहे. पूर्वजांकडून आपल्याला शरीर मिळाले आहे, जीवन मिळाले आहे. त्यांनी आपले लालनपालन केले आहे. या उपकारांना पितृऋण म्हणले आहे. देवतांनी म्हणजेच इंद्र, वरुण, अग्नि, पृथ्वी, वायू, सूर्य, वृक्ष, अरण्य, नदी इत्यादी निसर्गातील दैवी शक्तींनी आपले पोषण केले, ते देवऋण मानले जाते. तसेच समजाकडून आपल्याला अनेक सेवा सहज मिळतात, हे आपल्यावरील मनुष्यऋण आहे. आणि शेत नांगरणार्‍या बैलांपासून, परागीभवन करणार्‍या किटकांपर्यंत प्राणी आपल्याला अनेक सेवा देतात, ते भूतऋण मानले गेले आहे.
त्यावर राजा पांडूने विचारले, मुनी! ऋण असेल, तर ते फेडले पाहिजे. मग प्रत्येकाने हे पाच ऋण कशा प्रकारे फेडायचे असतात?
तेव्हा ऋषी म्हणाले, पाच ऋण फेडण्यासाठी पाच दैनिक यज्ञ करावेत. ऋषीऋण फेडण्यासाठी नित्य स्वाध्याय करणे आणि आपल्याला परंपरेने मिळालेले ज्ञान खंडित होऊ नये या करिता ते सत्पात्री शिष्यांना दान करणे हा ऋषीयज्ञ आहे. देवऋण फेडण्यासाठी देवपूजा आणि निसर्गाची सेवा करायची. ज्या देवतांच्या शक्तीने आपलं जीवन चालू आहे, त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगायची. ज्या नदी तळ्यांनी, लता वृक्षांनी आपली सेवा केली ते नैसर्गिक स्रोत आपल्या अतिवापराने नष्ट होऊ नयेत याची काळजी घेणे हा देवयज्ञ. सत्पात्री व्यक्तीला दान दिल्याने, अडल्या नडल्याला मदत केल्याने मनुष्यऋण फिटते. समाजाचे चक्र अखंड फिरत राहावे यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे मनुष्ययज्ञ आणि प्राण्यांना जलदान करणे, अन्नदान करणे आणि प्राण्यांची कुठली प्रजाती नष्ट होणार नाही याची काळजी घेणे, हाच भूतयज्ञ होय.
राजाने विचारले, मुनीवर्य! पितृऋणातून मनुष्य कशाप्रकारे मुक्त होऊ शकतो?
 
राजा! पितृऋण फेडण्यासाठी माता पित्याची तसेच कुटुंबातील वडीलधार्‍यांची सेवा करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आणि त्यांच्याप्रती आदर बाळगणे आवश्यक आहे. तसेच आपण स्वत: चांगले पालक होणं, आपल्या संततीला त्यांच्या कलेनुसार योग्य शिक्षण देणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपली संतती आपल्याहून अधिक चांगली होते, तेव्हा पितृऋण फेडले असे समजू शकतो.
 
हे ऐकून राजा पांडू उदास झाला. त्याला वाटत होते की मी ऋषींच्या, देवांच्या आणि मनुष्यांच्या ऋणातून मुक्त झालो, पण या जन्मी मी पितृऋणातून मुक्त होणार नाही. आपल्याला संतती नसल्यामुळे आपल्यावर असलेले पितरांचे ऋण आपण कसे फेडणार? माझा प्राचीन व श्रेष्ठ वंश माझ्यापाशी खंडित होईल. संततीच्या अभावी माझ्या जीवनाचे सार्थक कसे होईल? या विचारांनी त्याच्या मनात दाटी झाल्याने तो अतिशय दु:खी राहू लागला.
 
 
त्यावेळी धर्मशास्त्रानुसार त्याला सांगण्यात आले की जो स्वत:च्या पत्नीच्या ठायी पुत्र उत्पन्न करू शकत नसेल, त्याने नियोग पद्धतीने श्रेष्ठ पुरुषापासून स्वत:च्या पत्नीच्या ठिकाणी मूल उत्पन्न करावे. याला प्रणीत पुत्र किंवा आजच्या भाषेत ज्याला डशिीा ऊेपरींळेपद्वारे पूत्रोत्पत्ती करणे म्हणता येईल. किंवा त्याने आपल्या पत्नीला लग्नापूर्वी झालेला पुत्र आपला मानवा. अथवा मुलीच्या मुलाला दत्तक घ्यावे, आणि ते ही नाही, तर आपल्या कुळातील एक मूल दत्तक घ्यावे. हे राजा! यापैकी कोणत्याही पद्धतीने झालेला मुलगा, तुझाच पुत्र असेल. त्याचे चांगल्या प्रकारे संगोपन करून तू पितृऋणातून मुक्त होशील.
 
 
पुढे कुंतीला प्राप्त झालेल्या मंत्राच्या योगाने पांडुला - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या पाच पुत्रांची प्राप्ती झाली. एकेका वर्षाच्या अंतराने या पुत्रांचा जन्म झाला होता. प्रत्यक्ष देवांप्रमाणे असलेल्या आपल्या पाच पुत्रांकडे पाहून पांडूला परम हर्ष होत असे.
 
 
ही कथा ऐकून घरी आल्यावर रोहिणी म्हणाली, अशी वेळ येऊ नये, पण जर आपल्याला मूल झाले नाही तर? रजनीकांत तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तर आपण वैद्यकीय तपासणी करून आवश्यक त्या उपचारांची मदत घेऊ. जर आपल्यात काही दोष निघाला तर त्या निदानाचा सुद्धा आपण स्वीकार करू. स्वत:चेच मूल हवं असा अट्टाहास नाही धरायचा. तुझ्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील असे पराकोटीचे उपाय पण नकोत आपल्याला. वैद्यकीय शास्त्राने, धर्मशास्त्राने आणि कायद्याने सुद्धा संतानप्राप्तीसाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत, त्याचा विचार करू. मूल झाले नाही तर-दत्तकमूल घेऊन सुद्धा पालकत्व अनुभवता येतं, हे लक्षात ठेवू...

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com