मिश्र पीक पद्धत - एक आदर्श मॉडेल

विवेक मराठी    21-Jun-2025
Total Views |
 
@सोनाली कदम
 
krushivivek 
खरीप हंगाम हा महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर या कालावधीत येणारा मुख्य शेती हंगाम आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात पावसावर आधारित पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु हवामानातील अनिश्चितता, पाऊस कमी-अधिक होणे यामुळे पिकांची हानी होते. या पार्श्वभूमीवर मिश्र पीक पद्धत (Mixed Cropping) ही एक शाश्वत, सुरक्षित व नफा देणारी शेती पद्धत ठरू शकते.
शेती हा भारतासारख्या कृषिप्रधान देशाचा कणा मानला जातो. काळाच्या ओघात शेतीत अनेक बदल झाले, होताहेत. जमिनीचे प्रकार, पावसाचे प्रमाण आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शेती कसण्याच्या पद्धतीतदेखील विविधता आढळून येते. जसे की, पारंपरिक शेती, सेंद्रिय/ जैविक शेती, सघन शेती, हरितगृह शेती, हायड्रोपोनिक्स शेती, शाश्वत शेती व मिश्र शेती अशा शेतीच्या प्रचलित पद्धती आहेत.
 
 
मिश्र शेती तशी प्राचीन काळापासून चालत आलेली आणि शाश्वत उत्पन्न देणारी एक आदर्श पद्धत आहे. एका शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक वेगवेगळ्या जाती लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीकपद्धत म्हटले जाते. अशी पद्धत महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेली आहे. कोकणात वाफसा पद्धत ही पारंपरिक पद्धत प्रसिद्ध आहे. या पद्धतीत जमिनीत ओलावा कमी झाल्यावर पेरणी केली जाते.(नारळ, सुपारी, केळी अशा फळपीकांसोबत भाजीपाला घेतला जातो.) विदर्भ व मराठवाड्यात बैलांवर आधारित शेती अजून मोठ्या प्रमाणात केली जाते. या ठिकाणी कापूस व तूर, कापूस व बाजरी हे मिश्र पीक घेण्याची पद्धत आहे. कोकणात भाताच्या पिकात वालाचे पीक घेतात. मराठवाड्यात बाजरी (10ओळी) मूग (10 ओळी), तीळ (8ओळी) कापूस ( 10ओळी), ज्वारी (8ओळी) करडई (4ओळी), तूर (6ओळी) अंबाडी (3ओळी) असे जिरायती, बागायती व कायम स्वरूपाच्या पीक-मळ्यांमध्ये मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. कडधान्य व तृणधान्याच्या पीक मिश्रणामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. वैरणीच्या पिकात द्विदल वनस्पती पेरल्यास वैरणीची चव सुधारते.
 
 
मिश्र पीक पद्धतीचे फायदे
 
जर एक पीक हवामानामुळे फसले, तरी दुसरे पीक त्याची भरपाई करू शकते. जोखीम काळात ही पद्धत फायदेशीर ठरते.डाळी पिकांमुळे नत्र स्थिरीकरण होते, ज्यामुळे माती उपजाऊ राहते. याखेरीज विविध पीक एकत्र असल्यामुळे कीड एका विशिष्ट पिकावर संपूर्ण प्रादुर्भाव करू शकत नाही, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्ये यांचा योग्य व पूर्ण उपयोग होतो, एकाच वेळेस विविध पिकांचे उत्पादन मिळाल्यामुळे उत्पन्नात वाढ होते, संपूर्ण शेतावर कामाचे ओझे एकाच वेळी येत नाही, त्यामुळे मजुरांचे योग्य नियोजन करता येते. मुख्य पीक आणि आंतरपीक किंवा मिश्र पिकाचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीत भिन्नता असल्यामुळे कापणी करणे सुलभ होते. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण/सर्व पीक उद्ध्वस्त न होता किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते. कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आंतरपीक/मिश्र पिकाची मदत होते. शेतीच्या लहान क्षेत्रात मिश्र पीक पद्धत विशेष फायद्याची ठरते.
 
 
असे आहेत तोटे
 
या पद्धतीचे वर नमूद केलेले जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे या पद्धतीचा सर्रास वापर करणे शक्य होईलच असे नाही. या पद्धतीत यांत्रिक अवजारांचा वापर करणे शक्य होत नाही. विविध पीके निरनिराळ्या वेळी कापणीसाठी येतात व कापणीच्या मजुरीचा खर्च वाढतो. कोरडवाहू शेतीत पिकाच्या कापणीनंतर जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन लागलीच जमीन नांगरणे आवश्यक असते, परंतु मिश्र पीक पद्धतीत सर्व पीके एकाच वेळी कापणीसाठी येत नसल्याने हे शक्य होत नाही. उशिरा तयार होणार्‍या पिकांच्या कापणीपर्यंत अगोदरच्या पिकाच्या कापणीमुळे रिकामी झालेली जमीन वाळून तडकते आणि नांगरणीचे काम कष्टाचे होते. या पद्धतीतील पिकांची निवड काळजीपूर्वक न केल्यास रोग किडी यांच्या प्रमाणात वाढ होण्याचा संभव असतो. परंतु ज्यांचे क्षेत्र मर्यादित आहे अशा अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच अधिक फायद्याची आहे.
 
 
खरीप हंगामाकरिता मिश्र पीक प्रयोग
 
मिश्र पीक किंवा आंतरपीक निवडताना तृणधान्य पिकांमध्ये कडधान्य पिकांची निवड करावी.
 
1) बाजरी+ मुग- मुग नत्र स्थिरीकरण करते, जमिनीचा पोत सुधारतो.
 
2) सोयाबीन + मका दोन्ही पिकांच्या वाढीचा कालावधी वेगळा असतो. त्यामुळे स्पर्धा कमी असते.
 
3) भात+ उडीद- उडीद नत्र स्थिरीकरण करतो, भाताखाली जमीन भुसभुशीत राहते.
 
4) कापूस+ मूग / उडीद - डाळवर्गीय पिकांमुळे माती सुपीक राहते, कापसाची मुळे खोलवर जातात. त्यामुळे मातीच्या सुपिकतेचा पिकाला फायदा होतो.
 
5) ज्वारी+तूर एक खरीप हंगामात येणारे पीक आणि एक उशिरा काढणीचे पीक आपल्याला घेता येते.
 
6) मूग+ सोयाबीन- दोन्ही व्यापारी व पोषणमूल्य असलेली पिके आहेत.
 
8) सोयाबीन + तूर- दोन वेगवेगळ्या हंगामात काढणीस येतात आणि दोन्ही उच्च उत्पन्न देणारी पिके.
 

krushivivek 
 
 
मिश्र पीक घेताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
 
1. पिकांच्या वाढीचे कालावधी वेगळे असावेत, त्यामुळे एक पीक आधी काढणीस येते व दुसरे नंतर, शेतात अडथळा निर्माण होत नाही.
 
2. जमिनीच्या पोताचा विचार करणे आवश्यक आहे. काही पीक जड मातीला चांगले असतात (जसे की भात), तर काही हलक्या मातीला (जसे की मूग).
 
3. पाण्याची गरज वेगळी असावी, म्हणजे एक पीक कमी पाण्यात वाढते आणि दुसरे अधिक पाण्यात, जेणेकरून एकमेकांवर प्रभाव पडत नाही.
 
4. पेरणीचे अंतर योग्य ठेवा, एकमेकांच्या वाढीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्या.
 
5. खते आणि कीटकनाशके सावधगिरीने वापरा: एकाच औषधाने दोन्ही पिकांना फायदा व्हावा याची खात्री करावी.
 
6. एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके एका क्षेत्रावर घेऊ नये.
 
7. समान गरजा असणारी पिके टाळावीत.
 
8. एकसारख्या मुळ्या असणार्‍या पिकांची निवड आंतरपीक पद्धतीत करू नये.
 
9. पिके ही वेगवेगळ्या उंचीची, वेगवेगळ्या आकाराची असावीत.
 
10. मिश्र पीकपद्धतीत लवकर पक्व होणारी व उशिरा पक्व होणारी पिके एकत्रितपणे निवडावी.
 
11. आंतरपीक / मिश्र पद्धतीत एकतरी कडधान्य पीक असावे, त्यामुळे नत्र स्थिरीकरणास मदत होते.
 
12. एकमेकांचा गंध, रंग, सहवास तिरस्कार करणारी पिके टाळावीत.
 

krushivivek 
 
शिफारस केलेले काही आंतर
 
1. दोन ओळींच्या पद्धतीने लागवड ((Row Intercropping)):
 
उदा. : दोन ओळी सोयाबीन व एक ओळ मका.
 
फायदे : मशागत व औषध फवारणीसाठी सुलभता.
 
2. पट्टा पद्धतीने पीक पेरणी (Strip Cropping):
 
उदा. : 3 मीटर पट्टीमध्ये बाजरी, मग 3 मीटरमध्ये मूग.
 
फायदे : जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो.
 
3. उभ्या व आडव्या वाढीची संयोजना:
 
उदा. : मका (उभा) + मूग (जमिनीवर पसरणारा).
 
फायदे : प्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यांचा वापर योग्य होतो.
 
खरीप हंगामातील हवामान व मिश्र पिकांचे महत्त्व
 
खरीप हंगामात पाऊस पडण्याचे प्रमाण अनेकदा अनियमित असते. अशा परिस्थितीत, मिश्र पीकपद्धती शेतकर्‍यांना अतिरिक्त सुरक्षितता देते. एखादे पीक कमी पावसामुळे फसले, तरी दुसरे पीक काही तरी उत्पन्न देते. त्यामुळे एकाच पिकावर अवलंबून न राहता विविधता ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे आर्थिक नुकसान टळते.
 
शासनाची योजना व प्रोत्साहन
 
महाराष्ट्र शासनाच्या ’स्मार्ट शेती’, ’शाश्वत कृषी विकास कार्यक्रम’, तसेच ’राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान’ अंतर्गत मिश्र पीक पद्धतीला प्रोत्साहन दिले जाते. मिश्र पीक पद्धतीवर आधारित पीक प्रात्यक्षिके राबविली जातात. यात शेतकर्‍यांना जमीन निवडीपासून पीक उत्पादनापर्यंत तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. तसेच काही प्रमाणात बी-बियाणांंवर सवलतही दिली जाते.
 
मिश्र पिकांचे मृद व जलसंधारणात महत्त्व
 
मूलस्थानी जलसंधारण म्हणजे जागच्या जागी म्हणजेच शेतातल्या शेतात पावसाचे पाणी मुरवणे. कोरडवाहू शेतीमध्ये आणि खरीप हंगामात पावसाच्या पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा हे तंत्रज्ञान खरीप हंगामात फायद्याचे ठरते. (कपाशी+सोयाबीन) ही आंतरपीक पद्धती खोल मशागत करून उताराला आडवी पेरणी केल्यास पावसाच्या पाण्याचा अपधाव उथळ (अपधाव म्हणजे पाऊस किंवा पाण्याचा प्रवाही जमिनीच्या पृष्ठभागावरुन वाहून जाणे, ज्यामुळे जमिनीची धूप होते. उथळ म्हणजे जमिनीतील वरचा थर नांगरून काढणे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.) मशागतीपेक्षा 12.74 टक्के कमी होतो. तसेच जमिनीची धूप 17.76 टक्क्यांनी कमी होते आणि सोयाबीन तसेच कापसाचे उत्पादन 38.95 टक्क्यांनी वाढते. म्हणजेच (कापूस+सोयाबीन) या आतंरपीक पद्धतीमुळे मृदा व जलसंधारणास मदत होते. खरीप हंगामात मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास नुसतेच उत्पादनात वाढ होत नाही, तर मातीचा पोत, कीड नियंत्रण, उत्पन्नाचा स्थैर्य आणि शाश्वत शेतीचा मार्ग मिळतो. ही पद्धत शेतकर्‍यांसाठी ’एक पीक फसले, तरी दुसरे वाचेल’ असा विश्वास निर्माण करते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पीक पद्धतीचा जरूर अंगीकार करावा.
 
लेखिका येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी आहेत.