इराणचे पूर्वीचे नाव आहे, पर्शिया. हे पर्शियन साम्राज्य 1219 ते 1221 पर्यंत चंगेजखानने शब्दशः भस्मसात करून टाकले. शेवटी इराणच्या मोहम्मद शहा याला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पर्शियातून पळून जावे लागले. तिची स्थिती आताच्या इस्लामी क्रांतीचे अपत्य असलेल्या खेमेनईची झाली आहे. त्याचा शोध सुरू आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. आजचा इस्रायल-इराण संघर्ष ही तेराव्या शतकातील इतिहासाची पुनरावृत्ती ठरणार का?
इराण-इस्रायल संघर्षाच्या बातम्या हा सध्या दूरचित्रवाहिन्यांवरील महत्त्वाचा विषय झालेला आहे. या युद्धाशी प्रत्यक्ष आपला काहीही संबंध नाही, परंतु युद्धाच्या कथा अतिशय रम्य असतात असे म्हणतात. प्रत्यक्ष कथा कल्पना रंजकता भरून वाहिन्या भन्नाट बातम्या देत असतात. त्यातील हास्यास्पद बातमी ‘आता तिसर्या महायुद्धाची सुरूवात होणार’ अशी असते. बातमी देणार्याला तिसरे महायुद्ध म्हणजे काय, याची किती कल्पना असेल हा प्रश्नच आहे. अगोदरची दोन महायुद्धे झाली आहेत. ती प्रामुख्याने युरोपच्या भूमीवर लढली गेली. युरोपच्या भूमीवर रशिया आणि युक्रेनचे युद्ध चालू आहे. त्यातून तिसर्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता शून्य आहे. युद्ध करणार्या महाशक्तींना हे माहीत आहे की, तिसरे महायुद्ध झाल्यानंतर आम्ही युद्ध जिंकले असे सांगायला कुणीही जिवंत राहणार नाही.
इराण आणि इस्रायल संघर्षाला म्हटले तर तसे काही कारण नाही. इराणपासून इस्रायल जवळजवळ अडीच हजार किलोमीटर दूर आहे, म्हणून सीमावादाचा प्रश्न निर्माण होत नाही. दोघांच्या व्यापारी संबंधाच्या संघर्षाचाही विषय नाही. मग विषय कोणता? तो विषय आहे, दोन धर्मांच्या संघर्षाचा. इस्रायली लोक ज्यू धर्मीय आहेत आणि इराणी शासक शिया मुसलमान आहे. अरब भूमीत ज्यूंचे राष्ट्र नको ही इस्लामी इराणची भूमिका आहे. त्यामुळे इस्रायलला नष्ट करण्यासाठी हमास, हिजबुल्ला, हैती, या दहशतवादी संघटना इराणने पोसल्या आहेत. म्हणून न्यायाच्या पक्षाचा विचार केला तर न्याय इस्रायलच्या बाजूने आहे.
इराणचे पूर्वीचे नाव आहे, पर्शिया. हे नाव त्यांना ग्रीकांनी दिले. ग्रीकांनी भारताचा इंडिया केला. तसा इराणचा पर्शिया केला. हा पर्शिया अतिशय प्राचीन देश आहे. अतिशय समृद्ध संस्कृती असलेला देश आहे. एके काळी पर्शियन साम्राज्याचा विस्तार आज असलेल्या इस्रायलपासून मंगोलियाच्या सीमेपर्यंत होता. सायरस दी ग्रेट हा पर्शियन सम्राट अतिशय इतिहास प्रसिद्ध आहे. हे पर्शियन साम्राज्य 1219 ते 1221 पर्यंत चंगेजखानने शब्दशः भस्मसात करून टाकले. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. आजचा इस्रायल-इराण संघर्ष ही तेराव्या शतकातील इतिहासाची पुनरावृत्ती ठरणार का?
मंगोलिया आणि इराण यातील अंतर सुमारे चार हजार किलोमीटरचे आहे. म्हणजे आजच्या इस्रायलपेक्षा दुप्पट आहे. तेराव्या शतकात म्हणजे 1219साली आजच्यासारखी क्षेपणास्त्रे नव्हती, दूरसंचार व्यवस्था नव्हती. यांत्रिक गाड्या नव्हत्या. बंदुकीच्या दारूचा नुकताच शोध लागलेला होता. बंदुका आणि तोफा निर्माण व्हायच्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते चंगेजखान दोन लाख तर काहींच्या मते चार लाख घोडदळ घेऊन चालून गेला. युद्धाचे कारणही तसेच घडले.
चंगेजखान याने मंगोलियातील पशुपालन करणार्या टोळ्या संघटीत केल्या. त्यांच सैन्य उभं केलं. ते प्रशिक्षित केलं. पायाने घोडा हाकण्याची विद्या त्याने शिकवली.
चंगेजखान याने मंगोलियातील पशुपालन करणार्या टोळ्या संघटीत केल्या. त्यांच सैन्य उभं केलं. ते प्रशिक्षित केलं. पायाने घोडा हाकण्याची विद्या त्याने शिकवली. धावत्या घोड्यावरून धनुष्याला बाण लावून तो सोडण्याचे कौशल्य त्याने सैनिकांना शिकविले. मंगोलियन सैनिक घोड्यावर बसून 180 कोनातून धनुष्यबाण सोडत असत. त्याने प्रथम चीनवर हल्ला केला. अर्ध्याहून अधिक चीन आपल्या कब्जात आणला. त्याने तेव्हाचा पर्शियाचा सम्राट मोहम्मद शहा याच्याकडे संदेश पाठवला की, मी उगवत्या सूर्याच्या प्रदेशाचा सम्राट आहे आणि तुम्ही मावळत्या सूर्याच्या प्रदेशाचे सम्राट आहात. तेव्हा आपण दोस्ती करूया. इराणच्या राजघराण्याला खॉरेझमीन अशी संज्ञा होती. त्या खॉरेझमीन शहाने त्याला नकार दिला.
चंगेजखानने आपले पाचशेजणांचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ पर्शिया म्हणजे आजच्या इराणमध्ये खॉरेझमीन शहाकडे पाठविले. त्यात बहुतेक सगळे मुसलमान होते. त्यांचा प्रवेश ओटरार या शहरात झाला. इनालचुक हा त्या शहराचा गव्हर्नर होता. त्याने या पाचशे जणांना कैद केले. त्यांचे सामान जप्त केले आणि सर्वांना ठार मारून टाकले. यानंतर चंगेजखानने अधिकृतपणे आपले तीन राजदूत इराणच्या सम्राटाला भेटायला पाठविले. व्यापारी संबंंध वाढवावेत आणि मंगोलियाच्या व्यापारी गटाला ज्याने ठार केले, त्या इनालचुकला आमच्या हवाली करावे अशी मागणी करावी. मोहम्मद शहाने ती धुडकावून लावली.
प्रतिनिधी मंडळातील दोघा मुसलमानांची त्याने हत्या केली. एका मंगोलाचे केशवापन करून त्याला परत पाठवून दिले. राजनितीचा नियम असा असतो की, राजदूताला मारू नये. त्याचा आदर करावा. कारण तो फक्त निरोप्याचे काम करीत असतो. हा नियम इस्लामी सुलतानीच्या घमेंडीत मोहम्मद शहाने मोडला. आणि चंगेजखान, चंगेजखान असल्यामुळे याचा सूड घेण्याचे त्याने ठरविले. आणि सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणेे चार लाख घोडेस्वार घेऊन ओटरार शहरापर्यंतचे जवळजवळ तीन हजार किलोमीटरचे अंतर कापून त्याचे सैन्य आले. पर्शियन सम्राट सुलतान मोहम्मद शहा याने चंगेजखानच्या राजदूतांना मारण्याची एक चूक केली. पर्शियाला त्याची किंमत 1 कोटी पर्शियन लोकांची मुंडकी देऊन द्यावी लागली. एवढा भयानक सूड उगवणारा इतिहासात एकमेव असा चंगेजखान आहे.
सैन्य हालचालीची काय योजना असेल, सैन्याला रसदीचा पुरवठा लागतो. रसद पुरवठ्याचा मार्ग जेवढा लांबलचक तेवढा तो अत्यंत धोकादायक असतो. कुशल सेनापती हा मार्ग सुरक्षित राखतो. पर्शियावर हल्ला करण्यापूर्वी पर्शियाची शक्तीस्थाने कोणती, त्याची दुर्बळ स्थाने कोणती, त्याचे सैन्यबळ किती आहे, सैन्य सुलतानाशी एकनिष्ठ राहील का, एकवटून कोठे कोठे प्रतिकार होणे शक्य आहे, या सर्वांची गुप्तहेरांमार्फत चंगेजखानने माहिती गोळा केली.
चंगेजखानचा पहिलाच हल्ला हा पर्शियाला आकस्मिक हल्ला (सरप्राइज अॅटक) वाटला. ओटरार शहर सहा महिन्यात पडले. पुढच्या शहरांचे काय होणार आहे, याचा ट्रेलर हे ओटरार शहर होते. या शहराचे रक्षण करणारे सर्व सैनिक कापून काढण्यात आले, सर्व स्त्री-पुरूष, लहान मुले यांना ठार मारण्यात आले. फक्त वस्तू घडविणारे कारागीर यांना जिवंत ठेवण्यात आले. यानंतर चंगेजखान याने बुखारा, सरकंद, उरगेंच, टेरकेन, या प्रमुख शहरांचा उद्धवस्त केली. ही शहरे दूरदूरवरच्या अंतरावरची होती. शहरांच्या रक्षणासाठी मोहम्मद शहा याने सैन्य विभागून ठेवले होते. हे सैन्य त्याला एकनिष्ठ राहिले नाही.
एका सैन्यातील तुर्की सैन्य मंगोल आमच्याप्रमाणेच कुरण चरावू लोक आहेत. म्हणून ते मंगोलांना जाऊन मिळाले. सुलतान मोहम्मद शहाची राजवट लोकप्रिय नव्हती. त्याच्या जुलमाला प्रजा कंटाळत चालली होती. आज ज्याप्रमाणे खेमेनईची राजवट वेगवेगळ्या असंतोषाला जन्म देणारी ठरली आहे, तशी मोहम्मद शहाची राजवट होती. दोन-चार वर्षांपूर्वी महिलांनी आंदोलने केली आहेत. विद्यार्थी आंदोलन करायला उतरले आहेत. बातम्या अशा आहेत की, सैनिक सैन्यातून पळून चालले आहेत.
चंगेजखानने ज्याप्रमाणे इराणची अगोदर पूर्ण माहिती करून घेतली तीच गोष्ट इस्रायलने केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे अणुशास्त्रज्ञ, सेनापती, त्यांच्या त्यांच्या सुरक्षित ठिकाणी ठार मारले गेले. इस्रायलने इराणची अणुसंशोधन केंद्रे, प्रयोगशाळा उद्धवस्त केल्या. त्या जमिनीत कोठे आहेत, किती खोलवर आहेत, याचे अचूक ज्ञान इस्रायलकडे होते.
पर्शियाच्या म्हणजे आताच्या इराणच्या मोहम्मद शहाने चंगेजखानशी शत्रूत्व करण्याचे काही कारण नव्हते. धार्मिक आणि शक्तीच्या गुर्मीत ते त्याने केले. शेवटी त्याला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पर्शियातून पळून जावे लागले. कॅस्पियन समुद्राजवळील एका बेटावर त्याचा करूण अंत झाला. इस्लामी क्रांतीचे अपत्य खेमेनई आज कुठे लपला आहे याचा शोध सुरू आहे. त्याच्या नशिबात काय लिहिले आहे, हे आज सांगणे कठीण आहे. पण भविष्य मात्र उज्जवल आहे असे नाही. इतिहास आपल्या गतीने जात असतो, तो काळाच्या संदर्भात पुनर्जीवित होत असतो, एवढे मात्र खरे.