कृषी अवजारांचा भन्नाट आविष्कार

विवेक मराठी    24-Jun-2025   
Total Views |
अमरावती जिल्ह्यातील नामदेव वैद्य या शेतकर्‍याने आपल्या कल्पकता व बुद्धिकौशल्याने आणि संशोधकवृत्तीतून टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत कमी खर्चात पेरणी व खत यंत्र बनविण्याची शक्कल लढवली आहे. एका दिवसात एका शेतकर्‍याकडून सहा एकराची पेरणी होते. यामुळे वेळेची व श्रमाची बचत झाली आहे. शेतीच्या कार्यात महत्त्वाची ठरणारी ही संशोधने स्वतंत्रपणे पेटंट म्हणून नोंदविण्याच्या योग्यतेची आहेत.
 
krushivivek
 
गेल्या सहा दशकांत भारताने कृषी यांत्रिकीकरणात मोठी प्रगती केली आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी भारतातला पहिला लोखंडी नांगराचा कारखाना उभारला. भंवरलाल जैन यांनी ’ठिबक सिंचन’ ही संकल्पना शेतकर्‍यांच्या दारी पोचविण्याचे काम केले. महाराष्ट्रातल्या चार कृषी विद्यापीठात व चिंचवडच्या कृषी अभियांत्रिकी कारखान्यात कृषी अवजारांची निर्मिती होते.
 
 
शेतीबाबत भारत जितका विचार करतो तितका अन्यत्र कुठे केला जात नाही. हे सत्य असले तरी शेतीसंदर्भात आवश्यक ते कालसुसंगत तंत्रज्ञान आपण फारसे विकसित करू शकलो नाही. शिवाय सामान्य शेतकर्‍यांना परवडेल, असे तंत्रज्ञान पोहोचवू शकलो नाही. आज मजुरांची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून वेगवेगळ्या कामासाठी यंत्रांची मागणी केली जात आहे. शेतात तग राहून राहायचे आहे त्यांनी केवळ ज्ञानसंपन्न असून उपयोगी नाही, तर त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा गाभा समजून तो कृतीत उतरविला पाहिजे, तर त्यांचा टिकाव लागू शकणार आहे. त्यासाठी सतत नाविन्याचा शोध घेऊन उत्तमातले उत्तम कौशल्य व तंत्रज्ञान कसे प्राप्त होईल हाच ध्यास शेतकर्‍याचा असला पाहिजे. यालाच कृषी तंत्रज्ञानाचा उपासक म्हणतात. या कृषी उपासकाचे नाव आहे नामदेव आनंदराव वैद्य.
 
krushivivek
 
ओढ शेतीची
 
नामदेव वैद्य मूळचे धामणगाव(रेल्वे) तालुक्यातील निभोरा बोडखा गावाचे. त्यांचे आईवडील अशिक्षित शेतकरी. आनंदराव आणि शंकतुला वैद्य परिवारात 20 मे 1974 रोजी नामदेव यांचा जन्म झाला. दोन भाऊ, एक बहिण. नामदेव धाकटे. घरची स्थिती बिकट होती. वडिलोपार्जित जेमतेम चार एकर शेती, पण शेतात पाणी नसल्यामुळे उत्पन्न पुरेसे नाही. अशा परिस्थितीत नामदेव यांनी आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या माध्यमातून ते इलेक्ट्रिशियन, फिटर, प्लंबर व वेल्डरची कौशल्ये शिकले. यानंतर 1999साली मुंबईत एका कंपनीत नोकरी केली. रोज चारशे रूपये रोजंदारीने काम करण्यापेक्षा घरची शेती करण्याची उर्मी उफाळून आली. शेतीच्या ध्यासामुळे नोकरीचा राजीनामा देऊन 2003 साली ते गावी परतले. शेती करतानाच, भावंडांच्या मदतीने चार एकरांची शेती टप्पाटप्याने 50 एकरांवर नेली. या खेरीज गेल्या 30 वर्षांपासून खंडाने 30 एकर शेती ते करतात. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यासारखी विविध पिके घेतात. गावातल्या शेतकर्‍यांना संघटित करून त्यांनी ’कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनी’ची उभारणी केली. शेती करताना आयटीआयमध्ये शिकलेली कौशल्ये उपयोगात आणली. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि संशोधकवृत्तीतून त्यांनी कृषी अवजारांची निर्मिती केली. ’इनोव्हेटिव्ह’च्या माध्यमातून केलेले काम त्यांच्या प्रगतीला उभारी देणारे व्यासपीठ ठरले.
 



krushivivek 
 
खत पेरणी यंत्राची निर्मिती
 
नामदेव यांनी गावी परतातच स्वतःच्या शेतात प्रयोग सुरू केले. स्वतःचे हात मातीत घालून प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सुरूवात केली. शेतीची योग्य मशागत करूनही पेरणी यंत्रात अप्रगत आहोत, याची जाणीव त्यांना झाली. पुढे बियाणांची पेरणी करण्याकरिता यंत्र तयार करणे आवश्यक वाटू लागले. यासाठी त्यांनी आपल्या निरीक्षणाआधारे टाकाऊ वस्तूपासून अत्यंत कमी खर्चात पेरणी व खत यंत्र तयार केले. नामदेव सांगतात,‘2016 सालची गोष्ट असावी. मी मुंबईतली नोकरी सोडून गावी परतल्याने माझ्यापुढे शेती हाच एकमेव मार्ग होता. 25 एकरांवर कपाशीची लागवड केली होती. कपाशीला खते टाकण्यासाठी मजुरीचा खर्च वाढला होता. मला हे परवडणारे नव्हते. त्यानंतर खत पेरणी यंत्र बैलाच्या सहाय्याने ओढता येईल, अशा पद्धतीने यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. प्रथम यंत्राचे डिझायन केले. यानंतर मी जवळच्या फॅब्रिकेटरकडे गेलो. तिथे काही वस्तू घेतल्या. मुख्यतः घरगुती टाकाऊ वस्तूंचा अधिक वापर केला. दोन समान आकाराचे सहा फूट लोखंडी पाईप व एक प्लास्टिक चाळणी घेऊन खत पेरणी यंत्र तयार केले. हे यंत्र बैलाच्या साहाय्याने चालते. दिवसाला सहा एकर खत पेरणी होते. हे खत कपाशीच्या मुळाजवळ (4 ते 5 इंच) पडते. यामुळे पिकाला योग्य खताची मात्रा मिळते. पाऊस कमी झाला तरी सरीमुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. परिणामी, कपाशीचे उत्पादन वाढण्यास मदत होते. या पेरणीसाठी फक्त सहाशे रूपये खर्च होतो. ही पेरणी जर मजुरामार्फत करायची झाली तर एका मजुराला 50 किलो खतासाठी 300 रुपये (अंदाजित) मजुरी द्यावी लागते. सहा एकरासाठी 3006 = 1800 रुपये मजुरीचा खर्च येतो. एकूणच खत पेरणीचे हे यंत्र शेतकर्‍यांना परवडणारे आहे.
 
 
krushivivek
 
बैलचलित कापूस पेरणी यंत्र
 
कापूस हे वैद्य यांचे मुख्य पीक आहे. दरवर्षी 25-30 एकरांवर कपाशीची पेरणी करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असे. या समस्येला उत्तर म्हणून त्यांनी बैलचलित कापूस पेरणी यंत्राची निर्मिती केली. नामदेव सांगतात, ’जेव्हा कापूस पेरणीची वेळ येते तेव्हा मजूर मिळत नाहीत, हे अनुभव मला येऊ लागले. ही अडचण दूर करण्यासाठी मी टाकाऊ वस्तूपासून बैलचलित कपाशी पेरणी यंत्र तयार केले. कापूस बियाणे साठवण्यासाठी दोन पेट्या राजस्थानमधून आणल्या. चाके स्थानिक बाजारातून विकत घेतली. जुने लोखंडी पाईप घेतले. व्यवस्थित प्रतिकृती (डिझाईन) करून कापूस पेरणी यंत्र विकसित केले. या यंत्राची किंमत साडेपाच हजार रुपये आहे. या यंत्रामुळे कपाशीचे बियाणे एकसारखे पडतात. त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते. मुख्यतः लागवडीचा खर्च कमी होतो. पाच एकरासाठी 500 रूपये मजुरी द्यावी लागतेे. हे यंत्र न वापरल्यास मजुरीखर्च 1500 रूपये होतो. मी केलेली दोन्ही यंत्रं अवघ्या दोन दिवसांत बनवली आहेत आणि तिसर्‍या दिवशी हे यंत्र बैलाच्या सहाय्याने शेतीमध्ये उपयोगात आणली. काही उणीवा दूर केल्या. एकाच दिवशी मी स्वतः 7 एकरांमधील कपाशीला खत दिले. यामुळे माझ्या कपाशी क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन वाढले. पूर्वीपेक्षा शेती करणे अधिक सोपे झाले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांपेक्षा ही यंत्रे सामान्य शेतकर्‍यांना परवडतील अशी आहेत. यामुळे पैशांची बचत होऊन कामही सोपे झाले आहे.
 

krushivivek 
 
यानंतर त्यांनी तुरीचे काढणी यंत्र बनविले आहे. आणि आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टरचलित खत पसरविणारे यंत्र व कटर यंत्रासह काही सुधारित यंत्रे खरेदी केली. शेतकर्‍यांसाठी कास्तकर सोया शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून डाळींवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 
नामदेव यांची वाटचाल अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. शेती व्यवसाय सांभाळत संशोधकवृत्ती अंगी बाळगत स्वकौशल्यातून त्यांनी विकसित केलेली यंत्रे सामान्य शेतकर्‍यांना उपयोगी पडतील अशी आहेत, म्हणून त्यांची यशोगाथा तरूण शेतकर्‍यांना प्रेरणादायी आहे.

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.