दुल्लभ जाधव
9657560020
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिंनीनो, महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वत्र खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. मी एका शेतकर्याचा मुलगा आहे आणि शेती हेच माझ्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. धुळे जिल्ह्यातल्या जैताने (ता. साक्री) येथे माझी वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मी विविध पिकांचे उत्पादन घेत असतो. यामध्ये खरीप हंगाम हा महत्त्वाचा. 2024चा खरीप हंगाम तसा खास नव्हता. पिकांचे योग्य नियोजन केले होते. बाजरी, मका व कापूस अशी तीन पिके घेतली. पेरणीपूर्वी जमिनीची योग्य मशागत केली. निंदणी व कोळपणी घरच्या घरी केली. शिवाय पिकांना वेळेवर जैविक खताचे डोस, कीडनाशक व फवारणी केली, पण पावसाचा खंड पडला. त्यामुळे बाजरीचे एकरी सात क्विंटल, मका बारा क्विंटल व कापसाचे पाच क्विंटल उत्पादन निघाले.
यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाला. त्यामुळे माझ्यासहित सर्व शेतकर्यांची धांदल उडाली. पावसाचे दिवस, पावसाचे वितरण, पावसाचा खंड आणि वाढलेले तापमान याविषयी कृषी अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली. यातील सर्व गणित लक्षात घेऊन आणि राज्य शासनाने खरीप हंगामासाठी व्यापक तयारी केली असली तरी खरीप पेरणीसाठी आमची शेती सज्ज ठेवली आहे. या कामात माझी पत्नी व मुलगा यांची मोलाची मदत मिळाली. ’विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत व नशामुक्त मानव’ या तत्त्वावर माझी शेती आधारलेली आहे. याप्रमाणे शेतीचे नियोजन व आराखडा असतो. दादा लाड कापूस तंत्रज्ञानावर आधारित कापूस लागवड करण्यासाठी शेत तयार केले आहे. यासाठी वेस्ट डी. कंपोजर, जीवामृत, गोकृपामृत, ताक, गोमूत्र, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क इ. सर्व कृषी निविष्ठा तयार करून ठेवल्या आहेत.
यंदाच्या हंगामासाठी स्थानिक हवामानास सुयोग्य अशा पिकांची निवड केली आहे. एक एकरात भुईमूग व आंतरपीक म्हणून मूग व तीळ, एक एकर बाजरी, तीन एकर मका व चार एकर कापूस लागवड करणार आहे. भुईमूग व मूगाची बीजप्रक्रिया केली आहे. उर्वरित पिकांचे सुधारित वाण विकत घेणार आहे. गरज नसताना शेतीत अतिरिक्त खर्च करत नाही. जैविक कृषी निविष्ठा स्वतः तयार करत असल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होतो. प्रत्येक पिकांच्या उत्पन्नातून काही ठराविक रक्कम वेळेच्या वेळी बाजूला काढून ठेवतो. वर्षाचा हिशोब ही चोख ठेवतो. खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
लेखक धुळे जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आहेत.