वृक्षमित्र कट्टा

विवेक मराठी    24-Jun-2025
Total Views |
@अजित वर्तक
8097796070
 

Environment 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे हे गरजेचे असले तरी वृक्षसंवर्धन करणे हे त्याहून महत्त्वाचे आहे. बर्‍याचदा वृक्षारोपणाचे मोठमोठाले कार्यक्रम होताना दिसतात, मात्र लावलेल्या झाडांच्या स्थितीकडे कुणाचे लक्ष नसते ही अनास्था सर्वच ठिकाणी पाहायला मिळते. ही निकड जाणून वृक्षप्रेमी लोकांच्या साथीने जयप्रकाश नारायण उद्यान हे जैवविविधतेने भरलेले एक मॉडेल तयार होत आहे.
संकल्पना - झाडांचे महत्त्व आपण सगळे जाणतो, वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम होत असतात, परंतु वृक्षसंवर्धन होतेच असे नाही. आणखी एक बाब जाणवते की, हे वृक्षारोपण डोंगरावर, टेकड्यांवर किंवा दूरच्या गावात जाऊन केले जाते पण आपण जेथे राहातो अशा वस्तीत किंवा आसपासच्या परिसरात आपण झाडे जगवत नाही. आपल्या घरात आवडीने काही जण बाग करतात पण आपल्या परिसरात आवश्यक असलेली जैवविविधता साकारता येत नाही. यासंबंधी जागृती करणे, मान्यवरांकडून माहिती घेऊन प्रत्यक्ष लोकसहभागातून विविध प्रकारची झाडे लावून जयप्रकाश नारायण उद्यान हे जैवविविधतेने भरलेले एक मॉडेल उद्यान बनवणे ही कट्ट्याची संकल्पना.
 
पार्श्वभूमी - पुण्यात काम करत असताना (2015 - 2020) छत बाग, ऑरगॅनिक गार्डनिंग ग्रुप अशा अनेक वृक्षप्रेमी मंडळींशी संपर्क झाला. कोरोना काळ संपत असताना जयप्रकाश उद्यानात चालायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले की,
 
महानगरपालिकेने केलेली वृक्षलागवड ही प्रामुख्याने शोभेची झाडे, लवकर वाढणारी झाडे आणि फुले/फळे नसलेली झाडे ही लागवड होते. पण त्यात जैवविविधता नाही. 2021 साली माझ्या सोसायटीचा पुनर्विकास होणार हे नक्की होते आणि त्यामुळे तेथील काही झाडांना दुसरे घर शोधणे आवश्यक होते. पर्यावरणदिनाचे औचित्य साधून जून 2021 मध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी मिळून आमच्या सोसायटीतील काही झाडांचे जयप्रकाश उद्यानात पुनर्रोपण केले. सुदैवाने बागेतील काही ज्येष्ठ मंडळीना हा उपक्रम आवडला आणि मग महिन्याच्या पहिल्या रविवारी वृक्षमित्र कट्ट्याच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम सुरू झाला.
 
 
उपक्रम - कट्ट्यावर आलेल्या मान्यवरांकडून अनेक विषयांवर माहिती मिळाली आणि त्यातून प्रेरणा घेत आपण अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून गोरेगाव अधिक हरित आणि स्वच्छ राहण्यास मदत होईल.
 

Environment 
 
निर्माल्य कलश - जयप्रकाश उद्यानाबाहेर निर्माल्य कलश होता. या कलशाचा बर्‍याचदा गैरवापर होत असे. तसेच त्यातील निर्माल्य महानगरपालिकेच्या ओल्या कचर्‍यात जात असे. यामुळे उद्यानाच्या गेटच्या परिसरात घाण होत असे, दुर्गंधी येत असे. महापालिकेच्या अधिकार्‍यांना सांगून येथील निर्माल्य कलश हटवला. माझे निर्माल्य माझी जबाबदारी हा विषय घेऊन कट्ट्यावर प्रबोधन झाले आणि आपले निर्माल्य कचर्‍यात न टाकता त्याचे खत निर्माण करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केले. परिसरातल्या मंदिरांनीही निर्माल्याचे खत बनवावे यासाठी पाठपुरावा चालू आहे.
 
 
वाढदिवसाला एक झाड-आपला वाढदिवस साजरा करताना निदान एक झाड लावावे, तसेच आपण भेट देताना पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू न देता झाड द्यावे असे बागेत येणार्‍या लोकांना आवाहन केले आणि काही वृक्षप्रेमींनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
 
 
दिवाळी भेट - बागेतील कर्मचारीवर्ग बाग सुस्थितीत राहावी यासाठी कष्ट घेत असतात, त्यामुळे बागेत नियमित येणारे वॉकर्स स्वेच्छानिधी देतात ज्यातून बागेतील कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली जाते.
 
 
Gopumangochallenge 2024 - या पावसाळ्यात आपल्या इमारतीच्या परिसरात किंवा कुंडीत एक तरी आंब्याचे झाड लावणे.
 
 
DryWasteManagement - आपल्या घरातील रिसायकल होणारा कचरा (पेपर, प्लास्टिक, काच, मेटल, ई-वेस्ट) महानगरपालिकेच्या गाडीत न देता BINTIXसारख्या कंपनीकडे देणे. सध्या हा उपक्रम स्नेहवर्धिनी सोसायटीमध्ये चालू झाला आहे.
 
 
गोरेगाव गार्डन शो - 2024 मधील नवरात्रीत प्रत्येक दिवशी गोरेगाव पूर्वेतील एक छतबाग बघणे. यासाठी रु. 100 हे नोंदणी शुल्क आकारले होते आणि यासाठी केवळ गोरेगाव नाही तर मालाड, जोगेश्वरी, पार्ले आणि अगदी कल्याणहूनही एकूण 50 वृक्षमित्र आले होते.
 
 
अशा उपक्रमांद्वारे वृक्षमित्र कट्ट्यामार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाविषयी आवड निर्माण करण्याचे काम केले जाते.
हा उपक्रम सलग तीन वर्षे चालू आहे. 6 जुलै 2025 रोजी जयप्रकाश नारायण उद्यानात सकाळी 10 वाजता तिसरा वर्धापन दिन आयोजित करण्यात येत आहे.