आणीबाणीचे जळजळीत वास्तव

विवेक मराठी    25-Jun-2025
Total Views |
@डॉ.कुमार शास्त्री
25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात ‘आणीबाणी’ची घोषणा केली. ‘देशांतर्गत सुरक्षेच्या’ नावाखाली संविधानाच्या अनुच्छेद 352 प्रमाणे, ही आणीबाणी लादली गेली. आणीबाणीचे हे पर्व लोकशाही मूल्यांना तडा देणारे, हूकूमशाहीचे काळे पर्व म्हणून इतिहासांत नोंदविले गेले. जगात भारताची प्रतिमा एक सशक्त लोकशाहीचे मूल्य जोपासणारे राष्ट्र म्हणून होती.

 ‘आणीबाणी’मुळे लोकशाहीच्या मूल्यांचे हनन झाले अन् भारताच्या लोकशाहीवादी प्रतिमेला लांच्छन लागले! आणीबाणीच्या काळांत, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, संविधानाने दिलेले मूलभूत मौलिक अधिकार (fundamental rights) समाप्त करण्यात आले. देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांना ‘मीसा’ अंतर्गत, कारागृहांत, अनिश्चित काळासाठी कैद करण्यात आले. हा दुर्दैवी इतिहास या देशाने अनुभवला. म्हणूनच आणीबाणीचे पर्व हुकूमशाहीचे काळे पर्व या अर्थाने अधोरेखित झाले.
 
 
vivek
 
आज, या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. पण नवीन पिढी मात्र अनभिज्ञ आहे. आणीबाणीत काय घडले, किती अत्याचार झाला, लोकशाहीची कोणती मूल्ये पायदळी तुडवली गेली हा इतिहास नवीन पिढीने जाणून घ्यायला हवा. लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ते आवश्यक आहे. भारत हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा देश आहे. ही आमची देशाची प्रतिमा वृद्धिंगत होणे ही काळाची गरज आहे.
 
 
नवीन पिढीला कळले पाहिजे असे कोणते कारण होते की, ज्यामुळे देशांत आणीबाणी लावली गेली. असे काय घडले की, देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती. कारण संविधानातील कलम 352 प्रमाणे देशांची अंतर्गत सुरक्षा धोक्यात असेल तरच आणीबाणी घोषित करता येते. पण तसे कांहीच घडले नव्हते. ना गृहयुद्ध होते, ना बॉम्बस्फोट, ना अराजकता.....
 
या संदर्भात खरे कारण होते की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने, निवडणुकीत भ्रष्टाचाराचा गैरमार्ग वापरल्याचे सिद्ध झाल्याने अवैध ठरवली! अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गांधी यांनी ‘पंतप्रधानपदाचा’ राजीनामा देणे भाग होते, क्रमप्राप्त ठरत होते. तत्कालीन काँग्रेस पार्टी ‘नवा पंतप्रधान’ देशाला देऊ शकत होती वा देशांत पुन्हा निवडणूक घेऊन, नवे सरकार स्थापन करू शकत होती. देश त्यावेळी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार होता.
 
 
पण इंदिरा गांधी यांनी वरील दोन्ही बाबी टाळल्या. कारण नवा पंतप्रधान ‘दुसरा’ कोणी होणे, हे नेहरू-गांधी परिवाराला मनांतून मान्य नव्हते. यातून त्यांच्या ‘परिवारवादाला’ धक्का बसला असता. दुसरे, सार्वत्रिक निवडणुका घेणे गांधींना जोखमीचे वाटत होते. कारण, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे जनआंदोलन बिहार, उत्तर प्रदेशामध्ये विरोधात मोठया प्रमाणांत उभे होते.
 
 
रा.स्व.संघाने नानाजी देशमुख, अटलजी यांना जयप्रकाशजी सोबत उभे करून जनआंदोलनाला संघशक्तीचा पाठिंबाच दर्शविला होता. अशा परिस्थितीत, गांधींना स्वत:चा पराजय स्पष्ट दिसत होता. म्हणूनच, त्यांनी राजीनामा न देता, निवडणूक अवैध ठरविली असली, तरी ‘पंतप्रधान’ पदावर कायम राहून, देशांत आणिबाणीची घोषणा केली. हा सगळा किस्सा ‘खेल कुर्सी का’ असा होता! आणीबाणी लादून स्वत:ची एकहाती सत्ता इंदिरा गांधी यांनी राबविली.
 
 
देशाच्या इतिहासांत कधी नव्हे, ते घडले. लोकनायक जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरणसिंग, लालकृष्ण अडवाणी आदि विरोधी पक्षाच्या नेत्यांना, दिग्गजांना, ‘मिसाबंदी’ करून, अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबण्यात आले. रा.स्व.संघासारख्या बिगरराजकीय, देशभक्त संघटनेवर बंदी घालण्यात आली. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि अन्य संघ अधिकारी व हजारो स्वयंसेवकांना ‘मिसाबंदी’ करून अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवण्यात आले.
 
 
सर्वात महत्त्वाचे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, वृत्तपत्रस्वातंत्र्य यांची गळचेपी करून प्रसारमाध्यमांवर ‘प्रेस सेन्सारशीप’ लादण्यात आली. आणीबाणी विरोधात बोलणे, लिहिणे तर दूरच, पण संशयित व्यक्तींना सुरक्षेच्या नावाखाली कारागृहात डांबण्यात आले. देशांतील बुद्धिजीवी, पत्रकार, वकील, डॉक्टर, शिक्षक, कामगार, विद्यार्थी, महिला, कलाकार आदी सर्वांना मिसाखाली पकडून एक व्यापक अटकसत्र चालविले गेले. अवघा देश ‘कारागृहा’सारखा करून टाकला होता.
 
 
या हुकूमशाहीच्या दमनचक्राविरुद्ध रा.स्व.संघ व जे.पी.ची लोकशक्ती संघर्ष समितीने देशव्यापी सत्याग्रह केला. सर्व या सत्याग्रहींना सर्वांना कारागृहामध्ये टाकण्यात आले. या सत्याग्रहीनी आणीबाणी विरोधात नारे बुलंद केले. ‘इंदिराजी की तानाशाही नही चलेगी’, राष्ट्रभक्ती तेरा नाम आर.एस.एस., अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश, जयप्रकाश! हे ते बुलंद नारे होते! हा देशव्यापी सत्याग्रह इतका मोठा होता, हे जनआंदोलन ऐवढे मोठे होते की, देशातील सर्व कारागृह सत्याग्रहींनी भरून गेले. मग काहींना मारझोड, अत्याचार, करून अगदी जंगलांत सोडून देण्याचे प्रकार सत्याग्रहीबाबत घडले, पण ‘प्रेस सेन्सारशीप’मुळे कुणालाच हे अत्याचार माहीत होत नव्हते. त्यावेळी सर्वच प्रसारमाध्यमे व विख्यात पत्रकार खुशवंतसिंह, गिरीलाल जैन यासारखे पत्रकारही, महाभारतातल्या पितामह भीष्माप्रमाणे ‘मूकनायक’ बनले होते!
 
 
याच दरम्यान, आणीबाणीच्या काळांत दिल्ली सरकारच्या प्रशासनात, इंदिराजीचे पुत्र स्व.संजय गांधी याचा अनिर्बंध हस्तक्षेप वाढला. ‘संजय चौकडी’ म्हणून प्रसिद्ध होती. ही संजय चौकडी दिल्लीचे राजकारण मनमाने चालवू लागली. उदाहरणच बघा, याच काळांत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कुटुंब नियोजनाचा’ कार्यक्रम जोरजबरदस्तीने इतका खालच्या पातळीवर राबविला गेला की वृद्ध माणसाची, अविवाहित तरुणांची सुद्धा नसबंदी करण्याच्या गोष्टी घडू लागल्या. सत्ताधार्‍यांची दहशत तर इतकी मोठी होती की त्यावेळी प्रसिद्ध सिनेगायक किशोर कुमारच्या गाण्यावर बंदी घातली होती. जनतेसाठी न्यायालयाचा दरवाजा व वृत्तपत्राचे दालने ओस पडली होती, त्यांचा काहीच उपयोग होत नव्हता कारण आणीबाणी! हा सगळा तत्कालीन कॉँग्रेसी शासनाचा राजकीय आंतकवाद सुरू होता असे म्हणावे लागेल!
 
 
सर्वात महत्वाचे, असे याच काळांत भारतीय संसदेत, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते कारागृहामध्ये असतांना, त्यांच्या अनुपस्थितीत, संविधानाची 44 वी घटनादुरुस्ती, जी अत्यंत विवादित होती, त्यावर सखोल व फारशी राष्ट्रीय चर्चा न करता पारित केली गेली! भारतीय संविधानात, ‘सेक्युलॅरिझम’, ‘समाजवादी समाजरचना’, या संकल्पना या घटनादुरुस्तीने आणण्यात आल्या!
 
‘सेक्युलॅरिझमचा’ पुढे किती उदोउदो झाला, हे आपण जाणतोच. ज्या ‘सेक्युलॅरिझमचे’ स्तोम पुढे भरपूर माजले. यातूनच, पुढे ‘अल्पसंख्यांकवादाचे’ ‘व्होटबॅक पॉलीटिक्स’ निर्माण झाले! या ‘सेक्युलॅरिझम’चा जन्मच आणिबाणीच्या, काळ्या हुकूमशाही पर्वातला आहे. तो विवादित घटनादुरुस्तीतून आहे हे विदारक वास्तव लक्षांत घ्यायला पाहिजे!
 
 
हे सर्व कुणामुळे घडले, यामागचे षडयंत्र काय होते, याकडे लक्ष वेधण्याचा एक अल्पसा प्रयत्न करतोय.
 
 
‘ताश्कंद फाईल’ नावाचा विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी बघितला. भूतपूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमय निधनाबाबत हा चित्रपट खूप काही सांगून जातो. खरोखरीच, शास्त्रीजीचे निधन एक गूढ नि रहस्यमय घटना बनून राहिले. शास्त्रीजी रशियाला मास्कोत गेले. त्यानंतरचा घटनाक्रम बघा. शास्त्रीजी यांच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्या. नेहरु-गांधी ‘परिवारवाद’ पुन्हा सुरू झाला. 1971 मध्ये भारत-पाक युद्ध आम्ही जिंकले, त्यावेळी ‘बांगलादेश’ निर्माण झाला. इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाच्या पाठीशी कोण उभं होते, तज्ञ सांगतात ‘रशिया’! तर पाकच्या पाठीशी त्याही वेळी ‘अमेरिका’! यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे इंदिरा गांधी हारल्या होत्या. पण त्यांनी राजीनामा न देता, देशात ‘आणीबाणी’ लावली. हुकूमशाहीचे पर्व व दमनचक्र सुरू झाले. यामागे कोणती तरी आंतरराष्ट्रीय शक्ती उभी आहे, असे त्यावेळीची राजकीय जाणकार मंडळी दबक्या आवाजात बोलत असत! कारण, याच वेळी संसदेत विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत, 44 वी विवादित घटनादुरुस्ती करून, ‘सेक्युलॅरिझम’ व ’समाजवादी-समाजरचना’ विधेयके पद्धतशीरपणे अत्यंत हुशारीने पारित झाले. हा सगळा घटनाक्रम बघा.... अवघा देश कारागृह बनला, प्रेस सेन्सॉरशीप, सत्तेची दहशत, अराजक, हुकूमत हे सगळे एखाद्या षडयंत्राप्रमाणे तेव्हा घडले आहे. यामागे निश्चितच कोणती आंतरराष्ट्रीय शक्ती सुद्धा उभी होती हे सूज्ञास सांगणे नलगे. इथे संशयाची सुई मॉस्कोप्रणीत राजकारणाकडे जाते हे लक्षात घ्यायला हवे.
 
 
एकमात्र खरे की, आणीबाणीतील ही हुकूमशाही, लोकशाही मूल्यांचे हनन हे तत्कालीन प्रकार काँग्रेसच्या अनेक लोकांना, नेत्यांना, सरकारी अधिकार्‍यांना पटत नव्हते, मान्य नव्हते, पण ते बोलू शकत नव्हते. ही वस्तुस्थिती होती.
 
 
पुढे जगासमोर आणिबाणीमुळे भारताची प्रतिमा जसजशी मलीन होत गेली तसतसा देशांतर्गत सामाजिक व राजकीय दबाव वाढू लागला, अंततोगत्वा, सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. जे.पी.च्या नेतृत्वात -‘जनता सरकार’ लोकशाही मार्गाने स्थापित झाले. लोकशाही पुन्हा भारतात स्थापित झाली. आणीबाणीच्या पाश्वर्र्भूमीवर परिणामस्वरूप, इंदिरा गांधी पराभूत झाल्या, काँग्रेस हारली होती. त्यावेळी रा.स्व.संघावरील बंदी उठवण्यात आली. जनतेने या सर्व घटनांचे भव्य स्वागत केले. त्यावेळी तत्कालीन, सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे एक मार्मिक विधान सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. त्याचा मतितार्थ होता की, देशात पुन्हा अशी ‘आणीबाणी’ येऊ नये, लोकांना झालेला, अन्याय, अत्याचार मान्य आहे पण आता लोकांनी हे सर्व विसरावे, ‘Let us forget and forgive’,‘सगळ कांही विसरा आणि देशहितासाठी कामाला लागा’ हा तो संदेश होता. हा संदेश ’लोकशाही’ची खरी मूल्ये जीवंत ठेवणारा, समाजात सौहार्द जोपासणारा आणि दूरदर्शीत्वाचा होता! हीच भारताची खरी ओळख आहे!
 
डॉ. कुमार शास्त्री
मो.9423613710
(लेखक आणीबाणीच्या काळात सत्याग्रही जेलबंदी होते.)