कुटुंब हा समाजव्यवस्थेचा मूलभूत आधार आहे, याबाबत कोणाचेच दुमत नसेल. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध जितके निरोगी आणि कालसुसंगत असतील तितका हा समाज सुदृढ राहणार आहे. कुटुंबव्यवस्थेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य असलेले, त्यातल्या नातेसंबंधांमधले ताण अधोरेखित करणारे, कुटुंबांसमोरचे आजचे प्रश्न मांडणारे अनेक चित्रपट असतात. मनोरंजन करणे हा त्यांचा उद्देश नसतो तर प्रश्न मांडणे, त्यावर विचार करायला प्रवृत्त करणे, त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करणे हे अपेक्षित असते. अशा काही चित्रपटांचा परिचय करून देणारी, ते पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही नवीन लेखमाला...कुटुंब (चित्र)कथा
सोशल मीडियाने आपले आयुष्य व्यापून टाकले असताना, आपल्या आयुष्यात आपण कुणाला महत्त्व द्यायला हवे हे विसरत चाललो आहोत का, याचा विचार करायला लावणारा विजय बाबू निर्मित आणि रॉजीन थॉमस दिग्दर्शित होम हा अॅमेझॉन प्राइमवर असलेला मल्याळम सिनेमा भाग पाडतो.
आजचे युग मोबाईलचे युग आहे. स्मार्टफोनने आपल्या खाजगी आयुष्यात प्रवेश तर केला आहेच पण त्याच्या उपयोगाची व्याप्ती पाहिली तर मोबाईल हा आपल्या शरीराचा भाग झाला आहे असेही म्हणता येईल. या उपकरणावर आपण एवढे अवलंबून आहोत की समोरासमोर केलेले संभाषण आता दुर्मीळ होत चालले आहे. व्हाट्सअॅप, फेसबुक, जीमेल यांच्याद्वारे टाईप केलेल्या निरोपाची देवाणघेवाण आता एवढी रूळली आहे की लिहिण्याबरोबर संवादाची क्रियासुद्धा कमी होत चालली आहे. बाह्य जग जवळ आले असेल पण घरातील माणसे मात्र दूर होत चालली आहेत. हाच विषय घेऊन विजय बाबू यांनी होम या मल्याळम सिनेमाची निर्मिती केली आहे. रॉजीन थॉमस दिग्दर्शित या सिनेमात, एक स्मार्ट फोन एका हसत्याखेळत्या कुटुंबातील माणसांत किती अंतर पाडू शकतो हे दाखवले आहे. चित्रपटातील पात्रे, त्यांच्या आयुष्यातील घडणार्या घटना, त्यांच्यातील संभाषण हे एवढे नैसर्गिक आहे की ही तुमच्या, आमच्या कुणाच्याही कुटुंबाची गोष्ट वाटू शकते. सोशल मीडियाने आपले आयुष्य व्यापून टाकले असताना, आपल्या आयुष्यात आपण कुणाला महत्त्व द्यायला हवे हे विसरत चाललो आहोत का, याचा विचार करायला होम हा सिनेमा भाग पाडतो.
सिनेमाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की, ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. केरळमध्ये राहणारे हे मध्यमवर्गीय कुटुंब. कुटुंबाच्या तीन पिढ्या या घरात एकत्र राहतात. ऑलिव्हर ट्विस्ट हा या कथेचा नायक. त्याचे वडील, पत्नी कुट्टीयम्मा, दोन मुले आणि घराच्या गच्चीवर फुलवलेली बाग एवढेच त्याचे जग आहे. ऑलिव्हर ट्विस्ट हे नाव त्याला का मिळाले त्याचीही एक गोष्ट आहे. ऑलिव्हरचे वडील टायपिस्ट असतात. इंग्रजी साहित्य मल्याळममध्ये भाषांतरित करताना त्यांना साहित्यातील जी पात्रे आवडतात त्यांची नावे ते आपल्या मुलांना देतात. ऑलिव्हरचा छोटा मुलगा यू ट्यूब चॅनेल चालवतो. त्याचा मोठा मुलगा अँथोनी हा खरेतर एक हुशार वास्तुविशारद पण त्याला चित्रपटात रस आहे. त्याचा पहिला सिनेमा खूप गाजलेला आहे. त्याच्या दुसर्या सिनेमासाठी त्याला एका गाजलेल्या नटाची आवश्यकता आहे. निर्माता पैसे गुंतवायला तयार आहे पण अँथोनीला सिनेमाची पटकथा लिहिण्यात अडचणी येतात. आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात. त्यात दुसरीकडे राहायचे म्हणजे आलेला एकटेपणा.
तुझे लक्ष जर इथे केंद्रीत होत नसेल तर तू तुझ्या घरी जाऊन ही पटकथा तीन आठवड्यात पूर्ण कर, नाहीतर माझी रक्कम परत दे असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर अँथोनी आपल्या घरी येतो आणि चित्रपटाची सुरुवात होते. होम म्हणजे घर आणि घर म्हणजे घरातील भिंतीच नाही तर घरातील माणसे. या सिनेमातील घर मात्र एकविसाव्या शतकातील घर आहे आणि या घरातील तरूण पिढी ही जनरेशन न म्हणून ओळखली जाते. 1997 ते 2012 या कालावधीत जन्माला आलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. नव्वदीच्या दशकात तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल झाले. इंटरनेट आल्याने जगाच्या सीमा गळून पडल्या. जनरेशन झेड ही डिजिटल नागरिक असणारी पहिली पिढी म्हणता येईल. त्यांचे तंत्रज्ञान, मोबाईल आणि सोशल मीडियाशी मैत्रीपूर्ण नाते आहे. प्रत्यक्ष संपर्कापेक्षा सुद्धा त्यांचा वावर ऑनलाईन जास्त आहे. त्यांच्यासाठी स्मार्टफोन जास्त महत्त्वाचा आहे कारण त्यांचे सर्व व्यवहार आता केवळ हातात मावणार्या मोबाईलमुळे सुकर झाले आहेत. अँथोनी आणि त्याच्या छोट्या भावाचे जगसुद्धा या मोबाईलशी निगडित आहे.
मुलांना सोशल मीडियाचे लाईक्स, फॉलोअर्सच्या पुढे जगच नाही. तासन्तास फेसबुक, व्हाट्सअॅपवर अनेक परिचित, अपरिचित लोकांशी संपर्क ठेवून असतानाही घरातील लोकांशी संवाद साधायला त्यांना वेळ नाही आणि इच्छा नाही. मुलांशी संवाद साधायचा तर त्यांच्या जगाशी ओळख करून घ्यायला हवी हे ऑलिव्हरला समजते पण काळानुसार बदलणे प्रत्येकाला जमत नाही. या कथानकाचा नायक याच समस्येमधून जात आहे. एकेकाळी ऑलिव्हरची या शहरात स्वतःची व्हिडीओ लायब्ररी असते. त्याकाळी असे काही चालवणे हे सुद्धा धाडसाचे असते पण त्याचा पार्टनर त्याला फसवतो, नवीन जगाचा गंध नसल्याने, न बदलता आल्याने ही लायब्ररी बंद पडते आणि घरी बसलेला, आधुनिक जगाची ओळख नसणारा ऑलिव्हर मुलांकडून दुर्लक्षिला जातो. थट्टेचा विषय होतो.
ऑलिव्हरला मात्र मुलांच्या जगात शिरकाव करून घेण्याची इच्छा असते. फेसबुक आणि व्हाट्सअॅप यांचा वापर कसा करायचा हे मुलांकडून शिकून, जगाशी संपर्क ठेवण्यासाठी त्याला मोबाईल फोन विकत घ्यायचा असतो. मोबाईल विकत घेतल्यानंतर त्याच्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात, त्यामुळे त्याचे आयुष्य कसे बदलते, हरवलेला आनंद त्या घरात परत कसा वास्तव्याला येतो ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर होम हा सिनेमा बघावा लागेल.
सिनेमाची गोष्ट हा एक भाग पण त्या अनुषंगाने मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर आपल्या वास्तविक जीवनावर कसा प्रभाव टाकतो हे या सिनेमांत दाखवले आहे. जगाला आकर्षित करून घेण्यासाठी आपण चेहर्यावर एक मुखवटा चढवतो, आपली चांगली बाजू जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, तिथून मिळणार्या टाळ्यांची एवढी सवय होते की त्या कमी झाल्या तर आपले काय होईल भीतीत वावरतो पण हे करताना जी लोकं आपल्या जवळची आहेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अनेकवेळा घरातील लोकांमध्येच एवढ्या आदर्श व्यक्ती असतात, याची आपल्याला कल्पना नसते. सोशल मीडियावर त्यांचे प्रदर्शन नसते, त्याची स्टोरी कुणी घातलेली नसते, अनेकदा तर आपल्या हातून केवढे मोठे काम झाले आहे ह्याची करणार्याला सुद्धा जाणीव नसते पण ते अनुभव, कठीण परिस्थितीतून त्यांनी काढलेला मार्ग या गोष्टी अत्यंत प्रेरणादायी असतात. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आपल्यालाच त्याची जबाबदारी घ्यावी लागेल हा एक महत्त्वाचा संदेश हा सिनेमा देतो. बदल घडवून येण्यासाठी आपल्याला मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे हे लक्षात आल्यावर ऑलिव्हर न लाजता डॉक्टरची मदत घेतो. त्याच्या सल्ल्यानुसार वागतो आणि सकारात्मक बदल घडवतो.
जनरेशन बूमर्स आणि त्यांच्या पुढची मिलेनिअल पिढी यांच्यातील फरक आपण सारे अनुभवत असणारच. आपल्याला सगळे लिहून काढायची सवय आहे. मोबाईलवर टाईप करावे लागत असेल तरीही ते वापरायचे कसे याचे सूचनावजा टिपण ऑलिव्हर एका वहीत करतो. ते बघून त्याला शिकवणार्या त्याच्या मुलाच्या चेहर्यावरचे भाव पाहून हसूही येते आणि रागसुद्धा. तंत्रज्ञानाच्या जगात सहज बागडणार्या या मुलांना आधीच्या पिढीची अडचण कशी होऊ शकते हेच समजत नाही. अनोळखी माणसांत सुद्धा आपल्या मुलाच्या लहानपणीच्या गमती जमती ऑलिव्हर कौतुकाने सांगतो. मुलगा किती अवघडला आहे हे त्याच्या गावीही नसते.
सिनेमात अशी दृश्ये पाहिल्यावर नकळत आपण त्या घराचा एक भाग होतो. होम या सिनेमाचे सौंदर्य यात आहे की आपल्या प्रत्येकाला आपण हे कधीतरी अनुभवले आहे याची जाणीव होईल. जनरेशन गॅप ही प्रत्येक पिढीत असते. मुलं मोठी होतात, त्यांना स्वतःचे मत असल्याची जाणीव होते आणि मग आधीच्या पिढीबरोबर वाद सुरू होतो, प्रश्न विचारले जातात, त्याची सवय नसल्याने तो उद्धटपणा वाटतो. अनेकवेळा नवीन पिढीला आपण उद्धट वागतो आहे याचीही जाणीव नसते कारण समोर आलेल्या नवीन जगात ते गुंगून गेलेले असतात.
एक छोटासा प्रसंग सांगते. ऑलिव्हर झाडांना पाणी घालत असतानाच, आपल्या मुलाची मळलेली गाडी त्याला दिसते. तो गाडी साफ करायला घेतो. जवळून त्याचा छोटा मुलगा जात असतो. मदत हवी का हे विचारण्याऐवजी, तो आपल्या वडिलांना आपली स्कूटर साफ करायला सांगतो. ही मुले वाईट नसतात पण आपल्याच जगात रममाण असतात. आपण आधीच्या पिढीहून खूपच हुशार आहोत असा अभिमान बाळगून असतात कारण त्यांची तंत्रज्ञानावर पकड असते. वडिलांवर त्यांचे प्रेम असते पण त्यांचे वडील त्यांचा आदर्श नसतात. ऑलिव्हर हा अत्यंत साधा, छोटी स्वप्ने असणारा आणि घरात रमणारा सामान्य माणूस आहे. पण त्या सामान्य माणसात किती असामान्यत्व दडले आहे याची जाणीव एका प्रसंगाने त्याच्या मुलांना होते आणि ते घर परत एकदा निर्व्याज आनंदाने भरून जाते.
मेलोड्रामाकडे न झुकता, साध्या पण खोलवर प्रभाव टाकणार्या घटना, खुसखुशीत संवाद आणि सामान्य प्रसंगातून फुलत जाणारा विनोद यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून पहावा असा हा सिनेमा आहे.
अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.