श्रीरंगमचा इतिहास

विवेक मराठी    27-Jun-2025   
Total Views |
 
https://whatsapp.com/channel/0029VbBN5K4EAKW8HPZgHK0o
सा. विवेकचे WhatsApp channel.. सर्वांनी follow करा.. व इतरांनाही follow करण्यास सांगा...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------- 
 

Divya Desam
वेगवेगळ्या साम्राज्यांनी श्रीरंगम मंदिरनिर्मितीमध्ये भर घातली आहे. हे मंदिर ‘धर्मावर्मा’ ह्या चोळ राजाने बांधले अशी कथा सांगितली जाते. ही चोळ राजांची प्राचीन पिढी होती. हा पेरूमाळचा विग्रह अनेक वर्ष अयोध्येच्या ’ईक्ष्वाकु’ वंशाकडे होता. मग हा विग्रह श्रीरंगम्ला कसा बरं आला? त्यामागील इतिहास आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
गेल्या काही लेखांमध्ये आपण श्रीरंगमविषयी जाणून घेत आहोत. खरं तर सांगण्यासाठी इतकं काही आहे या मंदिराविषयी की, त्यासाठी खंड लिहिले जातील. त्यामुळे लिहिताना कुठेतरी थांबावे लागणार आहेच, पण तत्पूर्वी अजून काही माहिती घेऊया. या मंदिराचे आयुष्यात निदान एकदा तरी दर्शन झालेच पाहिजे, असं मला परत एकदा आवर्जून सांगावेसे वाटतेय.
लंकेला जाताना, विभीषणाकडून श्रीरंगनाथाचा विग्रह श्रीरंगमला, कावेरी व कोल्लिडम नद्यांच्या रमणीय परिसरात ठेवला गेला आणि तो तसूभरही न हलता तो याच ठिकाणी स्थापित झाला. मात्र याआधी अजून एक घटना याच श्रीरंगम बेटावर घडली होती. असं म्हणतात की, भगवान श्रीरामाने ज्याप्रमाणे श्रीरामेश्वरमला महादेवाची उपासना केली होती त्याचप्रमाणे अयोध्येला जाताना त्यांनी श्रीरंगमला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मूळ रूपाचे म्हणजे श्रीविष्णूच्या रूपाचे दर्शन विभीषणाला घडविले होते. त्यावेळी तिथे विग्रह आला नव्हता पण भविष्यात होणार्‍या घटनेची ती नांदी होती. आपल्या पूर्ण आयुष्यभरात श्रीरामांनी आपले विष्णुरूप फक्त श्रीरंगमलाच घेतले होते. भारतवर्षातील अत्यंत जुन्या मंदिरांत या मंदिराची गणना होते. पुराणांच्या बरोबरीने महाभारतात सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे तो म्हणजे, अर्जुन जेव्हा उलुपीशी लग्न करण्यासाठी दक्षिणेत आला होता त्यावेळी त्याने या मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात त्याच्या नावाने मंडपम आहे. आजच्या काळाशी सुसंगत बोलायचं म्हणजे, हे मंदिर ’युनेस्कोच्या संभाव्य वर्ल्ड हेरिटेज साईट’ मध्ये समाविष्ट आहे.
या मंदिराच्या निर्माणात कित्येक साम्राज्यांनी हातभार लावलाय. तामिळनाडू म्हटलं म्हणजे पहिले नाव चोळ साम्राज्याचे येते तसेच चोळांप्रमाणे पांड्य, होयसळ, विजयनगर आणि मराठा साम्राज्यांनी मंदिराचा विस्तार करण्यासाठी हातभार लावलाय. ह्या मंदिराचे आताचे स्वरूप ’किळीवाळवन’ या चोळ राजाने दिलंय. श्रीरंगनाथन ज्या आदिशेषावर पहुडले आहेत तो सोन्याचा आदिशेषही चोळांनी मंदिरात अर्पण केला होता. तंजावूरच्या मराठा साम्राज्याने आपली मोलाची छाप तामिळनाडूवर सोडली आहे. त्याच्या खुणा श्रीरंगनाथन मंदिर, बृहदिश्वर मंदिर मिरवित आहेत. या मंदिरात एकेक भिंत शिलालेखाने सजली आहे. प्रत्येक साम्राज्याने त्यात भर घातली आहे. असं म्हणतात की, हे शिलालेख कित्येक डॉक्टरेटचा विषय आहेत. कारण हे शिलालेख शतकांच्या कालावधीत लिहिले गेलेत. ह्या मंदिरावर जे शिलालेख लिहिले गेलेत ते तामिळ, संस्कृत, तेलुगू या भाषांत तर होतेच परंतु त्यांमध्ये मराठी भाषेतील शिलालेखांचा सुद्धा समावेश आहे. श्रीरंगमच्या वैष्णवांसाठी हे मंदिर प्राणापेक्षाही जास्त प्रिय होतं आणि आहे. या मंदिराचे त्यांनी प्राणपणाने रक्षण केलंय. एकेकाळी या मंदिरात प्रचंड सोनं होतं. मंदिराच्या भिंती सोन्याने मढलेल्या होत्या. मात्र सगळं लुटून गेलं. कितीतरी सुरस चमत्कारिक कथा मंदिराभोवती वेढल्या गेल्यात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की, महाराष्ट्राने दक्षिणेचे रक्षण केलं, त्यामुळे दक्षिणेच्या कोणत्याही मंदिराला आघात पोहोचलेला नाही.
हे मान्य करूनही मला सांगावेसे वाटते की, मुघलांच्या आधी गादीवर असलेल्या दिल्लीच्या सुलतानाने बाराव्या शतकात मंदिरावर तीन वेळा हल्ला केला होता. मात्र त्यावेळी मराठेशाही अस्तित्वातच नव्हती. पुढे मराठेशाही अस्तित्वात आल्यानंतर दक्षिणेचे खरोखरच रक्षण झाले. पण तेव्हा असलेल्या होयसळ, विजयनगर साम्राज्यांचे केवळ अवशेष उरले होते. मात्र हे परचक्र येण्याआधी श्रीरामानुजाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे सगळे सण-उत्सव सुरळीत सुरू होते. श्रीरामानुजाचार्य 120 वर्ष जगले आणि सन 1127 मध्ये श्रीरंगमला त्यांचे देहावसन झाले. श्रीरंगमवर, दिल्लीच्या सुलतानाचा पाहिला हल्ला सन 1311मध्ये झाला. अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर हे दोन राक्षस चितोडगड, देवगिरीचे यादव साम्राज्य, द्वापारसमुद्रचे (हळेबिडू) होयसळांचे साम्राज्य नष्ट करत करत श्रीरंगमला आले. त्यावेळी हल्ला होणार ही सूचना मिळाल्यामुळे मूळ विग्रहाच्या भोवती अतिशय भक्कम अशी भिंत बांधली गेली. त्यामुळे श्रीरंगनाथनच्या मूळ विग्रहाला कधीही क्षती पोहोचली नाही. मात्र ’नम्मपेरूमाळची’ उत्सवमूर्ती दिल्लीला नेली गेली. त्याचवेळी घडलेली सुलतानाच्या मुलीची गोष्ट सांगितली जाते. मुलीने ती उत्सवमूर्ती वितळवू दिली नाही. सुलतानाने ‘बाहुली’ म्हणून ती मूर्ती मुलीला खेळायला दिली, पण मुलीचे त्या मूर्तीवर प्रेम बसले होते. इथे श्रीरंगमला नम्मपेरूमाळ नसल्याने मात्र अवकळा पसरली होती. श्रीरंगमचे लोक दुःखातिरेकाने वेडे झाले होते. आपली उत्सवमूर्ती मंदिरात नाही, ही गोष्टच त्यांना सहन होत नव्हती. तामिळ साहित्यात याबाबत खूप कथा सांगितल्या गेल्यात मात्र ’कोईल ओळूकू’ मध्ये सांगितलेली कथा सर्वसंमत आहे. श्रीरंगममधील एक मुलगी मूर्ती परत मिळेपर्यंत काहीही न खाण्याचा निश्चय करून सुलतानाच्या सैन्यापाठोपाठ दिल्लीला पोहोचली होती. तिने पाहिलं की, मूर्ती सुलतानाच्या मुलीकडे आहे. हा निरोप तिने श्रीरंगमला परत येऊन दिला. त्यावर काही नर्तक व गायकांचा एक जथ्था दिल्लीला जाऊन पोहोचला. त्यांनी आपल्या कलेचे सर्वोच्च सादरीकरण सुलतानासमोर करून ती उत्सवमूर्ती सुलतानाला परत द्यायला लावली. असं म्हणतात की, भरतनाट्यमचा तो अत्यंत सुंदर अविष्कार होता. जथ्था वेगाने मूर्ती घेऊन श्रीरंगमला जायला निघाला मात्र, सुलतानाच्या मुलीला ही बातमी कळली. घोड्यावर बसून ती सुद्धा श्रीरंगमला जायला निघाली. सैन्याला चुकवण्यासाठी दूरच्या रस्त्याने आल्यामुळे मूर्ती तोपर्यंत श्रीरंगमला पोहोचली नव्हती. ज्यावेळी सुलतानाची मुलगी श्रीरंगमला पोहोचली त्यावेळी तेथे मूर्ती दिसत नसल्याने अत्यंत दुःखी होऊन तिचे तिथेच प्राणोत्क्रमण झाले. यावर चिडून सुलतानाच्या सेनापतीने मंदिरावर हल्ला केला. मंदिरावर झालेल्या हल्ल्यातील सगळ्यांत भयानक असा हा हल्ला होता. त्यावेळी गाभार्‍याजवळ वैष्णवांनी अत्यंत जाड मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळी सुमारे बारा हजार वैष्णव मरण पावले. श्रीरंगमला नुसता रक्ताचा सडा पडला होता. मुख्य पुजारी मूर्ती घेऊन तिरुनेलवेलीला चालले होते. त्यावेळी मंदिरात असलेल्या एका देवदासीने, वेल्लईने पुजार्‍यांना निघून जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणून भरतनाट्यम सादर करायला सुरुवात केली. तिच्या अप्रतिम नृत्याने अवघे सैन्य मंत्रमुग्ध झाले होते. सेनापती भुलून वेल्लईच्या मागे एका गोपुरमवर चढला. वेल्लईने प्रसंगावधान दाखवून त्याला गोपुरमवरून खाली ढकलून दिले व स्वतःच्या कृत्याचे प्रायश्चित म्हणून स्वतः सुद्धा तिथून उडी मारून जीव दिला.
इतक्या वेळात मूर्ती तिरूनेलवेलीच्या रस्त्याला लागली होती. इकडे श्रीरंगमला, सेनापतीच धारातीर्थी पडल्यावर गडबड उडून सैन्य सैरावैरा चहूकडे पसरले आणि श्रीरंगमवरचे संकट टळले. वेल्लईच्या बलिदानाची आजही तिथे आठवण ठेवली आहे. ते एकच असे गोपुरम आहे की, ते फक्त पांढर्‍या रंगात रंगवले आहे. त्या गोपुरमचे नाव सुद्धा ’वेल्लई गोपुरम’ आहे. मी श्रीरंगमला गेले होते त्यावेळी आवर्जून राजगोपुरम बरोबरच वेल्लई गोपुरम सुद्धा बघितले होते.
इकडे जो जथ्था उत्सवमूर्ती घेऊन श्रीरंगमला निघाला होता, त्यांच्यामध्ये सुलतानाचे सैन्य मागून येतेय म्हणून मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी फाटाफूट झाली होती. त्यातूनच उत्सवमूर्ती हरवली गेली. इथे श्रीरंगमवर दुःखाचे सावट पसरले होते. श्रीरंगमवासियांना सावरण्यासाठी मंदिराचे व्यवहार परत चालू करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र त्यासाठी उत्सवमूर्तीची गरज होती आणि तीच नव्हती. शेवटी पुजार्‍यांनी गुप्तपणे तशीच दुसरी मूर्ती बनवून घेतली व हरवलेली मूर्ती सापडल्याचे जाहीर केले. मात्र जंगलात हरवलेली मूर्ती जवळपास साठ वर्षांनंतर परत मिळाली. तिची परीक्षा घेतली गेली व अशाप्रकारे मंदिराला दोन उत्सवमूर्ती मिळाल्या. नंतर बनवलेली मूर्ती आता गाभार्‍यातच ठेवली आहे तर ’नम्मपेरूमाळ’ ही मूळ मूर्ती मात्र आजही उत्सवाच्या वेळी आपल्याला दर्शन देते...
मंदिरावर झालेले तिसरे आक्रमण हे मदुराईच्या सुलतानाने केले. त्यावेळी मूर्ती तिरुमलाला नेण्यात आली. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या विजयनगर साम्राज्यामुळे मंदिराला स्थिरता मिळाली. या मंदिराला वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष कार्ये केली त्यांची आठवण मंदिरात जागती ठेवली आहे. सुलतानाच्या मुलीला सुद्धा हे मंदिर विसरलं नाही. आज ही मुलगी ’थूळुका नच्चियार’ या श्रीरंगनाथाच्या पत्नीच्या रूपात पूजली जाते. वर्षातून केवळ एक दिवस, या दिवशी श्रीरंगनाथाला मुस्लीम वेश परिधान करून तूप व गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे विस्तारपूर्वक लिहिण्याचे कारण म्हणजे आपली मंदिरे आणि आपले पूर्वज कोणत्या परिस्थितीतून गेले याची आपल्याला जाणीव व्हायलाच हवी.
दिव्य देसम्मधले श्रीरंगनाथाचे एकुलते एक मंदिर असे आहे की, त्यात बारापैकी अकरा आळ्वरांनी पासुरामी रचल्या आहेत. या मंदिरावर सर्वात जास्त अशा एकूण 274 पासुरामी रचल्या गेल्यात. इतक्या पासुरामी दुसर्‍या कोणत्याही दिव्य देसम्वर रचल्या गेल्या नाहीत.
श्रीरंगनाथाचे मंदिर दिव्य देसम्मधील प्रथम क्रमांकाचे मंदिर आहे. तसेच हे मंदिर ’अंत्य रंगाचे’ सुद्धा मंदिर आहे. (आदी रंगा-श्रीरंगपट्टणम (म्हैसूर), मध्य रंगा-शिवसमुद्र तर अंत्यरंगा म्हणजे श्रीरंगनाथन.) हे मंदिर पंचरंगांमधील सुद्धा एक आहे. तसेच श्रीरामानुजाचार्यांचे जीवन ज्या चार मंदिरांत व्यतीत झाले त्या मंदिरांपैकी सुद्धा हे एक मंदिर आहे. (तिरुमला - वरदराज पेरूमल - कांचिपुरम - श्रीरंगम - मेळूकोटे)
पुढच्या भागात आपण श्रीरंगासाठी काय सेवा केल्या जातात ते पाहूया.
 

अनुष्का आशिष

 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंगमधे शिक्षण झाले असून, IT क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्र व साप्ताहिकात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहेत. प्रवासाची अतिशय आवड व त्यासंबंधित लेखन. देशभरातील प्राचीन मंदिरे पाहण्याची व त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे.