चीनचा कावा आणि भारताचा सांगावा

27 Jun 2025 16:42:30
दहशतवादाबाबत भारताची जी भूमिका आहे तिचा ठोस पुनरुच्चारच राजनाथ सिंह यांनी या एससीओ बैठकीत केला आहे. शांतता आणि समृद्धी दहशतवादासोबत एकत्र अस्तित्वात राहू शकत नाही, असे खडे बोल त्यांनी तेथे सुनावले.

india
 
 
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चीनच्या दौर्‍यावर गेले असताना त्यांनी गुरुवारी 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि भारताचा कणा ताठ राखला. आज सर्व जगाला भारताची दहशतवादाच्या विरोधात घेतलेली रोखठोक भूमिका सर्वज्ञात झाली आहे. अशावेळी या संयुक्त निवेदनावर राजनाथ सिंह यांनी स्वाक्षरी केली असती तर त्यामुळे भारताला महत्त्वाच्या मुद्द्यांवर पडती बाजू घ्यावी लागली असती आणि विशेषतः दहशतवाद आणि देशाची सुरक्षा याबाबत कोठेतरी तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागले असते.
 
 
राजनाथ सिंह यांनी या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास नकार देउन योग्य तेच केले आहे. कारण या महत्त्वाच्या दस्तऐवजात अलीकडेच झालेल्या काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. परंतु त्याचवेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यात बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे. यातून एकच अर्थ निघतो की, चीनने पाकिस्तानची पाठराखण करण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि चीन जागतिक समस्या असलेल्या दहशतवादापासून जगाचेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. जगाच्या पाठीवर दहशतवादी कारवाया घडवून आणणार्‍या दहशतवाद्यांचे पाकिस्तान हे माहेरघर आणि आश्रयस्थान आहे, हे जगजाहिर असले तरी चीन या वास्तवाकडे काणाडोळा करीत आहे.
 
 
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे ’द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी गटाने निष्पाप पर्यटकांवर एक भेकड आणि घृणास्पद हल्ला केला. पर्यटकांना प्रश्न विचारून त्यांचा धर्म हिंदू असल्याची शहानिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या नृशंस हल्ल्याचा भारताने प्रतिशोध घेतला.
 
 
दहशतवादाबाबत भारताची जी भूमिका आहे तिचा ठोस पुनरुच्चारच राजनाथ सिंह यांनी या एससीओ बैठकीत केला आहे. शांतता आणि समृद्धी दहशतवादासोबत एकत्र अस्तित्वात राहू शकत नाही, असे खडे बोल त्यांनी तेथे सुनावले.
 
 
भारत एससीओ सदस्यांमध्ये अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. आपण एकत्रितपणे आपल्या लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याची तसेच आजच्या आव्हानांना तोंड देण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. स्थिरता आणि सुरक्षितता मजबूत करण्याच्या आपल्या प्रयत्नात आपण सर्वांनी एकमत असले पाहिजे, अशी भूमिका आपल्या संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे.
 
 
भारताने वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब आहे) हे उदात्त मूल्य पूर्वीपासूनच स्वीकारले आहे. त्यामुळे परस्परविश्वास, परस्परसहयोग आणि सहअस्तित्व यावर भारतीयांची पूर्वीपासून अविचल श्रद्धा आहे. याच उदात्त मूल्याचा आधार घेऊन एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या ब्रीदवाक्याच्या आधारे जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न भारताने चालविला आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांनी परस्पर सामंजस्यपणा आणि परस्पर लाभ हेच धोरण स्वीकारले पाहिजे. केवळ जग हे एकच गाव बनलेले आहे, असे म्हणून भागणार नाही. आपली उक्ती आणि कृती त्याला अनुसरून असली पाहिजे.
 
 
 
पाकिस्तानचे तसे नाही. त्याच जन्मच मुळी धार्मिक विद्वेषाच्या परंपरेतून झाला आहे. आपण एकत्र नांदू शकत नाही, या विघटनवादी तत्त्वावर ज्यांचा ठाम विश्वास होता, तेच या पाकिस्तानचे जन्मदाता आहेत. त्यामुळे भारताविषयी सूडबुद्धी बाळगूनच पाकिस्तानचा आजवरचा प्रवास झालेला आहे. नुकताच जो दहशतवादी हल्ला झाला त्याला उत्तर देण्यासाठी भारताने 7 मे 2025 रोजी सीमापारचे दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या सुरू केले जे अजूनही थांबलेले नाही. देशाची सुरक्षा हा भारताचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. जे संयुक्त निवेदन शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वतीने जारी करण्यात येणार होते, त्यात सीमापारच्या दहशतवादी कारवायांना उत्तर देण्याविषयी साराच गुळमुळीतपणा होता. त्यामुळे देशहित लक्षात घेऊन या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे नकार दिला. सध्याच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश ही दोन्ही राष्ट्रे ‘चोर चोर, मौसेरे भाई’ अशा भूमिकेतून भारतविरोधाची सातत्याने एकमेकांशी जुळणारी भूमिका घेत असून त्यांचे दत्तक पितृत्व स्वीकारण्यास चीन अगदीच उतावीळ झालेला आहे. त्यामुळेच हे निवेदन तयार करण्यात त्यांची आडमुठी भूमिका राहिलेली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यानंतर, गटाने संयुक्त निवेदन जारी करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह यांच्या नकारानंतर, एससीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक त्यात सहभागी झालेल्यांकडून कोणत्याही संयुक्त निवेदनाशिवायच संपली.
 
 
ही बैठक 25 ते 26 जून दरम्यान चीनमधील किंगदाओ येथे झाली. या बैठकीत भारत, चीन, रशिया आणि इतर मध्य आशियाई राष्ट्रांसारख्या सदस्य देशांचे संरक्षण विषयातील नेते प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. बैठकीत बोलताना राजनाथ सिंह यांनी संपूर्ण जगाला भेडसावणारी सर्वात मोठी आव्हाने शांतता, सुरक्षा आणि विश्वासाची कमतरता यांच्याशी संबंधित आहेत. आणि या समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढती कट्टरतावाद, टोकाचा अतिरेकीपणा आणि दहशतवाद होय हे स्पष्ट केले. या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे आणि आपली त्यांच्याविरुद्धच्या लढाईत एकजूट झाली पाहिजे. राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करून लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटला पाकिस्तानचा पाठिंबा यावर प्रकाश टाकला. दहशतवादाची केंद्रे आणि तळांना आम्ही लक्ष्य करण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यामुळे ’दुटप्पी मापदंड नकोत’ असे एससीओ सदस्यांना सांगून दहशतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जागतिक व्यासपीठावर भारताने असे ठणकावून सांगणे हीच विशेष बाब या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0