पाणी समस्येच्या मुळाचा वेध

विवेक मराठी    28-Jun-2025
Total Views |
 Vidarbha Pani Parishad
 
@चारुदत्त कहू  9922946774
vivek
‘आज पाणी वाया गेले तर पाणी उद्या जीव घेईल’, असे म्हटले जाते. यातून पाण्याचे महत्त्व मानवासाठी किती आहे, हे कळते. मानवी जीवनातील पाण्याच्या महतीबाबत थोर पुरुषांनीही वक्तव्ये केली आहेत. भारतीय संस्कृतीतही प्रकृतीचे दोहन करा शोषण नव्हे या शब्दात निसर्गसंपत्तीच्या सुयोग्य वापराचा संदेश दिला आहे. हीच बाब ध्यानात घेऊन नागपुरातील वनामती येथे 7, 8 व 9 जून 2025 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समितीच्या वतीने त्रिदिवसीय विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये हजारो शेतकरी, जलतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग ‘जल है, तो जीवन है’ पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून गेला.
विदर्भ पाणी परिषदेच्या निमित्ताने आयोजित पोस्टर, मॉडेल प्रदर्शन, संशोधन पेपर आणि रील मेकिंग स्पर्धांमधील जनतेचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. या परिषदेत राज्याच्या पाणी प्रश्नावर तर चिंतन झालेच, समस्यांच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्नही झाला. तसेच पेयजल, कृषीजल आणि औद्योगिक जल परिषदेत झालेल्या तज्ज्ञांच्या विचारमंथनातून पाण्याचा वापर, साठवणूक आणि त्याच्या व्यवस्थापनाच्या पद्धतींवर प्रकाश टाकला गेला.
 
 
परिषदेच्या पहिल्या दिवशी ’शहरी भागातील पेयजल उपलब्धता, समस्या व उपाय’, ’ग्रामीण भागातील पेयजल सद्यस्थिती, समस्या व उपाय’, ’पिण्याचे पाणी, तंत्रज्ञान आणि सामाजिक उद्योजकता’ या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तर दुसर्‍या दिवशी रोजी ’कृषी जलपरिषद’ पार पडली. त्यात ’विदर्भातील कृषी योग्य पाणी : सद्यस्थिती, समस्या व उपाययोजना’, ’पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील पाणी : समस्या व उपाय’, ’मध्य विदर्भातील शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन: समस्या व उपाय’ तसेच ’पूर्व विदर्भातील पाण्याचे व्यवस्थापन : समस्या व उपाय’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ’विदर्भातील कृषी योग्य पाण्याचा वापर व त्यातील पाणी वापर संस्थांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परिषदेत ’विदर्भातील ठिंबक सिंचनासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर’, ’पूर्व विदर्भातील जलसिंचन व पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण’ या विषयांवरही तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या यशोगाथांचे सादरीकरणही यावेळी झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजय चौथाईवाले यांनी भूषविले.
 
 
 
परिषदेच्या तिसर्‍या दिवशी औद्योगिक जलपरिषदेत ’औद्योगिक क्षेत्रातील पाण्याच्या समस्या व उपाययोजना’, ’उद्योगांसाठी पाण्याचा परिणामकारक वापर’, ’औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचे शुद्धीकरण व पाण्याचा व्यावसायिक वापर’, ’औद्योगिक जलव्यवस्थापन व त्यातून रोजगार निर्मिती’ या विषयांवर मान्यवरांनी विचार मांडले. दुपारच्या सत्रात ’विदर्भातील सिंचन सद्यस्थिती व अनुशेष’, ’जलकार्यक्षम विदर्भासाठी : रोडमॅप 2047’ आदी विषय चर्चेला आले.
आयोजन समितीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य डॉ. विजय ईलोरकर, अधिसभा सदस्य शुभांगी नक्षिणे उंबरकर, अधिसभा सदस्य राज मदनकर, जनकल्याणकारी समिती नागपूरचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदव पिसे यांचा समावेश होता.
 
 
वैनगंगा जलप्रदर्शन
 
 या निमित्ताने वनामती येथील योगा हॉलमध्ये आयोजित वैनगंगा जलप्रदर्शनाचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रदर्शनाची तसेच संशोधन मॉडेल्सची पाहणी केली. पोस्टर प्रेझेंटेशन व संशोधन मॉडेल स्पर्धेत 150पेक्षा अधिक विद्यार्थी, संशोधक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या. ‘जलसंवर्धनातून
 
महाराष्ट्राची समृद्धी’ - मुख्यमंत्री
 
जलसंवर्धनातून महाराष्ट्र समृद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ पाणी परिषदेचे उद्घाटन करताना व्यक्त केला. ते म्हणाले,‘वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 500 किमीची नदीच विदर्भात तयार होणार आहे. विविध प्रकल्पांची साठवण क्षमता वाढविण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी उचलून गोदावरी खोर्‍यातील सिंचन क्षमता वाढवली जाणार आहे. या सोबतच पाच नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात आले असून, तापी जलपुनर्भरण योजनेबाबत मध्यप्रदेश सरकारसोबत करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 20 ते 22 टीएमसी पाणी अमरावती विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे‘. या प्रकल्पातून महाराष्ट्र जल स्वयंपूर्ण कसा होईल, याचा रोडमॅपच मुख्यमंत्र्यांनी मांडला.
 
‘जलसंवर्धन आणि व्यवस्थापनाची गरज’
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
 
विदर्भात शेतीची मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढवायची असेल तर जलसंवर्धन आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. विदर्भातील 6 जिल्ह्यात मागील काही काळात 10हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे अध्ययन करताना सिंचनाचा अभाव तसेच कापसाचे कमी उत्पादन मूल्य अशी दोन प्रमुख कारणे निदर्शनास आली. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. धावणार्‍या पाण्याला चालायला लावणे, चालणार्‍या पाण्याला थांबायला लावणे, गावातील पाणी गावात तर शेतातील पाणी शेतात थांबेल, अशी व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
‘पाच बिंदूंमधून शाश्वत विकास’ - पद्मश्री चैत्राम पवार
 
जल, जंगल, जमीन, पशुधन व जनजाती या पाच बिंदूंना जोडून जलसंवर्धन केल्यास शाश्वत विकासाची दिशा सापडेल, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे वॉटर क्रेडिटचा विषय चर्चेला येत आहे, त्याचप्रमाणे आगामी काही वर्षात ऑक्सिजन क्रेडिटचा विषय देखील चर्चेला येईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. एकजुटीच्या माध्यमांतून बारीपाडा गावाने 1100 एकर जंगल निर्माण केल्याची गाथाही त्यांनी सांगितली. जंगल निर्माण केल्याने येथील नागरिकांची सरपणाची समस्या निर्माण झाली होती. यासाठी गावामध्ये सोलर चूल, स्मोक चूल, गॅस अशा विविध पाच प्रकारच्या चुली आणल्या. गावाने संघटितपणे जंगल वाचविले. जंगलामध्ये पाणलोट क्षेत्र निर्माण करीत श्रमदानाने तब्बल 485 बंधारे बांधले. बंधार्‍यांतील पाणी जमिनीत मुरल्याने पूर्वी उजाड असलेल्या जमिनीवर ग्रामस्थांना शेती करणे शक्य झाले. एवढ्यावरच न थांबता 1116 शेतकर्‍यांना एकत्र करत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आजूबाजूच्या 44 गावात व्यवसाय निर्माण करीत तेथील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळ बाजाराशी जोडला. केंद्र सरकारच्या वनधन विकास योजनेतून या गावात शेकडो हेक्टर जमीन शेतीसाठी मिळवून देत विविध पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. मोहापासून मनुके, वाईन, चॉकलेट, तेल साबण आदी विविध उत्पादन घेत येथील नागरिकांना स्वयंपूर्ण करणारी माहिती चैत्राम पवार यांनी दिली.
 
 
जलसमस्येतून बाहेर येण्यासाठी...
 
 
पाण्याचे आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व कुणीच नाकारू शकणार नाही. पाण्याच्या अतिवापरामुळे अनेक ठिकाणी जलस्तर खालावलेला आहे. भूगर्भातील पाण्याचाही वापर होऊ लागल्याने समस्या भीषण झालेली आहे. पाण्याचा अति वापर झालेल्या ठिकाणी शेती करताना अडचण निर्माण झालेली आहे. सिंचनाच्या अपुर्‍या सोयींमुळेही विदर्भातील शेतकरी अडचणीत आहेत. सिंचनाची पुरेशी सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तसेच शेततळे तयार करण्याच्या योजना कशा फायदेशीर ठरल्या हे मुद्देही विदर्भ पाणी परिषदेत उच्चरवाने चर्चिले गेले. ‘पाणी पेरलं, पाणी उगवलं’ अशी दुंदुभीही दिली गेली. पाण्यावरील उपाययोजना करताना युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो, असे सांगितले गेले. पाण्याच्या समस्येवर वैयक्तिक सहभागही महत्त्वाचा असल्याची बाब अधोरेखित झाली आणि अखेर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर केल्याशिवाय जलसमस्येतून बाहेर येता येणार नाही, असा निष्कर्षही काढला गेला.