स्वामींनी अवगुणांपासून सुटण्यासाठी परमेश्वराची, रामाची भक्ती पूजन हा उपाय सांगितला असला तरी त्याचे महत्त्व न कळल्याने मन दु:खी खिन्न होते. आपले हित कशात आहे हे न समजल्याने भ्रम निर्माण होतात. या सर्वांना कारण असलेली देहबुद्धी गळून पडावी असे वाटले तरी परम कठीण आहे. आत्मानुभूती येण्यासाठी देहबुद्धीचा त्याग करणे महत्वाचे आहे. रामाची निष्ठापूर्वक भक्ती केल्याने, हे रामरूपाशी एकरूपता झाल्यावर शरणागताला अनुभवल्यावर रामाच्या कृपेने देहबुद्धी गळून पडते व आत्मसाक्षात्कार होतो. हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. त्यातच मानवी जीवनाचा उद्धार आहे.
’अनुदिनी अनुतापे ’या करुणाष्टकाच्या गटातील मागील श्लोक क्रमांक 12 मध्ये स्वामींनी आपले निरीक्षण नोंदवले आहे की या जगातील सर्व लोक भौतिक वैभव मिळवण्याच्या व वासनातृप्तीच्या आधीन झालेले आहेत, याचा अर्थ आपल्या आजूबाजूचे लोक, अशाश्वत म्हणजे न टिकणास भौतिक सुखाच्या, वैभवाच्या आहारी गेलेले आहेत, समर्थ म्हणतात ’सकूळ जन भवाचे आखिले वैभवाचे।’ हे सर्व लोक पैशाच्या, वैभवाच्या आधीन झाले आहेत. क्षणैक भौतिक सुखाच्या आकर्षणापायी त्यांना या ना त्या मार्गाने, नीती अनीतीचा, पापपुण्याचा विचार न करता पैसा, श्रीमंती हवी आहे. पण हे सारे अवैध मार्गाने मिळून त्यांना खरोखरच हवे ते सुख मिळणार आहे का? किंवा सुखाचा मार्ग सापडणार आहे का? या विषयी कोणी विचार करीत नाही. या पुढील श्लोकात स्वामी आता या भौतिक सुखासाठी धडपडणार्या पैशाच्या वैभवाच्या हव्यासाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, हे सांगत आहेत.
सुख सुख म्हणतां तें दुःख ठगकोनि आलें।
भजन सकळ गेलें चित्त दुश्चित झालें।
भ्रमनि मन कळेना हीत तें आकलेना।
परम कठिण देही देहबुद्धी गळेना ॥13॥
(यात) सुख आहे, (त्यात) सुख आहे, असे म्हणत असताना (सुख तर मिळाले नाही) पण दुःख मात्र (समोर) उभे राहिले. (या सुखापायी) परमात्म्याचे भजन (पूजन) भक्ती (झाली) नाही. (त्यामुळे) अंत:करण खिन्न झाले, मन भ्रमित झाल्याने हित कशात आहे हे कळेनासे झाले आहे. देहबुद्धी सोडून देणे अतिशय कठीण (झाले) आहे.
सुखाचे आकर्षण वाटून जे जे करायला जावे, त्या कृतीतून दु:खाची प्रचिती येते अशी स्थिती आहे. सामान्य माणसाच्या सुखाच्या कल्पना तरी काय असतात, त्याला वाटत असते, चांगले खावे प्यावे, हॉटेलातील वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा, नाटक, सिनेमे, टी.व्ही. यासारखी करमणुकीची साधने अनुभवावी, वासनातृप्तीची उपलब्धता असावी, वगैरे. यांसाठी पैसा आणि सत्ता हाताशी असेल तर सारे सोपे होईल व आपण सुखी होऊ माणसाला असेही वाटत असतेे की पैशाच्या जोरावर मी सारी सुखे विकत घेईन, असा भ्रम त्याच्या मनात निर्माण होतो. तथापि द्रव्य किंवा पैसा हे सुख मिळवण्याचे साधन आहे, साध्य नव्हे याचा माणसाला विसर पडतो. पैसा हेच सर्वस्व मानल्याने माणसाला पैशाची हाव निर्माण होते. वैधमार्गाने मिळणार्या पैशाचा आपण सुखासाठी साधन म्हणून उपयोग केला तर पैसा वाईट नसतो, घातक नसतो, पण पैशाच्या अती हव्यासापोटी नीति अनीतीची, पापपुण्याची चाड न बाळगता केवळ धनसंचय करणे या कृतीतून सुखाऐवजी दु:खाचा अनुभव येऊ लागतो. अवैध भ्रष्टाचारी मार्गाने प्रचंड पैसा जमा केलेल्या अतिश्रीमंत माणसांच्या आयुष्याचा शेवट आत्महत्या, वेड लागणे, दीर्घकाळ इस्पितळात खितपत पडणे, तुरुंगवास असा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. जी गोष्ट पैशासंबंधी आहे बीच स्थिती वासना, सत्तेचा मद या संबंधात आहे. स्वामीनी मनाच्या श्लोकात, मनाला उपदेश करताना सांगितले आहे की समजे हे मना, तू वासना, कामना, द्रव्य आणि दारा, बायका यांपासून दूर राहा.
मना वासना चूकवी येरझारा।
मना कामना सांडि रे द्रव्य दारा ॥ (म.श्लो. 21)
या जगात सभोवार सुखाची अनेक आकर्षणे दिसत असली तरी. अंतिमतः त्यातून दुःख वाट्याला येते असा सर्वसामान्य अनुभव आहे. लालसा, हावरटपणा, हत्यास हे त्याचे कारण आहे. जेवण कितीही, सुग्रास असले तरी जीभेचे लाड पुरवण्यासाठी आवडीचे पदार्थ मर्यादे पलिकडे सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येतात आणि दुःख भोगावे लागते.
आपण सर्व बाबतीत हे माझे, ते माझे असा अहंभाव बाळगल्याने आपल्याला सृष्टिकार्याचा, परमेश्वराचा विसर पडतो. स्वामी दासबोधात अशा अहंकारी माणसाची मानसिकता कशी आहे ते सांगतात.
माझे घर, माझा संसार। (मधेचि)
देव कैंचा आणिला थोर ।
’माझे माझे’ या प्रवृत्तीचा जोर विलक्षण असल्याने मनुष्य स्वार्थी अहंकारी तर बनतोच पण देवालाही विसरतो, अशाश्वत बेगडी आकर्षक वैधवाच्या नादी लागल्याने अनेक अवगुण त्याच्या ठिकाणी मुक्कामाला येतात. परोपकार, दान, त्याग, भक्ती, प्रेम असे सद्गुण त्याला खेडू सोडून जातात, अहंकार, स्वार्थ, विकार इत्यादिकांनी त्याचा ताबा घेतल्याने मन संक्रमित होते व खर्या सुखाचा हिताचा मार्ग सापडत नाही.. यावर काही उपाय आहे का? हो आहे. तो स्वामींनी दासबोधात सांगितला आहे-
उपाये येक भगवदभक्ती। जरी ठोकना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥
परमेश्वर भक्तीतून भजनातून अवगुणांना आळा बसून सद्गुणांची आवड निर्माण होते व खर्या समाधानाचा मार्ग शोधता येतो. परमेश्वराची मनापासून भक्ती, त्याच्याप्रती निष्ठा आणि शरणागतता यातून खर्या शाश्वत सुखाची प्राप्ती होते, असे अध्यात्मशास्त्र मानते व तसा संतांचा अनुभव आहे. भौतिक विज्ञानात प्रयोग करून सत्य शोधतात. तथापि आध्यात्म हे प्रचितीचे, अनुभूतीचे शास्त्र आहे. व्यावहारिक जगात सुख शोधताना दुःख पुढे उभे राहाते अहंभावाने भक्ती, प्रेम सुख दूर गेल्याने मनात निराशा, खिन्नता उत्पन्न होते. परिणामत: मनात भ्रम निर्माण होतात. करायला जावे एक आणि होते भलतेच असा अनुभव आल्याने माझे हित कशात आहे, हे समजेनासे होते. मन अस्थिर होते. ही अस्थिरता घालवण्यासाठी समर्थांसारख्या निरिच्छ संतांचा उपदेश मोलाचा ठरतो. पण देहबुद्धीच्या प्रभावाने हिताचा उपदेश उमजत नाही, अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही.
जन्मापासून सतत आपला संबंध या देहाशी आल्याने ’मी म्हणजे देहच’ अशी पक्की समजूत होणे, याला ’देहबुद्धी’ म्हणतात. ती सोडली तर ’मी म्हणजे चिरंतन आत्मा’ ही आत्मबुद्धी अनुभवता येते. पण देहबुद्धी सुटता सुटत नाही. स्वामी म्हणतात देहबुद्धी सोडून देणे अतिशय कठीण आहे. (परम कठिण देहीं देहबुद्धी गळेना) थोडक्यात प्रपंचातील गोष्टी सुखाच्या वाटल्या, मानवाला अहंभावाचे वासनातृप्तीचे आकर्षण वाटले तरी अंतिमतः जे दुःख देणारे ठरते. स्वामींनी अवगुणांपासून सुटण्यासाठी परमेश्वराची, रामाची भक्ती पूजन हा उपाय सांगितला असला तरी त्याचे महत्त्व न कळल्याने मन दु:खी खिन्न होते. आपले हित कशात आहे हे न समजल्याने भ्रम निर्माण होतात. या सर्वांना कारण असलेली देहबुद्धी गळून पडावी असे वाटले तरी परम कठीण आहे.
आत्मानुभूती येण्यासाठी देहबुद्धीचा त्याग करणे महत्वाचे आहे. रामाची निष्ठापूर्वक भक्ती केल्याने, हे रामरूपाशी एकरूपता झाल्यावर शरणागताला अनुभवल्यावर रामाच्या कृपेने देहबुद्धी गळून पडते व आत्मसाक्षात्कार होतो. हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. त्यातच मानवी जीवनाचा उद्धार आहे.