प्रज्ञावंत हरपला...

विवेक मराठी    28-Jun-2025
Total Views |
@नचिकेत केळकर 
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निसर्ग लेखक, अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या साहित्यात वाचलेल्या आणि कल्पना केलेल्या अनेक गोष्टी, स्थळं आणि माणसं स्वतःच्या डोळ्यांनी भेटता आणि अनुभवता आली. वन्यजीवनाच्या अभ्यासाचे धडे देणारे ते माझे पहिले गुरू. अजूनही मध्य भारतातल्या जंगलांमध्ये भटकत असताना जी परिचयाची झाडं भेटतात तेव्हा चितमपल्ली यांनी करून दिलेला परिचय सुद्धा परत उजळून येतो. याच आठवणींना उजाळा देणारा लेख..

Maruti Chitampalli
 
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी काही दिवसांपूर्वी आली. शाळेत असल्यापासून नागपूरला त्यांच्या घरी आमचं येणं-जाणं नेहमी असायचं. त्यांच्या मधुमेहासाठी ते आमच्या वडिलांचे पेशंट. मी बारा वर्षांचा आणि माझी बहीण नऊ वर्षांची असल्यापासून आम्हाला त्यांच्याबरोबर नवेगाव, नागझिरा, इटियाडोह, नागपूर, आणि चंद्रपूरच्या जंगलांमध्ये खूप भटकंती करता आली. त्यांच्या साहित्यात वाचलेल्या आणि कल्पना केलेल्या अनेक गोष्टी, स्थळं आणि माणसं स्वतःच्या डोळ्यांनी भेटता आणि अनुभवता आली. वन्यजीवनाच्या अभ्यासाचे धडे देणारे ते माझे पहिले गुरू. अजूनही मध्य भारतातल्या जंगलांमध्ये भटकत असताना जी परिचयाची झाडं भेटतात तेव्हा चितमपल्ली यांनी करून दिलेला परिचय सुद्धा परत उजळून येतो.
 
 
चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी फोन केला होता. तेव्हा त्यांनी मला ते कोईमतुर फॉरेस्ट कॉलेजला शिकत असताना तेव्हाचे तिथले प्राध्यापक प्रोफेसर के. ए. भोजा शेट्टी यांचा पत्ता अगर फोन नंबर शोधून काढता येईल का? असे विचारले. त्यांना त्यांच्यासाठी पेढे पाठवण्याची इच्छा होती. हे ऐकून आधी मी विचारात पडलो कारण हे शोधून काढणं बरंच कठीण जाणार होतं. चितमपल्ली यांचे वय 92 तर, प्रोफेसर भोजा शेट्टी यांचे वय किती असेल, ते अजूनही सक्रिय असतील का, आणि यासोबतच जे स्वाभाविक विचार मनात येतात तेच माझ्याही मनात आले. मात्र, इंटरनेटवर आणि काही मित्रांच्या मदतीने मला त्यांचा तमिळनाडूमधल्या पोलाची इथला पत्ता सापडला. पोलाची येथील डॉक्टर अल्वा यांना फोन केला, तेव्हा असे समजले की, प्रोफेसर भोजा शेट्टी यांचे एक वर्षापूर्वी, वयाच्या 99व्या वर्षी निधन झाले.
 
 
मी अकरावीत असताना वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (थखख) देहरादूनला भेट देणार होतो. तेव्हा चितमपल्ली यांनी त्यांच्या प्राणिकोश ग्रंथासाठी भारतातल्या सस्तन प्राण्यांची शास्त्रीय सूची थखख येथील डॉ. जॉनसिंग यांच्याकडून घेऊन यायचं काम माझ्यावर सोपवले. डॉ. जॉनसिंग म्हणजे भारतीय वन्यजीव संशोधनातलं एक फार मोठं नाव. 1970 च्या दशकात रानकुत्र्यांवर त्यांचा पीएचडीचा अभ्यास होता आणि त्याच काळात चितमपल्ली यांची त्यांच्याशी भेट झाली व पत्रव्यवहार सतत चालू राहिला. त्यावेळी डॉ. जॉनसिंग हे त्यांच्या चराारश्री ेष र्डेीींह ईळर या दोन खंडांचं संपादन करण्याच्या कामात व्यस्त होते. चितमपल्ली यांनी पाठवलेल्या पत्राचा संदर्भ वापरून डॉ. जॉनसिंग यांनी माझ्या हातात ती सूची दिली. गंमत म्हणजे त्यांचे ते महाखंड पूर्ण होईस्तो आणखीन 14 वर्षे लोटली-आणि या काळात मी वन्यजीवशास्त्रज्ञ झालो होतो, अन त्याच पुस्तकातला गंगा नदीतल्या डॉल्फिन्स वरचा लेख मला लिहायला मिळाला. डॉ. जॉनसिंग बंगलोरला निवृत्तीनंतर स्थायिक झाले. आमच्या एम.एस्सी. (चडल) मध्ये त्यांनी 2006 साली आम्हाला शिकवले तेव्हा मी त्यांना 2001 साली झालेल्या भेटीची आठवण करून दिली होती.
भारतातील वन्यजीव संशोधनात ओल्ड स्कूल नॅचरल हिस्ट्री म्हणजेच निसर्गाचा अभ्यास विस्तृत लेखनाने आणि निरीक्षणांनी पुढे नेणे, असे मानले जाते. चितमपल्ली हे ओल्ड स्कूल नॅचरल हिस्ट्रीच्या भारतातल्या शेवटच्या अभ्यासकांपैकी एक होते. ही पद्धत आधुनिक वैज्ञानिक पद्धतीपेक्षा वेगळी आहे. तरीदेखील तिचे महत्त्व आणि संदर्भ वैज्ञानिकच म्हणावे लागतील. हल्ली वन्यजीव संशोधकांमध्ये रपशलवेींरश्र म्हणजेच घटनावृत्तविषयक वर्णनांना कमी लेखले जाते. मात्र त्याच्यातलं मर्म समजून त्याचा नवीन वैज्ञानिक प्रश्न विचारण्यात आणि त्यांचे उत्तर शोधण्यात वापर कसा करता येईल, याच्याकडे सखोल दृष्टिकोन फार कमी संशोधक ठेवतात. चितमपल्ली यांच्या लेखनामध्ये अनेक महत्त्वाची निरीक्षणे, संदर्भ आणि पुरावे, आपल्याला नवे संशोधन करण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरतील यावर मला विश्वास वाटतो.
संस्कृत, पाली, रशियन, स्कॅन्डीनेव्हियन, जर्मन, अशा अनेक भाषांमधले निसर्गलेखन मराठी भाषेत आणण्याचं कार्य त्यांच्यामुळे घडलं. तेराव्या शतकात अनेक जिनपंथी ऋषींनी केलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदी, पक्ष्यांच्या नोंदी, या इतक्या परिपक्व आणि समग्र आहेत हे केवळ चितमपल्ली यांनी केलेल्या भाषांतरांमुळे शक्य झाले. नागर मराठी साहित्यात अन्यथा हे साहित्य कधीही समाविष्ट झालं नसतं. पाच-सहा वर्षांपूर्वी जैन मुनी हंसदेव यांच्या मृगपक्षीशास्त्रावर एक शास्त्रीय टिप्पणी लिहिण्याचं आम्ही ठरवलं होतं. त्यांच्या प्राणिकोशासाठी देखील छायाचित्रे जमवण्याचे काम करण्यात मी मदत करत होतो. पण ही दोन्ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.
त्यांच्या साहित्यात मध्य भारतातल्या आदिवासी जीवनाचं अतिशय उत्कट असं चित्रण होतं तरीदेखील त्याबाबतीत त्यांनी नेहमी एक साहित्यिक ताटस्थ्य साधलं. आदिवासी जीवनाचे वर्णन करताना त्या समाजाची कधी कीव न वाटावी किंवा त्याबद्दल मुद्दाम ीेारपींळलळीा उत्पन्न न व्हावा असे हे लिखाण. मात्र त्या समाजाची निसर्गाशी घट्ट जोडलेली नाळ आणि त्याचबरोबर जगाकडे बघण्याचा सरळसाधा दृष्टिकोन हे मात्र त्यांच्या लेखनातून वाचकांना समजता आले. त्यांच्या लेखनातून वन्यजीव व पर्यावरण संरक्षणासाठी काही उपयोग झाला नाही, अशी टीका देखील त्यांच्यावर झाली आहे. परंतु आपण पाहिलं तर त्यांची पुस्तक वाचणार्‍या अनेक साध्या माणसांमध्ये जंगलाबद्दल आणि तिथले जिवंतसृष्टीबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण कशी झाली नसेल? संवर्धनाबद्दल लिहिणं हे फक्त आपण काय केले पाहिजे किंवा काय करू नये एवढ्यातच का सीमित रहावे? जंगलाचे दर्शन आणि अनुभव सामान्य वाचकांपर्यंत पोचवणे हे देखील वन्यजीव संवर्धनासाठी प्रचंड मोलाचे कार्य आहे, ही आठवण त्यांची पुस्तकं त्यांच्यानंतरही आपल्याला सतत करून देतील.
मला त्यांच्याकडे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक दुर्मीळ अशी पुस्तके वाचायला मिळाली. यात इंग्रजी निसर्गकविता, श्येनशास्त्र हा षरश्रलेपीू या विषयावरचा संस्कृत अध्याय, व्यंकटेश माडगूळकर यांची पुस्तके, अशा बहुविध साहित्याचा समावेश होता. जपानी हायकू हा काव्यप्रकार प्रथम त्यांच्याच लेखनामुळे वाचायला मिळाला. कुठलंही पुस्तक वाचून परत देताना त्याच्यातलं काय नक्की आवडलं आणि भावलं हे त्यांना सांगावं लागायचं, आणि मगच त्यांची खात्री पटायची की ते पुस्तक खरंच वाचलं आहे. त्यांच्या लेखनातून केवळ त्यांनी हाताळलेले विषय नव्हे तर त्यासोबत येणारे संदर्भ यांचा देखील मागोवा घेत जाता कितीतरी नवीन संहिता दुरून का होईना, पण पाहायला मिळाल्या. त्यांच्याच लेखांमध्ये वाचलेली, महाभारतातील एक ओळ या श्रद्धांजलीला शेवट म्हणून सुयोग्य ठरेल.
पक्षांची पावले आकाशात दिसत नाहीत.
प्रज्ञावंत माणसांची पावले भूमीवर दिसत नाहीत.