@आदित्य शिंदे 9970633000
दयाल दादाच्या गावात साधनांचा अभाव होता पण तरीही प्रचंड श्रीमंती होती. दयाल दादा हे त्या सगळ्या श्रीमंतीचं प्रतीक होता, माझा ईशान्येतला तो पहिला बंधू होता. तिथल्या माणसांना आमच्या तिथे जाण्याचे कौतुक होते, आनंद होता. देशाच्या या कोपर्यात असलेला दयाल दादा आणि त्याचे गाव ईशान्येच्या कायम प्रेमात पडायला कारण ठरले.
मारे अडीच दिवस प्रवास करून कोलकाता आणि पुढे 6 तासांचा थांबा घेऊन 12 तास प्रवास करून गुवाहाटीला पोहोचलो तेव्हा विवेकानंद केंद्राच्या एक ताई आमचं स्वागत करायला स्टेशनवर आल्या होत्या. त्यानंतर गाडी घेऊन आम्ही आणखी 4 तासांचा प्रवास करून उदालगुडी जिल्ह्यातील भैरवकुंड नावाच्या गावात जाऊन पोहोचलो.
सुमारे 18-19 वर्षांपूर्वीचा हा काळ होता. तवेरा गाडी घेऊन आम्ही भैरवकुंड गावात पोहोचलो. संध्याकाळ झाली होती, दिवस लवकरच मावळत असल्याने 5 वाजताच बराच अंधार पडला होता. गावातली मंडळी आम्हाला ‘पाहायला’ आणि आमचं स्वागत करायला जमली होती. अनेकांना चार चाकी गाडी आपल्या गावात आलीये याचही पुष्कळ कौतुक वाटत होतं.
‘’आप सबकी व्यवस्था अलग अलग घर में किया है” असं म्हणत आमची व्यवस्था करणारा गावातला दयाल दादा पुढे आला. आम्ही तिथल्या स्थानिकांच्या घराघरांत 2 दिवस राहणार होतो. आमच्यातले अनेकजण संपूर्ण शाकाहारी असल्याचे मी तिथे गेल्या गेल्या सगळ्यांना सांगितले. गावातल्या एकाने ‘आदमी छोडके हिलने वाला सब खातें हैं‘ म्हणत माझ्या विनंतीला पहिली सलामी दिली.
दोन दिवस आम्ही शेतात राबणार्या त्या शेतकर्यांचे कष्ट पाहात होतो. भौगोलिक परिस्थितीशी चालू असलेला झगडा अनुभवत होतो. एकीकडे शाकाहारी असलेल्या आमच्या गटाला सकाळ-संध्याकाळ जेवू घालणे त्यांना बहुदा जरा जिकिरीचे होते. त्यांनी न्याहारीला भात आणि डाळीचे पाणी, दुपारी आणि संध्याकाळीही भात आणि डाळीचे पाणी असा बेत केलेला असायचा. मॅगी आणि तुपातला शिरा खाणारी आमची मुले या जेवणाला सरावली नव्हती.
दयाल दादाच्या कुटुंबाने सगळ्यांना सकाळी न्याहारीला बोलावले होते. न्याहारीचा बेत म्हणजे ब्रेड आणि जाम होता. आम्हाला त्यात काहीच विशेष वाटले नव्हते. आमची न्याहारी होत असताना दयाल दादाने आम्हाला त्या ब्रेडची छोटीशी कहाणी सांगितली. सुमारे 80 किलोमीटर प्रवास करून त्याने आमच्यासाठी ब्रेड आणि जाम आणला होता. आमची सरबराई करायला त्यांच्याकडे साधनांचा अभाव होता पण प्रेमाचा, आपुलकीचा आणि मायेचा सागर होता.
तिथल्या गावात होत्रा (शत्र किंवा सत्र) म्हणजे मंदिर होते. खूपच स्वच्छ आणि सात्विक अशा त्या मंदिराच्या प्रांगणात बसून आम्ही गीतेचा अध्याय म्हणत होतो. एक एक करत गावातून बरीच मंडळी आमच्यासोबत सहभागी झाली. अध्याय संपवून आम्ही निघालो तेव्हा एक जख्ख म्हातारी बाई समोर आली. तिने जमीन पदराने स्वच्छ करून आमच्यासमोर हात पसरून काहीतरी म्हणू लागली. हिला काय हवे असेल? पैसे? असा विचार करत असताना दयाल दादा तिथे आला. त्याने त्या आज्जीबाईंचे सगळे झाल्यावर आम्हाला तिचे म्हणणे सांगितले.
त्या आज्जीबाईंनी आम्हाला हात जोडून विनंती केली होती की, तुम्ही सगळे अतिथी म्हणजे ुळींर्हेीीं रििेळपीांशपीं आलेला आहात त्यामुळे तुम्ही सगळी मंडळी संध्याकाळी घरी जेवायला या!! अतिथींना देव मानून जेवू घालण्याची त्या आज्जीबाईंची इच्छा होती.
दोन दिवसांनी निरोपाच्या आधी मी आणि आमच्या सहलीचा आर्थिक प्रमुख याने दयाल दादाला किती पैसे द्यायचे याचा हिशोब करून ठेवला होता. दयाल दादाला दोन दिवसांचा पाहुणचार केल्याचे प्रत्येकी किती पैसे द्यायचे आणि त्याने जास्त मागितले तर आपण बार्गेन काय आणि कसं करायचं हे आम्ही ठरवून ठेवलं होतं.
निरोपाच्या वेळी सगळे गाव आपापल्या घरातून आम्हाला द्यायला काही ना काही घेऊन आले होतं. कोणी फुलं आणली होती, कोणी कोमल चावल, कोणी पीठा (तिथला एक गोड पदार्थ) तर कोणी अजून काही!! दयाल दादा माझ्या पुढे येऊन उभा राहिला. मी खिशात हात घालून ठरल्याप्रमाणे हिशोब करणार होतो. पण तेवढ्यात त्याने त्याच्या आसाममोळ्या हिंदीत बोलायला सुरुवात केली. आपको हम अच्छा खाना नहीं दे पाया । वो रोटी बनाना आता नाही ना । असं म्हणत दयाल दादाने माझ्या हातात 500/- रुपये ठेवले. वो पुना मे सब बच्चोंको उनका पसंद का खाना दे दो ।
दयाल दादाने दिलेले पैसे कमवायला किती कष्ट लागतात हे आम्ही अनुभवले होते. त्यामुळे पैसे घेऊ की नको या संभ्रमात मी होतो. पण त्याची प्रेमळ जबरदस्ती मी टाळू शकलो नाही. मोठ्या भावाने निघताना हक्काने हातात नोट ठेवावी तसे ते पैसे हातात घेतले. गाडीत बसल्यावर आमच्या शिबिरातला मुलगा कानात म्हणाला “दादा, आत्ता समजलं सारे भारतीय माझे बांधव आहेत.“ म्हणजे काय ते आसामच्या या भेटीत आम्हाला सगळ्यांना भरभरून मिळालं. सर्वात जास्त मिळालं ते बंधुत्वाचं नातं !!
दयाल दादाच्या त्या गावात साधनांचा अभाव होता पण तरीही प्रचंड श्रीमंती होती. दयाल दादा हे त्या सगळ्या श्रीमंतीचं प्रतीक होता. तिथल्या माणसांना आमच्या तिथे जाण्याचे कौतुक होते, आनंद होता. देशाच्या या कोपर्यात असलेला दयाल दादा आणि त्याचे गाव ईशान्येच्या कायम प्रेमात पडायला कारण ठरले.
ईशान्येच्या कोनाकोपर्यात आजही ही सांस्कृतिक श्रीमंती भरून राहिली आहे. तुम्ही जाताय ना ही श्रीमंती प्रत्यक्ष अनुभवायला?