@अजित वर्तक

एखाद्या शाळेने मनात आणले तर समाजात सहज पण आमूलाग्र परिवर्तन घडू शकते. हेच शाळांच्या उपक्रमांतून लक्षात येते. विद्यार्थ्यांचं पर्यावरणाची लहानलहान उपक्रमांमधून एकदा का नातं रुजलं की, विद्यार्थी अतिशय आनंदाने पर्यावरणाशी एकरूप होतात व विविध कल्पक उपक्रमांतून पर्यावरणाशी आपल्या नातं दृढ करतात. अशाच काही पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्या शाळांची माहिती देणारा लेख..
आपल्या भावी पिढीला पर्यावरणाच्या संदर्भात अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे, हे निश्चित. त्यामुळे पर्यावरण संदर्भात त्यांच्यात पुरेशी जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. हा विषय त्यांच्या शालेय जीवनापासूनच सुरू झाला तर त्यांची पर्यावरणाशी चांगल्या प्रकारे नाळ जोडली जाईल. या दृष्टीने अनेक शाळांनी आपल्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केले आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.
हे उपक्रम जाणून घेत असताना पहिल्यांदा श्रीमती सुरजबा विद्या मंदिरच्या कुसुम शुक्ला यांच्याशी बोलणे झाले. कुसुमजी, स्वाती फुंगुसकर आणि संजय गायकवाड पर्यावरणाशी निगडित उपक्रम राबवतात. एकंदरीत पर्यावरणाचा पट खूप विशाल आहे; पण सुदैवाने गेली अनेक वर्षे The Green Line, Roots Shoots, Keshav Srushti अशा काही अग्रगण्य संस्थांसोबत पर्यावरणाशी निगडित अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग, बीच क्लिनिंग, इको फ्रेंडली फेस्टिवल, वृक्षारोपण, किचन गार्डन, रिसायकलिंग, व्हर्मी कंपोस्टिंग, वेस्ट मॅनेजमेंट, सीड बॉल, बायो एन्जाइम, पथनाट्य असे अनेक प्रोजेक्ट राऊंड द क्लॉक चालू असतात.
MLP ( मल्टी लेअर प्लास्टिक) हा तसे बघायला गेले तर साधे प्लास्टिक रिसायकलिंग करण्यासाठीचा प्रोजेक्ट; पण त्यात शाळेने खूपच कल्पकता लढवली. प्रामुख्याने 8 वी इयत्तेतील विद्यार्थी हा प्रोजेक्ट बघतात. प्रत्येक मजल्यावर प्लास्टिक जमवण्यासाठी पेट्या असतात, त्याही टाकाऊतून टिकाऊ पद्धतीने बनवलेल्या. रिसायकलिंग स्पर्धात्मक बनवण्यासाठी ह्या प्रत्येक पेटीला दोन कप्पे असतात. प्रत्येक आठवड्याला बदलता प्रश्न असतो, उदा. तुमचा आवडता क्रिकेटर कोण रोहित की विराट? एक कप्पा विराटचा आणि एक रोहितचा, त्यामुळे आपला आवडता क्रिकेटर जिंकवण्यासाठी मुले त्या कप्प्यात जास्त प्लास्टिक जमा करतात. जमा झालेलं प्लास्टिक वेगवेगळया संस्थांना रिसायकलिंगसाठी दिले जाते. काही संस्था तर रिसायकलिंगमधून तयार झालेले बेंचेस पुन्हा संस्थेला देतात. काही वेळेला मुलेच प्लास्टिक ब्रिक्स बनवतात आणि मग केशवसृष्टी सारख्या संस्थांना त्या बंधारे किंवा अन्य कामांसाठी दिल्या जातात.
निर्माल्याचे खत हा आणखी एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट, कारण हा केवळ विद्यार्थ्यांच्या घरापुरता मर्यादित न राहता यात मंदिर, गणेशोत्सव मंडळे, शेजारीपाजारी ह्यांचाही सहभाग असतो. विद्यार्थीच शाळेच्या लेटरहेडवरील विनंतीपत्र घेऊन तर मंदिरे, मंडळे ह्यांच्या ट्रस्टींशी बोलतात आणि त्यांच्याकडून निर्माल्य जमाही करतात. आलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण होते. केशवसृष्टीने श्रेडिंग मशीन दिलेलं असल्यामुळे निर्माल्याचे विघटन अगदी 10 - 15 दिवसांतच होते. त्याचे वितरण पुन्हा समाजासाठीच केले जाते, जणू समाजाकडून समाजाकडे हे चक्रच कंपोस्टिंगच्या माध्यमातून पूर्ण होते. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पालक, त्यांच्या पाठिंब्यामुळेच मुले मोकळेपणाने आणि उत्साहाने या उपक्रमात पुढाकार घेतात. हा उपक्रम गेले आठ वर्ष सतत चालू आहे आणि वर्षाकाठी साधारण 50 किलो कंपोस्ट तयार होते.
जोगेश्वरी गोरेगावच्या मध्यावर अशीच एक प्रयोगशील शाळा म्हणजे अस्मिता. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणात त्यांनी स्वच्छ भारताचा संकल्प सोडला. अस्मिता शाळेच्या बाबतीत ही नवीन नव्हते, कारण त्याआधी सुद्धा शिक्षक आणि मुले सोबत आठवड्यातून एक दिवस शाळा स्वच्छता करत असत. त्यात थोडा बदल म्हणून सुरू झाली स्वच्छता फेरी. निसर्ग मंडळात जेव्हा पर्यावरणावर चर्चा झाली तेव्हा स्वच्छतेचे बाळकडू मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनीच गणेशोत्सवानंतर समुद्रकिनार्याची स्वच्छता आपण करूया असा विचार मांडला. काही तांत्रिक अडचणीमुळे समुद्र किनारा सफाई नाही, पण जोगेश्वरीतीलच शामनगर तलावाच्या स्वच्छतेची जबाबदारी अस्मिताने उचलली. गौरी गणपती विसर्जन होऊन शाळा सुरू झाली की, लगेचच दररोज एक तुकडी असे 100 विद्यार्थी तलाव सफाईला सुरुवात करतात आणि हे काम अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर संपते. ह्याच उपक्रमातून आणखी एक कल्पना पुढे आली की, जोगेश्वरीतील काही ऐतिहासिक जसे गुंफा किंवा गुंफाजवळील परिसर ह्यांची सफाई आणि हे काम निसर्ग आणि विज्ञान मंडळातील मुले स्वच्छता किंवा प्रभात फेरीच्या अंतर्गत करतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक आणि स्थानिक नागरिक यांचाही यात समावेश असतो.
नंतर माझे संभाषण झाले ते कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळ यांच्या नूतन ज्ञानमंदिर मधील विजयालक्ष्मी सणस आणि संगीता आंबेरकर यांच्याशी. छत्रपती शिक्षण मंडळाची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशीच (1 मे 1960) झाली हा एक योगायोगच. मागेल त्याला शिक्षण ह्या मूळ उद्देशाने चालू झालेली संस्था कायमच प्रगतीपथावर आहे आणि 6 विभाग व 27 शाळा चालतात. आजच्या कालानुरूप शाळेत स्वतंत्र पर्यावरण विभाग आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात.

छत्रपती शिक्षण मंडळ हे ज्ञानदानाचे कार्य गेली अनेक दशके करत आहे. याचबरोबर पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे व पर्यावरणपूरक जीवनशैली विद्यार्थ्यांनी, पालक व पर्यायाने समाजाने अंगीकृत करावी यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेच्या शाळा वनवासी, ग्रामीण व शहरी भागांत विखुरलेल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात. जसे की, मुरबाड, पालघर, रायगड विभागांतील शाळा परसबागेत भाज्या लावून त्यांचा वापर मध्यान्ह भोजनामध्ये करतात, तर शहरी भागांत छोट्या जागेत किचन गार्डन तयार करून विद्यार्थ्यांना याविषयी माहिती दिली जाते. वनवासी भागातील रातवड शाळेमध्ये दरवर्षी विद्यार्थी जलबंधारे बांधतात. त्यामुळे पावसाचे पाणी अडविले जाते. यामुळे गावातील स्त्रियांना पाण्यासाठी चार किलोमीटर जावे लागत नाही. वडघर येथील वनवासी शाळेत सौर ऊर्जा वापरासाठी सोलर पॅनल बसवल्यामुळे भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना सायंकाळी व रात्रीच्या वेळी अभ्यासासाठी सौरऊर्जेचा वापर करता येतो. श्री जयेश्वर विद्यामंदिर, डेंगाची मेट या वनवासी शाळेत 2011 साली 20हून अधिक औषधी वनस्पतींची लागवड केली व त्याचे संवर्धन व जतन केले आहे. पारंपरिक भाताच्या 20हून अधिक जातींच्या बियाणांचं जतन व संवर्धन करून देशी भाताचे महत्त्व गावकर्यांना पटवून दिले, त्यामुळे गावातील शेतकरी आता पारंपरिक भाताची शेती करू लागले आहेत.
शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील जैवविविधता अभ्यासून बायफ संस्था व लेडी बर्ड टाटा मोटर्स यांच्या मदतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलपाखरांची बाग विकसित करण्यासाठी दहा हजार वनस्पतींची रोपे लावून ती जतन केली आहेत. फुलपाखरांच्या विविध जातींचा अभ्यास विद्यार्थी करतात. विद्यार्थ्यांनी 200 देशी बांबूंची लागवड शाळेच्या परिसरात करून त्याचे संवर्धन केले आहे. शाळेच्या आवारात मोठे शोषखड्डे खोदून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्नही विद्यार्थी करतात.
शहरी भागातील विवेकानंद संकुल, सानपाडा येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक फिनेल तयार केले आहे. त्याचा वापर शाळेतील साफसफाईसाठी करतात. झाडावर कीटकनाशके म्हणून फवारण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे जलप्रदूषण होत नाही. अनेक वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या अनेक शाळांमधून राबविले जातात. काही शाळांमध्ये निर्माल्यातून व नारळाच्या शेंडीपासून धूप, सीड बॉल्स, पर्यावरणपूरक रंग, त्याचप्रमाणे दिवाळीसाठी सुगंधी उटणे अशा प्रकारे पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी अनेक लहान लहान उपक्रम शाळांमध्ये राबवले जातात आणि या सर्व उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमारजी जोशी सर व चिटणीस डॉ. निलेशजी रेवगडे सर यांचे मार्गदर्शन लाभते.
2017 साली पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली व छत्रपती शिक्षण मंडळाच्या, नूतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व) संयुक्त विद्यमाने शाळेत कल्याणमधील पहिले रानभाज्या प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थी, पालक आणि परिसरातील इतर शाळेच्या विद्यार्थ्यांचाही भरघोस प्रतिसाद लाभला. टिटवाळा शाळेतील विद्यार्थ्यांना टिटवाळ्यातील रानभाजी महोत्सवासाठी आमंत्रण दिले. पहिल्या वर्षी ह्यातून मुलांना रानभाज्यांची ओळख झाली आणि मग हळूहळू रानभाज्यांचे प्रकार, त्यांचे औषधी गुणधर्म ह्यांची विद्यार्थ्यांनी माहिती गोळा करून शाळेत प्रदर्शन भरवले. केवळ याच शाळेचेच नाही तर अन्य शाळांचे विद्यार्थी आणि पालकही प्रदर्शन बघून गेले, अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी सोपे व पौष्टिक असे रानभाज्यांचे पदार्थ ही बनविले आणि हा विषय कल्याणमधील इतर शाळांमधूनही चालू झाला. आज तर रानभाज्यांचे खाद्यपदार्थ बनवण्याच्या विविध पाककला स्पर्धा पण आयोजित केल्या जातात आणि त्यात पालकांच्या सोबत विद्यार्थीही सहभागी होतात.
सणस ह्यांच्या लेखनाच्या छंदाचा उपयोगही पर्यावरण विभागाला झाला. त्यांनी विविध पर्यावरणाशी निगडित विषयांवर लिहिलेली (थेंबे थेंबे तळे साचे, स्वच्छ कल्याण सुंदर कल्याण, उत्सवांचे बदलते स्वरूप, नदी तुझी कहाणी इ.) पथनाट्ये विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी सादर केली. ती लोकांना इतकी भावली की, कल्याणमधील माघी गणेशोत्सव, कल्याण महोत्सव, कोकण महोत्सव अशा अनेक नामांकित मंडळात सार्वजनिक गणेशोत्सव किंवा अन्य कार्यक्रमात पथनाट्याचे सादरीकरण करण्यासाठी बिदागी असते.
एखाद्या शाळेने मनात आणले तर समाजात सहज पण आमूलाग्र परिवर्तन घडू शकते हे वरील शाळांच्या उपक्रमांतून लक्षात येते. विद्यार्थ्यांचं पर्यावरणाची लहानलहान उपक्रमांमधून एकदा का नातं रुजलं की, विद्यार्थी अतिशय आनंदाने पर्यावरणाशी एकरूप होतात व विविध कल्पक उपक्रमांतून पर्यावरणाशी आपल्या नातं दृढ करतात. विद्यार्थ्यांवर लहान वयात संस्कार झाल्यामुळे भावी पिढी नक्कीच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारेल यात शंका नाही.