अर्धवटाचे अपुरे ज्ञान

विवेक मराठी    06-Jun-2025   
Total Views |
rahaul gandhi
 
चित्रविचित्र दावे करणे हा राहुल गांधी यांचा स्वभावच आहे. पण त्यांचे दावे जर देशाचा स्वाभिमान, देशाच्या जवानांचे शौर्य आणि पंतप्रधानांची प्रतिष्ठा यांच्या मुळावरच घाव घालत असतील तर श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्यांना ब्रह्मदेवाने नव्हे तर सर्वसामान्य भारतीय जनतेनेच समज देण्याची गरज आहे, हे निश्चित. 
 
अज्ञ: सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञ:।
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रंजयति॥
 
असे भतृहरी राजाने नीतिशतक नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. या श्लोकाचा अर्थ असा होतो- जो पूर्णपणे मूर्ख आहे त्याला अगदी सहजपणे समजावून सांगता येते. जो पंडित आणि तज्ज्ञ आहे त्याला समजावून सांगणे तर तुलनेने अधिक सोपे असते. परंतु जो अर्धवट शिकलेला आहे आणि ज्याला अपुर्‍या ज्ञानाचा गर्व झाला आहे, त्याचे समाधान ब्रह्मदेवही करू शकणार नाही.
 
 
या श्लोकाची आठवण होण्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच तोडलेले अकलेचे तारे...मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका अधिवेशनाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की,‘आता मला आरएसएस-भाजपा हे चांगले समजले आहेत. त्यांच्यावर थोडासा दबाव आला तर ते घाबरून पळून जातात.’ मग पुढे भारताच्या पंतप्रधानांबाबत भाष्य करताना ’नरेंदर नहीं सरेंडर’ असा पांचट विनोद केला. त्यांच्या मते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रागावल्यावर नरेंद्र मोदी यांनी सपशेल शरणागती पत्करली.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे राहुल गांधी यांचे अगाध अज्ञान एवढे आहे की त्याबाबत बोलता सोय नाही, पण देशांतर्गत राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याबद्दल त्यांनी जो आपल्या बालबुद्धीचा प्रत्यय दिला आहे त्याला अजिबात तोड नाही. कोणताही सुबुद्ध नागरिक त्यांचे हे विधान सहन करू शकत नाही. तेव्हा भाजपाने ही टीका सहन करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
 
 
आपण येथे लक्षात घेतले पाहिजे की, ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या अमेरिकेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर स्पष्टपणे म्हणाले आहेत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू करणे हे कोणत्याही तिसर्‍या पक्षाच्या हस्तक्षेपामुळे घडून आलेले नाही. जेव्हा एका पत्रकाराने त्यांच्याच पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदी शरण गेले या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा शशी थरूर यांनी प्रश्नावर उत्तर दिले की, मी एवढेच म्हणू शकतो की आम्हाला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल खूप आदर आहे. पण आम्ही आमच्याविषयी सांगू शकतो की, याबाबतीत भारताने कधीही कोणालाही मध्यस्थी करण्यास सांगितले नव्हते. आम्हाला पाकिस्तानी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात कोणतीही अडचण येत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा वापरतो तोपर्यंत भारत बळाची भाषा वापरेल. कुणीही भारताला थांबायला सांगण्याची गरज नाही, कारण पाकिस्तानने कुरापती काढण्याचे थांबवताच भारताकडून प्रत्युत्तरादाखल होणारे सर्व काही थांबेल.
 
पण राहुल गांधी यांना थांबा म्हणून कोण सांगणार? त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हल्ला चढवत म्हटले की,‘ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास साक्षी आहे. भाजपा-आरएसएसचे हे चरित्र आहे; ते नेहमीच डगमगतात. अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने 1971 मध्ये पाकिस्तानचे तुकडे केले होते. काँग्रेसचे ’बब्बर शेर’ आणि ’शेरनी’ महासत्तांशी लढतात, ते झुकत नाहीत.’
 
 
पक्षीय स्वार्थाच्या राजकारणामुळे राहुल गांधी इतके आंधळे झाले आहेत की, आपण भाजपा आणि रालोआ सरकारचा विरोध करताना आपल्या भारतीय सैन्यावरच अविश्वास दाखवीत आहोत. आपल्या आणि एखाद्या पाकिस्तानी राजकारण्याच्या दाव्यांमध्ये फरक करणारी सीमारेषाच आपण पुसून टाकत आहोत, याचेही भान त्यांना उरलेले नाही.
 
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना,‘राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला आणि धाडसाला ’शरणागती’ म्हणणे हे केवळ दुर्दैवीच नाही तर भारतीय सैन्याचा, राष्ट्राचा आणि 140 कोटी भारतीयांचा घोर अपमान आहे. जर एखाद्या पाकिस्तानीने असे म्हटले असते तर आपण त्याच्यावर हसलो असतो, परंतु ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे कहर केला त्यानंतर पाकिस्तानच्या जनतेपासून ते त्यांच्या सैन्यापर्यंत आणि अगदी पंतप्रधानांपर्यंत कोणीही हे बोलण्याची हिंमत केली नाही, परंतु राहुल गांधी हे बोलत आहेत! हे देशद्रोहापेक्षा कमी नाही.’
 
 
राहुल गांधी हे नेहमीच ताळतंत्र सोडून वागतात हे आपल्याला भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैनिकांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे त्यावरूनही दिसून येते. 2022 च्या भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सविरूद्ध गांधी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. संविधानाच्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, परंतु हे स्वातंत्र्य उचित निर्बंधांच्या अधीन आहे आणि त्यात भारतीय सैन्याची बदनामी करणारी विधाने करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या याचिकेत असा अजब युक्तिवाद केला होता की तक्रारदार भारतीय सैन्याचा अधिकारी नाही आणि म्हणून तो पीडित व्यक्ती नाही. हा युक्तिवाद फेटाळून लावताना न्यायालयाने असे नमूद केले की कलम 199(1) फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत, गुन्ह्याचा थेट बळी नसलेल्या व्यक्तीलाही जर गुन्ह्याचा परिणाम झाला तर तो पीडित व्यक्ती मानला जाऊ शकतो. असो. चित्रविचित्र दावे करणे हा राहुल गांधी यांचा स्वभावच आहे. पण त्यांचे दावे जर देशाचा स्वाभिमान, देशाच्या जवानांचे शौर्य आणि पंतप्रधानांची प्रतिष्ठा यांच्या मुळावरच घाव घालत असतील तर श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्यांना ब्रह्मदेवाने नव्हे तर सर्वसामान्य भारतीय जनतेनेच समज देण्याची गरज आहे, हे निश्चित.