@रुपाली कुलकर्णी -भुसारी
एनडीएतून नुकतीच महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. एनडीएमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला छात्रांची पहिली तुकडी आता भारतीय सैन्य दलात दाखल झालेली आहे. लिंगभेदभावमुक्त उपक्रम घेणे हे यातून एनडीएने साध्य केले आहे. प्राचीन इतिहासात वीरांगणानी शौर्य दाखविले, तसेच भारताचे संरक्षण करणार्या नव-वीरांगना पुनः तयार झाल्या आहेत, हे स्वागतार्ह आहे.
30 मे 2025 हा दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी पुण्यातील खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकेडमीतून -एनडीए- (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण झाली आहे. एनडीएमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ही तुकडी आता भारतीय सैन्य दलात दाखल झालेली आहे.
दरवर्षी एनडीएची पासिंग आऊट परेड सगळ्यांसाठीच उत्साहाची पर्वणी असते. यंदाची ही परेड नेहमीपेक्षा जास्त औत्सुक्याचा विषय होती. कारण एनडीएतून महिला छात्राची पहिली तुकडी बाहेर पडत होती.
परेडला मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलींचे प्लाटून शिस्तीत समोरून जात असताना सर्वच जणांनी जागेवरून उठून उभे राहत जोरदार टाळ्यांनी त्यांचे केलेले स्वागत... अभिमानाने ऊर भरून यावा असा हा क्षण... आणि डोळ्यात पाणी आल्याने त्या क्षणी धूसर झालेली नजर.. भरून आलेले ढगाळ आकाश आणि तोच जोरदार सलामी देत गेलेली सुखोई-30 फायटर विमाने...! हा थरार...केवळ अविस्मरणीय...!
यंदाची ऐतिहासिक ठरलेली, 28 मे 2025 रोजी एनडीएची कमांडंट रिह्यु परेड - पासिंग आऊट परेड मी अनुभवली.
आपला देश किती योग्य पिढीच्या हाती आपण सोपवत आहोत याची जाणीवच अत्यंत समाधान देणारी होती. एकूण 338 छात्र, त्यापैकी 17 मुली अशी तुकडी लष्करात ‘कमिशन’ झाली.
नुकतेच, ‘ऑपरेशन सिंदूरचे’ची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी लष्कराने महिला अधिकार्यांना पाठवून सुखद धक्का दिलेला आहे. जगाचे लक्ष ज्या ‘प्रेस ब्रीफ्रिंग’वर होते त्यात लष्करातील महिलांचा आत्मविश्वासपूर्ण वावर भारताच्या प्रगत दृष्टीकोनाची साक्ष देणारा होता. याविषयीच्या आठवणी ताज्या असतानाच नुकताच एनडीएचा 148व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा लक्षवेधी ठरला.
तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवत त्यांनी खेत्रपाल मैदानावर ‘अंतिम पग’ ओलांडले. हा ‘अंतिम पग’ ओलांडून हे छात्र देशाच्या सेवेसाठी लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज होतात. हा देखणा सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी काही प्रवेशिका सामान्य नागरिकांसाठी सुद्धा मिळू शकतात.
इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ प्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, एनडीए चे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरुचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सतराजसिंग बेदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मिझोरमचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख जनरल (नि.) व्ही.के.सिंग उपस्थित होते. सिंग यांनी संचलनाचे निरीक्षण करीत छात्रांकडून मानवंदना स्वीकारली. जनरल सिंग म्हणाले की, ‘हा आपल्या एकत्रित प्रवासातील ऐतिहासिक, मैलाचा दगड ठरलेला असून यातून सर्वसमावेशकता आणि सबलीकरण साध्य झालेले आहे.’ महिला छात्रांना ‘नारीशक्ती’ संबोधत त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तीन चेतक हेलिकॉप्टरनी मानवंदना दिली. संचलन प्रसंगी तीन सुपर डिमोना या प्रशिक्षणार्थी विमानांनी सुद्धा सलामी दिली.
या महिला छात्रामधील 9 जणी लष्कर, 3 जणी नौदल आणि 5 जणी वायुदलात भरती होत आहेत.
एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरुचरण सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एनडीएमध्ये महिला उमेदवारांचा समावेश हा प्रथमच केला गेला. त्यासाठी त्यांना सामावून घेणे ही प्रक्रिया एनडीएसाठी सुद्धा नवीन होती. ही एक प्रगतिशील अशी प्रक्रिया ठरली. सुरुवातीला मुले आणि मुलींना वेगवेगळे ठेवण्यात आले. नंतर यथावकाश त्यांचा सराव, प्रशिक्षण आणि विविध उपक्रम एकत्रितपणे घेतले गेले. लिंगभेदभावमुक्त उपक्रम घेणे हे यातून एनडीएने साध्य केले आहे. या महिला छात्रा पुढे युद्धभूमीवर जाऊ शकतात. त्या कमांड सांभाळणार आहेत, त्या दृष्टीने त्यांची क्षमता वाढवली गेली आहे. राष्ट्ररक्षासर्वोपरी यादृष्टी एनडीएचे प्रशिक्षण आखलेले असते.
इतिहासावर एक नजर
भारतीय लष्करात महिलांचा समावेश ही टप्प्याटप्प्याने झालेली एक प्रक्रिया आहे. प्राचीन काळात लढवय्या स्त्रिया, अनेक राण्या-महाराण्या, वीरांगना भारतात होऊन गेल्याचा इतिहास आहे. स्त्रियांनी युद्धात तलवार गाजवणे हे या मातीला तसे नवे नाही. शत्रूला जेरीस आणणार्या आणि वीरमरण पत्करणार्या अनेक महिला येथे होऊन गेल्या आहेत. पण, पुढे आधुनिक लष्करात महिलांचा समावेश ब्रिटिशांच्या काळात झाला.
साधारण, 1888 मध्ये ब्रिटिशानी मिलीटरी नर्सिंग सर्विस सुरू केली. प्रथमच औपचारिकपणे भारतीय लष्करात महिलांची भरती केली गेली. नंतर, 1958 पासून इंडियन मिलिटरी मेडिकल कॉर्पने महिला डॉक्टरांना नियमितपणे कमिशन देणे सुरू केले होते. पण यात महिलांची एकूणच भूमिका सैन्याची काळजी घेणे, उपचार करणे यापर्यंत सीमित होती. अर्थात, ते महत्त्वाचे होतेच. पण वैद्यकीय क्षेत्राच्या बाहेरची जबाबदारी महिलांना मिळायला 1992 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. वूमन स्पेशल एन्ट्री स्कीम लागू झाली. त्यात आर्मी एज्युकेशन कँप, कोर्प ऑफ सिग्नलस, इंटलिजन्स कॉर्पस आणि कॉर्प ऑफ इंजिनियर हे शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत चालू झाले. महिलांना 2008 पर्यंत ‘कायमस्वरूपी कमिशन’पासून वंचित राहावे लागले होते. त्यावेळी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे न्यायाधीश-वकील यांना त्यासाठी पात्र ठरवले गेले. पुढे 2019 पर्यंत विविध आठ सेवांच्या अंतर्गत महिलांना लष्करात नॉन-कॉम्बेट (म्हणजेच-थेट युद्धभूमीवरील कामगिरी सोडून अन्य विभाग) सेवांमध्ये कायमस्वरूपी कमिशन देणे सुरू झाले होते. साधारण 2000 सालाच्या सुमारास कायमस्वरूपी कमिशन मिळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातच होते.
कालांतराने, 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यात महिलांना लष्करात कायमस्वरूपी कमिशन देणे आणि थेट कॉम्बेट - म्हणजेच थेट युद्धात योगदान देणे यांना परवानगी देण्यात आली. लिंगभेद बाजूला ठेवत पुरुष आणि महिला यांना समान संधी उपलब्ध करून दिली जावी असा हा निर्णय होता. नंतर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एनडीएला आदेश दिला की, महिलांना सुद्धा प्रवेश देण्यात यावा. त्यानंतर मग लिंगभेदरहित प्रशिक्षण राबवून एनडीएने महिला उमेदवारांसाठी प्रशिक्षण सुरू केले. त्यांचा थेट युद्धभूमीवरचा सहभाग नजरेपुढे ठेवून महिला उमेदवारांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
एनडीएने या महिला प्रशिक्षणासाठी काही प्रशिक्षण पद्धती आणि काही नियम अन्य संस्थांप्रमाणेच अंगिकारले. त्यामुळे 1992 पासून शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये महिलांना संधी दिली जाते आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई, इंडियन नेव्हल अकादमी, इझीमाला, एअरफोर्स अकादमी, दुंडीगल तेथील काही प्रशिक्षण पद्धती महिला छात्रांसाठी उपयोगात गेल्या. एनडीएमध्ये त्यांची निवास व्यवस्था स्वतंत्र ठेवली गेली तरी त्यांचे प्रशिक्षण पुरुष छात्रांसह एकत्र पार पाडले गेले.
ऑक्टोबर 2021 ला सुप्रीम कोर्टाने जेव्हा एनडीएला महिला छात्रांची भरती करण्याचे आदेश दिले होते, तेव्हा त्यावेळचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज नरवणे यांचे उद्गार मोलाचे आहेत. ते म्हणाले होते, मला असे वाटते की, येत्या 30/40 वर्षांत महिला त्या जागी उभ्या असतील जिथे आज मी उभा आहे म्हणजेच महिलांना लष्करातील सर्वोच्च स्थानी पोहचण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.
पासिंग आउट परेडचे रीव्ह्युव्हिंग ऑफिसर मिझोरमचे राज्यपाल, जनरल (नि.) व्ही.के.सिंग यांनी सुद्धा याचप्रमाणे मनोगत व्यक्त केले आहे. आता ते भवितव्य दूर नाही जेव्हा, येत्या काळात यातीलच एखादी महिला छात्रा लष्करातील सर्वोच्च स्थानी आपली सेवा बजावत असेल म्हणूनच, यंदाची ही परेड आऊट परेड अनेक अर्थांनी विशेष होती.
पासिंग आउटच्या दिवशी जेव्हा सर्व छात्रांचे एकत्र संचलन झाले तेव्हा, पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या समान गणवेषात मार्च करीत होत्या. त्यातील कोणत्या महिला छात्रा आहेत हे चटकन कुणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही इतके साम्य त्यांनी साधलेले होते. लष्करात ‘आम्ही सर्व एक आहोत’ हा संदेश त्यातून दिला गेला. पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा देशाचे संरक्षण करायला समर्थ असून तशी शारीरिक आणि मानसिक क्षमता त्यांच्यात निर्माण केली गेली आहे. वर्षानुवर्ष एनडीएतून बाहेर पडणारे अधिकारी पराक्रमाचा इतिहास घडवत आहेत. म्हणूनच एनडीएला ‘नेतृत्त्व घडवणारा पाळणा’ म्हटले जाते. लहान वयात हे प्रशिक्षण झाल्याने पुढे लष्कर प्रमुखपदी पोहचण्यासाठी लागणारा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी जमा होऊन त्यापदी पोहचण्याची शक्यता वाढते.
महिलांच्या करियरच्या दृष्टीने लष्कराला पुढे त्यांना मातृत्त्व रजा, बालसंगोपन त्यासाठी नियम इत्यादींवर नवे धोरण राबवावे लागेल. अर्थातच, ते प्रगतीशील असेल यात शंका नाही.
थोडक्यात, प्राचीन इतिहासात होत्या तशा, भारताचे संरक्षण करणार्या नव-वीरांगना पुनः तयार होणार आहेत, याचे आपण स्वागतच केले पाहिजे .
लेखिका एकता मासिकाच्या संपादिका आहेत.