निरागस आनंदालय

विवेक मराठी    06-Jun-2025   
Total Views |
चहाच्या बागांमध्ये काम करणारी मंडळी म्हणजे या मळ्याचे, या हिरवाईचे खरेखुरे शिल्पकार. मात्र अनेक दशके ऊनपावसात काम करणारे हे कष्टकरी शिक्षण, सन्मानाचे आणि आरोग्यपूर्ण जीवन याचे खरे मानकरी. पण आजवर या सगळ्यापासून दूर राहिलेले. याच चहाच्या मळ्यात काम करणार्‍या मजुरांच्या या समाजात शिक्षणाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी 2003 सालापासून 83 आनंदालयाच्या माध्यमातून सुमारे 6500 मुलांसाठी काम चालू आहे.

vivek
सुमारे अर्ध्या दिवसाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो तेव्हा उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. मोठ्याशा हिरवळी पलीकडे बांबूच्या कुंपणात 18-20 लहान मुलं गोल करून उभी होती. आम्हाला बसायला खुर्च्या मांडल्या होत्या. पाच मिनिटांत तिथल्या एका ताईने सर्वांना पाणी दिले आणि तीसुद्धा त्या गोलात उभी राहिली. सर्वांनी हात जोडून त्रिवार ओंकार म्हटला आणि ‘भद्रं कर्णेभि: श्रृणुयाम देवा:’ ने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अतिशय ‘खरेखुरे सादरीकरण’ पाहायला मिळाले. कुठेच कृत्रिमपणा नव्हता. समंत्र सूर्यमनस्कार झाल्यावर सगळ्या गटाने आपापली नावं सांगितली.
 
 
‘हे प्रभू आनंददाता ज्ञान हमको दीजिये
 
शीघ्र सारे सद्गुणोंसे पूर्ण हमको किजिये’
 
या प्रार्थनेने त्या छोटेखानी सादरीकरणाचा समारोप झाला. प्रबोधिनीच्या मुलांनी काही प्रार्थना - पद्य म्हंटली आणि नंतर सर्वांचे एकत्रित खेळ सुरू झाले. खेळता खेळता धरलेले हात मैत्रीचे धागे होत एकमेकांशी अधिकच जुळले गेले. त्यानंतर भजन संध्या सुरू झाली आणि आसामी मराठी भजनांनी सारेजण अधिकच आनंदमय झाले. संध्याकाळचे एकत्र खेळ आणि एकत्रित भजन संध्या यामुळे रात्रीचे सहभोजन आणि घरोघरी केलेला निवास अर्थपूर्ण झाला.
 
 
चहा !! आसामचा कणा!!! या चहाच्या बागांमध्ये काम करणारी मंडळी म्हणजे या मळ्याचे खरेखुरे पालक! दूरदूरवर पसरलेल्या या हिरवाईचे शिल्पकार आणि तुम्हा-आम्हापर्यंत अमृततुल्य पोहोचविणारी अन्नपूर्णेची रूपे!!! अनेक दशके ऊनपावसात काम करणारे हे कष्टकरी शिक्षण, सन्मानाचे आणि आरोग्यपूर्ण जीवन याचे खरे मानकरी! पण आजवर या सगळ्यापासून दूर राहिलेले. पिढ्यानपिढ्या केवळ कष्ट करीत जगल्या.
 
 
‘या बांधवांच्या आर्त हृदयी, मेघसे ओसंडूनी’ असे आसामच्या पावसासारखे ओसंडून प्रेमाचे सिंचन केले ते विवेकानंद केंद्राच्या आनंदालय प्रकल्पाने. 2003 पासून मळ्यातील मजुरांच्या मुलांचे ‘क ख ग म्हणजेच कहानी खेल गाना’ या पद्धतीने शिक्षण सुरू केले. मळ्यात काम करणार्‍या मजुरांच्या या समाजात शिक्षणाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी 83 आनंदालयाच्या माध्यमातून सुमारे 6500 मुलांसाठी काम चालू आहे. दैनंदिन अडीच तासांच्या या शाळेत काम करणारे ‘कार्यकर्ता’ म्हणजे तरुण ताज्या दमाच्या उत्साहाचे झरे आहेत. हे कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे थोडे अनुभवी पण तरुण आचार्य म्हणजे आनंदालयाचे भक्कम आधार आहेत.
 
 
रात्रीच्या अंधारातून वाट शोधत या मुलांच्या घरी जाताना प्रकाशाचा ध्यास घेतलेल्या आनंदालय प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला मनोमन नमन केले. ‘पूर्ण हमको किजिये’ या प्रार्थनेमधल्या पूर्णत्व ही कल्पना मला अंतर्मुख करत गेली. पूर्णत्वाच्या स्वयंसाधनेसाठी अशा प्रकारच्या सेवाकार्यात सहभागी व्हायला हवे हा संकल्प अधिक पक्का झाला. प्रबोधिनीच्या कामात आपल्याला ती संधी मिळते आहे, याचे मनोमन समाधान वाटले. ज्ञानसेतू, नागरी वस्तीमधले काम किंवा मातृभूमी परिचय शिबिरे यांमधून होणार्‍या समाजदर्शनासाठी तुम्ही केव्हा जाताय?
 
लेखक ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे
केंद्र व्यवस्थापक आहेत.

आदित्य शिंदे

 ज्ञान प्रबोधिनीमध्ये १० वर्षांहून अधिक काळ पूर्ण वेळ कार्यकर्ता, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसासाठी अनेक विविध उपक्रमांचे आयोजन. ज्ञान प्रबोधिनीच्या पंचकोश आधारित गुरुकुलाचे गेली १० वर्षे नेतृत्व. पंचकोश आधारित विकसन आणि भारतीय ज्ञान परंपरा इत्यादी विषयांचे शासकीय, खाजगी स्तरावर मार्गदर्शक म्हणून कार्यरत.