संततीसाठी इच्छुक पालकांनी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक स्तरावरही स्वतःची तयारी करावी. त्यामध्ये - मानसिक शांतता, आहारशुद्धी, शरीरशुद्धी, योग्य आचरण असावे. सुप्रजनन ही प्रक्रिया केवळ संतती मिळवण्यासाठी नसून एक उत्तम समाज घडवण्यासाठी आवश्यक आहे - याचे आदर्श उदाहरण म्हणजे रामजन्म.
सोहर नावाचा एक लोकगीतांचा प्रकार आहे. घरात नवीन बाळाचा जन्म झाल्यावर, किंवा सातव्या महिन्यात ही मंगलगीते गायली जातात. या गीतांमध्ये संततीच्या जन्माच्या संदर्भातील कथा आणि बालकाच्या जन्माचा आनंद यांचे सुंदर वर्णन येते. रामजन्म आणि कृष्णजन्माच्या कथा अनेक सोहर गीतांमध्ये दिसतात. खालील गीत दशरथ आणि कौसल्या यांच्यातील संवाद आहे. राजा दशरथ निपुत्रिक असतानाचा हा संवाद आहे. कौसल्या प्रश्न करते आणि दशरथ उत्तर देतो -
कौसल्या - अमवा लगावे कौन फल मिलिये मोरे साहेब?
दशरथ - राही बाटे जौनो अमवा खईंये तब फल मिलिहै सुनहू।
कौसल्या - कुइंय्या बनावे कौन फल मिलिये मोरे साहेब?
दशरथ - प्यासा जब पानी पिवये तब फल मिलिहै सुनहू।
कौसल्या - तलैय्या खनावे कौन फल मिलिये मोरे साहेब?
दशरथ - गंय्या पिवे जोणो पनिया तब फल मिलिहै सुनहू ।
कौसल्या - पूत होवे तो कौन फल मिलिये मोरे साहेब?
दशरथ - दुनिया आनंद मनीये, दुनिया मंगल भणीये तब फल मिलेहै सुनहू ।
आंब्याचे झाड लावल्याने काय पुण्य मिळते? यावर दशरथ सांगतो - रस्त्याने जाणारा भुकेला माणूस जेव्हा त्या झाडाचे फळ खाऊन तृप्त होतो, तेव्हा झाड लावल्याचे पुण्य मिळते. विहीर बांधल्याचे पुण्य - तहानलेल्या माणसाने त्यातील पाणी प्याल्याने मिळते. तलाव खणल्याचे पुण्य त्या पाणवठ्यावर एखाद्या प्राण्याने, उदाहरणार्थ, गायीने आपली तहान भागवल्यावर मिळते. आणि पुत्र झाल्याचे पुण्य केव्हा मिळते? जेव्हा तो पुत्र जगाचे मंगल करतो, लोक त्याच्यामुळे आनंदी होतात, तेव्हा माता पित्याला पुत्र झाल्याचे पुण्य मिळते.
सद्गुणी संतती झाली तरच बाळ जन्माला घालण्याचे आणि वाढवण्याचे कष्ट घेतल्याचे पुण्य मिळते. अशा पुत्राने केवळ आई-वडिलांनाच नाही समाजाला पण आनंद मिळतो. हे श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, संतसाहित्य आणि लोकगीतांमधून बिंबवले गेले आहे. ही रामायणातील कथा पाहा -
आता अयोध्येचा राजा दशरथ, सामर्थ्यवान, धर्मशील आणि प्रजाप्रिय होता. परंतु त्याला संतती नसल्याने तो सारखा दु:खी असे. एके दिवशी संततीप्राप्तीच्या विचारात असताना त्याच्या मनात आले, उत्तम आणि पराक्रमी पुत्र व्हावा, यासाठी मी अश्वमेध यज्ञ करेन. राजाने आपल्या राण्यांना बोलावून आपल्या मनातील विचार सांगितला. ते ऐकताच कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा आनंदित झाल्या! राजा म्हणाला, ”आता आपण चौघेपण या यज्ञासाठी व्रत धारण करूया.”
त्यावर राजाने आपले पुरोहित आणि मंत्री यांचा सल्ला घेतला. आणि त्यानुसार दशरथाने अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर पुत्रकामेष्टी यज्ञपण करायचे योजले. त्या यज्ञासाठी राजाने स्वत: अंग देशात जाऊन ऋष्यशृंग ऋषी आणि त्यांची पत्नी शांता यांना आमंत्रण दिले. पुत्रप्राप्तीसाठी विशेष असा पुत्रकामेष्टी यज्ञ केला गेला. याचा उद्देश स्पष्ट होता - पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि प्रजेचे रक्षण करणारा, शत्रूचा नाश करणारा पुत्र व्हावा.
यज्ञाचे वेळी विविध औषधी वनस्पतींची आहुती देण्यात आली. त्यावर यज्ञकुंडातून एक विलक्षण तेजस्वी यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याच्या हातात एका सुवर्णपात्रात देवांनी सिद्ध केलेले ‘पायस’ होते. औषध होते म्हणूया. त्या यज्ञपुरुषाने दशरथाला म्हटले, ”हे राजा, प्रजापतीने मला इथे पाठवले आहे. हे संतानवृद्धी करणारे दिव्य पायस आहे. हे तुझ्या राण्यांना दे.”
राजा दशरथाने श्रद्धेने तो प्रसाद स्वीकारला आणि आपल्या राण्यांना दिला. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांनी तो प्रसाद आदराने घेतला आणि आनंदाने ग्रहण केला. काही काळाने त्या तिघी गर्भवती राहिल्या. यज्ञाला एक वर्ष झाल्यानंतर, कौसल्येच्या पोटी रामाचा जन्म झाला. त्यावर पाठोपाठ कैकेयीने भरताला, आणि सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्नाला जन्म दिला.
या कथेतून कैक गोष्टी कळतात, जसे - संतती जन्माच्या आधी पालकांची मानसिक आणि शारीरिक शुद्धता आवश्यक आहे. रामाच्या जन्माच्या आधी, एक वर्षभर पालकांनी व्रत धारण केले होते. व्रत म्हणजे शिस्त. अमुक वेळेत उठणे, ठरलेल्या वेळेला खाणे. ठरावीक पदार्थ खाणे. काही पदार्थ न खाणे. अमुक इतक्या प्रमाणात खाणे. गादीवर न झोपणे. दुपारी न झोपणे अशा प्रकारचे नेम यज्ञ करणार्या यजमानांच्या व्रताचा भाग असतात. ते नेम दशरथ आणि कौसल्या यांनी अंगिकारले होते. तसेच संततीसाठी इच्छुक पालकांनी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक स्तरावरही स्वतःची तयारी करावी. त्यामध्ये - मानसिक शांतता, आहारशुद्धी, शरीरशुद्धी, योग्य आचरण असावे. सुप्रजनन ही प्रक्रिया केवळ संतती मिळवण्यासाठी नसून एक उत्तम समाज घडवण्यासाठी आवश्यक आहे - याचे आदर्श उदाहरण म्हणजे रामजन्म.
संत तुकाराम महाराज म्हणतात - ”शुद्ध बिजापोटी । फळे रसाळ गोमटी ॥” सुदृढ आणि सद्गुणी संतती निपजावी अशी इच्छा असेल तर त्याची तयारी पालकांनी बाळाच्या जन्माच्या आधीपासून घेणे आवश्यक आहे. ही तयारी बाळाला चांगले जीवन मिळावे, आईवडिलांना सुख मिळावे, आणि समाजाचे मंगल व्हावे यासाठी आवश्यक आहे.
सुप्रजनन म्हणजे उत्तम संतान प्राप्त होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न. बाभळी, कोरांटी प्रयत्नाशिवाय कुठेही उगवतील, पण आंबा किंवा द्राक्ष लावायचे असेल तर त्यासाठी आधी जमिनीची मशागत करण्याचे कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट म्हणजेच - व्रत आणि नियम. आता आपला आधुनिक काळातील रजनीकांत, चांगल्या संततीसाठी कोणते व्रत घेणार आहे ते पाहूया ...
रजनीकांत आणि रोहिणी पालक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डॉ. मीरा यांच्या दवाखान्यात आले.
”डॉक्टर, आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली, आता आम्हा दोघांनाही बाळ हवे आहे असे वाटत आहे. नवीन बाळाचे स्वागत करायचे तर त्यासाठी आधी आम्ही काय तयारी करावी, हे जाणून घेण्यासाठी इथे आलो आहोत. ” रोहिणीने येण्याचे कारण सांगितले.
डॉ. मीरा म्हणाल्या, ”तुम्ही अतिशय योग्य वेळी, वैद्यकीय सल्ला घेण्याचा विचार केल्याबद्दल आधी तुमचे अभिनंदन. गर्भधारणेची तयारी म्हणजे शरीर आणि मन यांची काळजी घेणं. शरीराची काळजी म्हणजे - संतुलित आहार आणि नियमित व्यायाम. या धरायच्या गोष्टी झाल्या. काही सोडायच्या गोष्टी आहेत जसे - जास्तीचे वजन, धूम्रपान आणि मद्यपान. त्याशिवाय नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरात तणाव कमी राहील हे अवश्य पाहावे. कामाच्या ठिकाणी काही हानीकारक रसायने आहेत का, हे जरूर तपासावे.”
वैद्यकीय तपासणीचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या, ”सध्याचे काही त्रास असतील, आजार असतील तर त्यावर त्वरित उपचार घ्या. जसे - दातांची तपासणी करून घेणे, लसीकरण राहिले असेल तर ते घेणे, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स जरूर असतील तर ते सुरू करणे. तुम्हा दोघांना मागे झालेले आजार अथवा कुटुंबातील आनुवांशिक आजार असतील तर त्यांची नोंद करून त्याबद्दल डॉक्टरांना सांगून आधीच काही उपचारांची गरज असेल तर पाहाणे.”
रजनीकांतने विचारलं, ”डॉक्टर, आतापासून योग आणि ध्यान केले तर काही उपयोग होतो का?”
डॉ. मीरा म्हणाल्या, ”नक्कीच. ध्यान केल्याने झोप सुधारते, मानसिक शांतता मिळते आणि तणाव कमी होतो. याचा थेट प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे गर्भार राहण्याची शक्यता वाढते.”
रजनीकांत आणि रोहिणी यांची पालकत्वाच्या प्रवासाची तयारी सुरू झाली होती ...