रा. स्व. संघाचे स्वयंंसेवक, शास्त्रज्ञ सुधाकरराव असोलकर यांचे 26 मे 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन संपूर्ण परिवाराचा त्यांनी नावलौकीक केला. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा लेख..
सुधाकर असोलकर उर्फ बाळ असोलकर यांचा जन्म 1 मार्च 1938 रोजी लक्ष्मीबाई विश्वनाथभाऊ असोलकर यांच्या पोटी झाला. त्यांना दोन वडीलबंधू व दोन वडीलबहिणी होत्या. त्यांचे दोन्ही भाऊ रा. स्व. संघाचे तृतीय वर्ष शिक्षित कार्यकर्ते होते. ते स्वतः बालपणापासूनच संघाशी जोडले गेले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. बाळने उच्चशिक्षित व्हावे ही वडीलबंधू नारायणराव यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना जवळच असलेल्या देऊळगाव राजा येथील नामांकित शाळेत प्रवेश दिला. त्यांना प्रथम सत्र परीक्षेत इंग्रजी व गणित या विषयांत खूप कमी गुण मिळाले. त्यामुळे बाळला खडसावून सांगितले, ‘चांगले गुण मिळाले नाहीत तर घरी येऊन गुरेढोरे सांभाळावी लागतील.’
पुढे त्यांनी देऊळगाव राजा येथे इंग्रजी, गणित विषयाची शिकवणी घेणार्या शिक्षकाकडे जाऊन आपली शिकवणी घ्यावी, असे म्हटले. तुला शिकवणी लावायची असेल तर दर महिन्याला 4 रु. द्यावे लागतील असे त्या शिक्षकांनी सांगितले. परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे हा खर्च मला परवडणार नाही, असे बाळने सरांना सांगितले. त्या बदल्यात तुमच्या गाईचा चारा-पाणी मी रोज सकाळ-संध्याकाळ करेन, हे सांगितल्यावर सरांनी ते मान्य केले व बाळची शिकवणी सुरू झाली. त्यांची शिकण्याची जिद्द, अभ्यासाबद्दलची धडपड यामुळे ते शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सिंदखेड राजा येथील त्यांचे बालपणीचे मित्र स्व. वसंतराव सराफ यांच्या आग्रहामुळे त्यांनी 9 वी व 10वी साठी मे. ए. सो., मेहकर या नामांकित शाळेत प्रवेश घेतला. दहावी परीक्षेत त्या काळात बोर्डात मेरिटमध्ये उत्तीर्ण झाले. सिंदखेड राजाला आल्यावर त्यांना पुढे काय? हा प्रश्न पडला. तेव्हा गावातील काही सुशिक्षित मंडळीच्या म्हणण्यानुसार ते छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना कळले की, मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था आहे. ते प्राचार्यांना भेटले व आपली आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली. वसतिगृहाच्या सर्व नियमांचे मी पालन करेन आपण फक्त मला वसतिगृहात प्रवेश द्यावा ही विनंती केली. प्राचार्यांनी त्यांची विनंती मान्य केली व त्यांना वसतिगृहात प्रवेश दिला. हे कॉलेज व वसतिगृह पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्याद्वारे चालविले जाते. या सोसायटीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. ते अधूनमधून वसतिगृहात येत असत व विद्यार्थ्यांना भेटत असत. एकदा वसतिगृहात बाबासाहेब आले असता एका खोलीमध्ये सुधाकर असोलकर त्यांना अभ्यास करताना दिसले. त्यांनी त्याला नाव विचारले असता, ‘तू तर मागासवर्गीय वाटत नाहीस तर मग तू येथे कसा काय?’ असा प्रश्न विचारला.. त्यावेळी त्यांनी मला खूप शिकायचे आहे, असे सांगितले. त्यांची शिक्षणाबद्दलची निष्ठा बघून बाबासाहेबांनी त्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली. एवढेच नाही तर, त्यांच्या पाठीवरून हात फिरवून वाचनालयातून अभ्यासाची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्रंथपालांना सूचना केली. तेथून बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी देवगिरी महाविद्यालयातून एम. एस्सी. (रसायन) केले. त्यावेळच्या उस्मानिया विद्यापीठाचे ते सुवर्णपदक विजेते ठरले. ते स्वतः तर शिकलेच त्याचबरोबर चार पुतणे व तीन भाच्यांना स्वत: बरोबर घेऊन उच्चशिक्षित केले.
देवगिरी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केली. त्यानंतर मुंबई येथे भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, तारापूर येथे शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाले. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन संपूर्ण परिवाराचे नाव मोठे केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडं असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव संदीप असोलकर हे हिंदी विवेकच्या मार्गदर्शक मंडळावर आहेत आणि सा. विवेकचे हितचिंतक आहेत.
- अरविंद असोलकर