भूलोकीचे वैकुंठ

विवेक मराठी    07-Jun-2025   
Total Views |
Divya Desam
वेगवेगळ्या साम्राज्यांनी श्रीरंगममंदिरनिर्मितीमध्ये भर घातली आहे. हे मंदिर ‘धर्मावर्मा’ या चोळ राजाने बांधले अशी कथा सांगितली जाते. ही चोळ राजांची प्राचीन पिढी होती. हा पेरूमाळचा विग्रह अनेक वर्ष अयोध्येच्या ’ईक्ष्वाकु’ वंशाकडे होता. मग हा विग्रह श्रीरंगम्ला कसा बरं आला? हे आपण या लेखात पाहूयात.
मागच्या भागात आपण श्रीरंगमविषयी जाणून घेतले. श्रीरंगमला जाणे आणि श्रीरंगाच्या चरणी लीन होणे हे प्रत्येक दाक्षिणात्य वैष्णवाचे स्वप्न असते. वैष्णवांच्या या मंदिराविषयी प्रचंड आपुलकी आणि भक्तीमय भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे मानबिंदू आहे. खरंतर या मंदिरावर लिहायचं म्हणजे एक भलामोठा खंडच तयार होईल.
आम्ही ज्यावेळी वैकुंठ एकादशीला मंदिरात गेलो होतो त्यावेळी मंदिरातील उत्सवमूर्तीची मिरवणूक पाहिली होती. ही उत्सवमूर्ती नयनरम्य व अफलातून सुंदर आहे. या उत्सवमूर्तीला ’नम्म पेरूमाळ’ म्हणजे ’माझा पेरूमाळ’ म्हणतात. या दिवशी नम्म पेरूमाळाचे दर्शन घेण्याला अपार महत्त्व आहे. दक्षिणेच्या मंदिरात नेहमीच मुख्य मूर्ती म्हणजेच मूलवरम व त्या मूर्तीची वेगळी उत्सवमूर्ती असते. त्याशिवाय इतर मूर्तींच्याही उत्सवममूर्ती असतात. मूळ मूर्ती नेहमीच अचल असते. मात्र मंदिरात उत्सव साजरे करताना उत्सवमूर्तीची मिरवणूक काढली जाते, मूर्तीला नौकानयन घडवले जाते. भगवंताचे नुसते लाड केले जातात.
 
 
श्रीरंगनाथाच्या मंदिरात असंख्य मूर्ती व त्यांच्या उत्सवमूर्ती आहेत. आमच्या पहिल्या भेटीत नम्म पेरुमाळचे दर्शन झाले तरी मूलवरमचे दर्शन न झाल्याने मन खट्टू झाले होते. हीच ओढ मला परत मंदिरात घेऊन आली. माझ्या दुसर्‍या भेटीत मंदिरात प्रवेश केल्यावर एक वेगळाच उत्साह माझ्या मनी दाटून आला. गर्दीतून वाट काढत जशी मी गर्भगृहाजवळ पोहोचले तसं मला शयन अवस्थेतील श्रीरंगाचे दर्शन झाले. अनिमिष नेत्रांनी मी श्रीरंगाकडे पाहात होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण इतके दिवस मी माझ्या या इष्टदेवतेच्या दर्शनाचा ध्यास घेतला होता. जणू काही एक माणूसच पहुडला आहे असं मला मूर्तीकडे पाहून वाटत होते. एका फार फार मोठ्या देवस्थानाचे दर्शन झाले होते. गर्भगृहासमोर श्रीविष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची भव्य मूर्ती होती. पेरूमाळच्या दर्शनानंतर आम्हांला लक्ष्मीदेवीचे दर्शन घ्यायचे होते. श्रीरंगनाथाच्या लक्ष्मीचे किंवा थायरचे नाव आहे, ’श्रीरंगनायकी नच्चियार’. तिचे मंदिर शोधताना, मूळ मंदिराचा प्रचंड विस्तार अनुभवायला मिळाला. श्रीरंगनायकीची अप्रतिम मूर्ती काळजाचा ठोका चुकवणारी होती. आता मला अजून एक महत्त्वाचे स्थान बघायचे होते. मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे मी आदिशेषाचे अवतार असणार्‍या ’श्रीरामानुजाचार्यांचे’ दर्शन घेतले. खरोखरच, हे एक महत् आश्चर्य आहे. ज्यावेळेस मला हे समजले होते की, श्रीरामानुजाचार्यांचे पद्मासन घातलेले पार्थिव गेली नऊशे वर्ष मंदिरात जपून ठेवलेय तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. त्यांच्या पवित्र दर्शनाने मनात जे काही तरंग उमटले ते मी लिहूच शकत नाही. मंदिर अनुभवताना मी सतत मंदिराची पौराणिक पार्श्वभूमी आणि आधुनिक काळातील इतिहास आठवत होते.
 
Divya Desam  
या मंदिराची पौराणिक कहाणी अशी आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ब्रह्मदेव एका महाविष्णूच्या विग्रहाची पूजा करत होते. हा विग्रह प्रत्यक्ष महाविष्णूंनीच ब्रह्माला दिला होता. म्हणूनच हा विग्रह स्वयंभू आहे. त्यासाठी ब्रह्माने एक हजार वर्षे क्षीरसागराजवळ तपश्चर्या केली होती. ब्रह्माने या विग्रहाचे सत्ययुगात मंदिर बांधले होते व मंदिर अर्चकाचा मान प्रत्यक्ष सूर्याला दिला होता. सूर्याकडून तो त्याच्या मुलाकडे वैवस्वत मनूकडे व मनूकडून तो मान त्याच्या मुलाकडे इक्ष्वाकूकडे आला. या इक्ष्वाकूचे राज्य पृथ्वीवर अयोध्येला होते. पुढे इक्ष्वाकूच्या लक्षात आले की, जशी युगे उलटतील तसे पृथ्वीतलावरील मनुष्याचे आयुर्मान कमी होईल. त्यासाठी त्याने सत्यलोकात हजार वर्षे तपश्चर्या केली. पुढे इक्ष्वाकूला ब्रह्माच्या निद्राकाळात विग्रह अयोध्येला नेण्याचा वर मिळाला. कारण ब्रह्माच्या निद्राकाळात पृथ्वीवर युग-कल्प-मन्वंतरे होऊन जातात. याच इक्ष्वाकू वंशात दिलीप, अंशुमन, भगीरथ, दशरथ इत्यादी राजांनी पिढ्यानपिढ्या या विग्रहाची पूजा केली. याच घराण्यात पुढे श्रीरामाचा जन्म झाला. लंकेच्या युद्धानंतर सीतेला घेऊन जेव्हा श्रीराम, लक्ष्मण व हनुमानासह अयोध्येला पोहोचले त्यावेळी त्यांच्याबरोबर विभीषण सुद्धा होता. लंकेला परत जाताना विभीषणाने श्रीरामाकडे आठवण म्हणून आणि पूजेसाठी त्यांची मूर्ती मागितली. त्यावेळी प्रत्यक्ष श्रीरामाने हा महाविष्णूचा विग्रह विभीषणाला दिला. हा विग्रह लंकेला घेऊन जाताना खाली कुठेही ठेवायचा नाही ही अट होती. मात्र दैवगती काही निराळीच होती. एक असूर, पेरूमाळचा इतका महत्त्वाचा विग्रह स्वतःच्या राज्यात लंकेला घेऊन जाणार हे इतर देवांना सहन होत नव्हते.
 
Divya Desam
 
त्यासाठी सर्व देवांनी मिळून एक योजना आखली. विभीषण जेव्हा श्रीरंगममधे आले तेव्हा योजनेप्रमाणे गणपतीने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि युक्तीने विभीषणाकडून तो विग्रह हस्तगत केला व जमिनीवर ठेवला. अशाप्रकारे तो विग्रह तिथेच स्थिर झाला. तशी विभीषणाला जाणीव झाली की, प्रत्यक्ष श्रीरंगनाथस्वामींनाच श्रीरंगम इथे वसायचे होते. हीच नियती होती. तरीही राग सहन न झाल्याने विभीषणाने गणपतीच्या डोक्यावर वार केला व तिथे त्याला खोक पडली. ही गणपतीची मूर्ती ’उच्चि पिल्लयार’ या नावाने ओळखली जाते. तिरूचिरापल्लीला एक गणपतीच्या आकाराची खडकसदृश्य टेकडी दिसते. तिथे ही मूर्ती स्थित आहे. जगातील काही अतिपुरातन रॉक फॉरमेशन्समधील ही एक टेकडी आहे. इथल्या खडकाचे वय हिमालयापेक्षाही जास्त म्हणजे 3.8 बिलियन वर्षांपेक्षा जास्त आहे.
 
गोकर्ण महाबळेश्वरच्या आत्मलिंगाची व गणपती मंदिराचीही अशीच कहाणी सांगितली जाते. श्रीरंगनाथस्वामींचा विग्रह श्रीरंगमला ठेवल्यावर विभीषणाला साक्षात्कार झाला की, लंकेच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूर्तीचे मुख असावे. ज्याद्वारे विभीषणाला सतत श्रीरंगाचे आशीर्वाद मिळतील. म्हणूनच या मंदिरात दक्षिण दिशेला महत्त्व आहे. विभीषण हा सप्तचिरंजीवांपैकी एक आहे अशी लोकश्रुती आहे. त्यामुळे असं म्हणतात की विभीषण नेहमीच श्रीरंगमला, श्रीरंगनाथाच्या दर्शनासाठी येतो. विभीषणाने हा विग्रह धर्मवर्मा या चोळ राजाकडे सुपूर्त केला अशी कथा सांगितली जाते. इथे मंदिराजवळ एक चंद्र पुष्करणी आहे. या पुष्करणीजवळ धर्मवर्माने श्रीरंगनाथस्वामींची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी कित्येक वर्षे तप केले होते. याच तपाचे फळ म्हणून हा विग्रह धर्मावर्माकडे विभीषणाकडून सुपूर्त झाला.
 
या संदर्भात अजून एक कथा अशी आहे की, विभीषण श्रीरंगाचा विग्रह एका सोन्याच्या विमानातून लंकेत नेत होता. मंदिरशास्त्रात विमान म्हणजे मंदिराच्या गर्भगृहावर असणारी रचना. त्यामुळे विग्रह श्रीरंगमच्या भूमीवर विमानासहित स्थिर झाला. आजही हे सोन्याचे विमान आपल्याला श्रीरंगनाथ गर्भगृहाच्या छतावर पाहायला मिळते. या विमानाचे अनोखे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याची रचना आणि विमानाची प्राचीनता.
 
श्रीरंगनाथ विग्रहासारखीच विमानाची कथा आहे. हे विमान सत्ययुगात क्षीरसागरातून ब्रह्माला प्राप्त झाले. विग्रहाबरोबरच हे विमानसुद्धा इक्ष्वाकू वंशात गेले. या विमानाला ’प्रणवाकार विमानम्’ असेही म्हणतात. विमानाचे एका बाजूचे नऊ कलश नवग्रह, दुसर्‍या बाजूचे चार कलश चार वेद तर तिसर्‍या बाजूचे पाच कलश पंचमहाभूते दर्शवतात. विमानाच्या वरच्या बाजूच्या फुलांच्या पाकळ्या अठरा पुराणे दर्शवतात. त्याखालच्या गोलाकार संरचना एकशे आठ उपनिषदे दर्शवतात. विमानाच्या चारही बाजूंना चार महाविष्णुची रूपे आहेत. दक्षिणेला वासुदेव, पूर्वेला गोविंदा, उत्तरेला अनंत तर पश्चिमेला अच्युत.
 
मंदिराचे सात प्रकार म्हणजेच सात विभाग हे जशी मंदिरात भर पडली तसे वाढत गेले. हे प्रकार अनुक्रमे धर्मावर्मा, राजमहेंद्र, कुळशेखर आळ्वार, थिरूमंगई आळ्वार यांनी बांधले. यावरून आपल्याला समजू शकते की, मूळ गर्भगृह आणि प्रकार किती पुरातन आहेत. हे प्रकार सत्यलोक, तपोलोक, जनलोक, मर्हिलोक, स्वर्गलोक, भूवरलोक आणि भूलोक या नावांनी ओळखले जातात. मंदिरात फिरताना प्राचीन इतिहास आपल्याला आठवत रहातो, जाणीव करून देतो, कारण हे मंदिर उणंपुरं इतिहासात डुंबलेलं आहे. इथे प्राचीनता आपल्याला कित्येक शतकांच्या हिशोबाने तोलावी लागते. कितीतरी शतके मंदिरात पूजाअर्चा चालतेय. दुर्दैवाने भारतदेशातील जनतेला, मंदिरांना सुलतानी अत्याचाराच्या वरवंट्याचा अत्यंत भयानक त्रास भोगावा लागला आहे. श्रीरंगनाथाचे मंदिरही परकीय आक्रमकांच्या कचाट्यातून सुटले नाही. यापुढच्या भागात आपण हा इतिहास तसेच मंदिरात वेळोवेळी जे उत्सव साजरे होतात, त्याविषयी जाणून घेऊया.
 
 

अनुष्का आशिष

 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंगमधे शिक्षण झाले असून, IT क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्र व साप्ताहिकात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहेत. प्रवासाची अतिशय आवड व त्यासंबंधित लेखन. देशभरातील प्राचीन मंदिरे पाहण्याची व त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे.