आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ''विचार-चरित्र'' हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित 'गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
शीर्षकापासूनच आपल्याला प्रश्न पडतो, जसे कळले तसे म्हणजे काय? पुस्तक वाचत गेलो की या ’जसे-तसे’चा अर्थ उमगत जातो. लेखक स्वतः संघकार्यकर्ता आहेत. पद्मश्री गिरीश प्रभुणेंच्या कार्यात विवेक साप्ताहिकाचा कामाचा भाग म्हणून प्रत्यक्ष जाऊन, ते कार्य अनुभवलेले आहेत. लहानमोठ्या बैठकांमधील सहभाग, यमगरवाडी प्रकल्पाच्या देणगी-पावत्या लिहिणे ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रभुणे यांची मुलाखत घेणे इथपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे लेखकाने गिरीश प्रभुणेंना जवळून पाहिले आहे. पंचवीस वर्षे एखाद्या सेवाभावी, कलंदर व्यक्तित्वाला न्याहाळल्यानंतर, गिरीशकाकांच्या ’जीवनदर्शनाची’ मांडणी लेखक रवींद्र गोळे या पुस्तकात करतात.
गिरीशजींनी पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनात ज्या कार्याचा पाया घातला, जी कामे उभी केली, कार्यकर्त्यांची जडणघडण केली, तळमळीने लेखन केले, स्मारक निर्माण केले, प्रकल्प रचले त्यामागे असलेली प्रेरणा, विचार, ध्येयासक्ती, प्रतिकूलतेतही पाय रोवून उभे राहण्याची हिंमत, त्यासाठी जोपासलेली जीवनमूल्ये या व्यक्तित्वाच्या अंतरंगातील बाबींचा मागोवा घेत हे जीवनदर्शन सांगणारे विचारचरित्र आहे!!
या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर लक्षात येते की, एक एक भाग एखाद्या व्यक्तीचे जीवन व्यापून टाकू शकतो, जो प्रभुणेकाका जगले आहेत आणि जगत आहेत! जिथे जुगार, दारूची भट्टी सुरू होती त्या क्रांतिवीर चापेकरांच्या वाड्याला क्रांतितीर्थ करणे हे एक अवघड शिवधनुष्य होते! खरे तर समाजातून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा होता पण, या उर्जाकेंद्राला जुगार अड्डयात रूपांतरित होतांना समाजपुरुष डोळे बंद करून बसला होता. आज चापेकर वाड्यात चालणारे उपक्रम पाहिले तर लक्षात येते की, इतिहास घडतो म्हणजे नेमके काय होते!! भगिनी निवेदिता यांनी असे स्मारक उभे राहावे हे वाक्य म्हटले होते ते चरितार्थ करण्यासाठी गिरीश प्रभुणे आणि मित्रमंडळी जिवाच्या कराराने झटली आणि आज ते क्रांतितीर्थ उभे राहिले.
विवाहानंतर पहिले मूल जन्माला आले त्यावेळी ’असिधारा’ नियतकालिकाचा आतबट्ट्याचा उपक्रम प्रभुणेकाका राबवित होते. पण असिधारामुळे झालेले कर्ज पाहून ’माणूस’च्या माजगावकरांनी काकांना आपल्याकडे बोलावले आणि काकांच्या जीवनातील ’ग्रामायन’ या नव्या पर्वाची सुरुवात झाली. सर्व विचारधारांचे कार्यकर्ते ही लोकचळवळ चालवीत होते. एका विशेषांकाच्या निमित्ताने प्रभुणेंच्या जीवनात ग्रामायन आले आणि नंतर ते या प्रकल्पात एकरूप होऊन गेले! खेड्याकडे चला ही हाक घालणे सोपे असते, पण प्रत्यक्षात महानगरीय झोपडपट्टीमध्ये गेलेला गावखेड्यातील माणूस तिथे राहून, संपर्क साधून परत आणायचा हे असिधारा व्रत या कर्मयोग्याने सुफळ केले. लेखकाने एका मुलाखतीच्या वेळी हा वृत्तांत जाणून घेतला आणि अक्षरबद्ध केला, ज्यामुळे एक संघकार्यकर्ता कोणत्याही क्षेत्रात ध्येयरूप जीवन कसे जगतो याची जाणीव होते.
गिरीश प्रभुणेंच्या जीवनातील एक मोठा वाटा पारधी समाजाने व्यापला आहे! इंग्रजांनी ज्यांच्यावर गुन्हेगारी जमात म्हणून ठपका ठेवला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील त्याच चुकीच्या संबोधनाचा वापर करत आजही ज्या समाजाला सातत्याने वेठीला धरले जाते, अशा समाजात जाऊन त्यांच्या चालीरीती समजून घेऊन, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे हे शिवधनुष्य गिरीशजी आणि त्यांच्या सहकार्यांनी उचलायचे ठरवले.
हे पारधी किंवा फासेपारधी, मूळचे कोण, याचा शोध प्रभुणेकाकांनी कसा घेतला. त्यांची भाषा, चालीरीती, दंतकथा, पोवाडे सगळ्यांचा अभ्यास असातसा लायब्ररीत बसून नाही, तर त्यांच्या सोबतीने पालांवर राहून, वस्त्यांत राहून कसा केला हे लेखकाने स्वतः पाहिले आहे. ही राजस्थान मारवाड भागातील लढवय्यी जमात, प्रत्येक विदेशी आक्रमकांशी झुंज देणारी, वनांमध्ये, दर्याखोर्यांत राहून निसर्गस्नेही जीवनशैली जगणारी, निसर्गासारखेच कायदेकानून मानणारी, जातपंचायतीच्या चौकटीत राहून जीवन जगण्यात धन्यता मानणारी.
इंग्रजांनी वनांवर सरकारी हक्क प्रस्थापित केले, आणि यांचे उदरनिर्वाहाचे साधन हरवले. नंतर यांना गुन्हेगारी जमात ठरवून कुंपणात ठेवले गेले, न केलेल्या अपराधासाठी बडवण्यात आले. यांना स्वतःचं गाव नाही, भटकत फिरणं नशिबात आणि त्यात सरकारी रोष!
लेखक म्हणतात, एकेकाळचा स्वातंत्र्यप्रिय पारधी समाज त्याची नी समाजाची घट्ट वीण. त्यांच्या जातपंचायती, त्यातली न्यायदानाची पद्धत, दिलेल्या न्यायाची कठोर अंमलबजावणी, न्याय देणार्या पंचांची स्मरणशक्ती, परंपरेने चालत आलेल्या न्याय निवाड्याच्या गोष्टी सारंच अद्भुत!
पण असा हा स्वातंत्र्यप्रिय, स्वतःचे अस्तित्व असणारा समाज आज मारहाण, दरोडेखोरी, सूडचक्र, हत्या आणि पोलिसांचे अत्याचार अशा वावटळीमध्ये सापडलेला आहे! यांना प्रवाहात आणायचे म्हणजे नेमके कसे? पोटभर अन्न आणि अंगभर कपडा नाही. जगण्यासाठी सतत झगडा सुरू आहे. अशा भटके-विमुक्त समाजाला एकत्रित बांधून, त्यांच्या जुन्या अस्मितेच्या आठवणी कश्या करून द्यायच्या? त्यातही पारधी समाज हा आणखीच वेगळा! बाकीचे समाज त्यामानाने थोडेतरी गावाशी जोडलेले.नाही म्हणायला फासेपारधी लोक शेताची राखण करायचे कंत्राट धान्याच्या बदल्यात घेत असत. पण इतर जमाती जसे कंजारभाट, वडार, गोंधळी, गोसावी, बहुरूपी, कोल्हाटी, डोंबारी, कैकाडी, वंजारी, धनगर यांच्यापेक्षा फासेपारधी हा खूपच वेगळा आणि जास्त जटिल समस्या असलेला समाज आहे. या समाजाशी प्रभुणेकाका कसे एकरूप होत गेले याची दीर्घ कहाणी लेखक ’ऐसा पारध्याचा संग’ या प्रकरणात मांडतात.
नंतरच्या काळात सुरू झालेल्या यमगरवाडी प्रकल्पात प्रभुणेकाकांनी स्वतःला वाहून घेतले. लेखकाचे देणगीदारांच्या निमित्ताने आणि पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने या प्रकल्पावर सातत्याने येणेजाणे झाले. ओसाड माळरानाचे पुण्यक्षेत्र कसे झाले याची अद्भुत कथा म्हणजे मु. पो. यमगरवाडी हे प्रकरण आहे.
चळवळ म्हटली की त्यात संघर्ष, विद्रोह आणि आक्रमकता असायला हवी अशी सर्वसामान्य लोकांची कल्पना असते. व्यवस्था परिवर्तन घडवतांना केवळ नकारात्मक विचार करावा लागतो असे नसते तर त्यात समन्वयाचे सूर छेडता येतात, भावजागृती करता येते, सहवेदना ठेऊन बदल घडवता येतात, हे गिरीशजींच्या सारखी शाश्वत सनातन विचार जगणारी माणसे आपल्या कार्यातून पटवून देतात.
संघाच्या कार्याचे हे वेगळेपण आहे. समन्वयाने नम्रपणाने विद्रोहाला शमवू याहे त्यातील सूत्र आहे. कारण काही मोडूनतोडून व्यवस्था परिवर्तन होत नसते, तर ते बांधून-घडवून होते यावर संघाचा विश्वास आहे. संघाच्या कामाचे मर्म गिरीशजींच्या जीवनात उतरले आहे. कोणत्याही विषयावर समाजाचे विघटन होऊ नये. हिंदू समाजातील दोष आंदोलनाने नाही तर मतपरिवर्तन आणि सर्व घटक एकत्र आल्याने कमी होतील. प्रेमाचे वातावरण निर्माण होईल यावर संघाचा भर असतो. संघाच्या प्रकल्पाचेही असेच वैशिष्ट्य सांगता येईल. संघप्रकल्प व्यक्तिकेंद्रित नसतो. विशिष्ट कुटुंबाच्या नावाने तो ओळखला जात नाही. त्यामुळे असे प्रकल्प समाजाचे होऊन जातात.
पद्मश्री गिरीश प्रभुणेंचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे, त्यांची विचार करण्याची, चळवळ चालवण्याची पद्धत कशी आहे, विविध प्रकारच्या कामात, प्रकल्पात ते संघाची मौलिक विचारधारा कशी गुंफतात याचा शोध लेखक या पुस्तकात घेतात.
रवींद्र गोळे यांनी भटके-विमुक्त जनजातीच्या महिलांवर लिहिलेले आयाबाया हे पुस्तक प्रभुणे काकांना वाचायला दिले.त्यावरील त्यांची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता होती. काही महिन्यांनंतर एका ठिकाणी लेखकाच्या उपस्थितीत प्रभुणे काका म्हणाले, आमचं काम समजून घ्यायचे असेल तर यांचे आयाबाया हे पुस्तक वाचा! शाबासकी देण्याची ही अनोखी पद्धत भारावून टाकणारी ठरली.
चिंचवडला चप्पल शिवणार्या आजोबांना मुलांच्या हाती रोजची पोळीभाजी देणे असो की, उपोषणाला बसलेल्या बांधवांकडे जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून चालत जाणे असो, रोजच्या जीवनात स्वाभाविकपणे उतरलेली ही संवेदनशीलता लेखक टिपत जातात आणि आपण पानापानावर थबकत जातो.
सांख्य दर्शनात नीति दुरे नीति समिपे असे वर्णन केलेल्या प्रकृती सारखे लेखक हे जीवनदर्शन आपल्यापुढे मांडतात. संघबीजे अशीच रुजत असतात!! पुस्तकात शेवटी लेखक म्हणतात की, कळले कळले म्हणतांना काका सर्वार्थाने उमगत नाहीत. जीवन प्रवास, चरित्र कदाचित शब्दांत बांधता येऊ शकते, परंतु अशा दुर्दम्य व्यक्तीचे विचार चरित्र कितीही लिहिले तरी दशांगुळे उरणारच!!