ऋषिपरंपरेचे वाहक नवसुदादा

11 Jul 2025 18:25:08
@महेश काळे
 
vivek 
संघविचारांची स्पष्टता हे नवसुदादांचे आगळे असे वैशिष्ट्य. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या विचारात आणि कृतीतदेखील स्पष्टपणे दिसायचे. स्पष्ट आणि मोजक्या शब्दात ते संघ, कल्याण आश्रमाचा विषय मांडायचे. हिंदुत्वाचा विचार ठाणे जिल्ह्यातील दुर्गम अशा वनवासी भागात रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले अशा मांदियाळीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नवसुदादा वळवी.
आजचा पालघर जिल्हा म्हणजे जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, डहाणू हा सगळा त्या काळी ठाणे जिल्ह्याचा दुर्गम समजला जाणारा भाग होता. विकास, प्रगती यांपासून कितीतरी मैल दूर असणारा हा सर्व उपेक्षित भाग त्या काळी अति दुर्गम म्हणून मानला जायचा. मात्र ठाणे-कल्याणमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने झपाटलेल्या काही मंडळींनी प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध काम करत खूप मोठे परिवर्तन या सर्व परिसरात घडवून आणले. आपल्या विचारांवरील दृढनिष्ठा, समर्पण भाव आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची मन:स्थिती असेल तर सर्व प्रकारची प्रतिकूलता असलेल्या एका उपेक्षित भागामध्ये कशाप्रकारे वैचारिक परिवर्तन घडवून आणता येऊ शकते, याचा आदर्श म्हणजे आजचा पालघर जिल्हा म्हणता येईल.
आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून या सर्व दुर्गम भागात संघ शाखा व अन्य विविध सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून पोहोचलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमधून जी विविध रत्ने वनवासी क्षेत्रात नेतृत्व म्हणून उदयास आली त्यांपैकीच एक नेतृत्व होते नवसुदादा वळवी...!
 
 
हिंदुत्वाचा विचार ठाणे जिल्ह्यातील दुर्गम अशा वनवासी भागात रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले अशा मांदियाळीतील कदाचित शेवटचाच ऋषितुल्य असा कृतिशील कार्यकर्ता... एका अर्थाने या दुर्गम व उपेक्षित वनवासी क्षेत्रातील परिवर्तनाचा साक्षीदार...!
 
 
हिंदुत्वाचा विचार कानावर जरी पडला तरी पाल अंगावर पडल्यागत झटकून टाकण्याचा अत्यंत निराशात्मक काळ ज्यांनी अनुभवला, त्यांनाच कदाचित आजच्या ’अच्छे दिना’चे महत्त्व पटू शकेल. मात्र अच्छे दिन येतील याची कुठलीही शक्यता नसताना केवळ हिंदुत्वाची पताका सन्मानाने फडकली पाहिजे या दुर्दम्य विचारापायी, निराश न होता, न थकता, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न बाळगता जे पुढे आणि पुढेच जात राहिले त्यात एक नाव होते नवसु महादू वळवी.
 
 
नवसुदादांचा जन्म मोखाडा तालुक्यातील तोरणशेत या अगदी छोट्याशा पाड्यावर झाला. वारली समाजातील एका छोट्या शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्म घेतलेल्या नवसुदादांचे प्राथमिक शिक्षण मोखाडा येथे तर माध्यमिक शाळेतील शिक्षण जव्हार येथील आश्रमशाळेत झाले. शाळेत असतानाच कुस्तीमध्ये त्यांनी पारंगतता प्राप्त केली होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती आणि कमी वयातच झालेल्या एका जीवघेण्या अपघातामुळे त्यांना शिक्षण आणि कुस्ती मध्येच सोडावे लागले. त्याचवेळी योगायोगाने दादा विहारकर यांच्या माध्यमातून त्यांचा संघाशी संपर्क आला आणि त्यांच्या जीवनाला एक निश्चित दिशा मिळाली.
 
 
हळूहळू संघाच्या विविध जबाबदार्‍या घेऊन नवसुदादा मोखाडा तालुक्यात काम करू लागले. तसं पाहायला गेलं तर नवसुदादांचे गाव तोरणशेत हे मोखाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावरच... या छोट्याशा गावात गेल्यानंतर या गावात खरंच काही बदल होऊ शकतो याची कल्पना देखील महाभयंकर होती. मात्र वैजल गुरुजी आणि त्यांच्यासोबतच बाळूदादा वैजल, सखाराम झोले, नवसुदादा वळवी यांच्यासारख्या संघाचा परिसस्पर्श झालेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामविकासाचे हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला.
 
 
वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नाने हळूहळू पण निश्चितपणे या गावाने विकासाची वाट तर धरलीच पण संघाच्या विचाराला मान्यता देखील या सर्व परिसरात लाभली. त्यातूनच संघ व या विचारांच्या अनेक संस्था-संघटनांसाठी पूर्णवेळ कार्यकर्तेदेखील हळूहळू या गावाने दिले. त्या काळात तोरणशेत हे संघाचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. तत्कालीन सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस देखील आवर्जून या गावाला भेट देण्यासाठी आले होते. 1989ला बाळासाहेबांच्याच प्रमुख उपस्थितीत जव्हार येथे प्रचंड असे वनवासी संमेलन झाले होते. ठाणे, नाशिक जिल्ह्यामधून 25 हजार वनवासी बांधव या संमेलनासाठी उपस्थित होते. या संमेलनाच्या यशस्वीतेमध्ये नवसुदादांचा देखील मोठा सहभाग होता.
 
 
मात्र नवसुदादा या छोट्याशा गावात अडकणारे नव्हते, त्यांनी हळूहळू आपल्या कार्याचा आणि विचारांचा परीघ अधिक विस्तारित केला. वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली. या सर्व परिसरातील समाजघातक विचारांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रत्येक कामाला श्रद्धेचा आधार देण्याचे काम सुरू केले. वनवासी बांधवांच्या आपल्या संस्कृती-परंपरेबद्दल असलेल्या सुप्त श्रद्धेला त्यांनी साद घातली आणि पाहता पाहता धर्म जागरणाचे वारे जव्हार-मोखाडा परिसरात वाहू लागले. गावागावांमध्ये प्रवास करून त्यांनी भजनी मंडळे, सत्संग केंद्र, मंदिरांचे निर्माण, सार्वजनिक गणेशोत्सव, वारकरी दिंड्या अशा अनेक उपक्रमांची सुरुवात केली. त्यातूनच नवसुदादांकडे कल्याण आश्रमाच्या प्रांताची धर्मजागरणाची देखील जबाबदारी आली. संपूर्ण महाराष्ट्रातील वनवासी क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला. जव्हार मोखाडा भागात त्यांच्याच प्रयत्नांमधून धर्मजागरणासाठी दिंड्या निघू लागल्या. शेकडो वनवासी बांधव व्यसनमुक्त होऊन विकासाच्या वाटेवर चालू लागले. दिंड्यांच्या निमित्ताने नवसुदादांनी संपूर्ण जव्हार-मोखाडा परिसर शब्दशः पायाखाली तुडवला.
 
 
वनौषधी हा नवसुदादांचा असाच एक आवडीचा विषय. मात्र या विषयाला केवळ छंद न समजता त्यांनी अभ्यासक म्हणून देखील भूमिका बजावली. त्यातूनच या सर्व परिसरातील वैदू-भगत यांना एकत्र करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. केवळ वनौषधीच नव्हे तर वनवासी चाली-रीती, परंपरा याबाबत देखील त्यांनी चर्चा घडवून आणल्या. नष्ट होऊ घातलेली ही सर्व ज्ञानपरंपरा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित गेली पाहिजे आणि समाजाला या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे या उदात्त भावनेतून त्यांनी वैदुंचे प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र अशा अनेक उपक्रमांची सुरुवात केली. देवबांध येथे सुंदर नारायण गणेश मंदिराची जबाबदारी आल्यानंतर वैद्य खडीवाले यांच्या सहकार्याने त्यांनी वनौषधी लागवड हा देखील विषय यशस्वीपणे केला.
 
 
संघाच्या विचाराची स्पष्टता हे नवसुदादांचे एक आगळे वैशिष्ट्य. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या विचारात देखील स्पष्टपणे दिसायचे. स्पष्ट आणि मोजक्या शब्दात ते संघ, कल्याण आश्रमाचा विषय मांडायचे. गेल्या अनेक वर्षांपासून नवसुदादांनी मोखाडा फाट्यावर एक खोली घेऊन वनौषधी उपचार केंद्राची सुरुवात केली होती. ही खोली म्हणजे एक चंद्रमौळी झोपडीच होती. अनेकांनी या ठिकाणी चांगले घर बांधून देण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला पण त्यांनी याच चंद्रमौळी झोपडीत राहण्याचा आग्रह धरला आणि ते अखेरपर्यंत या निर्णयावर ठाम राहिले. याच झोपडीत त्यांनी प्रभावी वनौषधी उपचारांच्या माध्यमातून हजारो लोकांना व्याधीमुक्त केले होते. सोबतच या क्षेत्रात येऊ घातलेल्या अनेक युवकांना देखील त्यांनी हळूहळू हा ज्ञानाचा खजिना सुपूर्त केला होता. हीच वैदू मंडळी आपापल्या गावांमध्ये शेकडो बांधवांचा आधार म्हणून काम करताना आता दिसत आहेत.
 
 
संघाचा विचार घेऊन समाजपरिवर्तन घडविण्यासाठी कितीतरी लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभिनव कार्ये उभी करत आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. एक एक व्यक्तीला संस्कारीत करण्याचे कार्य एखाद्या व्रताप्रमाणे त्यांनी शब्दशः आयुष्यभर पाळले. आज समाजात दिसून येत असलेले परिवर्तन नवसुदादांसारख्या हजारो समर्पित कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येला आलेले फळ आहे. कुठल्याही मानसन्मानाची, फळाची अपेक्षा न करता समाजाच्या भल्यासाठी निरपेक्षपणे साधना करणार्‍यांना ऋषी म्हणून संबोधले जाते. नवसुदादा देखील असेच एक ऋषी होते!
 
 
नवसुदादा आज शरीररूपाने आपल्यातून गेले असले तरी ऋषीच्या भूमिकेतून त्यांनी गावागावात उभे केलेली वैदू मंडळी, वनवासी शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये उभी केलेली वनौषधीची झाडे, वनौषधीबाबत त्यांनी निर्माण केलेली जागरूकता अशी खूप मोठी परंपरा पाठीशी ठेवून ते गेले आहेत. त्यांचे हे अफाट कार्य सर्वांनी मिळून पुढे नेण्याची आवश्यकता आहे. ही अद्भुत अशी ऋषिपरंपरा पुढे नेण्याची जबाबदारी या भागात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनाच आता उचलावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0