नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ग्रामीण भागात मंडळ पातळीवर आणि शहरी भागात वस्ती पातळीवर हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. संघ रचनेनुसार सध्या देशात 58 हजार 964 मंडळे आणि 44 हजार 55 वस्त्या आहेत. हिंदू संमेलनांमध्ये समाजाचे उत्सव, सामाजिक एकता आणि सुसंवाद, पंच परिवर्तन यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. त्याचप्रमाणे, समाजात सुसंवाद वाढविण्यासाठी 11 हजार 360 खंड/नगरांमध्ये सामाजिक सुसंवाद बैठका आयोजित केल्या जातील. संघ रचनेनुसार, देशातील 924 जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिकांशी चर्चासत्राद्वारे संवाद साधला जाईल. यात भारताचा ’स्व’ इत्यादी विषयांवर चर्चा केली जाईल, घर-घर संपर्क मोहीम राबवून देशाच्या अधिकाधिक घरांमध्ये संघाच्या विचारांची ओळख करून दिली जाईल. शताब्दी वर्षात संघाने जनसंपर्काचे व्यापक कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवार दि. 7 जुलै 2025 रोजी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या दरम्यान देशातील विविध भागांत वेळोवेळी निर्माण होणार्या भाषिक तणावाच्या प्रश्नास उत्तर देताना, ‘भारतातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे, असे संघाचे मत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या बैठकीत मणिपूरमधील सद्यस्थिती, स्वयंसेवकांकडून केले जाणारे काम आणि सामाजिक सौहार्दासाठी केले जाणारे प्रयत्न यावरही चर्चा झाली. स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. संघ स्वयंसेवक मैतेई समुदायासह सर्व बाजूंशी बोलत आहेत. लवकरच मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असा विश्वास यावेळी आंबेकर यांनी व्यक्त केला.
“देशातील प्रत्येकास आपापल्या पूजापद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रलोभन दाखवून, जबरदस्ती, हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आणि कटकारस्थान करून बळजबरीने कोणाचेही धर्मांतर करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या सांस्कृतिक आक्रमणास कोणताही समाज सहन करणार नाही.” असेही आंबेकर यांनी सांगितले.
सत्ता आल्यास संघावर बंदी घालण्याची भाषा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना आंबेकर म्हणाले, “काँग्रेसकडून यापूर्वीही अनेकदा संघावर बंदी लादण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, प्रत्येकवेळी ही बंदी न्यायालयाचे आदेश, आंदोलनांमुळे त्यांना उठवावी लागली होती. संघावर बंदी आणण्याचे प्रयत्न हे कायदेशीरदृष्ट्या वैध नसल्याने त्यांचे मनसुबे साध्य झाले नाहीत.”
तीन दिवसांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
* तीन दिवसांच्या या बैठकीत संघाच्या कार्याचा विस्तार, शताब्दी वर्ष योजना, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये सुरू असलेले काम, अनुभव आणि प्रयत्न यावर चर्चा झाली. बैठकीस सरसंघचालक, सरकार्यवाहांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
* सामाजिक जीवनातील विविध समकालीन विषयांच्या संदर्भातही चर्चा झाली. सीमावर्ती प्रांतांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी तेथील कामाची स्थिती आणि त्यांचे अनुभव सांगितले.
* स्थानिक लोकांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते सतत समाजासोबत काम करत आहेत.
* शताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमांचे उद्दिष्ट व्यापक असेल. भौगोलिक, सामाजिक दृष्टिकोनातून समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आणि सर्व कामांमध्ये त्यांचा सहभाग असणे हे असेल.
संघ प्रशिक्षण वर्गांविषयी
एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात 100 प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. 40 वर्षांखालील स्वयंसेवकांसाठी आयोजित 75 वर्गांमध्ये 17,609 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे 40 ते 60 वर्षे वयोगटासाठी आयोजित 25 वर्गांमध्ये 4,270 शिक्षार्थ्यांनी सहभाग घेतला. देशातील 8,812 ठिकाणांहून स्वयंसेवकांनी या प्रशिक्षण वर्गांमध्ये भाग घेतला.