पेरांबू सिनेमा अमुधवनच्या आयुष्याचा पट मांडण्याबरोबर लोप पावत असलेल्या मानवतेचे दर्शन घडवतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा हृदय हिरमुसते, मन खचते, त्याचवेळी पुढच्या वळणावर तुमचा हात धरणारे कुणी, तुमची वाट पाहत असते याची खात्री हा सिनेमा देतो. हा सिनेमा कुणाबद्दलही मतप्रदर्शन करत नाही आणि आपल्याला करू देत नाही हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे.
पेरांबू या तामिळ शब्दाचा अर्थ आहे करुणा. पेरांबू या शब्दात अजून एक शब्द दडला आहे तो म्हणजे अंबु. अंबु म्हणजे प्रेम पण पेरांबू त्याच्याही दोन पावले पुढे जाणारी भावना आहे. पेरांबूमध्ये प्रेमाबरोबरच, दुसर्याबद्दल असणारी सहसंवेदना अंतर्भूत आहे.
दिग्दर्शक राम यांना याहून चांगले शीर्षक मिळाले नसते. एकल पालकत्व कठीण असतेच, त्यात मूल जर मेंदूच्या पक्षाघाताने आजारी असेल तर त्याला वाढवणे किती कठीण असेल! पेरांबू हा सिनेमा, वडील आणि त्यांच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्या पण मेंदूच्या पक्षाघाताने आजारी असलेल्या मुलीची गोष्ट आहे.
हा सिनेमा म्हणजे नायकाच्या आठवणींचा प्रवास. नायकाच्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा दुःखाचे ओझे हलके होत आहे असे वाटते तेव्हाच कोणत्यातरी कोपर्यातून ते परत डोके काढतेच, असे असूनही या दुःखाच्या महासागरातून पोहत जातानाच एकमेकांचा निरपेक्ष प्रेमाने केलेला स्वीकार म्हणजे पेरांबू.
सिनेमाच्या सुरुवातीला आपण पाहतो, सिनेमाचा नायक, अमुधवन(मामुट्टी) एका तलावाच्या काठी असलेल्या छोट्याशा बंगलीवजा घरात आपल्या मुलीबरोबर, पापाबरोबर राहायला येतो. फ्लॅश बॅकमधून समजते, अमुधवन, दुबईमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत असतो. त्याची पत्नी स्टेला भारतात आपल्या चौदा वर्षाच्या मुलीची काळजी घेते. ही मुलगी मेंदूच्या पक्षाघाताने आजारी असल्यामुळे दैनंदिन गोष्टींसाठी आईवरच अवलंबून असते. ना पतीची मदत, ना कुटुंबाचा पाठिंबा. एके दिवशी आईचा संयम संपतो आणि ती अमुधवनला पत्र लिहून, मुलीची जबाबदारी त्याच्यावर सोपवते आणि घर सोडून निघून जाते. जवळजवळ दहा वर्षांनी आपल्या मुलीसाठी अमुधवनला परत यावे लागते.
या आजाराविषयी बरेच गैरसमज असतात. आपल्या मुलीला संसर्ग होईल या भीतीने पापाची काकी अमुधवनला घर सोडायला सांगते. शेजारचे लोकसुद्धा त्याला त्रास देतात. खुद्द पापाची आजीसुद्धा, हे पाप तू आश्रमात सोडून ये म्हणून तगादा लावते आणि अमुधवन लोकांना टाळण्यासाठी गावापासून दूर असलेल्या ठिकाणी एक घर विकत घेतो.
अनेक वर्ष लांब असल्याने पापाला वडिलांची सवय नसते. अनेक उपायांनी तिला बोलके करण्याचा प्रयत्न करताना, तिला आईची आठवण व्याकुळ करते. अमुधवन हताश होत असतानाच एक प्रसंग घडतो. त्यांच्या घरात पक्ष्याचे एक छोटे पिल्लू अडकते. बाहेर जायचा रस्ता मिळत नसल्याने घाबरते. अमुधवन हळुवारपणे त्या पिल्लाला उचलून बाहेर नेतो. पिल्लू आनंदाने उडून जाते आणि हे पाहणार्या पापाचा चेहरा आनंदाने फुलून येतो. हळूहळू बाप-मुलीमध्ये विश्वासाचा बंध निर्माण होत असतानाच, पापाला मासिक पाळी येते. कितीही प्रेम असेल तरी अशा वेळेला आईचा स्पर्श धीर देतो आणि याच वेळी विजयालक्ष्मी नावाची एक स्त्री त्यांच्या आयुष्यात येते. आईच्या प्रेमाला मुकलेली पापा, तिच्यावर जीव टाकते. घराला एका स्त्रीच्या स्पर्शाने घरपण येते आणि अमुधवन, विजयालक्ष्मीशी लग्न करतो. विजयलक्ष्मीचा हेतू मात्र वेगळाच असतो. हे घर बळकवण्यासाठी केलेले हे नाटक असते. पापाला मारण्याचा प्रयत्न करताना ती पकडली जाते पण कोंडीत सापडलेल्या अमुधवनला आपले घर तिला देणे भाग पडते..
‘आम्ही असे का वागलो हे तरी विचार’, विजयालक्ष्मी विनविते. ‘तुला तर एवढा निरोगी मुलगा आहे. तरीही तू माझ्याशी खोटे बोलली असशील तर तुझा प्रॉब्लेम माझ्याहून नक्की मोठा असणार’, हे बोलून अमुधवन जेव्हा निघून जातो तेव्हा लक्षात येते की, अनेकांच्या आयुष्यात आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाहीत अशी दुःखे असतात. त्यातही ती ताठ मानेने जगतात, न डगमगता आयुष्याला सामोरी जातात.
आता हे गाव सोडून अमुधवन आपल्या मुलीला घेऊन शहरात येतो. पैसेसुद्धा संपल्याने चरितार्थासाठी तो कामाला जाऊ लागतो. पापा वयात येत असते. तिच्या स्त्रीसुलभ भावना जागृत होत असतात. पाळीच्या दिवसांत तिला मदतीची गरज असते पण ती अमुधवनला जवळ यायला देत नाही. तिला संसर्ग होतो. तिची काळजी घेणे आता तुला शक्य होणार नाही, डॉक्टर सांगतात. पापाला तिच्यासारख्याच मुलांसाठी असलेल्या शाळेत ठेवण्याचा सल्ला देतात, पण इथेही त्याचा भ्रमनिरास होतो.
अशा मुलांना आपल्याला काय होते ते सांगता येत नाही, स्वत:ला वाचवता येत नाही. त्यांचा गैरफायदा घेणारे खूप असतात. सर्व बाजूंनी निराश झालेला अमुधवन आता दोघांचे आयुष्य संपवण्याचा विचार करतो. आपल्याशिवाय आपल्या मुलीला जगता येणार नाही हे अमुधवन जाणून आहे. आपल्या मुलीची जबाबदारी घ्यायची त्याची तयारीसुद्धा आहे. त्याला अपेक्षा आहे ती कुणीतरी त्याचे दुःख समजून घेईल. जेव्हा ती सुद्धा पूर्ण होत नाही तेव्हा त्याचे पाय समुद्राकडे वळतात.
तेव्हा मात्र एक तृतीयलिंगी व्यक्ती, मीरा, त्याचा हात धरते.
चित्रपटाचाच नाही तर अमुधवनच्या कष्टाचा आता शेवटचा अध्याय सुरू होतो. या अध्यायाचे नाव असते करूणा. चित्रपटाच्या शेवटी जगाकडून नाकारलेले तीन जीव एकमेकांचा हात पकडून एका नवीन अध्यायाची सुरुवात करतात. प्रश्न काही संपलेले नसतात पण ते सोडवताना मिळालेली साथ, हा प्रवास सुसह्य करणार असते याची खात्री अमुधवन बरोबर प्रेक्षकांना सुद्धा वाटते.
प्रेमाच्या शोधात असताना, आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. या सिनेमातली पात्रे त्याला अपवाद नाहीत.
पेरांबूचे मुख्य पात्र आहे पापा(साधना). ही मुलगी सेरेब्रल पाल्सी या रोगाने ग्रस्त आहे. लोकांना तिच्याबद्दल सहानुभूती आहे पण त्या रोगाविषयी भीती आहे, किळस आहे. काही वेळासाठी कीव येऊन जरी कुणी तिच्याशी चांगले वागले तरी त्यांचा सहवास फक्त थोड्या काळापुरता आहे, याची पापाला कल्पना नाही. पापाला अशा प्रेमाची अपेक्षा आहे की, जे शाश्वत आहे.
यातील नायकाचे पात्र गुंतागुंतीचे आहे. सुरुवातीला आपल्या मुलीचा आजार तो पचवू शकत नाही. त्यामुळे दहा वर्षे तो तिच्याकडे पाहतसुद्धा नाही. जबाबदारी अंगावर पडल्यावर मात्र तो चांगला बाबा होण्याचा मनापासून प्रयत्न करतो. एका दुबळ्या बाबाचा आपल्या अपूर्ण मुलीला समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो करताना, परिस्थितीचा मनापासून स्वीकार करताना त्याचे रूपांतर एका सुजाण पालकात होते, जो आपल्या मुलीला तिच्या त्रुटीसकट मनापासून स्वीकारतो.
माणुसकीचा हा विजय साजरा करताना दिग्दर्शकाने आनंदाचा जल्लोष मात्र टाळलेला आहे. पडद्यावर व्यापून राहिलेली शांतता आणि गरज पडेल तेव्हाच केलेले अर्थपूर्ण संभाषण प्रेक्षकांना सुद्धा स्वतःचा शोध घेण्यास भाग पाडते. माझे आयुष्य जेव्हा तुम्ही जाणाल तेव्हा लक्षात येईल, तुम्ही नशीबवान आहात... चित्रपटाच्या सुरुवातीला आलेले हे स्वागत आता प्रेक्षकांना उमजते.
सिनेमात निसर्गाची अनेक रूपे कॅमेरामनने टिपली आहेत. निसर्ग हा चांगला किंवा वाईट नसतो. तो परिस्थितीनुसार आपले रंग बदलतो. माणूस सुद्धा येणार्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतो.
समाजात सर्व प्रकारची माणसे असतात. या सिनेमात सुद्धा माफिया आहेत, स्वतःच्या नातीचे सुद्धा प्रेम नसणारी आजी आहे, पैशासाठी फसवणारी स्त्री आहे, निष्पाप जीवांवर राग काढणारे लोक आहेत, पण दिग्दर्शक कुठेही त्यांचा वापर करून नायक किंवा पापासाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. तो फक्त आयुष्याचे चित्र मांडतो. अगदी पापाच्या आईला सुद्धा यात दोष दिलेला नाही. उलट तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.
संपूर्ण सिनेमा हा अमुधवनच्या आयुष्याचा पट मांडण्याबरोबर लोप पावत असलेल्या मानवतेचे दर्शन घडवतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा हृदय हिरमुसते, मन खचते, त्याचवेळी पुढच्या वळणावर तुमचा हात धरणारे कुणी, तुमची वाट पाहत असते ह्याची खात्री हा सिनेमा देतो.. पेरांबू पाहताना, मन उदास होते, हताश होते आणि अचानक आनंदाने भरून येते. आयुष्य कठीण असले तरी ते सुंदर होऊ शकते ह्याची जाणीव पेरांबू करून देतो.
कुठेही विचारवंताचा आव न आणता, आपल्या समाजातील काही दोष या सिनेमात फार खुबीने दाखवले आहेत. तृतीयलिंगी व्यक्तीबद्दल असलेला तिरस्कार, मासिक पाळीबद्दल असणारे गैरसमज, पुरुषसत्ताक मानसिकता, चाकोरीत न बसणार्या कुणालाच सामावून न घेणे हे सर्व प्रश्न हाताळले असूनही पेरांबू हा सिनेमा कुणाबद्दलही मतप्रदर्शन करत नाही आणि आपल्याला करू देत नाही हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे.
( सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर पाहाता येईल.)