सातेवाडीचा ‘डांगी मित्र’

17 Jul 2025 15:17:20
विजय सांबरे  9421329944
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सातेवाडी येथील बाळासाहेब मुठे हे डांगी गो संवर्धनात महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्याकडे सध्या 30-35 डांगींचा कळप आहे. डांगींचे आरोग्य जपण्यासाठी ते कार्य करतात. आजघडीला सातेवाडी पंचक्रोशीत ‘लाडका डांगी मित्र’ आणि ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
Dang cow
 
महाविद्यालयात शिकत असताना सह्याद्रीत भटकण्याचा छंद जडला. पश्चिम घाट वाचविण्याचे वेड घेऊन समवयस्क मित्रासह अश्वी-संगमनेर, माळशेज-शिवनेरी, भीमाशंकर-चाकण, लोणावळा-खंडाळा, महाड-रायगड, शिवथर घळ-वरंधा घाटातून राजगड-पुणे व परत अशी सायकल यात्रा काढली होती. अकोले तालुक्यातील कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड या किल्ल्यावर पदभ्रमण करत असताना चाळीसगाव डांगाण फिरत होतो. तेथील वनवैभव, देवराया भुरळ घालत होत्या. त्या निमित्ताने स्थानिक जनजातींची (आदिवासी) निसर्गपूजक संस्कृती जवळून अनुभवता आली. गावोगावच्या महादेव कोळी व ठाकर यांच्याशी मैत्री झाली. जनजातींचे आयुष्य अतिशय प्रतिकूल असूनही हे लोक कमीतकमी गरजांमध्ये जगत असूनही आनंदी कसे? याचे कोडे उलगडत नव्हते. हे सर्व पाहताना माझी दृष्टी ही मुख्य प्रवाहातील ‘शहरी’ होती. अशात एकदा मुंबईच्या गिरिमित्र संमेलनाला हजेरी लावली. तेथील एक मान्यवर वक्त्याचे विचार नवी दृष्टीच देऊन गेले. ते म्हणाले की, आपल्या तरुण पिढीची ताकद फक्त ऐतिहासिक गड-किल्ले भटकण्यात वाया जात आहे. भटकत असताना ही ताकद त्यांनी गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी असणार्‍या जनजाती बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरावी. या आशयाचे बोल ऐकल्यावर काम करण्याची प्रेरणा मिळाली. शंभर वर्षापासून ज्या भंडारदरा धरणाचे पाणी आपण बागायती शेती पिकविण्यासाठी वापरतो; ते पाणी धरणात साठताना सह्याद्रीतील नैऋत्य मान्सूनचा अति पाऊस, या जनजाती झेलतात. कृतज्ञता म्हणून आपण यांचे काही देणे लागतो, असा आतला आवाज सांगायचा. पण नक्की काय करायचे? हे उमगत नव्हते.
 
अशातच एकदा सह्याद्रीतील धुवांधार पाऊस अनुभवण्यासाठी हरिश्चंद्रगडावर जाणे झाले. बहुदा ते 2001 साल असावे. कोकणकडा पाहून आडवाटेने पुन्हा निघालो. पाहातो तर तरणीताठी डांगी जनावरे मृत अवस्थेत दिसली. खूप अस्वस्थ वाटले. गुराख्याशी बोलणे झाले. अज्ञात आजार व अतिवृष्टीमुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. खूप अस्वस्थ वाटले.
 
 
पुढे आदिवासींसोबत काम करण्याच्या निश्चयाने संगमनेरच्या लोकपंचायत या सामाजिक संस्थेशी जोडलो गेलो. अकोले तालुक्यातील आदिवासी गावात काम सुरू झाले. वनाधारित उपजीविका, कृषी जैवविविधता, जंगलाचे लोकसहभागातून संवर्धन हे विषय लोकपंचायतच्या कामाचा गाभा होते. गाव बैठकांत लोकांशी बोलताना डांगी गोवंशाचा विषय हमखास निघायचा. आमचीही ‘लक्ष्मी’ वाचविण्यासाठी काही तरी करा, अशी मागणी लोक पोटतिडकीने करायचे.
 
 
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याच्या ‘अंतरा’ या संस्थेत जाणे झाले. ही संस्था महिला पशुवैद्यकांनी सुरू केली आहे. तेथे गावरान पाळीव प्राण्यांच्या विविध जाती व स्थानिक लोकांच्या पुढाकाराने स्वस्थळी संवर्धन याविषयी प्रकल्प सुरू होते. संगमनेरी शेळी व अकोले तालुक्यातील डांगी गोवंश याविषयी महत्त्वाची माहिती येथे मिळाली. तेथेच डांगी गोवंश जतन-संवर्धन कार्याला प्रेरणा व चालना मिळाली. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्यासोबत महाराष्ट्रातील जैवविविधता संवर्धन याविषयी बैठक झाली. महाराष्ट्र जनुक कोश (Mahrashtra Gene Bank) या नावाने समविचारी व्यक्ती व संस्थांचे व्यासपीठ निर्माण झाले. तिथे डांगी गोवंशाचा कसा र्‍हास होतो आहे, यावर चर्चा झाली.
 
 
पुढे महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने डांगी गोवंश संवर्धन प्रकल्प सुरू झाला. आधी ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात डांगी पालक शेतकर्‍यांचा अभ्यास हाती घेतला. 125 डांगी पालक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. अहवाल हाती आला. या कामी पुण्याचे रघुनंदन वेलणकर यांची तज्ज्ञ व्यक्ती म्हणून विशेष मदत झाली. डांगी पालकांसोबतच अभ्यास व त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षातून कृती संशोधन, प्रथमोपचार, जाणीवजागृती कार्यक्रम, दस्तऐवज असे उपक्रम सुरू झाले आहेत. डांगी गोवंश संवर्धन प्रकल्पाद्वारे कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरातील अति दुर्गम गावांत कामाला सुरुवात झाली. या परिसरातील डांगी जनावरे झपाट्याने कमी होत होती. बिकट परिस्थितीतही काही डांगी पालक नेटाने प्रयत्नपूर्वक सुलक्षणी डांगी गाई व शुद्ध वळू पाळत होते.
 
Dang cow 
 
बाळू मुठेची गोष्ट
 
अकोले तालुक्यामधील कोतूळ डांगाणातील सातेवाडी परिसरात डांगी पालकांच्या भेटीसाठी भटकत होतो. फोफसंडी गावातील हरहुन्नरी तरुण कार्यकर्ता बुधाजी वळे सोबत होता. निसर्गातील झाडेझुडुपे, पशुपक्षी, देवराया, मधमाशी ते अगदी डांगी यांवर निरतिशय प्रेम करणारा बुधाजी भेटला की, डांगी गोवंश व संबंधित विविध घटक यांविषयी माहिती मिळायची व स्थानिक जनजाती डांगाणी भाषेतील नवनवीन शब्द पण कळायचे.
 
 
फोफसंडी गावात मुक्कामी असताना बुधाजी डोंगरातील गुहांमध्ये घेऊन गेला. तीन कुटुंबांचे कळप राहत होते. एकूण दीडशेपेक्षा अधिक जनावरे असावीत. गुहेत राहणारे डांगीपालक मी प्रथमच पाहात होतो. गुहेच्या उबेत व चुलीच्या उजेडात गोपालकांसोबत गप्पा रंगल्या. दरीतील त्रिशूळवाडी येथील ही कुटुंबे गुहेच्या आधाराने पिढ्यानपिढ्या डांगीचा कळप पाळत होते. त्यापैकी एक बाळूभाऊ मुठे नावाचा हा तरुण खूपच उत्साही होता व उस्फूर्तपणे बोलत होता. डांगीविषयी कमालीची आस्था व प्रेम त्याच्या बोलण्यातून प्रकट होत होते. शुद्ध डांगी कसे निर्माण करता येईल, याविषयी तो विशेष मेहनत घेत होता. पुढे डांगी संवर्धन उपक्रमाच्या निमित्ताने बाळूभाऊशी विशेष स्नेह जुळला. वीस गावांत ‘डांगी मित्र’ यांच्या माध्यमातून काम करण्याचे ठरले. पहिले डांगी मित्र म्हणून बाळूभाऊ मुठे यांनी सातेवाडीमध्ये कामही सुरू केले.
 
 
Dang cow 
दुर्गम गावे, वाडी वस्ती ते अगदी गड-गुहा येथे वास करणार्‍या डांगी जनावरांना वेळेवर प्रथमोपचार मिळावा, औषधांची सोय व्हावी, अनगड ठिकाणी वेळेवर लसीकरण व्हावे, या उद्देशाने वीस गावांत ‘डांगी मित्र’ म्हणून काम करू लागला. बाळूभाऊला यात अधिक आवड असल्याने तो अगदी मनापासून काम करू लागला. ’लोकपंचायत’ संस्थेच्या प्रकल्पात 2014 पासून तो आजतागायत डांगी व इतर पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सेवेत आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर व खाजगी वैद्यक यांच्याकडून त्याने पाळीव प्राण्यांवर उपचार व लसीकरण कसे करावे, या विषयी ज्ञान व कौशल्य मिळवले आहे. आजूबाजूच्या गावातील जनावर आजारी असल्याचे कळले की, तो तात्काळ उपाय करण्यासाठी हजर होतो. जुन्या वैदू परंपरेनुसार तो मोफत उपचार करतो. लांब अंतर असेल तर वाहनाची सोय करा, असे तो सांगतो. पण एका रुपयाचीही अभिलाषा त्याला नाही. ‘लक्ष्मी’ची सेवा करण्याचे कोणी दाम घेते का? असा रोकडा सवाल तो करतो.
 
Dang cow 
 
बाळूभाऊचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. भावंडात मोठा असल्याने गुरांचा कळप राखण्याच्या कामात बाळूचे मन रमले व तो ‘डांगीमय’ झाला. वयोवृद्ध आई सीताबाई, पत्नी लीलाबाई, सहा मुली व 30-35 डांगींचा कळप असा त्याचा मोठा कुटुंब कबिला आहे. बरडीनाथ डोंगराच्या पायथ्याशी तो केंबळी झाप करून राहतो.
 
 
आजघडीला सातेवाडी पंचक्रोशीचा लाडका डांगी मित्र बाळू ’गरिबांचा डॉक्टर’ म्हणून ओळखला जातो आहे. शुद्ध डांगीची पैदास व्हावी, या उद्देशाने तीन कुटुंब मिळून दर तीन वर्षांनी कळपातील वळू बदलतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राजूरच्या डांगी प्रदर्शनात चॅम्पियन ठरलेला वळू एक लाख रुपयांना विकत घेतला व त्याद्वारे गायांना भरवले. आज शुद्ध डांगीची पैदास येथे होत आहे.
 
Dang cow 
त्रिशूळवाडी गावातील तरुण डांगी गोपालक मित्रांनी मिळून सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक संस्थापण सुरू केली आहे. गुरांना दर्जेदार चारा मिळावा, आरोग्य उत्तम राहावे व दूध निर्मितीतून चांगला रोजगार निर्माण व्हावा, यासाठी तो सामूहिक कार्य करत आहेत. लोकपंचायत संस्थेच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या डांगी गोवंश पैदासकार व संवर्धक संघाच्या कामात बाळूभाऊ गेली सहा वर्षे सक्रीय आहे.
 
Dang cow 
2019 साली डांगी पालन जतन संवर्धन कार्यासाठी बाळासाहेब व लीलाबाई मुठे यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेने ‘आदर्श गोपालक’ पुरस्काराने सन्मानित केले. लोकपंचायत संस्थेनेदेखील 2016 मध्ये ‘उत्कृष्ट डांगी पैदासकार’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
 
देशी गोवंश सबलीकरणासाठी...
 
अलीकडे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व देशी गोवंशांना ‘राज्य गोमाता’ दर्जा बहाल केला आहे व 22 जुलै 2025 हा दिवस ‘देशी गोवंश संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. सरकारचे हे धोरण निश्चितच स्वागतार्ह आहे. यातून देशी गोवंश जतन संवर्धनाला निश्चित बळ मिळेल. विदर्भात गौळाऊ, मराठवाड्यात देवणी, सह्याद्रीत डांगी व कोकण गिड्डा या देशी गोवंशाचे पैदासकार संघ (Breeder Association) उभे राहत आहेत. त्यांना शासकीय प्रोत्साहन, पाठबळ व मदतीची खरी गरज आहे. त्यातून देशी गोवंशाचे स्वस्थळी संवर्धन (Inasitu conservation) तर होईलच, सोबत देशी गोवंश आधारित उपजीविका सक्षम होण्यास मदत होईल व ग्रामीण भागात नवीन रोजगार संधी निर्माण होईल. आपल्या राज्यात प्रमुख सहा सात देशी गोवंश आहेत, त्याचे अर्थकारण सर्वप्रथम समजून घ्यायला हवे. त्यासाठी गाय म्हणजे केवळ दूध ही दृष्टी धोरणकर्त्यांना सोडावी लागेल. त्यापलीकडे देशी गोवंशाची अर्थकारण (उपयुक्तता व सेवा यांचे मूल्य) समजून घेणे गरजेचे आहे. आजघडीला देशी गोर्‍हे-बैल विक्री, मशागत सेवा, शेणखत विक्री यांचा त्या कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्नात किमान 30 ते 40 टक्के वाटा आहे. डांगी पालनातील अर्थकारण हे डांगी गोवंशाशी संबंधित व्यवस्थेतील घटकांभोवती फिरते. डांगी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे पारंपरिक डांगी पालकांचे ज्ञान व कौशल्य, दुसरा घटक डांगी गाय व तिला भरवणारा वळू, जंगल व शेतातील चारास्रोत; तसेच डांगी गोवंशापासून मिळणारे दुध व उपपदार्थ यांची विक्री, तसेच शेती कामासाठी गोर्‍हे व बैलांना बाजारपेठेत असणारी किंमत, या बाबी सर्वच देशी गोवंश पालनाला लागू पडतात. त्या अंगाने इतर गोवंश व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी पाऊले उचलायला हवी, प्रदेशनिहाय उपाययोजना (Area specific solutions) विकसित करायला हव्यात. अशा सकारात्मक प्रक्रियेतून बाळूभाऊ उर्फ बाळासाहेब मुठे सारख्या सह्याद्रीतील डोंगरदर्‍यात ‘डांगीमय’ जीवन जगणार्‍या गोपालकाला अधिक प्रेरणा व सन्मान मिळेल, अशी खात्री वाटते.
Powered By Sangraha 9.0