स्वराज्याचे प्रहरी विश्वपटलावर

17 Jul 2025 13:11:15
shivaji maharaj
जागतिक वारसास्थळ मानांकन प्राप्त झालेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी ह्या शिवदुर्गाकडे पाहिल्यास त्यांचे शिवकाळातील अस्तित्व किती वैशिष्ट्यपूर्ण होते हे कळून येते. मराठ्यांचा विश्वपटलावर आले हे पहिले यश आहे. खरे काम आता करावे लागणार आहे. ऊन-वारा-पाऊस ह्या त्रयींशी सामना करीत उभे असलेले शिवदुर्ग यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन कार्य वाढीस लागले पाहिजे. हे संचित सांभाळू आणि पोहोचवू शकलो तरच ह्या मानांकनाच्या अभिमानाला खरा अर्थ प्राप्त होईल.
पॅरिसच्या युनेस्को सभागृहात शिवरायांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसास्थळे म्हणून निवडल्याची घोषणा होते...तिरंगा हाती घेत सर्व देशांच्या प्रतिनिधींसमोर धन्यवाद प्रकट करताना ’जय भवानी, जय शिवाजी’ नाद घुमतो आणि कोटी कोटी शिवप्रेमींच्या मनात शिवरायांच्या पावन स्मृती दाटतात- या बातमीचा अत्यानंद जगभरातील प्रत्येक मराठी माणसाला आणि शिवरायांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक भारतीयाला झाला असेल यात शंकाच नाही. त्यासाठी सर्वच शिवप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन! हे भगीरथ प्रयत्न ज्यांनी केले ते केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यातील संबंधित विभाग, मंत्री, अधिकारी, पुरातत्त्व विभाग यांचे आणि ज्यांनी ज्यांनी त्याला हातभार लावला अशा सर्वांचे अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु ज्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे हे कार्य साध्य झालं त्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष अभिवादन केले पाहिजे.
 
 
शिवचरित्राच्या इतिहासाचे दर्शन आता विश्वमय होणार ही गोष्ट जितकी अभिमानाची आहे त्याहून अधिक आपल्यावरील जबाबदारीची आहे. अभिमानाच्या नि आनंदाच्या वातावरणात या निमित्ताने ह्या स्थळांबाबत काही महत्त्वाच्या प्रश्नांचा उहापोह करायला हवा. वारसास्थळे म्हणून घोषित केलेल्या या अभिमानी शिवदुर्गची महती नक्की कोणती? त्याचे ऐतिहासिक, भौगोलिक वेगळेेपण कोणते? जगाने त्याला सांभाळले पाहिजे, येणार्‍या मानवी पिढ्यांसाठी संरक्षिले पाहिजे असे काय आहे या स्थळांत? त्यांची निवड करण्यामागे कोणता विचार केला गेला असेल? जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामावल्याने काय विशेष साध्य होणार आहे?
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
 
महाराष्ट्रातील लहानमोठे गडकोट, गढ्या, दुर्ग, जंजिरे इ. ची संख्या जवळपास चारशेच्या घरांत आहे. शिवदुर्गांचा विचार केल्यास आजमितीस सुमारे दोनशे किल्ले आपले भग्नावशेष कवटाळून का होईना शिवछत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास समजावणारे मूक साक्षीदार होऊन उभे आहेत. संपूर्ण जगाचा विचार केल्यास घनतेच्या आणि संख्येच्या दृष्टीने शिवदुर्गांची संख्या सर्वात जास्त आहे आणि सर्वाधिक दुर्ग असलेली डोंगररांग म्हणूनही सह्याद्रीच छाती काढून जगाच्या पाठीवर मिरवित आहे. नाशिक-बागलाणातील साल्हेरपासून तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत उभे असलेले हे शिवदुर्ग शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिवप्रेमींची तीर्थक्षेत्रे आणि स्फूर्तिस्थाने आहेत. युद्धशास्त्र आणि संरक्षण व्यवस्था ही प्रमुख अंगे कोणत्याही देशाच्या वा राज्याच्या सार्वभौमत्वासाठी आणि स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असतात. शिवकाळातील हे दुर्ग या व्यवस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण घटकांचे मार्गदर्शन करतात. जमिनीपेक्षा आकाशातून चालणार्‍या आजच्या क्षेपणास्त्रादी युद्धकारणाला आणि सायबर सुरक्षेसारख्या संगणकीय संरक्षणव्यवस्थेच्या काळात वावरणार्‍या आजच्या पिढीला या दुर्गांचे उपयोग बहुधा शून्य वाटतील. पण सतराव्या शतकातील राज्यकारभारात संरक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दुर्गांची माळच निर्माण केली ते स्वराज्याचे सर्वात मोठे बलस्थान ठरले. स्वराज्यकार्यातील सर्व दुर्गांनी पार पाडलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळेच रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील ’राज्याचे सार ते दुर्ग’ हे वाक्य सर्वार्थाने समर्पक ठरते.
 
 
shivaji maharaj
 
जागतिक वारसास्थळ मानांकन प्राप्त झालेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी ह्या शिवदुर्गाकडे पाहिल्यास त्यांचे शिवकाळातील अस्तित्व किती वैशिष्ट्यपूर्ण होते हे कळून येते. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि तामिळनाडूमधल्या विल्लुपुरम ह्या जिल्ह्यांमधील हे सारे किल्ले मराठा इतिहासाच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहेत. रायगड, राजगड आणि जिंजीचा दुर्गसमूह या स्वराज्याच्या शीर्षस्थानी असलेल्या तीन राजधान्या. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे मराठ्यांच्या नौदलसामर्थ्याचे अग्रणी. युगायुगांना मार्गदर्शक ठरेल असे चरित्र लाभलेले महापुरुष शिवछत्रपती जिथे जन्मले तो शिवनेरी. ज्या अलौकिक प्रसंगाने शिवछत्रपतींचे जीवितकार्य झळाळून टाकले तो अफजलखानवध ज्याने पाहिला तो प्रतापगड. पश्चिम घाटमार्गांचा सतर्क पहारेकरी म्हणून ठाण मांडून बसलेला लोहगड. ‘दुर्गमः इति दुर्गः’ हे शब्दशः पटवून देत आसमंत कवेत घेणारा अत्युच्च दुर्ग साल्हेर आणि आदिलशाहीची डोकेदुखी ठरलेला स्वराज्याच्या दक्षिण टोकावरील मेरुमणी-ज्याला केवळ साठ मावळ्यांसह कोंडाजी फर्जंदने जिंकला, त्या पराक्रमी स्मृती जागवणारा पन्हाळा. ह्या शिवदुर्गांची महती जागतिक पातळीवर प्रदर्शित झाली पाहिजे. ह्या दुर्गांचे भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. खरं तर ह्यातील प्रत्येक दुर्ग हा एकेका ग्रंथाचा विषय. काही शब्दांच्या लेखमर्यादेत त्यांचा इतिहास नि भूगोल बांधणं केवळ अशक्यप्राय. पण या निमित्ताने त्यांचा धांडोळा घेताना ज्या बाबी ठळकपणे समोर येतात त्यांची चर्चा करूया.
 
 
 
दुर्गबांधणीचे प्राचीनत्व रामायण-महाभारतकाळापर्यंत मागे जाते. हजारो वर्षांच्या काळात प्रत्येक राजसत्तेने आपापल्या प्रांती दुर्ग बांधले. भूदुर्ग (भुईकोट), जलदुर्ग, वनदुर्ग, गिरिदुर्ग असे अनेक प्रकार भारतीय इतिहासात सापडतात. परंतु शिवपूर्वकाळाचा विचार केला तर वेगवगळ्या इस्लामी सत्तांनी सरदारांना जहागिरी देताना त्या त्या प्रांतातील दुर्ग मात्र स्वत:कडे ठेवल्याचे व त्यावर विश्वासू किल्लेदारांची नेमणूक केल्याचे दिसून येते. असे असतानाही ह्यातील कित्येक किल्ले दुर्लक्षित व बेवसाऊ होते ज्याचाच फायदा शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीसाठी करून घेतला. स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा हा ताब्यात घेताना शिवरायांचे वय जेमतेम चौदापंधरा वर्षांचे. अनुभव थोटका, सामर्थ्य थोटके पण तरीही तोरण्यामध्ये मिळालेले धन घेऊन समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडासारखा अजोड किल्ला राजधानी म्हणून साकारला हे केवळ अद्भुत आहे. मावळ मुलुखाच्या केंद्रभागी असलेला हा किल्ला शिवरायांचा लाडका होता. संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती अशा चिंचोळ्या पण लांब पसरलेल्या तीन बुलंद माच्या आणि दुर्गम बालेकिल्ला ह्यांची बांधणी लक्षात घेतली तर त्यांचे संरक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्य लक्षात येतं. संजीवनी माचीभोवती डोंगराला उतार आहे म्हणून जी चिलखती तटबंदी बांधून महाराजांनी हा किल्ला अजेय केला, अशी तटबंदी जगात कुठेही दिसत नाही. ह्या तटबंदीतला एकही दगड न हलता साडेतीनशे वर्षांनंतरही टिकून आहे हेच त्याच्या भक्कम बांधणीचे वैशिष्ट्य. स्वराज्याचे सर्व राजकारण-चढउतार पाहत पंचवीस वर्षे हा गडांचा राजा राजधानी म्हणून दिमाख दावित होता. मात्र स्वराज्याचे सिंहासन अधिष्ठित होण्याचे भाग्य लाभले ते रायगडाला. सर्व बाजूंंनी नैसर्गिक ताशीव कड्यांनी अभेद्य असलेला रायरी शिवरायांनी जावळी घेतल्यावर तख्तास जागा म्हणून राजधानी ’रायगड’ केला. शे-दीडशे वर्षे जावळीचे राज्य करूनही रायरीचे अभेद्यपण चंद्रराव मोर्‍यांच्या किंवा आदिलशाहीच्या लक्षात आले नाही त्या पर्वताचे राजांनी सोने केले. राजप्रासाद, दरबार, नगारखाना, बाजारपेठ, मनोरे, गजशाळा, अंबरखाने, शस्त्रागार, तलाव, मंदिरे अशा असंख्य वास्तूंनी नटलेला रायगड ही उंच पर्वतावरील संपन्न नगरीच होती. जवळ जाईपर्यंत सर्वदूर न दिसणारा हा गिरिदुर्ग त्याच्या भौगोलिक स्थानामुळे सर्वांत सुरक्षित होता.
 
shivaji maharaj
 
 किनारपट्टीवरील समुद्री व्यापार नियंत्रणाखाली यावा हे सारे कार्य ह्या जलदुर्गांनी केले.
 
शिवरायांचा प्राथमिक शत्रू विजापूरची आदिलशाही होती आणि तिचे सामर्थ्य महाड, दाभोळ, राजापूर अशा पश्चिम बंदरातील व्यापारी उत्पन्नावर होते. शिवरायांनी प्रतापगड, लोहगड बांधून ह्या उत्पन्नाचे घाटमार्ग अडवले आणि आदिलशाहीचे आर्थिक कंबरडे मोडले. पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज आणि जंजिरेकर सिद्दी ह्यांनी पश्चिम समुद्रकिनारा ताब्यात ठेवला होता. ह्या स्वराज्याच्या सीमेवरील शत्रूंना समोर ठेवत व्यापार आणि सागरी संरक्षण दोन्ही बाबींचा विचार करता शिवरायांनी समृद्ध आरमाराची उभारणी केली. इंग्रजांच्या मुंबईसमोरील खांदेरी, सिद्दीला शह देऊ शकणारे सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग, गोवेकरांना चाप बसवणारा सिंधुदुर्ग अशा भक्कम जलदुर्गांनी पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग अशा बळकट किल्ल्यांच्या जोरावर भविष्यात सरखेल कान्होजी आंग्रेंनी कोकण किनारपट्टीवर मराठी आरमाराचा दरारा निर्माण केला होता. ज्या अजिंक्य जंजिर्‍याचा दिमाख सिद्दी मिरवे, त्या सिद्दीला कोकण किनारपट्टीतून हुसकावून मराठ्यांनी जंजिर्‍याच्या मर्यादेत कोंडले. पाश्चात्य शत्रूंच्या सागरी शक्तिला पुरून उरता आले पाहिजे, त्यासाठी आरमाराच्या नौकांना संकटकाळी सुरक्षा मिळावी, रसद आणि शस्त्रास्त्रे पुरवावीत, किनारपट्टीवरील समुद्री व्यापार नियंत्रणाखाली यावा हे सारे कार्य ह्या जलदुर्गांनी केले. समुद्री लाटांचा अखंड प्रहार सहन करूनही हे जलदुर्ग आजतागायत टिकून आहेत कारण त्यांची अजोड बांधणी.
 
 
 
स्वराज्याच्या उत्तरेला मुघलांचा प्रदेश-तिथे शह देण्यासाठी आणि नाशिक-बागलाण प्रदेशातील सहा घाटमार्गावरील व्यापार ताब्यात घेण्यासाठी साल्हेरसारखा किल्ला महाराजांनी स्वराज्याच्या कंठमाळेत बांधला. समुद्रसपाटीपासून सुमारे 1567 मीटर उंच असलेला हा किल्ला शिवदुर्गांपैकी सर्वात उंच आहे. कळसूबाईच्या खाली दुसर्‍या क्रमांकाचे शिखर आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे बालेकिल्ल्याचा वापर मुख्यत्व टेहळणीसाठी होई आणि तो इतका उंच त्यामुळे तटबंदी नाही. किल्ल्याच्या लोकवस्तीचा प्रमुख वावर किल्ल्याच्या माचीवरच होता. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडील कोल्हापूर प्रांतातील पन्हाळा म्हणजे प्राचीन पर्णाल पर्वत. कित्येक शतके अनेक राजघराण्यांना जवळून पाहणारा पन्हाळा हा शिवरायांनी अफजलखानवधाच्या अठराव्या दिवशी मिळवला. प्रतापगडला अफजलखानानाचा वध केला तेव्हा आनंदोत्सवात क्षणभर न घालवता पन्हाळापर्यंतचे पंधरा दुर्ग शिवरायांनी अवघ्या अठरा दिवसांत काबीज केले. इतक्या कमी काळात एवढे किल्ले मिळवणे हेही जगात कुठेच घडले नाही. खानाच्या स्वारीमुळे हे सारे किल्ले बेसावध होते, विजापूरकडे नेतोजी पालकर आणि दाभोळकडे एक तुकडी पाठवल्यामुळे निष्कंटक योजनेने राजांनी पन्हाळ्यापर्यंत मजल मारली. पन्हाळ्याचा विस्तार, त्याची दुर्गमता, भक्कम तटबंदी, मोठमोठाले अंबरखाने पाहता पुरेशा अन्नसाठ्याने हा गड कितीही काळ लढू शकतो हे सिद्दी जौहरप्रसंगी दिसून येते. कोंडाजी फर्जंदने केवळ साठ मावळ्यांना घेऊन हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला असा पराक्रमही भारताच्या इतिहासात कुठेही सापडत नाही. म्हणूनच हे शिवदुर्ग केवळ वास्तू नाहीत. मावळ्यांच्या अलौकिक पराक्रमाचे, देशभक्तीचे, राज्यनिष्ठेच्या इतिहासाचे स्फूर्तिस्थान आहेत.
 
 
shivaji maharaj
 
शिवचरित्रातील दक्षिण दिग्विजयाचा संपूर्ण अध्याय हा शिवरायांच्या राजकीय परिपक्वतेचा, दूरदृष्टीचा, प्रशासकीय अनुभवांचा, प्रादेशिक समन्वयाचा, भविष्यातील ध्येयवादी योजनांचा आणि एकंदरीत शिवरायांच्या मनातील संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचा सर्वश्रेष्ठ अध्याय आहे. आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या प्रांगणात रंगवलेल्या ह्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुघल बादशहा औरंगजेबच होता. मुघलांविरूद्ध निर्णायक युद्धाच्या काळात माघार घ्यायची वेळ आल्यास स्वतःची हक्काची संरक्षित भूमी (लरलज्ञषळशश्रव) निर्माण करण्यासाठी शिवरायांनी जिंजीपर्यंत मजल मारली. जिंजी हा एक किल्ला नाही तर कृष्णगिरी, राजगिरी, चंद्ररायगिरी असा दुर्ग समूह. शिवरायांनी जिंजी रक्ताचा थेंबही न सांडता मिळवला. मूळचे काही बांधकाम पाडून नवे उभारले. विशालतेत जिंजी पहिल्या क्रमांकावर. केवळ राजगिरीचा महादरवाजा पाहिला तर शिवदुर्ग स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना दृष्टीपथास येतो. स्वराज्याच्या संकटकाळी औरंगजेबाच्या दख्खन स्वारीत छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी राजधानी केली. कठीण प्रसंगी शत्रूला हार न जाता सात-आठ वर्षे राजाला सांभाळणारा हा भव्य दुर्ग शिवरायांच्या दूरदृष्टीचे गमक आहे.
 
 
जुन्नर प्रांतातल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. तो स्वराज्यात कधीही आला नाही तरी शिवरायांचे जन्मस्थान म्हणून ह्या दुर्गाचे स्थान मराठी इतिहासात वंदनीय आहे. इथल्या डोंगरमाळेत कोरलेली बौद्धलेणी, गुंफामंदिरे ह्या स्थळाच्या प्राचीनतेचे आणि जुन्नर बाजारपेठेची महती सांगतात.
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
ह्या बारा दुर्गांचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व निरनिराळे आहे त्याचे कारण त्यांचे राज्यकारभारातील प्रयोजन. पण तरीही शिवरायांच्या दुर्गबांधणीची काही वैशिष्ट्ये समान आढळतात. नुसत्या माच्यांचाच अभ्यास केला तरीही जगभरात लष्करी स्थापत्याची रचना किती कौशल्यपूर्ण व मुत्सुद्दी असू शकते ते कळून येते. असे भाग्य कोणत्याही किल्ल्यांच्या भाळी नाही हे लक्षात येते. सिंधुदुर्गातील बांधकामात शिश्याचा वापर सोडता सर्व किल्ल्यांच्या तटबंदीच्या बांधकामात वापरलेला चुना, शत्रूला आक्रमण न करता येणारी दरवाजाची गोमुखी बांधणी, बळकट माच्या, अभेद्य तटबंदी-बुरूज, खंदक, भरपूर पाणी व्यवस्था, अंबरखाने, दारुकोठारे अशा अलौकिक गोष्टींमुळे हे दुर्गम शिवदुर्ग सतराव्या-अठराव्या शतकातील मराठ्यांची भक्कम संरक्षण व्यवस्था समोर मांडतात. ह्या बांधकामांमध्ये नैसर्गिक स्रोतांचा सहज वापर केला आहे. पर्यावरणपूरक यंत्रणा राबवली आहे. नैसर्गिक दुर्गमतेचा योग्य वापर साधला आहे. त्यात कलात्मकता, चैनीविलासी ऐषोराम टाळून काठिण्य-बळकटीला प्राधान्य दिले आहे. ते उत्तर भारतातील मुघली, राजपुतांच्या नक्षीदार महालाचे कोट नाहीत तर स्वातंत्र्यवेदीवर आहुती देणार्‍या शूरवीरांच्या छाताडांसारखे अभेद्य अढळ सुरक्षेचे कवच आहेत. हे किल्ले मराठी स्थापत्यशास्त्राच्या भव्यतेचे दर्शन आहे. ते शिवरायांच्या मुत्सद्दी राजकारणाचा आणि गनिमी काव्याच्या युद्धशास्त्राचे आकलन करून देत आहेत.
 

vivek 
 
शिवछत्रपतींनी ज्या स्वराज्याची स्थापना केली ते लोककल्याणकारी होते, न्यायनीतिमत्तेचे होते. स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे होते. प्रजेचा सर्वांगीण विकास कसा करायचा ह्या जाणतेपणाचे होते. म्हणून ह्या दुर्गांभोवती ज्या लढाया झाल्या त्या शत्रू प्रदेशात झाल्या. ज्यांच्या कल्याणासाठी राज्य साधायचे त्यांचे सुख आणि संरक्षण महाराजांनी सर्वतोपरी मानले. किल्ल्यांसाठी लागेल तेवढा पैसा महाराजांनी उभारला कारण त्यांच्या डोळ्यासमोर बलाढ्य व सुसंरक्षित लष्करी व्यवस्था होती. बखरीतील त्यांच्याच शब्दांत मांडायचे तर- आज हजरतीस साडेतीनशे किल्ले आहेत...एकेक किल्ला एक वर्ष लढला तर आलमगीरास सर्व किल्ले घेण्यास साडेतीनशे वर्षाची उमर घ्यावी लागेल. घडलेही तसेच, औरंगजेब संपला पण स्वराज्य संपले नाही, वाढले. अटकेपार पराक्रम गाजवून मराठ्यांनी अवघा भारत व्यापला.
 
 
युनेस्कोद्वारा जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करताना अद्वितीय वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value ) हा निकष सर्वांत महत्त्वाचा आहे. वर चर्चिलेल्या शिवदुर्गद्वादशीची महती ह्या निकषांवर खरी ठरते. शिवरायांनी केलेले राजकारण, अर्थकारण, समाजकारण हे लोककल्याणकारी सत्तेचा मापदंड आहे आणि हे दुर्ग त्यांच्या राजकीय, लष्करी, व सांस्कृतिक दृष्टिकोनाची व्याप्ती दर्शवितात. पैसा-प्रतिष्ठा-सत्तालालसा-चढाओढीच्या भौतिक भोगवादात हरवलेल्या जगाला शिवदुर्गांच्या रूपात लोककल्याणाचे आदर्श मार्गदर्शन मिळणार आहे. ’स्वराज्य’ ह्या भारतीय संकल्पनेचे वैश्विक अधिष्ठान दृग्गोचर होणार आहे.
महाराष्ट्रातील शिवदुर्ग कोकणाचे आणि पश्चिम घाटमाथ्याचे नैसर्गिक सौंदर्य जपणारे आहेत. पर्जन्यधारातील धबधब्यांचे सजलेले मोत्याचे सर, कडेकपारींनी नटलेल्या हिरवाकंच शालू, दुमीर्र्ळ वनस्पती, धुक्यात हरवलेल्या दर्‍या, तीन तीन वर्षांनी रानोमाळ फुलणारे कारवीचे ताटवे, वन्य पशुपक्षी अशा कितीतरी नैसर्गिक वैभवाने हे दुर्ग समृद्ध आहेत. इथले जलदुर्ग सागरी लाटा अंगावर घेत किनारा तुला पामराला असे सागराला ठणकावत आहेत.
युनेस्कोच्या मानांकनामुळे या वास्तूंचे संरक्षण, पर्यटन वाढीस लागेल. भोवतालच्या अर्थव्यवस्थेला भरारी येईल. अनेक दुर्गवीर, दुर्गसंवर्धन संस्था हे किल्ले स्वच्छ व्हावेत, सुरक्षित राहावेत म्हणून धडपडताहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. हे शिवदुर्ग सुरक्षित होतील, मराठ्यांच्या इतिहासाचा हा भारतीय वारसा विश्वपटलावर विलसू लागेल. जगभराचे अभ्यासक-संशोधक-विशेषज्ञ इथे येऊन संशोधनाची नवनवीन क्षितिजे खुली होतील. हे सारे घडेल पण त्यासाठी सार्‍या महाराष्ट्राने एकवटून काम केले पाहिजे.
जागतिक वारसास्थळाचे मानांकन हे पहिले यश आहे. खरे काम आता करावे लागणार आहे. ऊन-वारा-पाऊस ह्या त्रयींशी सामना करीत उभे असलेले शिवदुर्ग यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन कार्य वाढीस लागले पाहिजे. दुर्गांची स्वच्छता ऐरणीवर आली पाहिजे. त्यांचे पावित्र्य राखावे म्हणून बेशिस्त अनाचारी वावरांवर बंदी आणली पाहिजे. प्रत्येक दुर्गाच्या बांधकामाचा सुयोग्य अभ्यास करून त्यातील साधनसामग्री समोर ठेवून जमेल तेवढी आणि तितकीच पुनर्बांधणी केली पाहिजे. आहे ते मराठी इतिहासाचे संचित आहे, तेच जतन करावे, नूतन काही नकोच. बागबगिचे-झाडे यांनी सुशोभित केले पाहिजे. दुर्गांची माहिती मोठे फलक-दृकश्राव्य माध्यमे, नवनवीन तंत्रज्ञानाने प्रदर्शित केली पाहिजे. ह्या कामासाठी लागणारा पैसा सरकारांनी दिला पाहिजे आणि त्यातला पै न पै त्याच्यासाठीच वापरला पाहिजे. मराठी लोकांनी ह्या वारसास्थळांना भेटी देण्यासाठी जगभरातील लोकांना प्रवृत्त केले पाहिजे, आवतान धाडले पाहिजे. देशविदेशातील दुर्ग-अभ्यासकांची आणि इतिहास संशोधकांची मांदियाळी निर्माण करण्यासाठी आवश्यक सहकार्य सर्व स्तरांवर मिळायला हवे. हे सारे करताना शिवैतिहासाच्या राष्ट्रीय प्रेरणा सर्वदूर पसरतील ते ते विचार यामागे ठायी ठायी असले पाहिजेत. येणार्‍या सर्व पिढ्यांसाठी शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी स्वराज्याचे साक्षीदार असलेले हे शिवदुर्ग जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. त्या नीतिमत्तेचे संचित सांभाळू आणि पोहोचवू शकलो तरच ह्या मानांकनाच्या अभिमानाला खरा अर्थ प्राप्त होईल.
Powered By Sangraha 9.0