समाज परिवर्तनाचा दुवा - चिरंजीव महादेव सितारे

विवेक मराठी    19-Jul-2025   
Total Views |
vivek
चिरंजीव महादेव सितारे हा भटके-विमुक्त समाजातील एक मुलगा शिकला, नोकरीला लागला. त्याने काय झाले तर त्याच्या समाजाचा दृष्टिकोन बदलला, शिक्षणाबद्दलचे गैरसमज दूर होऊन शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. एका अर्थाने चिरंजीव हा समाज परिवर्तनाचा दुवा ठरला.
 
'अरं कुठं चाललायं साळंला, शिकून तर काय व्हतयं, नोकर्‍या तर ल्हागत न्हाई! तुलाबी तेच करायचं हाय, आय-वडलांपरिस. फोटु नाय तर मालमटरेल इकायचंय. कशाला उगा साळा शिकतोय.’ शाळेला निघणार्‍या लहानग्या चिरंजीवच्या दर दिवशी कानावर पडणारे पालावरच्या जुन्या-जाणत्या लोकांचे हे शब्द. मात्र या नकारात्मक शब्दांनी त्याची शिकण्याची जिद्द काही कमी झाली नाही. शिक्षणाची कास धरूनच आज चिरंजीव राज्य उत्पादन शुल्क खात्यात जवान या पदावर कार्यरत आहे.
 
 
शिक्षणाविषयी औदासीन्यता असलेल्या समाजिक वातावरणात चिरंजीव शिकून नोकरीला लागला. परंतु त्याचा हा प्रवास सरळ नव्हता. अनेक वळणे घेत त्याच्या आयुष्याची गाडी आता कुठे स्थिरावते आहे. स्वतःच्या कुटुंबाचाच एक पाल होईल, एवढा भलामोठा कुटुंबकबिला. उदरनिर्वाहासाठी गावागावांतून नव्हे तर राज्याराज्यांतून भटकंती करणारा हा एक भटका समाज.
 
 
उगवतीला चूल पेटली तरी मावळतीला पेटेलच याची खात्री नाही. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धेचा पगडा, उपासमार, रोगराई जणू पाचवीला पुजलेली. अशा परिस्थितीत मुलांनी शाळा शिकावी, हा विचारही त्यांच्या डोक्याला शिवला नसेल तर नवल ते काय!
 
ढकलगाडीप्रमाणे दुसरीपर्यंत म्हणायला शिक्षण झालं, पण त्यातून अक्षरओळखीपुरतंही ज्ञान पदरी पडलं नव्हतं. अशात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि यमगरवाडीचे तुकाराम (अण्णा) माने चिरंजीवच्या सोलापूरच्या वडाळा गावातील पालावर भेटीकरता आले. तुकाराम माने हे यमगरवाडीचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.
 
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबत कला, क्रीडा, कौशल्याधारित शिक्षण तेही नि:शुल्क देण्याचा प्रामाणिक प्रयत्न समाजाच्या सज्जनशक्तीच्या साथीने संघप्रणित यमगरवाडीच्या माळरानावरील आश्रमशाळेत केला जातो. उदरनिर्वाहासाठी वणवण भटकणार्‍या आपल्याच समाजबांधवांच्या मुलांच्या वाटेला ही कुतरओढ नको. त्यांनी शिकून मोठं व्हावं, त्यांच्या आयुष्याला स्थिरता यावी. एकंदर शिक्षणापासून वंचित अशा भटके-विमुक्तांच्या लेकरांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य धारेत आणण्याच्या शुद्ध हेतूपोटी यमगरवाडीच्या उजाड माळरानावर भटके-विमुक्तांच्या निरागस गोंडस फुलांना आकार देऊन माळरान फुलवण्याचा ध्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतला. हा समाजव्यापी विचार फक्त ’यमगरवाडीच्या शाळेला मुलांना पाठवा, कुठला बी खर्च न्हाय की विक्रीसाठी बाहेर गेला तर मुलांची चिंता न्हाय. शिकून पोरं मोठी हुतील आणि तुमचं नाव रोशन करतील’, एवढ्या साध्या-सोप्या शब्दांत माझ्या आईवडिलांना अण्णांनी राजी केलं, असं सांगताना चिरंजीव आनंदला होता.
 
शाळेच्या तिसर्‍या वर्षाला यमगरवाडीच्या नंदनवनात चिरंजीवचा प्रवेश झाला. नंदनवन असलं तरी सुरुवातीला मन रमलं नाही. राहून राहून एकच प्रश्न मनात ठाण मांडून होता,‘आपण काय पाप केलंय म्हणून इतर समाजाच्या मुलांप्रमाणे कुटुंबात राहून आपलं शिक्षण होऊ शकत नाही?’ दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि रूढार्थाने कुटुंब आणि आश्रमशाळा यात फरक असला तरी यमगरवाडी शाळेची बात काही औरच आहे याचा अनुभव येऊ लागला. आबा, मामा, दादा, तात्या, अक्का, ताई अशा घरच्या नात्याप्रमाणे तेथील शिक्षक, पर्यवेक्षक यांना हाक मारली जाई. घरापासून दूर असलेल्या लेकरांना आपसूकच या उच्चाराने एक कौटुंबिक जिव्हाळा वाटत होता. हा कुटुंबासारखा व्यवहार मुलांना शिक्षण घेण्याबरोबर जीवन जगण्याचे बळ देत होता.
 
यमगरवाडी ही संघप्रणित आश्रमशाळा असल्यामुळे संघ प्रचारक, संघविचारधारेच्या संस्था-संघटनांचे कार्यकर्ते एकलव्य विद्या संकुलास भेट देण्यास येतच असत. प्रचारक मुक्कामी असले की, आज आपल्याला आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी हमखास मिळणार याने यमगरवाडीतील मुलं खूश असायची. कारण अशा कार्यकर्त्यांच्या भेटींमधून आणि गप्पागोष्टींमधून भारतीय मूल्यविचारांची रुजवण आपोआप होत असे. आपला धर्म, चालीरिती, आपले सण-उत्सव, परकीयांच्या आक्रमणाला आपल्या शूरवीरांनी शौर्याने केलेली मात, पूर्वजांनी धर्मरक्षणार्थ दिलेले बलिदान, भेदाभेद अमंगळ ही संताची शिकवण व्यवहारात आणण्याचे धडे असं बरंच ज्ञानार्जन होत असे.
 
’उदरनिर्वाहासाठी भटंकती करणारा, पोटाची खळगी भरण्याची चिंता असलेला हा समाज कधीच स्थिर नसल्याने संस्कृती तरी कशी जपणार? हे जरी सत्य असले तरी आम्हा मुलांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि महत्ता रूजवण्याचे आणि त्याचे संवर्धन करण्याचे बाळकडू दिले जात होते. तसेच देशसेवेसाठी घरदार सोडून समरस समाजाच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी समर्पण वृत्तीने कार्य कसे करावे याचा वस्तूपाठ प्रचारकांच्या जीवनातून यमगरवाडीतील मुलांवर होत होता’, असंही चिरंजीव संवाद साधताना कृतार्थ भावाने सांगत होता.
 
मातीला आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात, ते यमगरवाडीतील सर्व शिक्षकवृंद केवळ शालेय अभ्यासक्रम शिकवत नसत तर आईबाप घेत असलेल्या कष्टाची जाणीव आणि उच्च शिक्षण घेऊन मोठं होण्याचे बळदेखील देत असत. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात ऋणानुबंध तयार होतो. कारण प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आपुलकीच नातं येथील शिक्षक निर्माण करतात. इतर शाळेप्रमाणे वेळेच बंधन एकलव्य विद्या संकुलात नाही. शिक्षणासंदर्भात एखादी शंका असो वा व्यक्तिगत समस्या येथील शिक्षक शाळेच्या तासाबाहेरही मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असतात. कोणताही विषय असो तो सोपा करून सांगण्याची हातोटी येथील शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्या योग्य दिशेने विकसित करण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच यमगरवाडीतील मुले क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरांपर्यंत आपली मोहोर उमटवीत आहेत.
 
एकलव्य विद्या संकुलातील काही प्रसंग चिरंजीवच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले; ते त्याच्याच शब्दात,“विनोबा भावेंच्या धड्याचे तुम्हाला आकलन झाले तेवढे सांगा, असं मेहेत्रे मामांनी सांगितलं. मला जेवढं आकलन झालं ते मी सांगितलं. दुसर्‍या दिवशी सर्वांच्या समोर त्यांनी मला पेन बक्षीस दिलं. ते माझं पहिलं बक्षीस, त्याचं माझ्या आयुष्यातील स्थान मोलाचं आहे. असाच एक दुसरा प्रसंग उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आलेलो. सायकल चालवताना पडलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला. मदतीशिवाय कुठलंही काम करता येईना. आईच्या मायेने शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू होऊन दिवस सरले तरी चिरंजीव शाळेत का येईना, म्हणून शाळेचे अधिक्षक फुलाजी ताटीकुंडलवार (आबा) घरी आले. शिक्षणात तुमचं पोरगं हुशार आहे, त्याची सगळी काळजी आम्ही घेऊ, तुम्ही निश्चिंत रहा, असं ते वारंवार आणि असंख्य वेळा सांगण्यासाठी आमच्या घरची वारी करीत होते. पण आईची माया ऐकायला काही तयार नव्हती. अशातच एके दिवशी पुन्हा आबा आले ते शेंडगे सरांचं विद्यार्थ्याने शिकावं ही तळमळ प्रकट करणारे पत्र घेऊन. शेंडगे सरांच ते पत्र अजूनही मी जपून ठेवलं आहे. आबाचं वारंवार घरी येणं आणि शेंडगे सरांच ते पत्र आलं नसतं तर शाळेकडे मी कधी वळलो नसतो. आज आहे त्या ठिकाणची कल्पना तर अशक्यच.’
 
असं सारं असतानाही जातीच्या चुकीच्या नोंदीमुळे आठवी-नववी दरम्यान यमगरवाडी सोडावी लागली. या दोन वर्षांत यमगरवाडी शाळेची आठवण सतावत होती. या दोन वर्षांत ज्या शाळेत शिकत होतो, तिथे जातीनेच हाक मारत, कधी आमचं नावही उच्चारलं नाही. खालच्या जातीचे असल्यामुळे नेहमी तुच्छ भावानेच वागवायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पुन्हा यमगरवाडीच्या शाळेशी संपर्क आला. जातनोंदीची प्रक्रिया आता यमगरवाडीत यशस्वी पूणर्र् केली जाते, तेव्हा पुन्हा यमगरवाडीत प्रवेश घेण्यासंबंधी चिरंजीवला सुचविण्यात आले. शाळेविषयी कृतज्ञ भावाने चिरंजीव सांगत होता की, आमच्या यमगरवाडीच्या शाळेला तेव्हा सातवीपर्यंतच सरकारी अनुदान होते. मी दहावीत शिकणारा विद्यार्थी. माझ्या शिक्षणाचा शाळेला अतिरिक्त खर्च होणार होता आणि नापास झालो असतो तर शाळेच्या दहावीच्या निकालावरही परिणाम होऊ शकत होता. पण कुठलीही पर्वा न करता मुलांचे आयुष्य घडविण्याची धडपड यमगरवाडीतील शिक्षकांना स्वस्थ बसू देत नव्हती.
 
दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे स्वाभाविक असलं तरी यमगरवाडीतील शिक्षक व शिक्षकेतर मंडळी दहावीनंतरही अगदी आयुष्यात स्थिरावण्यापर्यंत मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका चोख बजावत असतात, हे चिरंजीव स्वानुभावरून सांगत होता. दहावीला शाळेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल चिरंजीवाला राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं. क्षणाचाही विलंब न करता डॉ. अभय शहापूरकरांना फोन लावला आणि धाराशिवला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला. माझ्या या प्रवासात यमगरवाडी, संघ, परिवारातील लोकांची साथ लाभली. डिप्लोमा झाल्यावर सोलापूरमध्ये मेकेनिकल इंजिनियरिंगही केले. शिक्षणाचा भार उचलण्याबरोबरच उच्च शिक्षणाची जिद्द कायम ठेवण्याचे बळ आणि समजुतीच्या गोष्टीही परिवारातील कार्यकर्त्यांनी सांगितल्या, म्हणूनच मी इथपर्यंत पोहचू शकलो हा भाव त्याच्या संवादातून प्रकट होत होता.
 
सरकारी नोकरीत रूजू होण्याचे चिरंजीवचे स्वप्न होते, पण त्या स्वप्नांना दिशादर्शनासोबत अनेक पथिकांची साथही संघ परिवाराने त्याला दिली. स्पर्धा परिक्षांचा खडतर अभ्यास करून आरटीओ पोस्टसाठी प्रवेश परिक्षा दिली. त्या वेळेस तिथेे प्रवेश भरती तूर्तास स्थगित केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान या पदावर प्रवेश भरतीसाठी प्रयत्न केला, उत्तीर्ण झाला आणि आता त्या पदावर कार्यरत आहे. गृह विभागातील हे एक खाते आहे. या विभागातर्फे अमली पदार्थांची अवैधरित्या तस्करी, मालवाहतूक, मालनिर्मिती इ. ला रोख लावणे, गुन्ह्यांना आळा घालणे या स्वरूपाचे काम असते. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर रूजू होण्याचा चिरंजीवचा मानस आहे.
 
तुझ्या समाजाच्या उत्थानासाठी कशा प्रकारे प्रयत्न करीत आहेस, यावर चिरंजीव म्हणाला की,“कुठलाही समाज वाईट नसतो. त्याची परिस्थिती त्याला वाईट बनवते. ज्या विचारधारेच्या लोकांसोबत राहतो, त्या पद्धतीची विचारधारा आपली बनत जाते. आमचा समाज कायमच गावकुसाबाहेर राहिला. समाजाच्या मुख्य धारेपासून कायमच तुटलेला, समाजव्यवहार सोडा, पण साधं माणूस म्हणून जगणंही आमच्या समाजाला माहीत नव्हतं. आपुसकच उरी कोणती मोठी स्वप्नं नाहीत, दूरदृष्टीचा अभाव, ना भविष्याची चिंता अशी अवस्था. खरं तर आमचा समाज कला सादर करून जगणारा, कालचक्रात करमणुकींच्या साधनांच्या महासागरात हरवून गेला. पोटाची खळगी भरण्यासाठी बाजारात देवदेवतांचे फोटो, तर कधी इतर छोट्यामोठ्या गोष्टी दारोदार विकू लागला. भटकंती काही सुटली नाही.
अशा समाजातील मुलगा शिकून नोकरीला लागला हेच आमच्या समाजासाठी अप्रूप. समाजाचा दृष्टिकोन बदलला, शिक्षणाबद्दलचे गैरसमज दूर होऊन शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे, हे समाज परिवर्तन शक्य झाले ते यमगरवाडीमुळे. आता मी सांगितलेल्या चार गोष्टी आमच्या पालावर ऐकल्या जातात. यमगरवाडी शाळेत आता आमच्या समाजाच्या मुलांची प्रवेश घेण्याची संख्या वाढली आहे. ‘अरं कुठं चाललायं साळंला, शिकून तर काय व्हतंय?’ हा प्रवास आता,‘जा की साळंला, शिकून मोठ्ठा सायब व्हो’, इथपर्यंत झाला आहे, हे सांगताना चिरंजीवचा उर भरून आलेला.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.