लाल मिरचीचे आगार नंदुरबार!

21 Jul 2025 18:04:16
 
nadurbar
 
@डॉ. वैभव गुर्वे
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या)
9665209799
@जयंत उत्तरवार
विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी)
8208027544
नंदुरबार हा जिल्हा ’लाल मिरची’साठी प्रसिद्ध आहे. येथील नंदुरबार, शहादा, तळोदा या तालुक्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गत वर्षी या लाल मिरचीला ‘भौगोलिक मानांकन’ मिळाले आहे. त्यामुळे नंदुरबार ‘लाल मिरची’चा लौकिक देशभर पसरला आहे.
मिरची हे महत्त्वाचे मसाले पीक. ’भारतीय करी’ पावडर परदेशात खूप लोकप्रिय आहे. याकरिता भारतीय मिरचीला देश-विदेशातून चांगली मागणी असते. महाराष्ट्रात नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर, जालना, नाशिक, लातूर, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यात मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अलीकडेच नागपूरच्या ’भिवापूर मिरची’ला आणि नंदुरबारच्या ’लाल मिरची’ला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या मिरचीचा तिखटपणा, रंग, चव आणि तिचा ठसका राज्यातच नव्हे तर देशात पसरला आहे.
 
 
नंदुरबार हा नर्मदा व तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा जिल्हा. सातपुड्याची डोंगराळ रांग, बेसाल्ट खडकाच्या विघटनातून तयार झालेली बारीक चिकणमाती आणि सुपीक माती ही शेतीसाठी उपयुक्त मानली जाते. विशेषतः ज्वारी, बाजरी व मिरची यांसारख्या पीकांसाठी वरदान समजली जाते. म्हणून इथल्या लाल मिरचीची चव देशभर पसरली आहे. जनजातीबहुल असलेल्या जिल्ह्याची ओळख आता ’लाल मिरचीचे आगार’ म्हणून होत आहे. नंदुरबार, शहादा व तळोदा इ.तालुक्यात मिरचीचे गेल्या तीनशेहून अधिक वर्षांपासून उत्पादन घेतले जाते. साधारणतः 3200 हेक्टर क्षेत्रावर शेतकरी मिरचीची लागवड करतात. नंदुरबार तालुक्यातील कोठली, लहान शहादे, खोंडामळी, सजुलापूर व शहादा तालुक्यातील कुठावद, धुरखेडा, म्हसावद आणि तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, रांझणी, बोरद आदी गावातील शेतकर्‍यांनी अनेक पिढ्यांपासून मिरचीचे पारंपरिक बियाणे टिकवून ठेवले आहे. त्यामुळे तिची चव आणि गुणवत्ता आजही टिकून आहे.
 
 
लाल मिरचीची वैशिष्ट्ये
 
 
नंदुरबार लाल मिरची ही इतर मिरच्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. ही मिरची तिखट असून तिच्यामध्ये ’कॅप्सॅसिन’ नावाचे रसायन आहे. त्यामुळे अन्नाची चव वाढते. सुकवलेल्या मिरच्यांमध्ये सुगंध टिकून राहतो. नैसर्गिकरित्या मिळालेला गडद लाल रंग मसाल्यांना आकर्षक बनवतो. मिरचीची पाने अंडाकृती असतात. पोटॅशियम 332 मि. लि. ग्रॅम, कार्बोहायड्रेट प्रति 9 ग्रॅम, प्रथिने 1.9 ग्रॅम आणि लांबी 9 ते 11 सें. मी. असते. ही मिरची योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास आठ ते दहा महिने खराब होत नाही. मिरचीचा हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होऊन मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत असतो. विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील हवामान मिरचीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकरी पावसाळा आणि हिवाळा या दोन हंगामात मिरचीची लागवड करतात. यासाठी शेतकरी ’संकेश्वरी, ’जी-4 सेगमेन्ट’ व स्थानिक वाणांच्या मिरचीला पसंती देतात. हिरव्या मिरचीचा पहिला तोडा 50 दिवसांनी होतो. लाल मिरचीचे तीन ते चार तोडे होतात.
 
 
सर्वात मोठी मिरची बाजारपेठ
 
 
देशातील मिरचीची दुसर्‍या क्रमाकांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. शेजारील गुजरात व मध्य प्रदेशातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. विशेषतः मध्य प्रदेशातून मोठी आवक होते. गत वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची विक्रमी आवक झाली होती. बाजार समितीत 60हून अधिक मिरची व्यापारी आहेत. हे व्यापारी शेतकर्‍यांकडून ओली लाल मिरची खरेदी करतात. नंतर ती वाळवून देशातल्या विविध बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. इथल्या मिरचीचा दर हंगाम व गुणवत्तेवर अवलंबून आहे.
 
 
मिरची प्रक्रिया उद्योगात दबदबा
 
मिरची प्रक्रिया उद्योगात नंदुरबार शहराने दबदबा निर्माण केला आहे. या शहरात मिरचीचे 50हून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योग आहेत. त्यामुळे मिरची उद्योग हा येथील अर्थव्यस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ’राजकमल ब्रँड’, ’महादेव मसाले’, ’तुलसी मसाले’, ’राजा छाप’ यासारखे नामांकित उद्योग मिरचीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून अधिक नफा मिळवत आहेत. याखेरीज नंदनगरी शेतकरी उत्पादक कंपनी मिरची लागवड, प्रक्रिया आणि विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 


nadurbar 
 
भौगोलिक मानांकन व फायदे
 
नंदुरबारच्या मिरचीला भौगोलिक मानांकन व लागवड क्षेत्र वाढविण्यात डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषि विज्ञान केंद्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मधल्या काळात बदलते हवामान, दुष्काळ व रोगराईमुळे मिरची लागवडीला फटका बसला होता. शेतकरी मिरची ऐवजी कापूस व इतर नगदी पीकांकडे वळला होता. त्यामुळे लाल मिरचीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. यावर उपाय म्हणून डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने मिरची उत्पादकांना संघटित करून आधुनिक पद्धतीने मिरची लागवडीसाठी प्रोत्साहित केले. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवड क्षेत्रात वाढ होण्यास मदत मिळाली.
नंदुरबार मिरचीची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी यासाठी नाबार्डच्या पुढाकाराने भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव सादर केला. नंदुरबार लाल मिरचीची वैशिष्ट्ये, उत्पादन पद्धती, हवामानाचा परिणाम या संदर्भात शास्त्रीय व भौगोलिक माहिती संकलनात या दोन संस्थांनी पुढाकार घेतला. तपासणी व परीक्षणानंतर चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री कार्यालयाद्वारे नंदुरबार मिरचीला 30 मार्च 2024 रोजी भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले. यामुळे ’नंदुरबार मिरची’ हा एक अधिकृत ब्रँड म्हणून ओळखला जात आहे. सध्या नाबार्डच्या सहकार्याने डॉ. हेडगेवार सेवा समितीतर्फे मिरचीच्या भौगोलिक मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. यात पहिल्या टप्प्यात एक हजार शेतकर्‍यांची नोंदणी होणार आहे. यामध्ये मिरचीचे पीक घेणार्‍या शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
 
सरकारकडून अपेक्षा
 
नंदुरबार जिल्ह्यात मिरची क्लस्टर निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांना मिरची लागवड ते प्रक्रिया व विक्रीचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिवाय मिरची वाळविण्यासाठी वाळवणी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी अपेडा संस्थेचे मार्गदर्शन केंद्र व निर्यात सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
 
 
नंदुरबारच्या या वैशिष्ट्यपूर्ण पीकांकडे सरकारने पाठबळ दिल्यास शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यास वेळ लागणार नाही.
 
- डॉ. हेडगेवार सेवा समिती-कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
Powered By Sangraha 9.0