प्रवास एका कृषी उद्योजकाचा

21 Jul 2025 18:08:30
book 
कृषी उद्योजक डॉ. टी. टी. पाटील यांचे जीवन व काळ यांचा उत्तम आढावा घेणारे असे ’यशोगाथा संघर्षाची टी. टी. पाटील’ हे आत्मथकथन होय. खानदेशातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून एक शेतकरी मुलगा उभा राहतो, जिद्दीने स्वतःचा उत्कर्ष साधतो आणि राष्ट्रीय पातळीवरील ’महाफिड स्पेशालिटी फर्टिलायझर इंडिया प्रा. लि.’कंपनीचा संस्थापक कसा होतो, याची ही कथा आहे. मे 2024 मध्ये वयाच्या 76व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
’उद्योजक’ या विषयावर अलीकडच्या काळात विपुल साहित्य निर्माण होत आहे. जी. डी. बिर्ला, जे. आर. डी. टाटा, रतन राटा, शंतनुराव किर्लोस्कर, धीरूबाई अंबानी, लक्ष्मी मित्तल, नारायण मूर्ती, विठ्ठल कामत या सर्व भारतीय उद्योजकांचे कर्तृत्व जसे अफाट आणि वेधक आहे, तसेच आपल्या आसपास अनेक लहानमोठे उद्योजक वावरत असतात. त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून दूर असतात. हे उद्योजक काहीतरी नवीन करून दाखविण्याच्या प्रेरणेने भारलेले असतात. यश मिळविण्यासाठी त्यांची सतत धडपड व मेहनत चालू असते, अशा माणसांबद्दल आपल्याला कौतुक असते. ’यशोगाथा संघर्षाची डॉ. टी. टी. पाटील’ या आत्मकथनातील कहाणी अशीच आहे. या आत्मकथनाचे शब्दांकन करण्याचे कायर्र् डॉ. पद्मश्री पाटील यांनी केले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा प्रतिकूल परिस्थितीशी अविरत झगडत गुणोत्कर्ष कसा साधतो आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान कसे देतो, हे सांगणारे आत्मकथन आहे.
 
 
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या धांद्रे (ता. शहादा) या छोट्याशा गावात डॉ. त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (टी. टी. पाटील) यांचे बालपण गेले. एकत्र कुटुंब, गावाची जीवनदायिनी ’म्हैस’ नदीच्या अथांग पात्रात सवंगड्याबरोबर मारलेले सूर, ’धांद्य्रांची मिरची’ हा खानदेशातील ब्रँड. स्वतः ही पिकवलेली लाल मिरची बाजारात नेऊन विकणे, नाना गुरुजींनी दाखविलेली शिक्षणाची वाट, चौथी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे, काही लोकांच्या आग्रहास्तव तालुका मास्तरापुढे बसून पुन्हा चौथी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविणे, चुणूक दाखविणे आणि अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा बालविवाह होणे, एका अर्थाने हा पाऊण शतकापूर्वीचा गावाच्या चालीरितींचा इतिहास आहे.
 
 
शिकण्यावाचून उन्नती नाही हे ओळखून ते कष्टातही शिकत राहिले. दोंडाईत वसतिगृहात राहून हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एम. एस्सी.(अ‍ॅग्री)ला विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शिक्षण व घरखर्चासाठी केलेला कँटीनचा व्यवसाय, पत्नी सिंधू हिची मिळालेली साथ, कुटुंबाची झालेली वाटणी, शेतीत पपई - भाजीपाल्याचे केलेले यशस्वी प्रयोग व भावंडांचे पालकत्व अशी विविध आव्हाने त्यांनी पेलली. अशा प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाटील यांची मानसिक, भावनिक आणि बौद्धिक वाढ झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी संधीची दारे उघडत गेली. झुआरी कंपनीसाठी धुळे जिल्हा विक्री प्रतिनिधी म्हणून काम केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुणवत्तेवर सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. त्यांची कृषी क्षेत्रात सरकारी नोकर म्हणून काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. त्यांना प्रत्येक वेळी यशच मिळाले असे नाही. काहीवेळा चार पावले माघार घ्यावी लागली, पण पाटील कधी जिद्द हरले नाहीत. गोळेगाव (औंढा नागनाथ) येथील कृषी प्रकल्पावर प्रभारी प्रक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांनी संकरित ज्वारी-बाजरी मातृ व पितृ वाणांचा पायाभूत बियाणे उत्पादनांचा कार्यक्रम यशस्वी केला. पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तिन्ही हंगामांत तो राबवून मराठवाडा विद्यापीठाने बीजोत्पादनात प्रथम क्रमांक मिळविला. हे यश त्यांच्या यशस्वी प्रवासातील मैलाचा दगड ठरले.
 
 
प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मालकीचे शेत असल्याप्रमाणे मेहनत घेतली. स्वतःचा उत्कर्ष साधला. महत्त्वाकांक्षा, जिद्द, प्रामाणिकपणा, विजिगिषु वृत्ती, व्यवस्थापकीय कौशल्ये आणि सकारात्मक वृत्ती त्यांना यशाकडे घेऊन गेली. भारतीय बीजोत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) उत्पादनप्रमुख-(1980 ते 1990) जबाबदारी सांभाळताना बीजोत्पादन कार्यक्रमात क्रांती घडवून आणली. याच कालावधीत ’महाबीज’ला भारत सरकारतर्फे ’राष्ट्रीय उत्पादकता’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी संशोधक वृत्ती आणि मेहनतीच्या जोरावर ’महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत मजल मारली. माणसाच्या आयुष्यात एखादी संधी चालत येते. त्या संधीचा आपण योग्य तर्‍हेने उपयोग करून घेतला तर तीच संधी आपले आयुष्य बदलून टाकते. अशीच एक संधी पाटील यांच्या वाट्याला आली. भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या हैदराबाद येथील ’नागार्जुन फर्टिलायझर्स लि.’या कृषी कंपनीचे ’सी. ई. ओ’ म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. या ठिकाणी नवनवीन प्रयोग राबविले.
 
 
मराठी माणसाच्या रक्तात उद्योग नाही असे बरेचदा उपहासाने म्हटले जाते, पण हे खरे नाही. अनंत अडचणी उभ्या ठाकल्या तरी त्यावर मात करून मराठी माणसाची आता उद्योग करण्याची मानसिकता झाली आहे. हे टी. टी. पाटील यांच्या जीवनचरित्रातून कळते. पाटील यांच्या स्वभावातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे उद्यमशीलता. भविष्यातील विद्राव्य खताची बाजारपेठ त्यांना खुणावत होती. आपण आपला स्वतःचा विद्राव्य खत कृषी उद्योग सुरू करावा असे पाटील यांना खूप वाटत होते. 1995 साली पुण्यात बँकेकडून तेरा लाखांचे कर्ज घेऊन ’पायोनियर अ‍ॅग्री टेक्नोस्कॅन अ‍ॅण्ड एक्सपोर्ट प्रा.लि. कंपनी’ची स्थापना केली. या आवडीच्या क्षेत्रात त्यांनी अल्पवाधीतच जम बसवला. सध्या ही कंपनी ’महाफिड स्पेशालिटी फर्टिलायझर इंडिया प्रा.लि’ नावाने परिचित आहे. ’महाफिड ब्रँड’ला शेतकर्‍यांकडून उत्तम प्रतीची विद्राव्य खते म्हणून मान्यता मिळाली आहे. आज कंपनीचे एकूण बारा राज्यांत जाळे पसरले आहे.
 
 
पाटील यांचा ध्येयप्रवास हा मार्गदर्शक आहे. प्रत्येक आव्हान झेलत, संधीचे सोने करण्याची धडपड करणार्‍या आणि महत्त्वाच्या टप्प्यांवर अचूक निर्णय घेणार्‍या या कृषी उद्योजकाचा प्रवास प्रत्येकाकरिता स्फूर्तिगाथा आहेे. त्यामुळे डॉ. पद्मश्री पाटील यांनी शब्दांकित केलेले हे चरित्रोपनिषद नवउद्योजकांना निश्चितच दिशा देईल, अशी आशा आहे.
पुस्तकाचे नाव : यशोगाथा संघर्षाची टी. टी. पाटील

शब्दांकन ः डॉ.पद्मश्री पाटील

प्रकाशक ः श्रीमती सिंधुबाई त्र्यंबकराव पाटील

पृष्ठ संख्या ः 282

मूल्य ः 450/-
Powered By Sangraha 9.0