भारतीय अवकाश मोहिमा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य

विवेक मराठी    25-Jul-2025
Total Views |
vivek
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
 @अर्चित गोखले 
 
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था किंवा भारतीय अवकाश मोहिमा हा सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय बनला आहे. इस्रोच्या स्थापनेला ह्या वर्षी 56 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. ह्या लेखात आपण भूतकाळातील भारतीय अवकाश मोहिमा, वर्तमान मोहिमा त्याचबरोबर भविष्यातील मोहिमांबद्दल जाणून घेणार आहोत.
 
 
भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून सी.व्ही. रमण, होमी भाभा, विक्रम साराभाई असे अनेक शास्त्रज्ञ भारताच्या विज्ञानातील प्रगतीसाठी प्रयत्नशील होते. अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानावर महत्त्वाचा अभ्यास सुरू होता. विज्ञान संशोधनाला समर्पित संस्था असावी ह्या हेतूने 1945 मध्ये जे.आर.डी. टाटांच्या सहाय्याने होमी भाभांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1954 साली तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ह्यांनी होमी भाभांच्या नेतृत्वात डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी स्थापन केली. अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञान ह्या दोन्ही क्षेत्रांत भारत विकसित व्हावा ह्या उद्देशाने शास्त्रज्ञ काम करत होेते. डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी अंतर्गत अवकाश तंत्रज्ञानाला समर्पित इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (इन्कोस्पार) ही समिती डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या नेतृत्वात 1962 साली स्थापन झाली. इन्कोस्पारने थिरुवनंथपुरम येथील थुंबा ह्या ठिकाणी भारताचे पहिलं प्रक्षेपण केंद्र (लाँच स्टेशन) उभारले. हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ असल्याने ह्या ठिकाणाची निवड करण्यात आली.
 
 
साराभाई ह्यांच्या नेतृत्वात ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारताच्या प्रक्षेपकांवर काम करत होते. 1963 मध्ये नासाने विकसित केलेलं नाईकी - अपाचे नावाचे साऊंडिंग रॉकेट थुंबा येथून अवकाशात प्रक्षेपित झाले. अशा प्रकारची साऊंडिंग रॉकेट भारतात बनवण्याचं शास्त्रज्ञानांचं ध्येय होतं आणि 1967 मध्ये रोहिणी (ठक-75) नावाचं भारताने विकसित केलेलं पहिलं साऊंडिंग रॉकेट थुंबा येथून अवकाशात प्रक्षेपित केलं गेलं. 15 ऑगस्ट 1969 रोजी इन्कोस्पारचं रूपांतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमध्ये झालं. 1972 मध्ये भारत सरकारने डिपार्टमेंट ऑफ स्पेसची स्थापना केली.
 
 
1975 मध्ये पूर्णतः भारतात निर्माण झालेला उपग्रह आर्यभट्ट रशियाच्या कॉसमॉस नावाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. त्या काळी भारतात उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करू शकणारा प्रक्षेपक नसल्याने रशियाच्या प्रक्षेपकाची मदत घेण्यात आली. शास्त्रज्ञांनी लगेच भारतीय प्रक्षेपकांवर संशोधन सुरू केलं आणि उपग्रह प्रक्षेपित करणारे सशक्त प्रक्षेपक निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं.
 
 
1980 साली भारताच्या प्रक्षेपकाच्या मदतीने भारताचा उपग्रह रोहिणी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित झाला. सॅटेलाईट लाँच व्हेईकल (एस.एल.व्ही) हे प्रक्षेपक तेव्हा भारताने विकसित केलं होतं. दरम्यान 1971 साली श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्र (लाँच स्टेशन) कार्यरत झालं होतं. एस.एल.व्ही ह्या प्रक्षेपकात वापरलं जाणारं इंधन घन स्थितीतील होतं. त्यानंतर घन स्थितीतील इंधन असलेलंच ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेईकल (ए.एस.एल.व्ही) इस्रोने विकसित केलं. परंतु दुर्दैवाने त्याची पहिली काही उड्डाणं अयशस्वी झाली. अवकाशात अत्याधिक अचूकतेने प्रक्षेपण करण्यासाठी आणि अवजड उपग्रह अवकाशापर्यंत नेण्याची क्षमता असलेलं प्रक्षेपक निर्माण करण्यासाठी भारताला द्रवरूपी इंधनाचा वापर समजून घेणं गरजेचं होतं. त्या काळी फ्रान्समध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध होतं. हे तंत्रज्ञान फ्रान्सकडून घेण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार झाला. त्याप्रमाणे 100 मॅन इयर्स (एका माणसाने एका वर्षात केलेलं काम, अशी 100 वर्ष, पण अनेक मनुष्यांनी एकत्र काम केल्याने हा कालावधी कमी होतो) च्या बदल्यात आपल्याला द्रव इंधनाचं तंत्रज्ञान दिलं. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून 1985 मध्ये भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायणन ह्यांनी विक्रम अंबालाल साराभाई ह्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून विकास नावाचं इंजिन भारतात विकसित केलं. द्रवरूपी इंधन असलेलं विकास इंजिन ज्यामध्ये वापरलं गेलं असं पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पी.एस.एल.व्ही) हे प्रक्षेपक भारताने विकसित केलं आणि 1993 साली ह्या प्रक्षेपकाने पहिलं उड्डाण केलं. पी.एस.एल.व्ही ह्या प्रक्षेपकाचा इस्रोच्या सर्वाधिक मोहिमांमध्ये समावेश झाला. 2008 मध्ये प्रक्षेपित झालेलं चांद्रयान 1, 2013 मधील मंगळयान, अशा अनेक महत्वाच्या मोहिमा इस्रोने पी.एस.एल.व्ही च्या विविध प्रकारांचा वापर करून यशस्वी केल्या.
 
 
त्याहून अवजड जवळजवळ 4 टन वजन असलेले उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी क्रायोजनिक इंधनाचा वापर गरजेचा असतो. क्रायोजनिक ह्या टप्प्यात द्रवरूपी ऑक्सिजन आणि द्रवरूपी हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती त्या प्रक्षेपकामध्ये असते. असं क्रायोजनिक इंधन वापरणारं जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच वेहिकल (जी.एस.एल.व्ही) इस्रोने विकसित केलं. ह्याच प्रक्षेपकाचा आधुनिक प्रकार लाँच व्हेईकल मार्क -3 (एल.व्ही.एम 3) ह्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने चांद्रयान 3 प्रक्षेपित केलं गेलं. 2023 मध्ये भारताने इतिहास घडविला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. भारताचा चांद्रयान प्रकल्प अनेक टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे. त्यामध्ये चंद्रावर अलगद उतरणं हा टप्पा आपण यशस्वीरित्या पार केला आहे. चंद्राच्या संशोधनासाठी चांद्रयान प्रकल्पातील पुढील मोहिमा लवकरच चंद्राकडे प्रक्षेपित केल्या जाणार आहेत. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल 1 हा उपग्रह प्रक्षेपित केला. आदित्ययान पुढील सुमारे पाच वर्षे सूर्याचा महत्त्वपूर्ण अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर मानवाला अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोने गगनयान प्रकल्प हाती घेतला आहे.
 
 
शुभांशू शुक्ला ह्यांच्या अनुभवाचा गगनयान मोहिमेसाठी खूप फायदा होणार आहे. 2027 मध्ये गगनयान प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. ह्यातील पहिल्या तीन उपग्रहांमध्ये माणसाचा समावेश नसणार आहे. ह्यातील तिसर्‍या उपग्रहातून व्योममित्रा नावाची यंत्र मानव अवकाशात जाणार आहे. ह्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारतात विकसित झालेल्या यानातून मानव पहिल्यांदा अवकाशात जाईल. 2028 रोजी चांद्रयान 4 प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. ह्या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक, माती ह्याचा अभ्यास करण्यासाठी ह्या गोष्टी चंद्रावरून पृथ्वीवर आणल्या जातील. ह्या मोहिमेसाठी आणि गगनयान मोहिमेसाठी अंतराळात दोन उपग्रह जोडण्याची म्हणजेच डॉकिंगची प्रक्रिया करता येणं अत्यावश्यक आहे.
 
 
इस्रोने 16 जानेवारी 2025 रोजी दोन उपग्रहांचं यशस्वी डॉकिंग केलं आणि चांद्रयान 4 आणि गगनयानसाठी आपला मार्ग मोकळा झाला. 2029 रोजी जपान आणि भारताच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान 5 अवकाशात झेप घेणार आहे. भारताचा सहभाग असला तरी ही मोहीम जपान येथून प्रक्षेपित होणार असून त्यामध्ये जपानचं रोव्हर असणार आहे. परंतु चंद्रावर उतरणारं लँडर भारताचं असणार आहे. ह्यामध्ये युरोपियन स्पेस एजन्सी, नासा, जपान आणि इस्रो अशा चार अग्रेसर संस्था विविध उपकरणं बनवणार आहेत. 10 मार्च, 2025 रोजी भारत सरकारने ह्या मोहिमेसाठी आर्थिक मंजुरी देऊन मोहिमेला औपचारिक मान्यता दिली. अशा अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतील ह्याची खात्री आहेच. इस्रोच्या भविष्यातील मोहिमांसाठी इस्रोला भरभरून शुभेच्छा. असा हा राष्ट्रप्रेमाने भरलेला आणि तंत्रज्ञानाचा आपल्या देशाला कसा फायदा होईल हा हेतू बाळगलेल्या सगळ्या इस्रोतील वैज्ञानिकांचा इतिहास नक्कीच आपल्याला प्रेरणा देत राहील.