सर्व शिवमयं ब्रह्म

26 Jul 2025 15:17:47
@कौमुदी परांजपे
श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात शिवाची विशेष पूजा केली जाते, उपवास केला जातो, अभिषेक करतात, मंदिरात जातात त्यामुळे श्रावण महिन्यात शिवभक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ’शिवो भूत्वा शिवं यजेत’ याचा प्रचितीच सर्वत्र येत असते. याचनिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील ही काही निवडक शिवमंदिरांची माहिती करून देणारा लेख...
nashik shiv shankar temple
 
अहं शिवः शिवश्चार्य, त्वं चापि शिव एव हि।
सर्व शिवमयं ब्रह्म, शिवात्परं न किञ्चन॥
 
 
मी शिव आहे, तुम्हीसुद्धा शिव आहात, हे सारे ब्रह्मांड शिवमय आहे. शिव हाच सार्‍या शक्तींचा स्त्रोत आहे. भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असे संबोधले जाते. समुद्रमंथनातून निर्माण झालेले हलाहल प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांना नीलकंठ किंवा नीलग्रिव म्हणले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्र व पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून देखील ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शं करोति इति शंङ्कर:। (संस्कृत - शंङ्कर) म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय.
 
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात परंतु सृष्टीचे चालन हे भगवान शिवशंकरामुळेच होणार आहे. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरणचक्राची रूपके आहेत. भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत. महादेवांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे-तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी स्थापित झाले. त्यांनाच ज्योतिर्लिंगे म्हणून ओळखले जाते.
 
 
महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. नाशिक जिल्ह्यातही त्र्यंबकेश्वर हे ज्योतीर्लिंग प्रसिद्ध आहे. परंतु नाशिक जिल्ह्याच्या आसपासच्या भागात किंवा उत्तर महाराष्ट्रात अनेक प्राचीन आणि अद्भुत अशी शिवमंदिरे आहेत त्यातील काही प्रसिद्ध शिवमंदिरांची माहिती या लेखातून देत आहोत.
 
 
nashik shiv shankar temple
 
श्री कपालेश्वर महादेव मंदिर: नाशिक गोदाघाटावरील प्रसिद्ध रामकुंडापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार्‍या या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इतर शिवमंदिरांसारखी या मंदिरात नंदीची मूर्ती स्थापित केलेली नाही. याची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, एकदा भगवान शंकरांच्या हातून चुकून गोहत्या झाली ह्या पापाचा नाश व्हावा म्हणून नंदीने त्यांना गोदावरी नदीत स्नान करण्याचा उपाय सुचवला. त्याप्रमाणे शंकराने गोदावरी नदीत स्नान केले आणि तिथेच तपश्चर्येस बसले. नंदीच्या सुचनेनुसार त्यांनी हे पापक्षालन केले. यावेळी नंदी त्यांचा गुरू होता. तिथे नंदी त्यांचा सेवक नव्हता म्हणून कपालेश्वर मंदिरात आधी नंदीची मूर्ती नाही. अतिशय सुंदर आणि पुरातन असे हे मंदिर खूप सुंदर आहे.गंगाघाटावर, रामकुंडावर येणारा प्रत्येक भाविक या मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेतोच. श्रावणी सोमवारी या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विशेष पूजा-अर्चना केली जाते.
 
 
सोमेश्वर मंदिर-नाशिक: नाशिक शहरापासून अगदी जवळ अशा ‘आनंदवल्ली’ या परिसरात हे मंदिर आहे. अतिशय रम्य आणि सुंदर परिसरातील या मंदिराचे महत्त्व नाशिककरांसाठी अनन्यसाधारण आहे. या मंदिरातून संथ वाहणार्‍या गोदावरी नदीची भव्यता डोळ्यात भरते. ‘सोम’ म्हणजे चंद्र आणि ईश्वर असे हे सोमेश्वर रूप इथे पाहायला मिळते. या मंदिराची निर्मिती ‘चोल’ काळात झालेली असावी. मंदिराचे स्थापत्य अतिशय सुंदर आहे. कुंभमेळा आणि महाशिवरात्री अशा काही विशेष काळात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. मंदिरात भगवान शंकराची उपासना करून काही काळ गोदा नदीकाठी शांतपणे बसून निसर्ग आणि अध्यात्म यांतून मिळणारी मन:शांती एक वेगळाच अनुभव देते.
 
 
nashik shiv shankar temple
 
गोंदेश्वर मंदिर-सिन्नर,नाशिक: नाशिकपासून 30 कि.मी दक्षिणपूर्व नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरपासून अगदी जवळ हे मंदिर आहे. साधारण 12-13 व्या शतकात यादव कालखंडात या मंदिराचे निर्माण झालेले असावे. यादव कुळातील राजा राजगोविंद याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. हेमाडपंती पद्धतीच्या स्थापत्यकलेने या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. काळ्या बसाल्ट आणि चुनखडीपासून बनलेल्या मंदिरात कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती सुंदर आखीव आणि अप्रतिम आहेत. या मंदिर परिसराला शिवपंचायतन किंवा पाच मंदिरांचा समूह म्हणतात. भगवान शिवाच्या मंदिरा व्यतिरिक्त श्रीपार्वती गणपती भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांचीही मंदिरे याच परिसरात आहेत. कूर्म या विष्णू अवताराच्या मूर्ती इथे कोरल्या आहेत. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर नक्की बघायला हवे.
 
 
nashik shiv shankar temple
 
सिद्धेश्वर चांगदेव मंदिर-मुक्ताईनगर-जळगाव: तापी आणि पूर्णा आणि गुप्त गंगा अशा त्रिवेणी नदीसंगमावर हे मंदिर बांधलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गावात स्थापित या मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक आहे. नावाप्रमाणेच संत नामदेव यांच्या स्मरणार्थ ह्या मंदिराला चांगदेव मंदिर असे नाव देण्यात आले आहे. मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिर परिसरात अनेक सुंदर रेखीव मूर्त्या आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुशोभित आहे. दगडावरचे नक्षीकाम अतिशय अप्रतिम आहे.
 
 
nashik shiv shankar temple
 
श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर: चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन याने आपली मुलगी चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व 52 मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला. त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले. बाबांनी हा भाग स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मूर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभार्‍यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर ‘गणेश टाके’ आहे. बारमाही पाणी हे या गणेश टाकीचे वैशिष्ट्य आहे. तेथील उत्सवात गावातून पालखी निघते. पालखीत भगवान शिवाचा चांदीचा मुखवटा, शेषनाग, बाबांची, प्रतिमा, दागिने, ठेवतात. यावेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात. श्रावणात एक लक्ष बिल्वदले ‘ओम नम: शिवाय’ या जपाने शिवलिंगावर वाहतात. तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करतात.
 
 
माणकेश्वर मंदिर : धुळ्यापासून साधारण 30 किमी अंतरावर असणार्‍या झोडगे गावात हे मंदिर आहे. या मंदिरात खूप सुंदर शिल्पे आहेत. नागर शैलीत हे बांधकाम केलेले आहे. मानवी जीवनातील विविध अवस्था, विविध कला शिल्प पौराणिक आणि बोधकथा हे सारे या मंदिरातल्या शिल्पातून दिसतात. फक्त भाविकच नाही तर स्थापत्यकलेची आवड असणारे, ती कला शिकणारे यांनी इथे नक्की भेट द्यावी असे हे मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त इथे उत्सव होतो. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
 
 
 
हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा व डुब्बा या नद्यांचा संगम आहे. ही प्राचीन तपोभूमी असल्याचे उल्लेख अनेक पुराणात आढळून येतो, याठिकाणी पुरातकालीन ‘हरिहरेश्वर महादेव मंदिर’ (असून याठिकाणचा उल्लेख स्कंदपुराण, नवनाथ, शिवपुराण, शिवलीलामृत, श्रीमत भागवत पुराण आदी प्राचीन ग्रंथात वाचायला मिळतो. प्रभू श्रीराम आपल्या वडिलांचे म्हणजे राजा दशरथाचे उत्तरकार्य नाशिक येथून आटोपून पुढच्या प्रवासाला निघाले असता वाटेत पिंपळगाव हरेश्वर या गावी बहुळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर थांबले. तिथे भगवान शंकर तपश्चर्या करीत होते. भगवान शंकर व प्रभू श्रीराम यांची भेट याच ठिकाणी झाली. प्रभू श्रीराम हे विष्णूचा अवतार त्यामुळे विष्णू व शंकर यांच्या भेटीचे ठिकाण म्हणून ही जागा हरिहर नावाने ओळखली जाते. पुराणात या गावचा उल्लेख ‘पिप्पलग्राम हरिहरेश्वर’ असा आढळतो. ‘भस्मासुराचा वध झाला ती जागा’ या ठिकाणचा असा उल्लेख पुराणात येतो. त्याचं प्रतीक म्हणून येथे ‘भस्मासुराची शिळा’ आहे. पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वराचे मंदिर 1297 ला बांधले असं वर्णन हेन्री कोसेन्स या इंग्रज प्रवाशानं लिहून ठेवलं आहे. हरिहरेश्वर असे नाव असल्याने शंकराच्या पिंडीत विष्णू आणि शंकर अशी दोन्ही रूपे आहेत.
 
 
उत्तर महाराष्ट्रातील ही काही निवडक शिवमंदिरे आहेत. ही शिवमंदिरे फक्त भगवान शंकराची मंदिरेच नाहीत तर स्थापत्यकला पुराणकथा आपली प्राचीन संस्कृती यांची प्रतीके आहेत. या निर्जीव दगडांमधून येथील शिल्पे प्रतीके नक्षीकाम आपल्याला अबोलपणे खूप काही सांगून जातात. या मंदिरांचे आणि त्यातून आपल्या संस्कृतीचे जतन करणे ही आपलीच जबाबदारी आहे. तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची, परंपरेची कल्पना येईल.
Powered By Sangraha 9.0