पोर्तुगीज-भारत संबंध

26 Jul 2025 15:28:36
जुनागड आणि निजाम या दोन संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणण्यासाठी भारताला सैनिकी शक्ती वापरावी लागली. ऑक्टोबर 1947मध्ये काश्मीर हिसकावून घेण्यासाठी पाकिस्तानने पुकारलेले युद्ध त्याला डिसेंबरमध्ये आवरते घ्यावे लागले. 1948मध्ये यानंतर भारतीय सैन्याला युद्धाचा प्रसंग आला तो 1961साली! याबद्दल जाणून घेऊया प्रस्तुत लेखांकात.

portuguese-india relations history
 
पोर्तुगाल हा दक्षिण युरोपमधला एक देश आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन या देशांप्रमाणेच पोर्तुगीज लोकदेखील मोठे महत्त्वाकांक्षी होते. पूर्वेकडच्या देशांशी व्यापार करावा, संपत्ती मिळवावी, साम्राज्य गाजवावे आणि अधिकाधिक लोकांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा द्यावी, अशी त्यांना फार हौस होती. सुरुवातीला तरी त्यांच्या धर्मप्रसाराचे लक्ष्य आफ्रिका आणि आशियातले मुसलमान हे होते. कारण इसवी सनाच्या 7 व्या-8व्या शतकापासून पुढची कित्येक शतके मुसलमान आशिया, आफ्रिका आणि युरोपात प्रचंड प्रमाणात बाटवाबाटवी करत होते.
 
 
इसवी सनाच्या 15व्या शतकात पोर्तुगालच्या राजघराण्यात हेन्री नावाचा एक भलताच अभ्यासू राजपुत्र जन्माला आला. त्याने भूगोल, नकाशाशास्त्र आणि नौकानयन या विषयांचा प्रचंड व्यासंग केला. म्हणून त्याला ’हेन्री-द-नॅव्हिगेटर’ या नावाने ओळखतात. इ. स. 1415साली पोर्तुगालचा राजा जॉन पहिला हा जातीने साम्राज्यविस्तारासाठी बाहेर पडला. त्याच्या सोबत युवराज दुआर्त, राजपुत्र पेट्रो आणि राजपुत्र हेन्री (हेन्री-द-नॅव्हिगेटर) हे ही होते. त्यांनी उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोजवळचे सेऊता हे बंदर जिंकले.
 

portuguese-india relations history 
सेऊता हे मुसलमानांच्या अधिपत्याखालचे एक श्रीमंत, भरभराटलेले व्यापारी शहर होते. तिथले अरब मुसलमानांचे आरमारही सुसज्ज होते. पोर्तुगाल आरमाराने समोरासमोरच्या सागरी युद्धात त्यांचा पराभव करून सेऊता शहर तर जिंकलेच, पण आपले आरमार अरबांना भारी आहे, हे दाखवून दिले. पोर्तुगीजांच्या साम्राज्यविस्ताराची सुरुवात होय. ही लढाई 21 ऑगस्ट 1415 या दिवशी झाली.
 
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर ' सा. विवेकचे वर्गणीदार व्हा!

वर्गणीदार होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

 
 
या नंतरच्या पोर्तुगीजांच्या आशिया-आफ्रिकेतील मोहिमांशी आपल्याला कर्तव्य नाही. इसवी सन 1487मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी बार्थोलोम्यू डायस याने आफ्रिकेचे दक्षिण टोक जे ’केप ऑफ गुड होप’ तिथपर्यंतचा सागरी मार्ग निश्चित केला. याच मार्गावरून पुढे येत अखेर 20 मे 1498 या दिवशी वास्को-डि-गामा याने भारताच्या केरळ प्रांतातले कोळिकोड हे बंदर गाठले. तमिळ आणि मल्याळम् मध्ये ’क’ या अक्षरासाठी इंग्रजीतले ’झेड’ हे अक्षर वापरतात. त्यामुळे उच्चार कोळिकोड आणि स्पेलिंग कोझिकोड असे केले जाते. पोर्तुगीज आणि नंतर इंग्रज त्याला म्हणायचे कालिकत.
 
 
वास्को-डि-गामाची भारत यात्रा भलतीच यशस्वी झाली. प्रवास खर्च आणि अन्य सर्व खर्चाच्या 60 पट अधिक रक्कम, भारतातून आणलेल्या मसाले आणि इतर वस्तूंच्या विक्रीतून मिळाली. मग पेद्रो काब्राल, जोआ नोहा, त्रिस्ताव-डा-कुन्हा, फ्रान्सिस्को-डि- अल्मीडा असे अनेक पोर्तुगीज दर्यावर्दी एका पाठोपाठ एक येत राहिले. सन 1502 साली त्यांनी कोचीन, क्विलॉन आणि कन्नानोर ही ठिकाणे कायमची घेतली. आज आपण यांना अनुक्रमे कोची, कोल्लम आणि कन्नूर या त्यांच्या मूळ नावांनी ओळखतो. ही पोर्तुगीजांची भारतातील साम्राज्यविस्ताराची सुरुवात होय.
भारताच्या पश्चिम किनार्‍याने वर सरकत सन 1509मध्ये त्यांनी विजापूरच्या आदिलशाही सल्तनतीकडून गोमंतक किंवा गोवे जिंकले.
या 16व्या शतकाच्या उर्वरित काळात पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनार्‍याबरोबरच पूर्व किनार्‍यावरही चांगलेच हातपाय पसरले. आपण कालक्रमानुसार पाहूया- गोव्याच्याही आधी सन 1507मध्ये तामिळनाडूमध्ये नेगापट्टम्, 1521मध्ये कोकण किनार्‍यावर चौल किंवा चेऊल, 1523 मध्ये केरळमध्ये कांग्रानोर (मूळ नाव कोडुंगल्लूर) आणि पूर्व किनार्‍यावर तामिळनाडूत मैलापूर (मैलई नावाचे हे मूळ गाव आता चेन्नै महानगराचा एक भाग आहे); त्या आधी 1518मध्ये पुलिकत (पुळावरकडू नावाचे हे मूळ गाव आता चेन्नै महानगराचा एक भाग आहे.); सन 1528मध्ये बंगाल-ब्रह्मदेश सीमेवरचे चितगाव किंवा चितगाँग; 1534मध्ये मुंबई, साष्टी आणि वसई, 1535 मध्ये काठेवाडजवळचे दीव; 1540मध्ये सुरत, 1548मध्ये तामिळनाडूत तुतिकोरिन (मूळ नाव तुतुकुडी); 1559मध्ये गुजरातमध्ये दमण; 1568मध्ये कर्नाटकात मँगलोर(मूळ नाव मंगळुरू); 1579मध्ये बंगालमध्ये हुगळी आणि 1598 मध्ये मुसुलिपट्टण (आंध्र प्रदेशातले मच्छलिपट्टण) एवढ्या बंदर शहरांमध्ये पोर्तुगीजांनी जम बसवला. हे एवढ्या तपशीलवार देण्याचे कारण असे की, इंग्रज, डच आणि फ्रेंच या अन्य महत्त्वाकांक्षी युरोपीय राष्ट्रांच्या आधी पोर्तुगीज भारतात येऊन चांगलेच स्थिरावले होते. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी सन 1600 मध्ये, डच ईस्ट इंडिया कंपनी सन 1602 मध्ये, तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी खूपच उशिरा 1664 साली स्थापन झाली.

portuguese-india relations history 
 
मात्र एकदा स्थापन झाल्यानंतर डच, फ्रेंच आणि इंग्रज यांनी पोर्तुगीजांच्या भारतातल्या आणि आग्नेय आशियातल्या व्यापारी हितसंबंधांना चांगलाच शह दिला. पुढे इंग्रजांनी युरोपात प्रथम डचांचा आणि मग फ्रेंचांचा पराभव केला. मुघल सुभेदारांनी पोर्तुगीजांना पूर्व किनार्‍यावर व्यापार करणे अशक्य करून सोडले. पश्चिम किनार्‍यावर छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांनी पोर्तुगीजांना चांगलाच पायबंद घालत चौल त्यांच्याकडून हिसकावले. पुढे चिमाजी अप्पा पेशव्यांनी साष्टी आणि वसईतून त्यांची हकालपट्टी केली. त्यापूर्वी सन 1661मध्ये त्यांनी स्वतःच मुंबई इंग्रजांना दिली.
आता पोर्तुगीज हे कट्टर कॅथलिक आणि इंग्रज हे प्रोटेस्टंट म्हणजे ते दोघेही एकमेकांना ’इनफिडल’ किंवा ’काफर’ मानतात. तरीही पोर्तुगीज राजाने आपली मुलगी इंग्रज राजाला दिली. वर आंदण म्हणून मुंबई दिली. आपण हिंदू लोक बावळट असल्यामुळे, हा लग्नसंबंध कसा काय बुवा घडून आला, असे आपल्या मनातही येत नाही. तर याचे कारण असे आहे की, पोर्तुगालचा शेजारी जो स्पेन, त्यांची आणि यांची लढाई झाल्यास, इंग्लंडने आपल्याला म्हणजे पोर्तुगालला पाठिंबा द्यावा, असा हा राजकारणी कावा होता. पोर्तुगाल कॅथलिक, स्पेनही कॅथलिक. पण दोघांच्या भांडणात इंग्लंडसारख्या प्रबळ प्रोटेस्टंट देशाला आपल्याकडे खेचण्यासाठी त्याला आपली राजकन्या देण्यात पोर्तुगीज राजाला काडीचीही दिक्कत वाटली नाही.
असो. तर अशा विविध कारणांनी इंग्रजांनी जेव्हा 1818साली संपूर्ण भारत देश जिंकला; तेव्हा पोर्तुगीजांची भारतातली पूर्व किनार्‍यावरची सत्ता साफच संपली होती नि पश्चिम किनार्‍यावर गोवा, दमण, दीव, दादरा, नगर हवेली आणि अंजदीव एवढ्याच ठिकाणी शिल्लक होती. यांपैकी दादरा आणि नगरहवेली ही दोन ठिकाणे पोर्तुगीजांनी 1779साली मराठ्यांकडून काही एका नुकसानी प्रकरणात भरपाई म्हणून मिळवली होती. अन्य सर्व ठिकाणे त्यांनी गमावली होती.
दीव हे गुजरातमधल्या काठेवाडच्या वेरावळ बंदराजवळ एक छोटेसे बेट आहे. दमण हे गुजरातमधल्या बलसाडजवळचे एक बंदर आहे. दादरा आणि नगरहवेली ही महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरची जंगल प्रदेशातली दोन गावे आहेत. गोवा आपल्याला माहीतच आहे. अंजदीव हे गोवा आणि कर्नाटकच्या सरहद्दीवर कारवार बंदराजवळ एक बेट आहे.
या सगळ्या वर्णनावरून आपल्या लक्षात येईल की, इंग्रजी राज्याच्या काळात पोर्तुगीजांची सत्ता भारतातून पारच उताराला लागली. मोठा म्हणावा असा एकच भूप्रदेश त्यांच्या हातात राहिला. तो म्हणजे गोवा. इंग्रजांनीही ज्याप्रमाणे पाँडिचरीत फ्रेंच सत्ता अल्पस्वल्प टिकू दिली, तशीच गोव्यातही पोर्तुगीज सत्ता टिकू दिली.
पुढे पहिल्या महायुद्धात पोर्तुगालने इंग्लडला साथ दिली. त्यात अर्थात त्याचा स्वार्थ होताच. आफ्रिकेत अनेक ठिकाणी पोर्तुगीज वसाहती होत्या. जर्मनीने त्यांच्यावर हल्ला करताच पोर्तुगाल इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरला. 1918 साली महायुद्ध संपेपर्यंत जर्मनीने पोर्तुगालची 91 जहाजे बुडवली होती. विविध रणांगणांवर पोर्तुगालचे किमान 12 हजार सैनिक ठार झाले.
1939 ते 1945 च्या दुसर्‍या महायुद्धात पोर्तुगाल अलिप्त राष्ट्र होते. त्यामुळे युरोपात पोर्तुगालच्या भूमीत काय काय घटना घडल्या असतील त्या असोत, पण गोव्यात काही फारच मनोवेधक घटना घडल्या. गोव्याच्या मार्मुगोवा (मूळ नाव मुदगाव) बंदरात चार जर्मन मालवाहू जहाजे आश्रय घेऊन राहिली होती. त्यांनी हळूहळू हेरगिरी सुरू केली. तेव्हा ब्रिटिश हेरखात्याच्या सूचनेवरून भारतीय सैन्याच्या ‘कलकत्ता लाईट हॉर्स’ या तुकडीतले काही लोक गोव्यात आले. त्यांनी मोठे कारस्थान रचून सर्व जर्मन जहाजे बुडवली. हे सगळेच प्रकरण मोठे रोचक आहे. परंतु प्रस्तुत लेखमालेत आपण स्वतंत्र भारताच्या सैन्याची पराक्रम गाथा मांडत आहोत. त्यामुळे 1943साली पडलेली वरील कथा पुन्हा केव्हातरी स्वतंत्रपणे पाहू.
तर अशा रीतीने सर्व संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न निकाली निघाला. काश्मीरचा प्रश्न अर्धामुर्धा तरी सुटला. 1954 साली फ्रेंच लोक आपणहून पाँडिचरी आणि जवळची कारिकल, माहे इत्यादी गावे सोडून निघून गेले.
पण पोर्तुगीज काही आपले बूड हलवायला तयार होईनात. अशा घट्ट चिकटलेल्या बुडांवर लष्करी बुटांची लाथ बसावी लागते. पण ती द्यायला सरदार पटेल हयात नव्हते. ते 1950 सालीच मरण पावले होते.
(पुढील अंकात)
Powered By Sangraha 9.0