आकार - भारतीयत्वाचा तेजस्वी हुंकार

28 Jul 2025 12:53:02
@अक्षदा कुलकर्णी
 
aakar
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
‘विद्यार्थी कसा असावा’, याबाबत आपल्या उपनिषदांनी एक नेमके वचन सांगितले आहे -
 
यः कदा पृच्छेत् कदा श्रद्धायेत्
कदा विचिन्तयेत् इति जानाति सः एव शिष्यः।
 
प्रश्न कधी विचारावेत, अन्वेषण कधी करावे आणि विश्वास कधी ठेवावा, हे ज्याला समजते तो खरा विद्यार्थी. प्रश्न विचारणारे आणि अन्वेषण करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि ते त्यांचे कर्तृत्व सिद्धही करत आहेत, पण याचवेळी गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आपण कमी पडतो आहे का, असा प्रश्न सध्याची सामाजिक स्थिती बघताना पडतो. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी आहे आणि शिक्षण संस्थांबरोबरच कुटुंब हा शिक्षणाचा मूळ स्रोत आहे. तेव्हा ज्ञानार्जन करताना कुटुंबातील तसेच कुटुंबाच्या बाहेरील आपल्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी विश्वासाने आचरणात आणणे ही मानसिकता तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने गेली 129 वर्षे स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला आहे. त्या त्या वेळी समाजाची असणारी शैक्षणिक गरज पूर्ण करताना संस्थेच्या आज 77 विविध शैक्षणिक शाखा पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आकार या नवीन शाखेची स्थापना केली.
 
पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती (अहमदाबाद)च्या कुलपती इंदुमतीताई काटदरे यांना संस्थेने गेल्या वर्षी बाया कर्वे पुरस्कार देऊन सन्मानित केले. इंदुमतीताईंच्या मूलगामी कार्याने प्रेरित होऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आकार शाखेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा, शास्त्र आणि संस्कृतीचे संशोधन व प्रसार करणे, शाश्वत जीवनशैली व शिक्षणपद्धतींवर विचारमंथन घडवून आणणे, सर्व समाजघटकांमध्ये सांस्कृतिक आत्मभान जागृत करणे आणि शुद्ध विचार आणि शुद्ध आचार उत्पन्न करणारे मंच निर्माण करणे ही आकार शाखेची उद्दिष्टे आहेत.
 
ही उद्दिष्टे साध्य करणारे विविध उपक्रम राबवण्याचे काम आकार करेल. उदाः- ‘चित्रार्थ’ या उपक्रमांतर्गत संवेदना, सहवेदना आणि राष्ट्रप्रेम जागृत, वृद्धिंगत व्हावे आणि स्थायी रहावे या हेतूने वयोगटांनुसार विविध चित्रपट दाखवणे आणि त्यावर बोधप्रद चर्चा घडवून आणणे असा कार्यक्रम राबवला जाईल. ऐकून घेणारा कान मिळाला की, निम्म्याहून अधिक समस्यांचे निराकरण होते. भारतीय संयुक्त कुटुंब पद्धतीत घरातच उपलब्ध असणार्‍या या कानांनी अनेकांना वेळेवर आधार देऊन तग धरायला, प्रेरित व्हायला मदत केली आहे. याच धाग्याला पुढे नेत, ‘मुक्त संवाद’ या उपक्रमांतर्गत पौर्णिमेच्या रात्री विद्यार्थिनींसोबत संवाद सत्रे होतील.
 
यशस्वी सहजीवनासाठी, संस्कार आणि मूल्यांच्या पायावर कुटुंब उभे राहावे यासाठी विवाहपूर्व समुपदेशन ‘संयोजिनी’ हा प्रस्तावित उपक्रम आहे. आपुलकीच्या भावनेतून शिकवल्यावर त्याचा प्रभाव अधिक असतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गर्भसंस्कार या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला अनुसरून विविध उपक्रम जसे की, अंगाईगीतांची कार्यशाळा, योग, आहार मार्गदर्शन हे या ‘वात्सल्यम’ अंतर्गत होतील. पालकत्व हे एक शास्त्र आहे आणि ती एक कलाही आहे. आपले मूल कसे घडवावे यासाठी विविध मार्गदर्शनपर, चर्चात्मक सत्रे ‘पालक प्रबोधन’ या उपक्रमांतर्गत घेण्याची योजना आहे.
 
aakar
 
भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, गणित हे विषय आपण सध्या शिकतो. यातील अनेक संदर्भ कैक हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांमध्ये सापडतात. हे प्राचीन संदर्भ अभ्यासून ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे काम ‘तत्व चिंतनम’ या शीर्षकाखाली होईल. भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित विविध प्रश्नमंजुषा, मुलांना आवडेल, समजायला सोपे जाईल अशा साहित्यात त्याचे रूपांतरण करण्याचा उपक्रम ‘कुतूहल’ या नावाने प्रस्तावित आहे.
 
 
समाजाची गरज ओळखून सत्य अधिष्ठान, समर्पित कार्यकर्ते आणि रचनात्मक कार्यक्रम यांच्या आधारे भारतीय ज्ञानसंस्कृतीचे पुनरुत्थान साधण्याच्या संकल्प आकार शाखेने केला आहे.
 
अतिशय मंगल आणि ऊर्जादायी वातावरणात, संस्थेच्या वर्धापनदिनी, उपस्थितांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने आकारचा उद्घाटन सोहळा साजरा झाला. औषधी उत्पादन क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द करून सध्या पालघर येथे गोशाळा चालविणारे पुनरुत्थान विद्यापीठाचे अध्येता विनोद सिंह हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच राष्ट्र सेविका समितीच्या कुटुंब प्रबोधन राष्ट्रीय सहप्रमुख अमेरिकास्थित अंजली पटेल या विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य जयंत इनामदार, सीमा कांबळे, सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही. एस. शास्त्री, उपसचिव कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते.
 
भारतीय परंपरेप्रमाणे शंखनादाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात ‘आकार’बाबत माहिती देणारी एक चित्रफित सर्वांना दाखवली गेली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘आकार’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक मंडळ सदस्य सीए अभय कुलकर्णी यांनी, ‘जनरल डायरने मोठा नरसंहार केला, हे आपल्या लक्षात राहते; परंतु लॉर्ड मेकॉलेने इथे पाश्चात्य शिक्षणपद्धती रुजवून अनेक पिढ्यांचे मेंदू मृतप्राय करून टाकले, ही बाब मात्र आपण विसरून जातो, असे सांगत भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि आकार ही शाखा सुरू करण्याचे प्रयोजन सर्वांपुढे मांडले. यानंतर संस्थेच्या वतीने या अतिथींचे भारतीय परंपरेप्रमाणे वस्त्र, पत्र, पात्र, पुष्प, फल, दक्षिणा आणि ग्रंथभेट देऊन औपचारिक स्वागत केले गेले. ‘आकार’ संकल्पपत्राचे अनावरण करून या शाखेचे उद्घाटन मान्यवरांनी केले. या संकल्पपत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले.
 
‘बदलत्या काळामध्ये कुटुंबव्यवस्था देखील बदलली असली तरीसुद्धा जीवनमूल्यांचे महत्त्व आपण विसरता कामा नये’, असे उद्बोधन अंजली पटेल यांनी केले. ‘जीवनमूल्यांची किंमत एकदा समजली की, ती आपल्याकडून हरवणार नाहीत. आज कुटुंबातील संवाद हरवल्यामुळे घरातील लहान मुले सुद्धा नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडतात, अशी समाजाची परिस्थिती झालेली आहे. असे न होण्यासाठी संवाद वाढवणे आणि बदलत्या समाजरचनेमध्ये मैत्रीची वर्तुळे वाढवणे आणि टिकवणे हेच काम आपल्याला करावे लागणार आहे’, असेही त्या म्हणाल्या.
विनोद सिंह यांनी आपल्या प्रमुख उद्बोधनामध्ये ‘आकार’ शाखेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतल्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘मेकॉले शिक्षणपद्धतीने आपल्याला नोकर केले आहे. आजही या व्यवस्थेमध्ये विविध मार्गांनी आपल्याला एकेकटं पाडलं जात आहे. कुटुंब किंवा समूह अशी ओळख न राहता एक व्यक्ती म्हणून ओळख अधिक ठळक होत चालली आहे. नाती संपत चालली आहेत. या पृष्ठभूमीवर मूळ भारतीय विचार समजून घेऊन त्याप्रमाणे समाज घडविणे, हे आवश्यक आहे. त्याकरिता संपूर्ण जीवनाला उन्नत करणारी भारतीय शिक्षणपद्धती अवलंबणे हाच मार्ग आहे. पुनरुत्थान विद्यापीठाने हेच काम हाती घेतले आहे. कर्वे संस्थेसारख्या मोठ्या संस्थेने हा विचार घेऊन एका नव्या शाखेची सुरुवात करणे, ही फार मोठी आशाजनक बाब आहे. स्त्री ही मुळातच शक्तिस्वरूप असल्याने तिने जर स्वत:ची ओळख भारतीय विचारांच्या प्रकाशात समजून घेतली तर हा देश खर्‍या अर्थाने शक्तिसंपन्न होईल.’ त्यांनी ‘आकार’ या शाखेसाठी पुनरुत्थान विद्यापीठाकडून आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी केली जाईल, असे आश्वासन दिले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने हाती घेतलेल्या या कार्याचा लाभ संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या कुटुंबियांना निश्चितपणे होईलच, शिवाय भविष्यात ‘आकार’च्या माध्यमातून भारतीयत्वाचा कल्याणकारी हुंकार शैक्षणिक क्षेत्राच्या वायुमंडलात सक्षमपणे उमटेल असा विश्वास आहे.
लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील ‘आरुणि विद्या मंदिर’ या पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका असून नूतन शाखा ‘आकार’च्या प्रमुख आहेत.
Powered By Sangraha 9.0