भागवत-मौलाना भेट - महत्त्व आणि औचित्य

विवेक मराठी    28-Jul-2025   
Total Views |
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्‍या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रूजत आहे. मंचाने एक कार्यक्रम ‘आओ जडोंसे जुडे’ असा सुरू केला आहे ज्याद्वारे भारतीय मुसलमान समाजाला त्याची असली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि संघाचे अन्य अधिकारी तसेच मुस्लीम धर्मगुरू आणि बुद्धिजीवी यांच्यातील संवाद कार्यक्रमाचे हे औचित्य आणि महत्त्व आपण या दृष्टीने लक्षात घेतले पाहिजे.
 
rss
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत देशभरातील प्रमुख मुस्लीम मौलाना, इमाम, मुफ्ती आणि बुद्धिजीवी यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. त्या चर्चेचे वृत्त देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी प्रसारित केले.
 
 
ही भेट आणि चर्चा अचानक ठरलेली नव्हती. ती पूर्वनियोजित होती. अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना उमेर अहमद इलीयासी यांनी ही भेट घडवून आणली होती. त्यासाठी मोहन भागवत यांचा वेळ मिळावा याकरिता त्यांनी बरेच दिवस आधीपासून प्रयत्न चालविले होते.
 
 
या भेटीदरम्यान संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपालजी, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी  तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघटनेचे मार्गदर्शक आणि संरक्षक डॉ. इंद्रेशजी कुमार हे देखील उपस्थित होते. दिल्लीतील हरयाणा भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात इमाम संघटनेच्या वतीने देशभरातील सुमारे 50 ते 60 मौलाना, इमाम, मुफ्ती यासारखे धर्मगुरू तसेच काही बुद्धिजीवी मंडळी या चर्चेत सहभागी झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि इमाम संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष अशा समसमा संयोगावर ही चर्चा घडून येणे हा देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मिळालेला एक चांगला संकेत आहे असे म्हणावयास हरकत नसावी.
 
 
आपल्या देशात हिंदू आणि मुस्लीम समुदायात कशा प्रकारचे संबंध आहेत हे वेगळ्याने सांगावयास नकोच. अनेक विद्वान अभ्यासकांच्या आणि इतिहास तज्ज्ञांच्या मते भारतातील 99 टक्के मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत. मुसलमानी आक्रमणादरम्यान काही ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कारणामुळे त्यांच्या पूर्वजांनी आपला धर्म आणि उपासना पद्धती बदलली असेल. परंतु त्यामुळे त्यांच्या मूळ हिंदू असण्याला कुठेच छेद जात नाही.
 

rss 
 
जगात आजमितीला एकूण 57 मुस्लीम देश आहेत. त्यातील काही सुन्नी बहुल तर काही शिया बहुल आहेत. इतरही अनेक पंथांचे मुस्लीम या देशात राहतात. परंतु ते सतत संघर्षाच्या वातावरणात राहत असतात. इस्लाममध्ये एकूण 72 फिरके (संप्रदाय किंवा पंथोपपंथ) आहेत. परंतु भारत हा एकमेव देश जगाच्या पाठीवर असा आहे की जेथे या सर्व 72 फिरक्यांचे मुस्लीम शांततेत आणि सुरक्षेच्या वातावरणात राहत आहेत. आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लीम जनसंख्या असलेला गैर-मुस्लीम देश आहे! हे सर्व सहज शक्य झाले आहे कारण भारतीय लोकांची मनोभूमिका आणि मनःस्थिती ही सर्वांशी सामोपचाराने राहण्याची आहे. परस्पर संवाद हा या मागचा एक मोठा आणि महत्वाचा दुवा आहे.
 
 
नेमके हेच वैशिष्ट्य ध्यानात घेऊन मुस्लीम धर्मगुरूंच्या आणि बुद्धिजीविंच्या या चर्चेत असा सूर उमटला की आपले धर्म आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी माणुसकीचा धर्म म्हणजे वागणूक हाच सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. हे ध्यानात घेऊन आपली वागणूक आणि व्यवहार असला पाहिजे, असा सूर सर्व प्रतिनिधींनी लावून धरला.
 
 
आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे देश आणि राष्ट्र यांची प्राथमिकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत ही गोष्ट जोर देऊन सांगत असतात की आपल्यासाठी देश सर्वप्रथम असला पाहिजे. आपली प्रत्येक हालचाल देशाच्या हिताचीच असली पाहिजे. सरसंघचालक डॉ. भागवत तर कायमच राष्ट्र सर्वोपरी या मंत्राचाच घोष करीत असतात. इथेही या मुद्द्यावर जोर देण्यात आला.
 
 
हे सर्व सहजपणे साध्य करता येण्यासाठी उत्तम मार्ग कोणता असेल तर दोन्ही पक्षांनी म्हटल्याप्रमाणे संवाद हेच ते माध्यम होय. आतापर्यंत मुस्लीम आणि हिंदू समाजात परस्पर सार्थक संवादाच्या अभावामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत, कटुता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे हिंसाचारही झाला आहे. त्याची काही ऐतिहासिक करणे असतीलही. जसे, देशाचे विभाजन. साधारणपणे हिंदूंचे हे मत आहे की देशाच्या फाळणीला मुसलमान समाजच जबाबदार आहे. तसेच, दहशतवादी घटना. यातही जो सहभाग आहे तो देखील मुस्लीम कट्टरवादी घटकांचा आहे. अशा घटनांमुळे काही पूर्वग्रह, किंवा सरसकट सर्वांना दोषी ठरविण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. परंतु सगळाच मुस्लीम समाज तसा असेल असे मानण्याचे कारण नाही. दोन्ही समुदायांमध्ये सार्थक, सकारात्मक संवाद सुरू झाला की हे मतभेद दूर होऊ शकतील असेही या चर्चेदरम्यान सांगण्यात आले. सतत संवाद हेच सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी प्रभावी कारक आहे हे देखील यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी जोरकसपणे मांडले.
 
इमाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना उमेर अहमद इलीयासी म्हणाले की, काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात परंतु हिंदू व मुस्लीम समुदायात मनभेद नसावेत. संवादात सातत्य असावे यावरही त्यांनी जोर दिला. हिंदू आणि मुस्लीम समुदायातील परस्पर द्वेष, आणि तिरस्कार भावना दूर व्हावी या उद्देशाने आम्ही सरसंघचालक डॉ. भागवत आणि अन्य संघ अधिकार्‍यांसमवेत हा चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे त्यांनी सांगितले. 
 
परस्पर संवादाचे स्वागत करतांना इमाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना उमेर अहमद इलीयासी म्हणाले की, काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात परंतु हिंदू व मुस्लीम समुदायात मनभेद नसावेत. संवादात सातत्य असावे यावरही त्यांनी जोर दिला. हिंदू आणि मुस्लीम समुदायातील परस्पर द्वेष, आणि तिरस्कार भावना दूर व्हावी या उद्देशाने आम्ही सरसंघचालक डॉ. भागवत आणि अन्य संघ अधिकार्‍यांसमवेत हा चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे त्यांनी सांगितले. अशा चर्चा भविष्यात पुढेही आयोजित करता येतील. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रक्रियेत मुस्लीम समाज आपले योगदान देईल असेही आश्वासन त्यांनी दिले.
 
 
मौलाना इलीयासी असेही म्हणाले की आम्ही असे सुचविले आहे की मशिदींचे इमाम आणि अन्य धर्मगुरू तसेच मंदिरांचे पुजारी यांनी अशा प्रकारच्या संवादाचे कार्यक्रम त्यांच्या-त्यांच्या समाजात सुरू करावेत. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी या कल्पनेला दुजोरा दिला असे मौ. इलीयासी यांनी सांगितल्याचे वृत्त ‘द हिंदू’ या दैनिकाने दिले आहे.
 
 
मुस्लीम धर्मगुरुंसोबत सरसंघचालक डॉ. भागवत यांची ही पहिलीच भेट नव्हती. यापूर्वी 2019 साली जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सय्यद अरशद मदनी यांच्या सोबत तसेच माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि अन्य मुस्लीम बुद्धिजीवी यांच्यासोबत 2022 मध्ये डॉ. भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती.
 
 
त्याही पूर्वी 2021 साली गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे प्रसिद्ध मुस्लीम स्कॉलर प्राध्यापक डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांनी लिहिलेल्या ‘दि मिटिंग ऑफ माइंड: ए ब्रीजिंग इनिशिएटिव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी,‘भारतातील हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन या सर्वांचा डी. एन. ए. एकच आहे’, असे विधान केले होते. या विधानाचे स्वागत मुस्लीम समाजातील विद्वान, धर्मगुरू आणि बुद्धिजीवी घटकांनी विविध वृत्तपत्रात लेख लिहून केले होते.
 
 
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्‍या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रूजत आहे. मंचाने एक कार्यक्रम ‘आओ जडोंसे जुडे’ असा सुरू केला आहे ज्याद्वारे भारतीय मुसलमान समाजाला त्याची असली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
 
 
सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत आणि संघाचे अन्य अधिकारी तसेच मुस्लीम धर्मगुरू आणि बुद्धिजीवी यांच्यातील संवाद कार्यक्रमाचे हे औचित्य आणि महत्त्व आपण या दृष्टीने लक्षात घेतले पाहिजे. संवादाचे असे कार्यक्रम स्थानिक स्तरावर व्हावे ही आज काळाची गरज आहे. अशा कार्यक्रमातून कट्टरवादी विचार कमजोर होऊन ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’, ‘एक देश-एक जन-एक राष्ट्र’ ही भावना वाढीस लागून 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुस्लीम समाज देखील संपूर्ण ताकदीने हिंदूंच्या बरोबरीने योगदान देईल अशी आशा करूया.
 
 
-विराग पाचपोर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. 9226682290)