महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. एक तळागळातील सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपामध्ये त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा सुरू केला. पुढे नगरसेवक, चारवेळा आमदार, मंत्रीपद भूषवतांनाच चव्हाण यांनी संपूर्ण कोकणात भाजपाला मजबूत केले. तळागळातील लोकापर्यंत असलेले दृढ संपर्क, संघटन कौशल्य, सदैव कार्यतत्पर यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाची दखल भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घेतली... त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेणारा लेख...
1 जुलैच्या संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाण यांची औपचारिक निवड झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वारे सुरू झाले, नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद आजवर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे आळीपाळीने गेलेले होते, पण या पदावर कोकणच्या पदाधिकार्याचा विचार होऊ शकतो अशी शक्यताच कधी उद्भवलेली नव्हती. यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या हिंदुत्वाचा गड मानल्या जाणार्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार आणि सिंधुदुर्गाचा सुपुत्र पक्षाच्या राज्यातील सर्वोच्च पदावर निवडून गेला आहे.
स्वाभाविकपणेच अध्यक्षीय सूत्रे स्वीकारण्याच्या सोहळ्याला या दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चव्हाण कुटुंब मूळचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावचं. चव्हाणांचे वडील पेंडूरहून भांडुपला राहावयास आले आणि रवींद्र चव्हाणांचा जन्म भांडुपमध्ये झाला..
महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच रविंद्र चव्हाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झाले आणि वडील डोंबिवलीत राहायला आल्यानंतर तर चव्हाण पक्षाचे कार्यकर्तेच बनले. 2002साली त्यांच्या पक्षकार्याची सुरुवात झाली ती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष बनून..
2005साली रविंद्र चव्हाण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक बनले, 2007साली त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ते नाहीच. 2009, 2014, 2019 आणि 2024 या चारही विधानसभा निवडणुका त्यांनी चढत्या मताधिक्यानं जिंकल्या आणि पक्ष नेतृत्वाचं लक्ष वेधून घेतलं...
2016 साली चव्हाण राज्यमंत्री झाले, 2018 साली मंत्रीपदासह रायगड आणि पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं. रामभाऊ कापसे यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांना उमेदवारी दिल्यापासून ठाणे जिल्हा जणू शिवसेनेचाच बालेकिल्ला मानला जाऊ लागला होता.
चव्हाण यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व आलं आणि सलग दोन निवडणुकात भाजपाचे सर्वाधिक 9 आमदार निवडून आणण्याची किमया रविंद्र चव्हाणांनी करून दाखवली. रायगड जिल्ह्यात रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांना भाजपात आणून त्यांनी भाजपाची ताकद वाढवलीच, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाचं कमळ फुलवलं.
चव्हाण हे फडणवीस यांच्यासाठी भरवशाचा माणूस बनले ते तेव्हापासून. ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत‘ हा बंडमार्ग आखण्यात आणि राबवण्यात चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली. वाजपेयी सरकार अणुस्फोट घडवणार आहे, हे जसे अमेरिकी गुप्तचरांपासून दूर राहिले, भारत सरकारचा सर्जिकल स्ट्राईक जसा पाकिस्तान सरकारला कळलाच नाही, तसा हा बंडमार्ग मातोश्रीला पूर्णपणे काळोखात ठेवून अवलंबला गेला आणि त्याचं बव्हंशी श्रेय रविंद्र चव्हाण यांच्या वाट्याला गेलं.
2019च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात चव्हाण होतेच, पण मंत्रीपद सांभाळण्याबरोबरच 2019च्या निवडणुकीत कोकणात भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यात त्यांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली होती ती फडणवीस यांच्या नजरेत भरली होती. याच काळात पक्षाचं सरचिटणीसपद त्यांच्या वाट्याला आलं होतं आणि स्वाभाविकपणेच राज्यभर प्रवास करत त्यांनी संघटना बांधणीचं काम केलं होतं. तळाच्या कार्यकर्त्यापर्यत त्यांचे दृढ संपर्क स्थापित झाले होते.
संघटनकौशल्याची चुणूक दाखवत असतानाच मित्रपक्ष शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्याची जी चाणक्यनीती त्यांनी दाखवली, त्यावरूनच महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याची जबरदस्त ताकद या माणसात आहे, हे फडणवीस यांनी जाणलं होतं आणि शिंदे यांचं बंड यशस्वी करण्यासाठी चव्हाण यांची रणनीती वापरली गेली.
2024च्या निवडणुकानंतर फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं. दोन पक्षांची साथ त्यांना घ्यावी लागली. ते पक्ष, ते नेते सत्तेत आल्यानं स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागेल, आगामी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकात भाजपाची कसोटी लागेल हे ओळखून त्या पक्षांशी जुळवून घेतानाच आपली स्थिती मजबूत करण्यासाठी चव्हाण यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवावी लागेल हे नेतृत्वानं जाणून चव्हाण यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं..
चव्हाण यांना पक्षाध्यक्षपद देतानाच मराठा समाजाला नेतृत्व दिले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रविंद्र चव्हाणांना ते भान ठेवतानाच प्रदेशाध्यक्षपद सांभाळता सांभाळता पक्ष कार्यकर्त्यांपुढे लोकप्रिय आमदार बनण्यासाठीचे कानमंत्रदेखील ठेवावे लागतील. 123च्या संख्येत असलेल्या भाजपला शतप्रतिशत भाजपा सरकार या स्थितीत आणून ठेवण्यासाठीच्या सार्या खेळी खेळाव्या लागतील..
रविंद्र चव्हाणांचं हे राजकीय कौशल्य मोहक आहे, परंतु मतदार केवळ मोहकतेकडे पाहून मतं देत नाहीत, त्याला शेवटी त्याचं रोजचं जगणं सुखकारक बनवणारा लोकप्रतिनिधी हवा असतो याचं भान आमदार रविंद्र चव्हाण नक्कीच ठेवतील. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असलं तरी डोंबिवलीचे असंख्य नागरी प्रश्न आ वासून उभे आहेत ही गोष्ट मी स्वत: एक डोंबिवलीकर असल्याने या अभिनंदनपर लेखात नमूद करणं मला आवश्यक वाटतं.
राज्याला नेतृत्व आणि कार्यदिशा देत असतानाच त्यांच्या मतदारसंघातील चित्र पालटण्याचं आव्हानही रविंद्र चव्हाण यांच्यापुढे आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा आणि संघटनकौशल्याचा कस पाहणार्या कार्यकाळासाठी भरभरून शुभेच्छा.