आम्ही ही वारकरी

विवेक मराठी    04-Jul-2025
Total Views |
Vasudev Kamat experience
 
@वासुदेव कामत
 
Vasudev Kamt 
’पाऊले चालती पंढरीची वाट’ हे यंदाच्या वर्षी घडून आलं. जगाच्या पाठीवर हा एकच सोहळा आहे की या वारीत चालणार्‍या सर्वांचा देव विठ्ठल आहे. तो ही माऊली. संस्काराची, संस्कृतीची, सांघिक देवकार्याची विलक्षण अनुभूती गाठीला आली. उगमापासून सागरापर्यंतची परिक्रमा नाही झाली तरी आपल्या ओंजळीत मावेल तितके अमृत प्राशन करता आले, जीव कृतार्थ झाला.
‘देवा, आपणसुद्धा एकदातरी वारीला जायचं. मला खरोखरीच वाटू लागलंय. हा अनुभव आपण घ्यायचाच.’ माझ्या गृहिणीने ही इच्छा व्यक्त केली होती 25 वर्षांपूर्वी, 2000 साली! त्याला कारण असं घडलं की आम्ही निसर्ग चित्रण करण्यासाठी गंगोत्री - गोमुखची सहल आखली. तेव्हा आम्ही घोडं करून पुढे गेलो तरी थकलो होतो आणि आमच्यातले चित्रकार मनोहर देसाई आणि आणखी काहीजण चालतच गोमुखला पोचले. त्यांच्या चेहर्‍यावर मात्र थकवा जाणवत नव्हता. ते कसे, हे विचारताच सोबती म्हणाले की, ’मुन्ना (मनोहरला आम्ही मुन्ना म्हणायचो) वारीचे भजन गात नाचत चालायचा आणि आम्ही त्याला साथ देत, त्याच्या तालावर पावलं चालतो ते इथपर्यंतचं अंतर सहज कापलं.’ याच सहलीत मुन्नाकडून पंढरीच्या वारीचा अनुभव ऐकून वाटू लागलं की आपणही या वारीतला एक तरी टप्पा करायचाच. त्यानंतर दर वर्षी पंढरीच्या वारीचा निश्चय पुढच्या वर्षावर ढकलत गेलो. काळ गेला तसे आमची इच्छादेखील पुसट होत गेली. एका दीर्घ आजाराने माझ्या गृहिणीने अंथरूण धरलंं आणि चार वर्षापूर्वीच तिने थेट वैकुंठाचीच वाट धरली.
 
 
गेल्या वर्षी गणपतीत विठ्ठलाची भजने गाताना ’पाऊले चालती पंढरीची वाट’ या ओळी आळवत होतो आणि अमृताला -माझ्या कन्येला म्हटलं की,‘गृहिणीची इच्छा होती की आपण वारी करायची.’ लगेच तिने घोषित केलं की,‘आम्ही वारी करणार. कोण कोण येतंय ते बोला.’ माझ्या दोन भगिनी गीता, सुमन, विशालभय्या, बंंधु शिवानंद, मी स्वतः, अमृता आणि आमचे जावई अंकित असे घरातलेच सातजण नक्की झाले. मी जातोय म्हटल्यावर माझे विद्यार्थी मित्र प्रणय अणेराव, रूक्मिणी दिक्षित, तिची मैत्रीण - आणि अमृताची ही मैत्रीण आम्रपाली यात सहभागी झाली. आमचा मार्गदर्शक मनोहर देसाई. एक छोटेखानी दिंडीच आकाराला आली म्हणा ना!
 
 
21 जूनला ज्ञानेश्वरांची आणि तुकोबारायांची पालखी पुण्यात भवानी पेठेत पोहोचणार आणि 22 जूनला पहाटे निघून सायंकाळी सासवडला विसावा घेईल हे मुन्नाने सांगितले होते. तेव्हा आपण पुणे ते सासवड हा 30-35 किलोमीटरचा टप्पा करू असं मनाशी पक्क केलं.
 
वारी करण्यापूर्वी रोज सकाळी किमान पाच किलोमीटर तरी चालावं म्हणून ’मॉर्निंग वॉक’ चालू केला. पण कसचं काय! दोन किलोमीटर कसंबसं चालून अमृताला म्हणायचो की, तू पुढे जा मी इथंच बसतो. त्यावर ती म्हणायची की,‘30 किलोमीटर कसे चालणार? आत्ताच विचार करा.’ मी म्हणायचो की,‘ते चालेेन पण आज इतकंच पुरे.’ मग मनालाच विचारी की,‘खरंच जमेल ना तुला?’ मग वाटे, ’हो’ म्हणायला काय जातं... आणि तो दिवस उजाडला. सगळी तयारी झाली. येणार्‍यांसाठी अमृताने आठवड्यापूर्वीच मोबाईलवर’आम्ही वारकरी’ असा ग्रुपसुद्धा बनवला - कसं जायचं, कुठे रहायचं, काय काय घ्यायचं...सगळ्या सूचना त्यात होत्या.
 
 
आमचा टप्पा 22 जूनचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर पुणे ते सासवडचा टप्पा करायचा म्हणून आदल्या रात्रीच पुण्याला गेलो. कोथरूडच्या संस्कार भारतीच्या कार्यालयात रात्रीचा मुक्काम ठरला होता.
 
पहाटे उठून शूचिर्भूत झालो. पांढरा कुर्ता, पायजमा, कपाळी वैष्णवी गंध टिळा, खांद्यावर उपरणे, गळ्यात माळ आणि झांजा. पाठीशी पायाची बाटली, पंचा घेतलेली छोटीशी सॅक आणि डोईवर टोपी घालून आम्ही निघालो. स्वारगेटपाशी आलो तर तोवर आमच्यापेक्षाही ताजेतवाने होऊन चालणारी विठ्ठलभक्त मंडळी उत्साहाने, लगबगीने चालत होती. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशी आरोळी देत आमच्यातील हौशींनी सेल्फी काढला.
 
वारीत सामील झालो आणि हळूहळू ‘मी’पण नाहीसे होऊ लागले. सहज पावले पडावीत तशी ओठातून उच्चारले जाणारे विठ्ठलनाम पावलागणिक लय धरून उच्चारले जात होते. किंंवा नामावलीच्या गतीत पावलं पडत होती.
 
दिंडीच्या वाटेवरच आख्खं पुणं स्नानादि आन्हिकं आटोपून स्वागत आणि सेवेला जागोजागी उभं होतं. एकादशी असल्यामुळे उपावासाची खिचडी, राजगिर्‍याचे लाडू-चिक्क्या, केळी, चहा-पाणी याची आग्रही व्यवस्था पाहताना मन भरून येत होतं. काही ठिकाणी लहान लहान मुलं वारकर्‍याच्या वेषात तर कुणी विठ्ठल रखुमाईच्या वेषात आम्हाला प्रसादरूप नाश्ता देत होती.
 
झांजांचा, टाळ-मृदुंगांचा नाद, विठ्ठल नामाचा गजर आसमंत दुमदुमवित होता. गोल्मा ऑक्टोबर महिन्यांत हृदयविकाराच्या एका झटक्याने माझ्या तब्येतीचं दार ठोठावलं होत आणि गेल्या काही महिन्यांपासून गुडघेही कुरकुरायला लागले होते. त्यामुळे अमृताला काळजी वाटत होती. सारखी माझी चौकशी करायची. मी मात्र ठीक आहे, ठीक आहे हे विठ्ठल नामाच्याच गतीने बोलत पावलं टाकत होतो. याबरोबरच साखरेशीही वैर सुरू झाल्याने रुचीवर बंधनं आलेली, पण या दिवसाकरता मी मिळेल ते घ्यायचं, नव्हे स्वीकारायचं या भावनेने थोडं स्वातंत्र्यही उपभोगलं. (चालण्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते हे ही विधान समाधान करीत होतं.)
 
चालता चालता तीन-चार किलोमीटर अंतर कधी कापलं तेे कळलंच नाही. एरव्ही वॉकिंगला अर्ध्यावरच फतकल मारून बसणारा ’मी’ माझ्याबरोबर नव्हताच जणू!
 
हडपसरमध्ये शिरताच जागोजागी राजकीय पक्ष आणि इतर सामाजिक संस्था मोठमोठ्या आवाजाच्या स्पीकरवर सेवेचा प्रोपोगंडा करीत वारीच्या विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ मृदुुंगांची लय क्षीण करीत होते. त्यातच भरीला ‘डीजे’ची धडधड. एरव्ही गोड वाटणारी भजनं आणि गाणी, एक दुसर्‍याच्या स्पीकरमध्ये गुंतल्याने कधी एकदा हे वातावरण सोडून पुढे सरकतो असे झाले होते.
पहाटेच्या प्रहरी मंद स्वरात नाम संकिर्तनात चालणार्‍या वारीची लयच बिघडू लागली. आता मलाही पायांचं आणि गुडघ्यांचं दुखणं जाणवू लागलं. कुठेतरी बाजूला बसून आपणच आपले पाय चेपावेत असे वाटू लागलं. माझे जावई अंकितने मनगटावरचं घड्याळ दाखवून मला सांगितलं की,‘दोन तासात आपण फक्त चार-पाचच किलोमीटर चाललो आहोत. अजून 25 किलोमीटरचा पल्ला कसा गाठणार?’ हे ऐकताच मटकन खालीच बसावं वाटलं. आता एकही पाऊल टाकणं कठीण अशी माझी स्थिती झाली होती. माझा मित्र प्रणय सावलीसारखा माझ्याबरोबर चालत होता. मी फूटपाथच्या एका डिव्हायडरवर बसलो आणि पाय पसरून माझेच पाय चेपत विठ्ठल नाम चालू ठेवले. तेवढ्यात घाईघाईने चालणारी एक व्यक्ती जवळ आली आणि एक छोटीशी डबी देऊन म्हणाली ‘माऊली, हे घ्या. लगेच आराम पडेल.’ मान वर करून त्याला ‘धन्यवाद’ म्हणायच्या अगोदरच ती व्यक्ती वारीच्या गर्दीत विरून गेली. त्याने दिलेल्या ‘बाम’च्या रगडण्याने पुन्हा चालेन या विश्वासाने उभा राहिलो.
 
 
हडपसरला तुकोबांची पालखी सोलापूरच्या दिशेने वळली आणि आमची ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडच्या दिशेने. थोड्या वळणावर ज्ञानेश्वरांच्या पालखीचे शिखर पाहून दोन्ही हात वर करून जयघोष केला. कमरेपासून पायांच्या बोटांपर्यंतचे स्नायू नकार घंटा बडवीत होते. गर्दीतून चालताना अर्धे अर्धे पाऊल टाकत पुढे सरकत होतो. आणि एक विलक्षण घटना अनुभव देऊन गेली. त्याही गर्दीत एक ’माऊली’ महिला उलट्या दिशेने गर्दी बाजूला करीत ’माऊली, माऊली’ म्हणत आमच्या दिशेने आली आणि माझ्या पावलांवर वाकून नमस्कार केला व माझ्याच पायांना कवटाळलं. मला काही सुचेना. मी ही ’माऊली नमस्कार’ म्हणून हात जोडले आणि ती परत मागे फिरून गर्दीत नाहीशी झाली
 
अमृताने विचारलं,‘अन्ना कोण ती?’ मी म्हटलं,‘माहीत नाही.’ हळूच डोळ्यात आसवं गोळा होऊ लागली. ‘तथास्तु’ म्हणून ती गेली त्या दिशेने नमस्कार केला. गृहिणीची इच्छा आपण पूर्ण करतोय याचं एक समाधान, प्रेरणा देऊन गेलं. मुंबईहून निघताना गृहिणीचा फोटो पाकिटात आठवणीने घेतला होता. मनाशीच विचारलं,‘नवस पावतोय ना?’
 
कुठूनशी शक्ती आली आणि परत चालू लागलो. कधी,‘विठ्ठल, विठ्ठल’, तर कधी ‘माऊली, माऊली’ म्हणत पावलं पडू लागली. वाटेत एका ठिकाणी एका सेवाव्रती डॉक्टरने माझ्या दोन्ही पायांना, कमरेला, पाठीला चांगला मसाज केला. त्यानं मी इतका तरतरीत झालो की दिवेघाटाच्या पायथ्यापर्यंत न थांबता चालू शकेन असा विश्वास दिला.
 
आमचे मेव्हणे चित्रकार विशाल आणि डॉ. मनोहर देसाई यांनी तीन वेळा माझ्या पायांना चांगला मसाज केला आणि मी ही सासवड येईपर्यंत चालू लागलो.
 
दिवेघाटाची वनराई, चालण्याची मंद गती, लयतालातलं भजन आणि दूरवर दिसणार्‍या पालख्या...सारं सारं खूप समाधान देत होतं. चालणार्‍यांमध्ये महिला होत्या, पुरुष होते, मुलं होती. काही तर वारकर्‍यांच्या खांद्यावर किंवा कडेवर होती. कोण श्रीमंत किंवा कोण गरीब, किंवा कोण कुठला, किंवा ज्ञातीच्या विभक्तीसुद्धा विरून गेलेल्या. वयाचं गणित घालावं तर ते सुद्धा अनुत्तरित करणारं. कुणी आमच्या सारखे एखादाच टप्पा करणारे, तर कुणी थोड अंतर चालून पुण्य पदरात घेणारे होते.
 
 
 
मी किंवा आमच्या गटाने वारीचा हा अवघड आणि मोठा टप्पा केला हे अभिमानानं सांगावं असं काही कर्तृत्व नाही. कारण आमच्या पेक्षा अधिक वारी न चुकता करणारे अनेक वयस्क आम्हाला लाजवतील असे होते. एक 96 वर्षांचे आजोबा गेली अनेक वर्षे 68 वारी चालले आहेत. तेही अनवाणी: आळंदी ते पंढरपूर आणि परतीची वारी आळंदीपर्यंत करून घराकडे परतणारे, अनवाणी चालणार्‍यांची संख्या तर किती तरी!
 
 
कुणाच्या माथी तुलसी वृंदावन तर कुणाच्या माथी विठ्ठल रखुमाई; काहींच्या डोईवर सामानाचं गाठोडं तर कुणाच्या कडेवर मुलं-नातवंडं. तक्रार नाही, रडणं नाही, कण्हणंसुद्धा नाही. विठ्ठलाच्या ओढीनं चाललं की विठ्ठल धरून चालत होता याचंच कौतुक वाटत होतं. सारा भार त्या माऊलीच्या खांद्यावर वाहून सारे चालत होते. ही परंपरा गेली अनेक शतकं अव्यावहत चालू आहे.
 
 
एक आश्चर्य राहून राहून वाटतं, की जगाच्या पाठीवर हा एकच सोहळा आहे की या वारीत चालणार्‍या सर्वांचा देव विठ्ठल आहे. तो ही माऊली. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताई या सर्व ’माऊली” तुकोबाही माऊली. आणि हे सर्व चालणारे वारकरी, त्यांनाही लाभलेलं एकच संबोधन ‘माऊली.’ एकमेकांच्या पाया पडतानाही हाक मारायची ती,‘माऊली माऊली,’
 
 
धन्य झालो. संस्काराची, संस्कृतीची, सांघिक देवकार्याची विलक्षण अनुभूती गाठीला आली. उगमापासून सागरापर्यंतची परिक्रमा नाही झाली तरी आपल्या ओंजळीत मावेल तितके अमृत प्राशन करता आले, जीव कृतार्थ झाला.
 
 
जर काही थोडे फार पुण्य पदरी आले असेल ते संविभाग म्हणून सर्वांना वितरीत व्हावे ही प्रार्थना.
 
जय जय विठ्ठल...श्री हरी विठ्ठल
 
लेखक आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार आहेत.