@अॅड. आशुतोष बडवे - 9730180600
महाराष्ट्रातील पंढपूरला जाणार्या वारीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. लाखोंहून अधिक संख्येने वारकरी सहभागी होत असले तरी वारीला अजूनही गालबोट लागले नाही, याचे श्रेय कोणाला तर वारीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाला. हा पालखी सोहोळा 18 दिवस चालणारा असला तरी याचे नियोजन त्याआधी सुमारे 2 -4 महिने चालू असते. हे व्यवस्थापन चालते ते आध्यात्मिक ज्ञान, जिज्ञासा, तृष्णा यांच्या पूर्तीसाठी.
मधोमध नक्षीदार मखमली गालिचा घालून ठेवलेल्या आसनावर चांदीची सुंदर पालखी ठेवलेली आहे. त्यावर कोणी हातभर लांबीच्या रंगीबेरंगी जाळीदार गोंड्यांची छत्री धरली आहे, कोणी रेशमी झालर लोंबणारे झगझगीत सूर्यपान धरले आहे, तर कोणी चांदीच्या पंख्याने वारा घालतोय. कोणी वनगायीच्या शेपटाच्या केसाची भल्या मोठ्या आकाराची लखलखीत चवरी ढाळतोय. सभोवताली कुशल चित्रकाराने आखल्यासारख्या गोलाकार आकारात सगळ्या दिंड्या उभ्या आहेत. त्यांच्या टाळ-पखवाजांचा ध्वनी आणि मुखावाटे पडणारा ज्ञानोबा तुकारामाचा गजर टिपेला पोहोचला आहे. सर्वत्र लोकांची दाटी उडालेली आहे. बसलेले लोक गलबलाट करीत आहेत. जे ते मानकरी आपापल्या ठरल्या जागी आले का? ते न्याहाळत चोपदार दिंड्या पुढे मागे करीत आहेत. सर्वत्र कोलाहल माजला आहे. सगळे जागेवर आले की मधोमध उभ्या चोपदाराच्या हातातील झळाळणारी चांदीची काठी उंच आकाशात झेपावते अन् त्या बरोबर ‘हो ऽ ऽ ऽ’ ची साद गर्जत राहते. तत्क्षणी सर्वत्र शांतता पसरते. अगदी टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता. सारे लोक बडबड बंद करतात. कुजबूजही थांबते. टाळ पखवाजाचे निनादणे बंद होते. चित्त एकाग्र करून भक्त मंडळी माऊलींच्या पालखीकडे पाहत आरतीची आस धरतात. चोपदाराकडून हरवले- सापडले अन् अन्य सूचनांची घोषणा होते आणि त्याच हातातील काठी आकाशात उंच गोलाकार फिरू लागताच,‘आरती ज्ञानराजा’चे साद पडसाद उमटू लागतात. टाळ पखवाज त्यांची साथ करतात. भला मोठा पितळी कर्णाही आरतीचे स्वर सर्वदूर नेतो.
यातून पालखी सोहोळ्यातील समाज आरती कशी घडते हे सांगायचे नाही. तसचे त्याचे बैजवार वर्णन करायचे नसून त्यामागे असणारे व्यवस्थापन किती विलक्षण आहे हे पोचवायचे आहे. म्हणून हे सविस्तर मांडले. कारण क्षणार्धात सूचना...क्षणार्धात शांतता, आरतीचे स्वर त्या साठीची ’परवली’ म्हणजे काठीचे आकाशात झेपावणे, गोल फिरणे. हे म्हणजे या सगळ्यातील सूक्ष्म व्यवस्थापन होय. तेच त्याच्या यशाचे कारण होय.
पण हे व्यवस्थापन म्हणजे निश्चित काय? याचा विचार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहोळ्यासंदर्भात कसा केला जातो ते समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. हा पालखी सोहोळा 18 दिवस चालणारा असला तरी याचे नियोजन त्याआधी सुमारे 2 -4 महिने चालू असते.
गुढीपाडव्याला पंचांग आणि गुढीपूजा झाली की याची सुरुवात होते. चैत्र शुद्ध एकादशीपूर्वी आळंदी संस्थानचे विश्वस्त आणि सोहोळा प्रमुख, यांच्या बरोबरच सोहोळ्याचे मालक आरफळकर आदी मंडळी प्रत्यक्ष वाटचालीच्या रस्त्याने पाहणीसाठी फिरुन येतात. पालखीच्या मुक्कामाच्या, जेवणाच्या आणि विसाव्याच्या जागी जाऊन स्वतः पाहणी करतात. स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी अडचणींबाबत चर्चा करून त्यांचे निराकरण करतात. त्या नंतर पंढरपूरात दिंडीवाल्यांची सभा होते. त्यातही अनेक विषयांवर चर्चा होऊन मागील अडचणी आणि संभाव्य विघ्ने या बाबत चर्चा होऊन मार्ग काढला जातो.
या नंतर प्रत्यक्ष कामाला आरंभ होतो. आळंदी संस्थान हे याचा केंद्रबिंदू असल्याने त्यांचेकडून तिथी क्षय वृद्धी याचा विचार करून सोहोळ्याचे वेळापत्रक प्रकाशित केले जाते. मग मात्र सर्वत्र आपापली जुळणी आणि कामाची धांदल उडते.
प्रत्यक्ष संस्थानामध्येे हळकुंडापासून अग्निकुंडापर्यंत आणि पादुकांपासून पालखीपर्यंत, बैलांपासून रथापर्यंत विविध भांडीकुंडी, वस्त्रे प्रावरणे, भोजन शिधा सामुग्री, मुक्कामाची पाले, पडदे, पेट्या यांसारख्या कैक वस्तूंच्या गरजेप्रमाणे याद्या करून ते देवाच्या भांडारात जमा करणे आवश्यकतेप्रमाणे त्याच्या पेट्या बनविणे, नोंदी ठेवणे यांसारखी कामे केली जातात.
बरोबरच पुजारी, व्यवस्थापक, पालखीचे भोई, देवासाठी सोवळ्यातील स्वयंपाकाचे कसबी स्वयंपाकी, जाणते वाढपी, हुनरबाज बैलवाले, कोणतेही काम पार बिनबोभाट पाडणारे हरकामे अशा हर एक कामगांरांची जुळणी केली जाते. त्यांच्यावरच्या जबाबदार्या वाटून दिल्या जातात.
याप्रमाणे प्रत्येक दिंडीप्रमुखाकडेही धांदल उडते. दिंडीतील लोकांसाठी पाले, मेखा, घण, काठ्या, तणावाच्या दोर्या, टाळ, पखवाज, त्याची शाई भरणे, गजरे, पुड्या दुरुस्ती करणे याची जुळणी होते. मोडल्यातोडल्याची भरती केली जाते. गरजेप्रमाणे नवी खरीदले जाते. मग भोजनावळीच्या सामुग्रीची जमवाजमव केली जाते. स्वयंपाकासाठीची मोठमोठाली भांडी, वाढण्याची भांडी, पोळपाट लाटणी, विळ्या, चाकू, सुरे, पोळीच्या आणि साध्या शेगड्या असे सारे जमविले जाते. पूर्वी सरपण असे. आता गॅस टाक्या भरून घेतल्या जातात. ट्रक, टँकर मालवाहतुकीच्या गाड्या, त्यासाठी अनुभवी ड्रायव्हर बोलावून आणले जातात. पाल ठोकणारे, अन्य कामाचे लोक जमविले जातात. दिंडीत चालणारे टाळकरी, गुणी गायक, पखवाज वादक, विणेकरी, झेंडेकरी, हंडेवाले, तुळस घेणारे या सर्वावर नियंत्रण ठेवणारे दिंडीचे चोपदार, हवालदार कारभारी असे सार्यांचे नियोजन होते. ही जबाबदारी दिंडी प्रमुखाची असते.
जसे संस्थान, दिंडीप्रमुख समूहाची जबाबदारी चालवितात, नियोजन करतात तसे वैयक्तिक पातळीवर लोकांची गडबड उडते. आपली वळकटी जी पावसात ओली होणार नाही, आवश्यक वस्तू सामावेल, जास्तीत जास्त गरजा भागवेल, अन् कमीत कमी जागा खाईल आणि वजन कमी होईल अशा रितीने त्याची तयारी केली जाते. ज्यात आपल्या कपड्यालत्त्याबरोबर अंथरुण पांघरूण, दोरी, औषधे, ताट, तांब्या, आसन अन् नित्यपूजेचे, वाचनाचे साहित्यही असते.
आळंदीहून हा सोहोळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होत असला तरी शितोळे सरकारांचे घोडे आणि अन्य लवाजमा ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला कर्नाटकातील अंकलीहून आळंदीकडे कूच करतो. तर शिरवळकर, धोंडोपंतदादा अत्रे यांच्या दिंड्या त्याच दिवशी पंढरीहून माऊलींना आणण्यासाठी म्हणून पायी निघतात. या दिंड्यातील वारकरी भक्तांची व्यवस्था मरलक वा दिंडीप्रमुखांनी करावयाची असते. तर शितोळे सरकारांनी त्यांच्या घोड्याच्या मोतद्दारांना आणि स्वारांना जमिनी देऊन त्यांच्या कायमच्या पोटापाण्याची पिढ्यानपिढ्याची व्यवस्था केलेली आहे.
आळंदीहून मोठ्या थाटात प्रस्थान सोहोळा निघतो अन् मजल दरमजल करत हा सोहोळा पंढरीकडे येतो. पण तो पूर्वसुरींनी घालूून दिलेल्या शिस्तीत. जो तो आपापले स्वत:चे काम स्वतः करतो. त्याअर्थी तो स्वयंपूर्ण असतो. पहाटे तंबू पाडण्यापूर्वी आपली आन्हिके आटोपून आपली पडशी/वळकटी बांधून व्यवस्थेच्या गाडीत (पूर्वी बैलगाडीत) टाकतो. रात्री स्वतः काढतो. इतरांना मदत करतो. कैक जण तर आपले साहित्य आपल्याच खांद्यावर घेऊन चालतात. एका खांद्यावर घोंगडे ठेवून त्यावर पडशी ठेवतात. ज्याला पुढे आणि मागे अनेक कप्पे असतात त्यात आपले कपडे, जेवणाची भांडी, पोथी/देव ठेवतात. दुसर्या खांद्यावर पताका असते अन् गळ्यात टाळ, माळांचे अलंकार मिरवितात. चर्येवर गोपीचंदनाच्या मुद्रा, कपाळी गंध त्यावर मधोमध बुक्का रेखलेला. ते जणू एकांडे शिलेदारच असतात.
हाती टाळ घेऊन चालताना चार चारची एक ओळ कोणीही मोडत नाही. रस्त्यावर वाटप चालू असेल तर त्याकडे धावत नाही. कारण ते वाटप साहित्य गोळा करायला आलेले नसतातच. ते भक्तीच्या पोटी आलेले असतात. साधनेसाठी आलेले असतात. नामस्मरणासाठी असलेले असतात. संत सहवासासाठी आलेले असतात. देवभेटीसाठी आसुसलेले असतात. पुण्यप्राप्ती हा त्यांचा ध्यास असतो.
चालताना दिंडीप्रमुख आपल्या दिंडींचे वहन चालवितो. म्हणजे भजन, त्याचा दिवसभराचा क्रम शिवाय अभंगाचे जे प्रकरण परंपरेने घालून दिले आहे तसेच चालविले जाते. सकाळी आरंभी नामावळी वा रूपावळी, म्हणजे देवस्तुतीपर अभंग, त्या झाल्या की वासुदेव, आंधळा पांगळा, नाट, पत्रिका असे भजन रंगते. दुपारी भोजनोत्तर हरिपाठ, अन् त्या दिवसाचे, वाराचे अभंग, वा प्रसंगपरत्वेचे अभंग. जसे की जेजुरी जवळ येता,‘मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी। इच्छा मुरळीस पाहू नका ॥ पडाल नरकद्वारी । बोध बुधली ज्ञान दिवटी अजळा दारोदारी।’ असे खंडोबाचे माहात्म्य सांगणारे अन शिंगणापूर जवळ येता ‘शिव भोळा चक्रवर्ती। त्यांचे पाय माझे चित्ती। तसेच कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती। पार्वतीचा पती योगिराज॥, तुम्ही विश्वनाथ । दिन रंक मी अनाथ । कृपा कराल ते थोडी । पाया पडीलो बराडी’ यासारखे अभंग गायले जातात. ते ही एक एक जणांकडून पुढे सरकत जातात. म्हणजे दिंडीच्या चार जणांच्या पहिल्या ओळीत पहिला अभंग झाला की पुढचा अभंग त्या पुढच्या ओळीतील टाळकर्याने सुरू करायचा. असे पुढे पुढे अभंग म्हणत दिंडी जाते. एकानी तो सांगायचा इतरांनी त्यामागे ताल धरायचा. टाळ वाजवीत अभंग आळवायचा. ते करताना टाळाची दोरी तुटली तर जागा सोडायची नाही. मात्र दिंडीचे सोबत रक्षक म्हणून कडेने चालणारे चोपदाराकडे आपला टाळ द्यायचा. कारण त्याचे जवळ त्यासाठीची दोरी ठेवलेली असते. त्याने तो टाळ नीट करून टाळकरी मंडळींना पुन्हा द्यायचा. त्याच्याच जवळ पखवाजासाठीची कणिक अन हातोडी असते.
या ओळीही साधारण गाववार चालतात. ते ही पिढ्यानपिढ्या. एखाद्या दिंडीत गतकाळात एखादे गांव विणेकर्याच्या पुढच्या ओळीत चालत असेल तर ते आजही तिथेच चालते. कालौघात भक्त कमी झाला तर त्याजागी त्याच्या घरचा वा गावचा वारस येतो. तेच विणेकरी, अन् झेंडेवाले, शिंगवाले, कर्णेकरी यांचेही आहे. जसे दिंडीकरी 5-7 पिढ्या दिंडी चालवितो आहे तसे त्यांचेकडील गावे, टाळकरी, झेंडेवाले, विणेकरीही 5-7 पिढ्या चालणारे, चालविणारे आहेत. कारण ‘याचा धरिन अभिमान। करिन आपुले जतन।’ हे वारकरी ब्रीद आहे.
दिंडीप्रमुखाकडे दिंडीचे संचालन असते तसे त्यातील टाळकरी, झेंडेकरी, वारकरी, विणेकरी यांचे भोजन, जलप्रबंध, पालातील मुक्काम यांचेही नियोजन असते. एका पालात 20-25 जण राहू शकतात याचा विचार करून लोकांच्या गणितावर पाले टाकली जातात. ही पाले मारणारी मंडळी गाड्यात सारा बाडबिस्तरा घेऊन पुढे जातात. मुक्कामावर माऊलींचा तंबू पहिला लागतो मग इतरांची पाले पडतात. कारण पहिले देव मग आपण हा भाव त्यात आहे. तसेच देवाच्या तंबूवरून आपल्या जागा ठरलेल्या आहेत ते कामही सोपे जाते. उजवीकडे, डावीकडे कोण, त्यांच्या पुढे कोण, मागे कोण, हे सारे सासवड वाखरीत एकसारखेच असते. जसे आधुनिक काळातील मंत्री लोकांचा वा सनदी लोकोचां प्रोटोकॉल असतो तसाच हा पारंपारिक वारसा आहे. शितोळे सरकारांचे पाले देवाच्या डावीकडे समोरच्या बाजूस असतात. त्यासमोर घोडे, रथ, बैल बांधले जातात. सरकारांच्या पालाच्या पुढील खांबाला त्यांचा जरिपटका बांधला जातो. ज्यावरुन पाल समजून येते. त्यांचे मागे वासकर, त्या मागे संस्थानाची पाले असतात. हे डावीकडे तसे उजवीकडेही नियोजन आहे. देवाच्या सभोवती मानकरी लोकांची पाले. कारण काही निकडीचे काम निघाले तर त्वरेने बैठक भरविता येते. ती ही जरिपटक्याच्या पालाखाली भरते. त्यातील निर्णय जो तो आपल्या शिष्याला कळवून त्वरेने अंमल होऊ शकतो.
मुख्य तळावर देवासमोर मोठे पटांगण मोकळे ठेवलेले असते. हेतू दोन अर्थी. एक देवासमोर चालणारे कीर्तन, जागराचे भजन यासाठी जागा. आणि दुसरा हेतू गर्दी टाळणे हा होय. नित्य सायं समाजआरती नंतर कीर्तनसेवा होते. त्यानंतर जागर चालतो. म्हणजे देवासमोर सतत भजन करीत उभे रहायचे. त्यातून देव आळविणे आहेच पण जागरामुळे चोरीमारी, अपव्यवहारावर वचक बसतो.
ठरल्या तिथीप्रमाणे कीर्तन जागर होत असतात. त्याची तपशीलवार नोंद संस्थानाकडे ठेवली जाते. शिवाय देव निघण्यापूर्वी काकडाभजन चालू होते त्याच वेळी अभिषेक पूजा संपन्न होते. माऊलींना सकाळी शितोळे यांचा नैवेद्य असतो तर दुपारचा प्रबंध संस्थानाकडून केला जातो. निघताना कर्ण्याची इशारत केली जाते. ती ही तीन वेळा थांबून थांबून. तिसर्या कर्ण्याला वाटचाल चालू होते. रस्त्यात जागोजागी चालणार्या लोकांच्या शक्तीचा विचार करून बैलाच्या अन घोड्याच्या पाण्याचा विचार करून ठिकठिकाणी पालखी थांबविली जाते. काही काळ विसावा होतो. शिवाय गावोगावच्या भक्तांनाही त्यामुळे दर्शन होते. त्याचवेळी लोक आपला अल्पोपहार, दुग्धपान, चहापान करतात. जनावरांना पाणी दाखवितात. अन् पुन्हा पुढची वाटचाल चालू राहते.
भोजनाचे वेळी दिंडीकर्यांचे ट्रक पुढे जाऊन आपल्या लोकांची व्यवस्था करतात. तिथे स्वयपांक होतो. पंगती पडतात. सारे लोक एका पंगतीला भोजन करतात. झेंडेकरी मात्र रस्त्यावर झेंड्यांच्या कैच्या लावतात अन् तिथेच सावलीत बसून राहतात. दिंडीप्रमुखांनी त्यांचे जेवण तिथे पाठवायचे. कारण हे की भोजनोत्तर पुन्हा दिंडी सुरू झाली की आपली जागा शोधण्यात वेळ जाऊ नये. पटकन् चाल साधावी. दिंडी पकडावी कारण झेंडेकरी इतरत्र गेले की पुन्हा नंबरला दिंडी लागणे कठीणच जाते.
चालताना पाऊस लागला की जो तो आपल्या जवळच्या पाठपिशवीतून कुंची, रेनकोट, छत्री काढतो अन परिधान करतो. पावसाने दिंडी थांबत नाही, भंगत नाही. उलट त्यात टाळकर्यांना जणू पंख फुटतात. सर सर वाट सरते. पंढरीचा हा पायी प्रवास म्हणजे एक तप आहे. साधना आहे. त्यासाठी ऊन, वारा, पाऊस हा सोसायलाच हवा असे बंकटस्वामी महाराज म्हणायचे.
पाले पावसात पडली म्हणजे आंधी त्याभोवती चारी काढल्या जातात, ज्यामुळे पाणी आत न येता वाहून जाते. हे सारे अति तन्मयतेने, नियोजनाप्रमाणे आपसूक घडत असते. त्यासाठी आरडाओरड गडबड गोंधळ काही दिसत नाही. त्यासाठीची रचना पूर्वसुरींनी केलेली आहे ती तशीच चालविली जाते. आपदा आल्यास त्यावर उपाय करून नवी व्यवस्था केली जाते. जसे पूर्वी बैलगाड्या होत्या त्याजागी ट्रॅक्टर आले, मोठाले ट्रक आले. पूर्वी दिवट्या असायच्या त्यात बत्त्या आल्या. आता वीज आली. पूर्वी शौचाला पार बाहेर मोकळ्यात जावे लागायचे. आता तळावर शौचालयाच्या गाड्या आल्या. जवळच पाण्याचे टँकरही असतात. पूर्वी स्वयंपाक मातीत चर काढून त्यात सरपण घालून चुलाणे मांडली जायची, त्या जागी आता गॅसच्या भट्टया आल्या एवढाच काय तो बदल!
म्हणजे कामाचे नियोजन, संयोजन, त्यावरचे नियंत्रण, कार्यप्रवणता हे सगळे अत्यंत सूक्ष्मतेने आणि तेवढेच विस्ताराने चालते. प्रत्यक्ष प्रवासात दिंडीकर्याला अडचण आली तर तक्रारीचा मार्ग ही सोपा आहे. अर्ज करा, विनंत्या करा, खेपा घाला ही यातायात करावी लागत नाही. नित्याच्या समाजआरतीच्या वेळी दिंडी तळावर आली अन् चोपदाराने काठी वर केली की सर्वत्र शांतता पसरते. त्यावेळी तक्रारदाराने आपले टाळ वाजवीत रहायचे. बस झाले काम. म्हणजे प्रमुखांनी ओळखायचे की यांचे गार्हाणे आहे. त्यावेळी चोपदाराने त्या दिंडीत जाऊन विचारपूस करायची, गार्हाणे ऐकायचे. प्रमुखाला, मालकांना येऊन सांगायचे. त्यांनी त्यावर त्वरित निर्णय करायचा ही झाली निराकरणाची सुलभ पद्धती.
या सार्यात पुढे असणारा नगारा, त्यामागे घोडे, मग दिंड्यांचा क्रम, त्यांचे ध्वज हे सारे आखल्यासारखे चालते. कारण सोहोळ्यात जरिपटके केवळ तीनच. एक स्वाराचा, दुसरा रथापुढे 11 व्या दिंडीतील भोपळे दिंडीचा, आणि रथामागे 11 व्या दिंडीतील ढवळीकरांचा. त्यामुळे लोकांनाही कोणती दिंडी आली आहे हे लक्षात येते.
पारंपारिक पद्धतीत या सार्याचा इतका बारकाईने विचार केला आहे की त्यावर एखादा प्रबंध होईल वा जाडजूड ग्रंथ होईल. हे सारे आधुनिक व्यवस्थापनतंत्राचा विचार करता अजब आहे. कारण आधुनिक तंत्रात केवळ त्यातील विकास व कष्टता यांचा विचार केला जातो. मात्र परंपरेत त्यातील शारिरीक, बौद्धिक, भौतिक, मानसिक, आध्यात्मिक टप्प्यांचा विचार केला आहे. planning, organizing, controlling, actuating यात वेळोवेळी दिसते. मात्र यामागचा उद्देश आध्यात्मिक म्हणजे भगवद्प्राप्ती हा आहे. देवभेटी आहे. संतसज्जनांचा सहवास हे आहे.
हे व्यवस्थापन वैयक्तिक व्यक्ती म्हणून त्यांच्या गुणांचा विकासाचा, सुधारणांचा विचार करते. जसे की नित्याच्या भजनाने गायन सुधारते, पाठांतर होते, चाली नव्याने कळतात. चालण्याने आरोग्य सुधारते. वारा ऊनपावसाने सहनशक्तीत वाढ होते. स्वत:मधल्या उणीवा कमी होतात. भौतिक गरजा कमी होतात. सात्विक शुद्ध जीवनपद्धती आचारमान होते.
तसेच सामूहिक जीवनात प्रगल्भता येते. इतरांना मदत करण्याची भावना वाढते. आपद्काल कळतो. सहजीवन जमते. इतरांना मान देणे, सन्मान करणे, त्यांच्या विचाराला अनुमोदन देणे हे ही घडते. कारण या सोहोळ्यात सारेच एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतात. यामागे सर्वाभूती ईश्वर हा भाव आहे. त्यांची सेवा हे जीवनकर्तव्यच हा भाव आहे. तो दिवसेंदिवस दृढ होत जात आहे. कोणाची ज्येष्ठता काय, कोणाशी कसे वागावे हे यातून माणूस शिकतो.
बरोबरच तिसरे अंग वैश्विकतेचे आहे. पर्यावरण संबंधाचे आहे. बरोबरचे बैल, घोडे पूर्वी हत्ती यांचाही विचार केला जातो. हर एक दिंडीत कुत्रे चालताना दिसते. तसे त्याला सारे मायेने भाकरी घालताना दिसतात. रस्त्याकाठचे शेतकरी बैलाला घोड्याला वैरणकाडी पाणी देताना आढळतात. अगदी विसाव्यावर त्यांचा मसाज करतानाही दिसतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे।’ याचेही प्रत्यंतर येते. कोणीही झाडे तोडताना दिसत नाही. असमतोल झाला तर ती न्यूनता आहे. ती अपूर्णता आहे. असुसंगतपणा आहे यांचे भान सर्वांना असते. उलट त्याच्या सावलीत सारे विसावताना दिसतात.
मात्र याहून महत्त्वाचे म्हणजे हे व्यवस्थापन चालते ते आध्यात्मिक ज्ञान, जिज्ञासा, तृष्णा यांच्या पूर्तीसाठी. कारण हे 250 किलोमीटरची वाट चालतात ते भगवंतांच्या भेटीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, जी त्यांना पंढरीत होणार आहे. संतभेटी नी भगवद्भेटी होणार आहे. त्यांची ज्ञानपूर्ती, तृष्णापूर्ती, जिज्ञासापूर्ती पंढरी क्षेत्री होतेच पण वाटेवर चालताना तिचे जागोजागी प्रत्यंतर येते. मात्र ते कळते प्रवासाच्या अखेरीस. अर्थात आधुनिक व्यवस्थापनात अर्जन आहे. ते केवळ अर्थार्जन वा आर्थिक होय. मात्र पारंपारिक व्यवस्थापनात ध्येयअर्जन आहे, उद्देश आहे तो आध्यात्मिक. त्यामुळे आधुनिकतेहून पारंपारिकता इथे श्रेष्ठ ठरते. म्हणून म्हणावेसे वाटते,
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले ।
म्हणोनी विठ्ठले कृपा केली ॥