महाराष्ट्राची लोकधारा आणि वारी

विवेक मराठी    05-Jul-2025
Total Views |
information of maharashtra pandharpur wari
 
@डॉ. वरदा संभूस 
 
 Pandharpur 
वारीमध्ये सर्व स्तरांतील लोक सहभागी होतात, त्याचप्रमाणे वारी ही परंपरागतदेखील आहे. थोडक्यात एकाच घरात वारीची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत असते आणि वारीशी जोडलेली मूल्यपरंपरा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असते. म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घोंगडीचे उभे आणि आडवे धागे वारीमध्ये गुंफले जात असतात. गावागावांतून सर्व स्तरांतून वारीममध्ये सहभागी होणारे वारकरी त्यांच्या माध्यमातून वारकरी मूल्यं समाजाच्या कानाकोपर्‍यात पोहोचतात. पिढ्यांपर्यंत हा ऐतिहासिक आणि शाश्वत ठेवा पोहोचतो आहे. वारीच्या माध्यमातून शतकानुशतके समाजमन घडवण्याचे काम अविरत चालू आहे.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई।
 
नाचती वैष्णव भाईं रे।
 
क्रोध अभिमान गेला पावटणी।
 
एक एका लागतील पायीं रे॥1॥
 
महाराष्ट्राची लोकधारा समजून घेताना दोन गोष्टींचा साकल्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि शतकानुशतके चालत आलेली पंढरपूरची वारी. महाराष्ट्र संस्कृती आणि इतिहास या दोन गोष्टींभोवती बांधला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वराज्याच्या निमित्ताने मूर्त झालेला महाराष्ट्र धर्म आणि वारीच्या माध्यमातून लोकालोकांत पोहोचलेला, रूजलेला भागवत धर्म यांच्या आधारावरच मराठी-भाषा प्रांताची संस्कृती आधारलेली आहे. येथे प्रामुख्याने नमूद करायला हवे, महाराष्ट्र धर्म तसेच वारकरी संतांचा भागवत धर्म यांची जननी जरी महाराष्ट्र प्रांत असला तरी त्यांचा विचार आणि कार्य मराठी प्रांतापुरते मर्यादित नाही. जवळ जवळ संपूर्ण भारतवर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विचार आणि संतांचा भागवत विचार त्या त्या काळात पोहोचलेला दिसतो. अटक ते कटक आणि दक्षिणेत तंजावरपर्यंत झालेला मराठा साम्राज्याचा विस्तार आणि श्री गुरू ग्रंथ साहिब या ग्रंथात नामदेव महाराजांच्या रचनांचा झालेला अंतर्भाव ही या विस्ताराची काही द्योतके आहेत. तसेच हे ही नमूद करायला हवे, की महाराष्ट्र धर्म आणि भागवत धर्म हे दोन भिन्न, नसून ते एकाच सामाजिक, सांस्कृतिक मंथनाचे सार आहे आणि ते परस्परपूरक आहेत. संतांनी घालून दिलेल्या भागवत धर्माच्या पायावर स्वराज्याचा महामेरू उभा राहिला आणि पुढे निदान दोनशे वर्षे स्वराज्य पताका फडकत राहिली असेे निःसंकोचपणे म्हणता येईल.
 
 
सदर लेखात भागवत धर्म आणि शतकानुशतके या भागवत धर्माशी सामान्यजनांना जोडून ठेवणार्‍या, भागवत धर्माची मूल्यव्यवस्था महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणार्‍या वारीचा विचार प्रामुख्याने केला आहे. ’वारी’ चा शब्दशः अर्थ ’येरझारा’ असा आहे. वारंवारिता अथवा पुनःपुन्हा एखाद्या ठिकाणी जाणे आणि परत येणे म्हणजे वारी करणे. अनेक देवस्थानी अथवा तीर्थक्षेत्री भक्त वर्षातून एकदा किंवा ठराविक अंतराने भेट देत असतात, त्या दृष्टीने अशा तीर्थयात्रांना देखील ’वारी’ म्हणता येते. मात्र शं. वा. दांडेकर (मामा दांडेकर), यांनी म्हटल्याप्रमाणे, ’वारी’ म्हटले म्हणजे पंढरपूरचीच वारी असा अर्थ रूढ आहे. पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा गाभा.
 
 
वारीची परंपरा निदान हजार वर्षांची आहे असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत वारीला जात असल्याचे उल्लेख साहित्यात पाहायला मिळतात. त्याही आधी, आठव्या शतकात, श्री शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंगाष्टक प्रसिद्ध आहे. त्यावरून असे म्हणता येईल की, आठव्या शतकात पंढरपूर हे नावाजलेले तीर्थक्षेत्र होते. वर्षातून एकदा आषाढ, कार्तिक, माघ किंवा चैत्र यांपैकी एका एकादशीला पंढरपूरला चालत जाऊन, चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेणे आणि हा प्रतिवर्षीचा नियम करणे हे वारकर्‍यांचे व्यवच्छेदक लक्षण होय. त्याचबरोबर गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, प्रतिदिन हरिपाठ, पंधरा दिवसातून येणारे एकादशी व्रत, शुद्ध आचार-विचार ही वारकर्‍यांची ओळख. वारकरी म्हणजे तो अथवा ती वारीत असणारच हे निश्चित.
 
 
वारीच्या निमित्ताने, संपूर्ण महाराष्ट्रातून, किंबहुना, महाराष्ट्राबाहेरील मराठी प्रांतातून, शहर-गावांतून, महिला, पुरुष, आबालवृद्ध वारीत सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून विविध संतांच्या पालख्या निघतात. सामान्यतः पालखीबरोबर एकच एक मोठी दिंडी किंवा अनेक दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत कमीअधिक प्रमाणात वारकरी असतात. ती संख्या 50 ते 5000 अशी असू शकते. पालखीबरोबर चालणार्‍या दिंड्यांचा मिळून पालखी सोहळा होतो आणि विविध भागातून निघणारे पालखी सोहळे मिळून संबंध वारी होते. अनेक पालखी सोहळ्यांपैकी ज्ञानोबा-तुकोबांचे पालखी सोहळे प्रसिद्ध आहेत आणि अधिकाधिक वारकरी या दोन पालख्यांबरोबर चालताना दिसतात. असा हा गावागावातून निघालेला वैष्णवांचा मेळा, वेगवेगळ्या मार्गानी पंढरपूरकडे प्रस्थान करतो. प्रस्थान ठिकाणापासून पंढरपूरपर्यंत अंतराच्या प्रमाणात ठरलेले मुक्काम आणि विसावे असतात. आषाढी एकादशीच्या साधारण दोन दिवस आधी सर्व पालख्या पंढरपुरात पोहोचतात. पंढरपुरात मुख्यतः चंद्रभागेत स्नान करून, पांडुरंगाचे अथवा कळसाचे दर्शन घेणे, चंद्रभागेच्या वाळवंटात भजन, कीर्तन, भारूड, प्रवचन यांमध्ये तल्लीन होणे आणि द्वादशीचा काल्याचा प्रसाद घेऊन परतीच्या वाटेला लागणे हा वारकर्‍यांचा सामान्यक्रम दिसतो. तर प्रमुख पालख्यांचा मुक्काम गुरुपौर्णिमेपर्यंत पंढरपुरात असतो व त्यानंतर त्यांची परतवारी सुरू होते.
 
 
सध्या दिसणारे वारीचे सूत्रबद्ध नियोजन हे मात्र मागील दोनशे वर्षातील आहे. वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हैबतबाबा आरफळकर यांच्या प्रयत्नाने एकोणिसाव्या शतकात क्रमबद्ध दिंड्या, दिंड्यांचे क्रमांक, ठरवून दिलेला भजन-अभंगांचा क्रम, वारीचे वेळापत्रक, थांबे आणि विसावे, सैनिकी शिस्तीत वारीची वाटचाल याचा शिरस्ता सुरू झाला आणि तो आजतागायत चालू आहे. या घालून दिलेल्या शिस्तीमुळे वारीचे नियोजन अतिशय चपखल असते. ज्याप्रमाणे वारकरी नोंदणी करून दिंड्यादिंड्यातून चालतात, त्याचप्रमाणे अनेक मोकळे वारकरी देखील असतात. सध्या अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या, विद्यापीठांच्या, अथवा सेवाभावी संस्थांच्या अनेक दिंड्या, तसेच विविध प्रकारच्या सेवा दिंड्या वारीत पाहायला मिळतात.
असे म्हटले जाते की वारीमध्ये हौशे, नवशे आणि गवशे बघायला मिळतात. थोडक्यात, वारीमध्ये समाजातील सर्व स्तरांतील लोक सहभागी होतात. लिंग, वर्ण, जाती, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, संप्रदाय अथवा उपासना पद्धती, वय या कशाचेच वारीत सहभागी होण्याला बंधन नाही. थोडक्यात, वारकरी होण्याचे सर्व नियम जो पाळतो, किंवा ज्याने माळ घेतलेली आहे तो वारकरी. मात्र, विस्तारित अर्थाने जो जो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वारीशी जोडला जातो, क्षणिक का होईना वारीमध्ये चालतो तो देखील वारकरीच होय. त्यामुळे खर्‍या अर्थी वारी ही सर्वसमावेशक आहे. ज्याप्रमाणे वारीमध्ये सर्व स्तरांतील लोक सहभागी होतात, त्याचप्रमाणे वारी ही परंपरागत देखील आहे. थोडक्यात एकाच घरात वारीची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत असते आणि वारीशी जोडलेली मूल्यपरंपरा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असते. म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घोंगडीचे उभे आणि आडवे धागे वारीमध्ये गुंफले जात असतात. गावागावांतून सर्व स्तरांतून वारीममध्ये सहभागी होणारे वारकरी त्यांच्या माध्यमातून वारकरी मूल्यं समाजाच्या कानाकोपर्‍यात पोहोचतात. वारीमध्ये काही मूल्यांची उजळणी होते तर काहींमध्ये कालानुरूप आवश्यक बदल घडवण्याची प्रक्रिया सुरू होते. तर दुसर्‍या बाजूला वारीचा ठेवा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असल्याने नवीन पिढ्यांपर्यंत हा ऐतिहासिक आणि शाश्वत ठेवा पोहोचतो आहे. वारीच्या माध्यमातून शतकानुशतके समाजमन घडवण्याचे काम अविरत चालू आहे.
 
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणखी एक ठेवा म्हणजे मराठी भाषा. भागवत धर्माचा पुरस्कार केलेल्या सर्व संतांनी त्यांची रचना मराठीमधून केलेली दिसते. मराठीतून अभंग अथवा ग्रंथ रचना हा निव्वळ योगायोग नसून संतांनी कालानुरूप जाणीवपूर्वक केलेली योजना आहे. सर्व संतांच्या साहित्यात केवळ मराठी रचनाच नाही तर मराठीचा गौरव दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
 
माझा मराठीचा बोलु कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके।
 
 
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥
 
तर एकनाथ महाराज विचारतात:
 
संस्कृत वाणी देवें केली
 
तर मर्‍हाटी काय चोरापासूनी झाली?
 
महाराष्ट्राच्या सर्व स्तरांतील लोकांना आध्यात्मिक ज्ञानाची कवाडं उघडी व्हावीत म्हणून मराठीतून रचना हा संत मंडळाने जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. त्याच जोडीने सर्वसामान्यांच्या परिचयाची रूपके, चाली वापरून, ओवी, गौळण, हमामा, हुतूतू, भारूड यांसारख्या जनसामान्यांना रूचतील, कळतील अशा पदांची रचना करून त्यांना अध्यात्म मार्गावर ठेवण्याचे मोठे काम वारकरी संतांनी केले व आजही वारीत भजन, कीर्तन, भारूड या माध्यमातून या रचना जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.
मात्र, वारीमध्ये सगळेच आलबेल आहे असे नाही. काही समाजविघातक घटक देखील या माध्यमाचा गैरवापर करत आहेत. वारकरी संतांच्या सर्वसमावेशक वृत्तीशी फारकत घेत जातीजातीतील तेढ वाढविण्याचे काम असे घटक करत आहेत. इरावती कर्वे यांनी आपल्या 1962 मध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे काही समाज, काही ख्रिश्चन मिशनरी वारीमध्ये केवळ धर्मांतरच्याच उद्देशाने आजही सामील होताना दिसतात. धर्म, लिंग, भाषा आदींच्या नावाखाली समाजातील एकोपा तोडण्याचे काम देखील अशा घटकांकडून होत आहे. मात्र, वारीमध्ये सहभागी होणार्‍या आणि वारकरी संतांच्या शिकवणुकीवर गाढ श्रद्धा असणार्‍या सर्वांनी प्रयत्नपूर्वक या घटकांना दूर ठेवणे गरजेचे आहे. तरच वारीचा सकस, सनातन वसा आपण पुढील पिढ्यांपर्यंत आणि विश्वभरात पोहोचवू शकू.
 
 
सहयोगी प्राध्यापक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली
 
(लेखिका ‘वारी पिलग्रिमेज: भक्ती, बीइंग अँड बियाँड’ या वारीवरील इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका आहेत.)