मराठी मना, विचार कर

विवेक मराठी    07-Jul-2025   
Total Views |
मराठी मना, याचा विचार कर. कुणीही उठावं आणि तुझ्यावर राज्य करावं, हे तू किती काळ सहन करणार आहेस? आणि कशासाठी सहन करणार आहेस? तुला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, विचारशक्ती दिलेली आहे. ही बुद्धी आणि विचारशक्ती वार्‍यावर सोडून वार्‍यासारखा तू कुणाच्याही मागे का धावत जातोस?
vivek
महाराष्ट्राचा विचार करता सध्या आपण एका अत्यंत कलुषित वातावरणात जगत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण दिशाहीन झालेले आहे. समाजकारण महाराष्ट्र विसरत चालला आहे. आषाढी एकादशीची वारी आली की, महाराष्ट्र विठ्ठलमय होतो, मात्र तो त्या दोन-तीन दिवसांपुरताच विठ्ठलमय असतो. यानंतर महाराष्ट्राचा ‘महाराष्ट्रधर्म’ म्हणून काही आहे का, हे शोधत बसावे लागते. राजकीय बातम्या अशा तर्‍हेने दिल्या जातात, निर्माण केल्या जातात, ज्या ऐकणे आणि पाहणे हा अत्यंत उबग आणणारा विषय असतो.
 
मराठी मनावर कुणाला राज्य करू द्यायचे, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. 1791साली फ्रेंच राज्यक्रांती झाली. या राज्यक्रांतीने एक जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्याचे चिंतन जगातील सर्व लोकशाही देशांच्या संविधानात प्रतिबिंबित झाले आहे. त्याची प्रस्तावना अशी म्हणते की, अज्ञान, विसरभोळेपणा आणि स्वतःच्या अधिकारांसंबंधी अनास्था, ही सार्वजनिक दुःखाची मुख्य कारणे आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर हे वाक्य तंतोतंत खरे ठरते.
 
 
महाराष्ट्रात कुणीही उभा राहतो आणि त्याला असं वाटतं की, आरक्षणाची आरोळी ठोकली की, मराठी माणसाचे कल्याण होईल. तो उपोषणाची साखळी सुरू करतो, मोठी हवा निर्माण केली जाते, मोर्चे काढले जातात, या मोर्चात विसरभोळे, अज्ञानी, स्वतःच्या अधिकारांसंबंधी अनास्था असलेले तरुण सामील होतात. उपोषण करणार्‍याचे नाव होते, त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळते. आंदोलन करणारे अनेकजण तुरुंंगात जातात. अनेकांची शेती, व्यवसाय घाट्यात येतात.
 
नंतर कोणाला वाटते की, मराठी अस्मितेला साद घातली पाहिजे. मराठी भाषेवर आक्रमण होता कामा नये, शाळेत हिंदी शिकवली जाता कामा नये, इंग्रजांची इंग्रजी शिकवायला काही हरकत नाही. हिंदी भाषा बोलणारे, हिंदीत व्यवहार करणारे खपवून घेता कामा नये, अशी आरोळी सेनापती ठोकतात. ती आरोळी ऐकून विसरभोळे, अज्ञानी, स्वतःच्या अधिकारांसंबंधी अनास्था असलेले आंदोलन करायला लागतात. सेनापती महालात सुरक्षित राहतात, आंदोलनकर्ते तुरुंगाची वाट चालू लागतात.
 
मराठी मना, याचा विचार कर. कुणीही उठावं आणि तुझ्यावर राज्य करावं, हे तू किती काळ सहन करणार आहेस? आणि कशासाठी सहन करणार आहेस? तुला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे, विचारशक्ती दिलेली आहे. ही बुद्धी आणि विचारशक्ती वार्‍यावर सोडून वार्‍यासारखा तू कुणाच्याही मागे का धावत जातोस?
 
मराठी मना, कधीतरी तू विचार करायला शिक की, जे वेगवेगळे विषय काढून आंदोलने करतात त्यांचे हेतू काय आहेत? अन्याय झालेल्या मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा त्यांचा हेतू आहे का? मराठी तरुणाईला उन्नत करण्याचा त्यांचा हेतू आहे का? मराठी तरुणाईला देशभर आणि विश्वभर पराक्रमी करण्याचा त्यांचा मानस आहे का? मराठी मना, याचा विचार केलास तर त्याची तुला उत्तरे सापडतील. हे फार गहन प्रश्न नाहीत. अतिशय गहन प्रश्नांची चर्चा करणारे क्वॉन्टम विज्ञान आहे. तेथे डोकं चक्रावून टाकणारे प्रश्न तुम्हाला सापडतील. तसे हे प्रश्न नाहीत.
 
मग तुला उत्तर सापडेल की, प्रश्न आरक्षणाचा नसतो, प्रश्न तथाकथित मराठी अस्मितेचा नसतो, प्रश्न फक्त स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवून देण्याचा असतो. राजकीय दिवाळखोरीत चालले दोन पक्ष आणि त्यांचे पक्षप्रमुख एकत्र येतात. त्यांचा हेतू आपले अस्तित्व राजकारणात नगण्य न होता अग्रगण्य झाले पाहिजे हा असतो. त्यांना तुमच्या भावना चेतवून त्यावर स्वार व्हायचे आहे. मराठी मना तू याचा विचार कर की, कुणालाही आपल्या पाठीवर बसू द्यायचे का? त्यांचा घोडा बनायचे का?
 
 
मराठी मना, तुला आपल्या पूर्वजांचे स्मरण सतत केले पाहिजे. स्वतःकडे नगण्य साधनसामुग्री असताना एक तरुण उभा राहतो, ज्याचे नाव शिवाजी आणि तो रायगडावर स्वपराक्रमाने हिंदूचे स्वतंत्र सिंहासन निर्माण करतो. हे शिवाजीपण हे आपले मराठीपण आहे. अंदमानच्या काळ कोठडीत मरणासन्न यातना सोसून स्वातंत्र्याची आग धगधगीत ठेवणारे वीर सावरकर हे आपले मराठीपण आहे. खेळामध्ये विश्वविक्रम करणे हे आपले मराठीपण आहे. एखाद्या विषयात गाडून घेणे आणि त्यासाठी आपले सर्व आयुष्य अर्पण करणे, जसे बाबा आमटे यांनी केले, त्याआधी विनोबा भावे यांनी केले, डॉ. बाबासाहेबांनी केले, भटके-विमुक्तांच्या कल्याणासाठी आज गिरीश प्रभुणे करीत आहेत, हे आपले मराठीपण आहे.
 
 
याचा विसर पडू देणे म्हणजे अधोगतीच्या मार्गाने जाण्यासारखे आहे. आज मराठी मनापुढे वेगाने बदलत जाणार्‍या तंत्रज्ञानाने शेकडो आव्हाने उभी केली आहेत आणि तेवढ्याच संधी उपलब्ध केलेल्या आहेत. आज प्रजातंत्र म्हणजे वाट्टेल ते बडबडण्याचे मुक्त स्वातंत्र्य असा विकृत अर्थ राहिलेला नसून प्रजातंत्र म्हणजे सामूहिकरूपाने उद्ममशील बनून प्रचंड आर्थिक प्रगती करून घेणे ज्याला आपण विकास म्हणतो, या विकासाच्या वाटेवर घोडदौड करणे हा प्रजातंत्राचा आजचा अर्थ आहे.
 
 
मराठी मनात प्रचंड शक्ती आहे. त्याच्या भुजांत शक्ती आहे, त्याच्या पायांत शक्ती आहे, त्याच्या वाणीत शक्ती आहे, विसरभोळेपणामुळे त्याचे विस्मरण होते आणि नको त्या लोकांना आपण डोक्यावर बसवून घेतो. यातून सावध झाले पाहिजे. कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता ईश्वराने दिलेल्या विचारशक्तीचा त्याग न करता वाटचाल आपण केली पाहिजे. कोट्यावधी मराठी तरूणांने एकदिलाने जर संकल्प केला की, आम्हा सर्व क्षेत्रात उंच भरारी मारायची आहे, एकमेकांना साहाय्य करून आणि आपल्या आवतीभोवती समाजहिताची चिंता करणार्‍यांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे संत तुकोबारायांनी दिलेला सल्ला आपण लक्षात ठेवला पाहिजे की, आणिक नका पडू गाबाळाचे भारी, तेथे आहे थोरी नागवण। तेव्हा कुणाच्याही नादी लागणं, म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा अवमान करणे आहे, याचे स्मरण नित्य असावे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.