बिकट वाट, प्रखर ध्येयनिष्ठा

09 Jul 2025 13:18:15
 
girish prabhune biography in marathi
पुनरुत्थान आणि तेही समरसतेच्या प्राणतत्त्वाद्वारे करणारे गिरीशजी प्रभुणे आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांचा चिंचवडला सत्कार होईल. हा सत्कार एका व्यक्तीचा नसून भटके-विमुक्त ऐतिहासिकतेचा आहे. त्यांच्या सन्मानाचा आहे आणि त्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा आहे. आपल्या समाजबांधवांसाठी भटकेपण स्वीकारून व्यक्तिगत जीवनातून विमुक्त होणार्‍या गिरीश प्रभुणे यांना निरामय आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
बालवयात संघाचे एक गीत आम्ही कंठस्थ केले होते. या गीतातील काही ओळी अशा-
 
संघ कार्य आसान नहीं है
लेकिन डरना काम नहीं है
निशीदिन कष्ट उठाना है
कार्यपूर्ती अब करना है॥
मातृभूमी का मान बढाने
होना है बलिदान
हिंदू भूमी की हम संतान॥’
 
गिरीश प्रभुणे यांनीदेखील बालवयात शाखेत कंठस्थ केले असेल. बालवयात ‘संघकार्य आसान नहीं है’ हे फक्त शब्द समजले, परंतु त्यात दडलेला अर्थ समजायला खूप वर्षे लागली. संघकार्य म्हणजे काय? रोज शाखेत जाणं, शाखेतील शारीरिक, बौद्धिक कार्यक्रम करणं, एखादं गीत म्हणणं, शेवटी संघ प्रार्थना म्हणून घरी येणं. हे संघकार्य तर सोपं काम आहे. शाखा भरण्याच्या वेळी शाखेत जायचं, पूर्णवेळ शाखेत राहायचं आणि नंतर घरी यायचं.
 
 
परंतु संघकार्य तेथेच थांबत नाही. संघ म्हणजे हिंदू समाज. हिंदू समाज म्हणजे हिंदू समाजाचे अगणित प्रश्न. हिंदू समाजाचे अगणित प्रश्न म्हणजे त्या प्रश्नांना जाऊन भिडणं, ते प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करणं. हे काम सुरू झाले की, खर्‍या अर्थाने संघकार्य सुरू होते. मग कुठल्याही क्षेत्रातील काम असेना, या गीताची ओळ आठवू लागते, ‘संघकार्य आसान नहीं है.’
 
 
गिरीश प्रभुणे यांनी संघकार्य म्हणजे हिंदू समाजातील भटके आणि विमुक्त यांच्या पुनरुत्थानाचे अगणित प्रश्न आपल्या डोक्यावर घेऊन ते सोडविण्यासाठी काम सुरू केले. या कामाची कुठली पूर्वपिठीका नाही. व्यापक संघकामाला कोणतीही पूर्वपिठीका नसते. त्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जेव्हा चालू लागतो, तेव्हा वाट तयार होते. ती त्या क्षेत्राची वाट ठरते. या वाटेवर असंख्य काटे, अणकुचीदार पत्थर लागतात. काटे आणि पत्थर यांचे आघात सहन करायचे, डोकं शांत ठेवायचं आणि चालत राहायचं.
 
 
गिरीश प्रभुणे यांची पंचाहत्तरी म्हणजे हा अखंड चालण्याचा प्रवास आहे. या वाटेवर चालता चालता त्यांना प्रथम पारधी भेटले, नंतर नंदीबैलवाले, मरीआईवाले, मसणजोगी, गोंधळी, कोल्हाटी, डोंबारी, गोपाळ, हा गोतावळा वाढत वाढत तीस-पस्तीस जातीजमातींपर्यंत गेला. हिंदू समाजातील जातींचा विचार करता गिरीश प्रभुणे ब्राह्मण आणि त्यांना भेटलेले हे सर्व अब्राह्मण. म्हणून अनेक भटक्यांच्या मनात पहिला प्रश्न आला, हा बामणाचा पोरं आमच्यात येऊन का मिसळतो?
 
 
girish prabhune biography in marathi
 
ते सर्व गिरीश प्रभुणे याला पारखू लागले. हे पारखणं म्हणजे सोन्याने आपली शुद्धता सिद्ध करण्यासाठी अगीत स्वतःला तापवून घेणे होते. ही फार अवघड परीक्षा होती. त्यात स्वयंसेवक गिरीश प्रभुणे यशस्वी झाले. ते गिरीश प्रभुणे राहिले नाहीत, ते सर्वांचे काका झाले. आत्मीयतेने ज्याच्यापुढे गार्‍हाणी सांगावीत, आपल्या व्यथा सांगाव्यात असे स्थान भटके-विमुक्त समाजाला प्राप्त झाले.
 
 
डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे, एवढा मंत्र दिला. संघटन का करायचे आहे तर संघटनेअभावी हा समाज दुर्बळ झालेला आहे. त्याला सबळ करायचे आहे. केवळ चार लोक गोळा केल्याने सबळता निर्माण होत नाही. सबलतेची वेगवेगळी रूपे आहेत. आर्थिक सबलता, शैक्षणिक सबलता, सामाजिक सुरक्षा सबलता, हिंदू संघटन मंत्राचा हा अर्थ होतो. गिरीश प्रभुणे यांनी हा अर्थ लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली.
 
 
त्यांनी भटके आणि विमुक्त समाजाचे मंत्रालयावर मोर्चे काढले नाहीत. मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी याचना मनोवृत्ती त्यांनी निर्माण केली नाही. त्यांनी या समाजाचे आत्मभान जागे करण्याचा प्रयत्न केला. सुरुवात केली, मुलं आणि मुलींना शिक्षण देण्यापासून. पिढ्यानपिढ्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मुक्त संचार करणारी ही पाखरे शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त राहणं फार कठीण होतं. मुले पळून जातं, अजूनही जातात. मग त्यांच्या शोधासाठी गावोगाव भटंकती करायची, शोधून त्यांना पुन्हा शाळेेत आणायचे. गिरीशने कधी असा विचार केला नाही की, चार मुले गेली तर गेली, तेवढी डोक्याची कटकट कमी झाली. ज्यांना आत्मीयतेने जवळ केले, त्यांना असे वार्‍यावर सोडता येत नाही.
 
 
गेली तीस वर्षे हे कार्य चालू आहे. तीस वर्षांत किमान दोन पिढ्या शिक्षण घेऊन पुढे गेल्या आणि जीवनात स्थिरावल्या. भटकेपण संपलं आणि प्रतिष्ठेचे जीवन वाट्याला आलं. कुणी इंजिनीअर, डॉक्टर, नर्स, शिक्षक, कुणी सरकारी अधिकारी, पोलीस, परिवर्तनाची एक खिडकी उघडली गेली.
 
 
गिरीश प्रभुणे इथेच थांबले नाहीत. तर हा भटके-विमुक्त समाज आहे कोण? भारताच्या प्राचीन संस्कृतीतील त्याचे स्थान कोणते? गावगाड्यात तो नेमका कोठे बसतो? एकेकाळी सोन्याचा धूर निघणार्‍या भारतातील संपत्ती निर्माण करण्यात, सुखसमृद्धी निर्माण करण्यात या समाजाचा वाटा किती? गिरीश प्रभुणे यांचे हे संशोधन पुस्तकी संशोधन झाले नाही. अनार्यवादाचा मूर्ख सिद्धांत त्यांनी सांगितला नाही, मनुवादाची वटवट त्यांनी केली नाही. एक गोष्ट अतिशय ठामपणे मांडली, ती म्हणजे आम्ही भटके-विमुक्त या व्यापक हिंदू समाजाचे अंग आहोत. आमचा इतिहास अतिशय प्राचीन आहे.
 
 
आम्ही संपत्ती निर्माण करणारे आहोत. वेरूळ-अंजिठ्यासारखी शिल्पे आम्ही घडवली आहेत. न गंजणारा पोलादाचा अशोक स्तंभ घडविणारे आम्ही आहोत. भव्य राजप्रासाद आणि भव्य मंदिरे बांधणारेदेखील आम्हीच आहोत, आम्हीच आहोत कृषी संस्कृतीचे रक्षणकर्ते. आम्हीच आहोत निसर्गचक्राचे अचूक ज्ञान असणारे. आम्हीच आहोत माणसांची योग्य पारख करणारे, आणि आम्हीच आहोत नाडीवरून व्यक्तीच्या स्वास्थ्याची चिकित्सा करणारे, आम्ही ज्ञानभांडार आहोत. इंग्रजी राजवटीने आम्हाला देशोधडीला लावले. ज्ञानी असून आम्ही अज्ञानी ठरलो. पदवीचं भेंडोळे आमच्याकडे नसल्यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही डावलले गेलो.
 
 
या सर्वांचे पुनरुत्थान आणि तेही समरसतेच्या प्राणतत्त्वाद्वारे करणारे गिरीशजी प्रभुणे आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांचा चिंचवडला सत्कार होईल. हा सत्कार एका व्यक्तीचा नसून भटके-विमुक्त ऐतिहासिकतेचा आहे. त्यांच्या सन्मानाचा आहे आणि त्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा आहे. आपल्या समाजबांधवांसाठी भटकेपण स्वीकारून व्यक्तीगत जीवनातून विमुक्त होणार्‍या गिरीश प्रभुणे यांना निरामय आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Powered By Sangraha 9.0